रायगडच्या कर्जतमध्ये बंधारा फुटला; राज्यातल्या पावसाची स्थिती जाणून घ्या

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील बंधारा फुटला आहे.
फोटो कॅप्शन, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील बंधारा फुटला आहे.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील बंधारा फुटला आहे. या घटनेमुळे परिसरात पाणी शिरला आहे. लोकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

आजही राज्याच्या मुंबईसह किनारपट्टीतल्या भागात पावसाला सुरुवात झालीय.

मात्र, मुख्यमंत्री कार्यलयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे.

विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.

पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; राज्यातील पावसाचा अंदाज जाणून घ्या

तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

फोटो स्रोत, DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज (8 जुलै) पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर व विठ्ठल नगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

यावेळी महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

खडकवासला धरण

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc

फोटो कॅप्शन, खडकवासला धरण

या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या. नदीपात्रालगत तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

महापौर म्हणाल्या, "पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल."

पुढील पाच दिवसांचा कसा आहे अंदाज?

मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 7 जुलै रोजी पालघर, नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

7 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरघाट,अहिल्यानगर, धुलेजळगाव, वाशीम आणि वर्धा, नागपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, सातारा घाट आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.

फोटो स्रोत, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य

फोटो कॅप्शन, मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.

8 जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे यलो अलर्ट राहणार असून, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल.

9 जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

10 जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. 11 जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेने नागरिकांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)