मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारला 90 दिवसांची मुदत

फोटो स्रोत, Facebook/Uday Bhise Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
ते अंतरवाली सराटीहून मुंबईला निघाले होते. पण, या दौऱ्यात त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पाटोदा इथं सकाळी दाखल झालं.
मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला.
यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं. सकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली.
"3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मी आज उपोषण स्थगित करतो, मात्र आंदोलन सुरुच राहणार," असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, facebook/manojjarangepatil96k
मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळासमोरच्या प्रमुख मागण्या काय?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारसोबत झालेल्या बैठकीत मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या.
त्यांनी हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि त्याची वैधता (व्हॅलिडिटी) देण्यासाठी सुधारित शासन निर्णय (जीआर) काढण्याची मागणी केली. मराठा आणि कुणबी ही एकच जात असल्याचे स्पष्ट करणारा जीआर राज्य सरकारने काढावा, अशीही त्यांची मागणी होती.
जरांगे म्हणाले, राज्य सरकारने अलीकडे हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि वैश्य वाणी या जाती एकच असल्याचे मान्य करणारा जीआर काढला. त्याच धर्तीवर मराठा-कुणबी एकच आहेत, असे सरकारने जाहीर करावे.
त्यांनी आणखी एक मागणी करताना म्हटलं की, स्वातंत्र्यपूर्व काळात मराठा समाज कुणबी म्हणून ओळखला जात होता आणि आरक्षणात त्याचा समावेश न होणे ही ऐतिहासिक चूक होती, असा उल्लेखही जीआरमध्ये करावा.
तसेच, न्या. संदीप शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदी कायम ठेवण्याची लेखी हमी सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रांचे वाटप आणि व्हॅलिडिटी देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम द्यावा आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही असावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री यांनी माध्यमांसमोर येऊन याबाबत सार्वजनिक आश्वासन द्यावे, असंही ते म्हणाले.
सरकारने कोणती आश्वासने दिली?
बैठकीनंतर सरकारने पुढील बाबींवर सहमती दर्शवल्याचं सांगण्यात आलं.
- सातारा, कोल्हापूर, पुणे आणि औंध गॅझेट संदर्भातील सुधारित जीआर तीन महिन्यांत लागू करण्यात येईल.
- हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी सुधारित जीआर काढण्यात येईल.
- हैदराबाद गॅझेटनुसार दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांची वैधता देण्याची प्रक्रिया सुरू राहील.
- न्या. संदीप शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदी कमी केल्या जाणार नाहीत.
- मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची रद्द करण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे पुन्हा वैध करण्यात येतील.
मुंबईकडे निघाले होते मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे मंगळवारी (15 सप्टेंबर) अंतरावाली सराटीहून मुंबईकडे निघाले. बीडमध्ये त्यांनी मुक्काम केला, पण त्यानंतर त्यांची तब्येत ढासळली होती.
मनोज जरांगे यांचं गेल्या 19 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. उपोषणादरम्यान अन्न पाण्याविना त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांचं बीपी आणि शुगर लेव्हल लो झाल्याचं बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीशकुमार सोळंके यांनी सांगितलं होतं.
मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर एकटाच मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
मुंबईत आंदोलनासाठी निघण्यापूर्वी त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. तसेच यानंतरही पोलिसांनी परवानगी न दिल्यास कोट्यवधी मराठे विनापरवानगी मुंबईला येणार, असा इशारा दिला होता.
दरम्यान, यापार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांनी उत्सवाच्या काळात लोकांना त्रास होईल, असं काही करू नये, असं आवाहन केलं होतं.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
मुंबईला निघाल्यानंतर रस्त्यात विविध ठिकाणी जात असताना मनोज जरांगे यांची बीडमध्ये पोहोचल्यावर तब्येत बिघडली होती.
त्यानंतर बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी त्यांना तपासून उपचार केले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करत आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना डॉक्टर सोळंके म्हणाले, "त्यांचं बीपी लो आहे. शुगर लेव्हलदेखील लो आहे. शरीरात पाण्याची कमतरता आहे. आम्ही त्यांना तपासणीसाठीची विनंती केली होती, त्यांनी ती मान्य केली. त्यांनी आम्हाला उपचार दिला आहे. त्यांना सलाईन लावली आहे. डिहायड्रेशनमुळे शरीरावर परिणाम होतात. तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील उपचार करण्यात येतील."

फोटो स्रोत, ANI
याआधी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केली होती. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. मात्र, पोलिसांनी अनेक कारणांची यादी देत या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती.
आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु बिडकर यांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाला परवानगी नाकारताना एक पत्र पाठवत कारणांची यादीच दिली होती.
यात जरांगे यांच्या मागील वर्षीच्या आंदोलनातील संदर्भ देत गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर जरांगे मुंबईकडे निघाले आहेत.
मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंनी लोकांना त्रास होणार नाही, असा निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.
"गणेशोत्सव हिंदुंच्या सणांमधल्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. या उत्सवात विघ्न येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत. ते पुढेही करू शकतात."
"यावेळी त्यांनी केलेल्या मागण्यांमधल्या कायदेशीर असलेल्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यांनी एकूण 13 मागण्या केल्या होत्या त्यापैकी 12 मान्य झाल्या. जी मागणी मान्य होऊ शकत नव्हती त्यात कायद्याची अडचण काय, कोर्टातील केस, कोर्टाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचे नुकसान कसं होईल हे त्यांना समजून सांगण्यात आलं होतं."
"त्यामुळं अशा पद्धतीनं भूमिका न घेता सणासुदीच्या दिवसांत लोकांना त्रास होणार नाही, असा निर्णय त्यांनी घेणं अपेक्षित आहे," असं फडणवीस म्हणाले.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, "मराठा समाजाने आधीही विविध मोर्चे काढले आहेत. त्यावेळी सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली होती."
"मुंबईतील गणेशोत्सवाला देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यामुळे आंदोलनाचा अधिकार असला, तरी गणेशभक्त आणि सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सरकार आणि पोलीस यंत्रणा त्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहेत," असं शिंदे म्हणाले.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे म्हणाले, "आता मी एकटाच मुंबईला चाललो आहे. आता कसे अडवतात ते बघतो. कोण आझाद मैदानाला परवानगी देत नाही तेही बघतो."
"मराठ्यांची तिथं गर्दी होणार आहे, अडथळे निर्माण होणार आहे म्हणूनच परवानगी नाकारली आहे ना. म्हणूनच फडणवीसांनी मराठ्यांवर वार केला ना. आता मी एकटा येत आहे. आता फडणवीसांना मराठ्यांना नाव ठेवायला नाक नाही. मराठ्यांना प्रतिडाव टाकता आला पाहिजे. आता परवानगी नाकारायला नाक आहे का?" असा प्रश्नही जरांगे यांनी विचारला.
"आता जर परवानगी नाकारली, तर मग कोट्यावधी मराठे विनापरवानगी बेकायदेशीरपणे मुंबईला येणार," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
परवानगी नाकारताना पोलिसांनी काय म्हटलं?
याआधी, मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांकडे आंदोलनाची परवानगी मागितली होती. ती पोलिसांनी नाकारली होती.
परवानगी नाकारताना पोलिसांनी म्हटले होते, "तुमचा 19 सप्टेंबर 2026 पासून 'मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आझाद मैदान, मुंबई येथे प्रस्तावित आंदोलन, उपोषण व धरणे' याबाबतचा अर्ज 12 सप्टेंबरला आझाद मैदान पोलीस ठाण्याला मिळाला."
"आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती, आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही असे नमुद करण्यात आले आहे. परंतु तुम्ही 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये जाहीर केलं, "खोपोली फायनल पकडून चला, 5व्या दिवशी आपण सकाळी 10 वाजता आझाद मैदानला आमरण उपोषण सुरू करतोय."
"तुम्ही केलेल्या अर्जात "आंदोलन व आमरण उपोषण" असे नमूद केले आहे. मागील वर्षी तुम्ही 29 ऑगस्ट 2025 पासून पुढे अनिश्चित कालावधीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. यातून माझी खात्री झाली आहे की, तुम्ही 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025 च्या' नियमाचा भंग करणार आहे."

फोटो स्रोत, ANI
या नियमावलीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, "कोणत्याही आंदोलनास, एकाच वेळी फक्त एकच दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व इतर शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही. तसेच आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी निश्चित करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 6 वाजता आंदोलनस्थळ रिकामे करण्याबाबत नमूद आहे."
"तुमच्या अर्जामध्ये 19 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचे नमूद केले आहे. हा शासकीय सुट्टीचा दिवस आहे. तुमच्या अर्जामध्ये मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन असे नमूद केले आहे."
"2025 मध्ये तुम्हाला जाहीर सभा, आंदोलने व त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या परवानगीनुसार 29 ऑगस्ट 2025 ला सायंकाळी 6 वाजता आंदोलन स्थगित करणे अपेक्षित होते. परंतु आपण नियमांचे पालन न करता तुमचे आंदोलन 2 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवले होते. 2025 मध्ये आंदोलन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला नियमावलीची प्रत देण्यात आली होती. असं असूनही या नियमावलीचा भंग केला होता. त्यामुळे तुमचे 19 सप्टेंबर 2026 चे आंदोलन सायंकाळी 6 वाजता स्थगित होणार नाही हे स्पष्ट होत आहे. यातून माझी खात्री झाली आहे की, तुम्ही 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियमां"चा भंग करणार आहे."
'गाड्या आहेत लाखात'
12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीच्या सभेमध्ये तुम्ही जाहीर केले, "आजच्या आज मुंबईला जाऊ शकता का? नाही, कारण गाड्या आहेत लाखात". यातून स्पष्ट होतं की, तुमच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल.
यापूर्वी 2025 मधील आपल्या आंदोलनामधील ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली होती. मात्र तुम्ही आझाद मैदान व परिसरामध्ये सुमारे 5000 वाहने आणली.
सर्व मुख्य मार्गावर व चौका-चौकात वाहने उभी करून वाहतूक कोंडी व अडथळे निर्माण केले होते. यातून माझी खात्री झालेली आहे की, तुम्ही 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025'च्या नियमाचा भंग करणार आहे.

फोटो स्रोत, ANI
आंदोलकांची कमाल संख्या 5000 पर्यंतच ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, तुम्ही 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथील सभेमध्ये जाहीर केले, "आजच्या आज मुंबईला जाऊ शकता का? नाही, कारण गाड्या आहेत लाखात". तसेच "मुंबईत बसण्यासाठी सुद्धा लाखो करोडोंने या" असे आवाहन तुम्ही केले आहे.
2025 मध्ये केलेल्या आंदोलनामध्येही 5 हजार आंदोलकांची मर्यादा ठेवणे बंधनकारक होते. मात्र, 29 ऑगस्ट 2025 ला सुरू केलेल्या आंदोलनात आझाद मैदान येथे सुमारे 40 हजार आंदोलकांचा समावेश केला होता. हे पाहता तुम्ही 5 हजारपेक्षा जास्त आंदोलक आणून नियमभंग केला होता.
'इतरांचा आंदोलनाचा हक्क बाधित'
2025 मध्ये तुम्ही आंदोलनासाठी अर्ज करण्यापूर्वी इतरही आंदोलकांनी 29 ऑगस्ट 2025 ला आंदोलनासाठी परवानगी मागितलेली होती.
इतर आंदोलन करणान्या आंदोलकांचा आंदोलन करण्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आंदोलकांच्या 5 हजार संख्येमध्ये त्यांचाही समावेश असेल आणि त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करून देणे हे तुमच्यावर बंधनकारक होते, असे परवानगी पत्रात तुम्हाला सांगण्यात आले होते.
परंतु, तुमच्या आंदोलनाने संपूर्ण परिसर व्यापल्याने त्या दिवशी इतर आंदोलनांना परवानगी देता आली नाही. त्यामुळे त्यांचा आंदोलनाचा हक्क बाधित झालेला होता. त्यामुळे तुम्ही नियमभंग करणार असल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी परवानगी नाकारताना म्हटले होते.
'वाहनांच्या टपावर चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केले'
पोलिसांनी परवानगी नाकारताना जरांगे यांनी केलेल्या जुन्या आवाहनाचा देखील उल्लेख केला होता.
पोलीस म्हणाले होते, तुम्ही "मुंबईत बसण्यासाठीही लाखों करोडोंने या" असे आवाहन केले आहे. तसेच लाखो वाहने आणण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु तुमच्या आंदोलकांनी 2025 च्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सी.एस.एम.टी, चर्चगेट ही रेल्वे स्थानके, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन, सी.एस.एम.टी. जंक्शन इत्यादी ठिकाणी मोर्चे नेऊन रस्ता रोको केले.
"रस्त्यावर बसून, झोपून, अन्न शिजवून आणि इतर कृत्ये करून सार्वजनिक वाहतुकीला अडथळे आणले. तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहनांचे टपावर चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केले," असे पोलिसांनी परवानगी नाकारताना म्हटले होते.

फोटो स्रोत, ANI
पोलिसांनी म्हटले होते की आंदोलकांनी रस्त्यावरील सिग्नल पोलवर चढून नारेबाजी केली होती. तसेच, मुंबई शहरातील बेस्ट उपक्रमातील सिटी बसमध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरिकांशी गैरवर्तन करून भांडणे केली होती.
अशाप्रकारे तुमच्या आंदोलकांनी आपल्या आंदोलनादरम्यान नियमबाह्य वर्तन केले. यावरून असे स्पष्ट होते की, आंदोलनात लाखो आंदोलक येणार असून त्यावर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही. यावरून तुम्ही नियमभंग केला असल्याचे निदर्शनास येते, असे कारण पोलिसांनी दिले होते.
'राहिलेले अन्न रस्त्यावरच सोडले, फूटपाथवर अंघोळ'
पुढे पोलिसांनी म्हटले होते, "नियमानुसार सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती वर उल्लेख केलेल्या ठिकाणी अन्न शिजवणार नाही किंवा केर कचरा टाकणार नाही असे नमूद आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीच्या वाहनांमध्ये, रस्त्यावर अन्न शिजवून वाटप केल्याचे निदर्शनास आले होते. तसेच राहिलेले अन्न हे रस्त्यावरच सोडलेले होते. त्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
"2025 च्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक जागेत, रस्त्यांवर, फूटपाथवर अंघोळ करणे इत्यादी प्रकार करून सार्वजनिक जन जीवनाचा, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण केला होता.
"त्यामुळे यावर्षीही त्याचप्रकारे पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. म्हणून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल याबाबत माझी खात्री पटलेली आहे," असं पोलिसांनी म्हटलं होते.
'तुमच्याकडून नियमावलीचा भंग जाणीवपूर्वक करण्यात येईल'
पुढे पोलीस म्हटले होते, 14 सप्टेंबरपासून मुंबई शहरात मोठया प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवादरम्यान होणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीमुळे मुंबई ही कायम राष्ट्रविघातक शक्तीच्या निशाण्यावर राहिलेली आहे.
त्यादृष्टीने अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. या आंदोलनादरम्यान होणाऱ्या अलोट गर्दीमुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनामध्ये बाधा निर्माण होईल. असे पोलिसांनी म्हटले होते.
"तुमच्याकडून सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच 'जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम 2025 मधील नियमावलीचा भंग जाणीवपूर्वक करण्यात येईल याबाबत माझी खात्री पटलेली आहे.
"तसेच दक्षिण मुंबई परिसरातील शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक आरोग्य बाधित होऊन सार्वजनिक सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मी तुमच्या 19 सप्टेंबरपासूनच्या आझाद मैदानातील आमरण उपोषण व आंदोलनाला मागितलेली परवानगी नाकारत आहे," अशी माहिती आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु बिडकर यांनी दिली होती.
परवानगी नाकारली नंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि केवळ आपण एकटेच आता मुंबईला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आता त्यांच्या या भूमिकेनंतर पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























