'राजकीय पोळ्या भाजू नका', जे. पी नड्डांचं विरोधकांना आवाहन

Published
वाचन वेळ: 15 मिनिटे

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका केली.

ते म्हणाले की, भूतकाळातही अनेक राज्यांमध्ये अनेक वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत.

नड्डा म्हणाले, "तुम्हाला या मुद्द्यावर राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत, हे दुर्दैवी आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. अशा घटनांची मोठी यादी आहे, ज्या वेळी यूपीएची सरकारे सत्तेत होती आणि पेपरफुटी झाली होती."

ते पुढे म्हणाले, "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. या विषयावर सखोल चर्चा व्हावी. संसदेतच यावर गांभीर्याने चर्चा होऊ शकते. आपण ठोस धोरण घेऊन यायला हवे, कारण देशातील मुले हे देशाचे भविष्य आहेत. ही केवळ सरकारचीच नव्हे तर विरोधकांचीही जबाबदारी आहे."

जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, ते आंदोलकांशी चर्चेसाठी तयार आहेत. आंदोलक जेव्हा म्हणतील तेव्हा सरकार त्यांच्याशी चर्चा करेल. मात्र, आज कोणतीही चर्चा झालेली नाही.

सोनम वांगचूक यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला असून मी अजूनही जिंवत असून उपोषणाच्या 25 व्या दिवशी आपलं 11 किलो वजन कमी झाल्याचं त्यांनी सांगितलंय.

जंतर-मंतरवरून हलवल्यानंतर सोनम वांगचूक पहिल्यांदाच समोर आलेले आहेत.

त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय की, "माझ्या बऱ्याच मांसपेशी कमकुवत होत आहेत. पण, मी ठीक आहे. काल मला गुरूग्राममधील एका खासगी दवाखान्यात आणण्यात आलंय."

ते म्हणाले की, "मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटू इच्छितो ज्यांनी स्वत: लाठी झेलत इतक्या शांततेमध्ये आंदोलन पार पाडलं. इतकं उकसवून सुद्धा पलटून तुम्ही हल्ला केला नाहीत. आधीपासूनच दगडं आणून ठेवण्यात आली, तरीही तुम्ही शांत राहिलात, हे पाहून माझं मन भरून आलं. फारच क्रूरपणे हल्ले होत होते म्हणून मी माझं उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आताही अनेक राजकीय नेते माझ्याकडे उपोषण सोडण्याची विनंती करण्यासाठी आले होते. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीही 65 खासदारांची स्वाक्षरी असलेलं पत्रही घेऊन आले होते.

मात्र, मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी पुन्हा अशा ताकदीचा प्रयोग करू नका. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत, हे आश्वासन मला तातडीनं मिळालं तरच मी आज उपोषण सोडेन. मात्र, जर असं आश्वासन मला मिळालं नाही, तर मी उपोषण सुरू ठेवेन," असंही ते म्हणाले आहेत.

शिवाजी पार्क परिसरात मोठं आंदोलन

दादरमधील शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली आहे. ही गर्दी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

मुंबईत पाऊस असतानाही आंदोलक शेकडोंच्या संख्येनं जमले. तसेच तेथे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही उपस्थित राहिले.

बीबीसी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, दादरमध्ये मुला-मुलींना पोलीस पकडून घेऊन जात होते. आंदोलक आणि पोलिसांची बाचाबाचीही होत होती. पोलिसांनी बराच वेळ थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी लाँग मार्च करत शिवाजी पार्कच्या दिशेनं मार्गक्रमण केलंय.

मनसे प्रमुख राज ठाकरे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून आंदोलक घोषणाही दिल्या.

मुंबई पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी संध्याकाळी चेंबूरमधील कारवाईची माहिती दिली.

ते म्हणाले, "दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास चेंबूर पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चौकात जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी 700-800 आंदोलनकर्ते सामील झाले होते. त्यावेळी पोलिसांनी संयमाने त्यांना समजावले व त्यांना तिथून निघून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर जमाव पांगला. त्यातील सुमारे 200 इसम यांना जमावातून बाजूला घेऊन ताब्यात घेतले होते. त्या अनुषंगाने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व इतर कलमानुसार आंदोलनकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे."

सोनम वांगचूक यांचं सरकारला पत्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (22 जुलै) पत्रकार परिषद घेऊन 'शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा,' या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला, सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण थांबवावं, अशी विनंती कॉक्रोच जनता पार्टीनं केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सरकारकडे काही मागण्या करणारं एक नवं पत्र प्रसिद्ध केलं आहे.

त्यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा जी आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी उद्देशून हे पत्र लिहिलं आहे.

या पत्रात त्यांनी म्हटलंय की, "आदरणीय नड्डा जी आणि जितेंद्र सिंह जी, काल रात्री रुग्णालयात माझी भेट घेतल्याबद्दल आणि माझं उपोषण मागे घेण्याबाबत कळकळीची विनंती केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या चर्चेदरम्यान, आपण मला आश्वासन दिलं की सरकार खालील बाबींचा सकारात्मक विचार करेल:

  • परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई देणं.
  • जबाबदारी निश्चित करण्यासाठी संसदेत सविस्तर चर्चा करणं, ज्यामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विचार करणंही समाविष्ट असेल.
  • पोलिसांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरेकी वापर असूनही, 20 जुलै 2026 रोजी झालेला 'चलो संसद' मोर्चा अत्यंत शांततापूर्ण राहिला. लोकशाही मार्गाने निषेध करण्याबाबतची त्यांची संयमवृत्ती आणि निष्ठा संपूर्ण देशानं आणि जगानं पाहिली. मला मनापासून आशा आहे की, यात सहभागी झालेल्यांविरुद्ध कोणतेही कायदेशीर खटले, छळ किंवा सूडबुद्धीनं केलेली कारवाई करून लोकशाही संस्थांवरील हा विश्वास आणखी कमकुवत केला जाणार नाही.

पुढे त्यांनी म्हटलंय की, "आपल्या भेटीनंतर, विविध राजकीय पक्षांतील सुमारे 65 खासदारांनी मला पत्रे लिहिली आहेत. काहीजण आधीच येऊन गेले आहेत आणि इतर काहीजण आज संध्याकाळी येण्याची शक्यता आहे. त्यांनी मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे आणि आठवण करून दिली आहे की, देशाच्या सेवेसाठी मला अजून खूप काम करायचं आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. मला जगायचं आहे. मला माझ्या विद्यार्थ्यांकडे, शिक्षणाकडे आणि ज्या कार्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला आहे, त्या कामाकडे परत जायचं आहे. परंतु, ज्या तरुण मुलांसाठी ही चळवळ सुरू झाली, त्यांच्या हिताचा बळी देऊन मी तसे करू शकत नाही."

"त्यामुळे, मी सरकारकडे आदरपूर्वक अशी स्पष्ट हमी मागतो की, या चळवळीत सहभागी झाल्याबद्दल कोणत्याही तरुण आंदोलकावर दंडात्मक किंवा सूडबुद्धीनं कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. न्याय्य आणि जबाबदार शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवणं हाच त्यांचा एकमेव 'गुन्हा' आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

"सरकारने केवळ माझीच नव्हे तर लाखो तरुण भारतीयांच्या आकांक्षांचीही दखल घेतली आहे, अशी हमी दिली तर या विश्वासासह मी माझं उपोषण मागे घेईन. अशी हमी न मिळाल्यास, मला माझं उपोषण अनिश्चित काळासाठी चालू ठेवण्यास भाग पाडलं जाईल. तसेच, मला आशा आहे की या चळवळीला दडपण्यासाठी पोलिसांकडून बळाचा अतिरेकी वापर केला जाणार नाही. आपल्या लोकशाहीचे भवितव्य हे ती आपल्याशी सहमत असलेल्यांशी कशी वागते यावर अवलंबून नाही, तर जेव्हा तरुण नागरिक धैर्य, आशा आणि ठाम विश्वासानं बोलण्याचं धाडस करतात, तेव्हा ती त्यांच्याशी कशी वागते यावर अवलंबून आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.

'दहा वर्षांत 152 वेळा पेपरफुटी, एकालाही शिक्षा नाही' - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (22 जुलै) पत्रकार परिषद घेऊन 'शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा,' या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.

त्यांनी सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत, त्यातील पहिली मागणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आहे. दुसरी मागणी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आहे तर पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागण्याची तिसरी मागणी आहे.

या पत्रकार परिषदेत त्यांनी शिक्षणव्यवस्थेची दुर्दशा झाल्याचा आरोप करत त्यामध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचं नमूद केलंय.

10 वर्षांत 152 वेळा पेपरफुटी झाली असून एकालाही शिक्षा झालेली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

'आम्ही संवादासाठी सरकारसमोर दोन पर्याय ठेवलेत' - सीजेपी

बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलंय की, त्यांना आजच सकाळी सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव मिळाला होता आणि त्यांनी सरकारसमोर दोन पर्याय ठेवले आहेत.

सौरव दास म्हणाले की, "आम्ही सरकारसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं आहे की, एकतर ते जंतर-मंतरवर येऊ शकतात किंवा जंतर-मंतरजवळील एखाद्या तटस्थ ठिकाणी चर्चा होऊ शकते."

20 जुलै रोजी आंदोलकांकडून चर्चेचा प्रस्ताव आला होता, या सरकारच्या दाव्यावरही सौरव दास यांनी भाष्य केलं. सौरव दास म्हणाले की, "त्यांनी (सरकारने) 20 जुलै रोजीही आमच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही, हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. सकाळपासूनच ते आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच काय, तर पोलिसांनी आम्हाला सरकारशी चर्चा करण्यास सांगितल्याचं दर्शवणारे व्हीडिओ फुटेजही उपलब्ध आहे."

सौरव दास यांनी पुढे सांगितलं की, "सरकारला चर्चा करायची आहे, असं सांगत पोलिसांनी आज पुन्हा आमच्याशी संपर्क साधला. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण त्यासाठी सरकारनं मोकळ्या मनानं आमचं म्हणणं ऐकून घेणं, आंदोलकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करणं आणि त्या मान्य करण्याची तयारी दर्शवणं आवश्यक आहे."

सौरव दास यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इतर खासदारांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला.

मंगळवारी राहुल गांधी काँग्रेसच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण थांबवावं - सीजेपी

कॉक्रोच जनता पार्टीनं एक पत्रक प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये सोनम वांगचूक यांना आपलं उपोषण थांबवण्याची विनंती केली आहे.

या पत्रात कॉक्रोच जनता पार्टीनं लिहिलंय की, "आदरणीय सोनम सर, त्यंत आदर आणि कृतज्ञतेसह, आम्ही आपणास विनंती करतो की कृपया आपले उपोषण थांबवावे. मच्या त्यागाने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे. 20 जुलै रोजी, तुमच्या आणि या चळवळीच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अनेक राज्यांमधून तरुण-तरुणींनी प्रवास करून हजेरी लावली. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठा आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, हे तुम्ही दाखवून दिलं आहे. परंतु, सध्या आम्हाला तुमची प्रकृती उत्तम राहणं गरजेचं वाटतं."

पुढे लिहिलंय की, "आम्ही वचन देतो की, हा लढा तुमच्या उपोषणासोबतच संपणार नाही. परीक्षांबाबतच्या न्यायाच्या आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलने सुरू ठेवू आणि हा लढा पुढे नेऊ. हा लढा अविरत चालू ठेवण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू."

विद्यार्थी आणि तरुणांचा राजकीय साधन म्हणून वापर करण्याचे प्रयत्न - राजनाथ सिंह

"विद्यार्थी आणि तरुणांचा राजकीय साधन म्हणून वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत," असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

आज बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचं वर्णन 'गंभीर चिंतेची बाब' अशा भाषेत केलं आहे.

ते म्हणाले की, "हे अत्यंत दुर्दैवी आहे की, काही लोक आपल्या देशातील विद्यार्थी आणि तरुणांचा वापर स्वतःचं राजकीय हित साधण्यासाठी राजकीय साधन म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहेत."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आमचं सरकार तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येचं किंवा चिंतेचे म्हणणं ऐकून घेणं आणि त्याचं निवारण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे."

राजनाथ सिंह यांनी नमूद केलं की, भारताच्या जागरूक तरुणांना अशा दिशाभूल करणाऱ्या प्रयत्नांची पूर्ण जाणीव आहे.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील जंतर-मंतरवर

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतर येथे आंदोलनस्थळाला आणि आंदोलकांना भेट दिली. मनोज जरांगे यांनी याआधीच या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.

मनोज जरांगे यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंची भेट घेतली.

त्यांनी भेट घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी एक्सवर पोस्ट केले आहे की, "मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार."

"जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे."

'मारहाणीचे व्हीडिओ बघायला आमच्याकडे वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका'; सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रिया

दिल्लीत आंदोलनादरम्यान आंदोलकांना सुरक्षा दलांकडून मारहाण झाल्याच्या आरोपांसंबंधित याचिका सुनावणीसाठी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिला असल्याचे वृत्त लाइव्ह लॉने दिले आहे.

दिल्ली येथील जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर हल्ला केला असे व्हीडिओ समोर आले आहेत. यासंदर्भात तातडीने प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली.

त्यावर उत्तर देताना, "आमचा वेळ वाया घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका," असे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाचा उल्लेख करणाऱ्या वकिलांना सांगितले.

लाइव्ह लॉ ने दिलेल्या वृत्तानुसार, वकिलांनी सांगितले की, विद्यार्थी NEET परीक्षा योग्य पद्धतीने घेण्याची मागणी करत आहेत. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेत (NTA) सुधारणा करण्याची मागणीही करत आहेत. त्यावर त्यांचे बोलणे मध्येच थांबवत सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, "खूप धन्यवाद."

वकिलांनी सांगितले तीव्र पोलिसी कारवाईचे व्हीडिओ देखील उपलब्ध आहेत. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, "आम्हाला व्हिडीओंमध्ये रस नाही. ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही."

याआधी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयानेही अशाच प्रकारच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. "न्यायालयाला यात ओढू नका," असे न्यायालयाने म्हटले होते.

जखमी मुलीच्या प्रकृतीत सुधारणा

आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीच्या कथित घटनेत एक 21 वर्षीय तरुणी गंभीररीत्या जखमी झाली होती. त्या तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयाने दिली आहे.

रुग्णालायाने म्हटले आहे की तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले असून ती आता सामान्यपणे श्वास घेत आहे. ती शुद्धीवर असून डॉक्टरांच्या सूचनांना योग्य प्रतिसाद देत आहे. तिच्या मेंदू आणि मणक्याच्या एमआरआयचा अहवाल नॉर्मल आला आहे.

उपचार सुरू झाल्यापासून तिच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर सर्व आवश्यक उपचार सुरू आहेत.

या कथित घटनेच्या संदर्भात सध्या RML रुग्णालयात दाखल असलेली ती एकमेव रुग्ण आहे. तिच्यावर आवश्यक उपचार आणि सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

दिल्लीतील 16 मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)ने बुधवारी (22 जुलै) सकाळी 11.27 वाजता 16 मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

डीएमआरसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या 16 स्थानकांची यादी जाहीर करत म्हटले, "ही मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. मात्र, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटेरिएट येथे इंटरचेंजची सुविधा उपलब्ध राहील."

डीएमआरसीने बंद ठेवण्यात आलेल्या मेट्रो स्थानकांची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे. -

  • लोक कल्याण मार्ग
  • राजीव चौक
  • पटेल चौक
  • रामकृष्ण आश्रम मार्ग
  • बाराखंबा रोड
  • सुप्रीम कोर्ट
  • सेवा तीर्थ
  • जनपथ
  • मंडी हाऊस
  • सेंट्रल सेक्रेटेरिएट
  • आयटीओ
  • दिल्ली गेट
  • इंद्रप्रस्थ
  • खान मार्केट
  • जोर बाग
  • शिवाजी स्टेडियम

'विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचा वापर देशविरोधी घटकांकडून गोंधळ माजवण्यासाठी केला जाऊ नये' - प्रीती झिंटा

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत अभिनेत्री प्रीती झिंटाने प्रतिक्रिया दिली आहे. देशांतर्गत आणि परदेशातील काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक विद्यार्थ्यांच्या संतापाचा आणि अडचणींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशी चिंता तिने व्यक्त केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत प्रीती झिंटाने म्हटले की, "विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचा वापर देशविरोधी घटकांकडून गोंधळ माजवण्यासाठी किंवा आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी होऊ नये."

तिने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, "आपल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे आणि आपल्या तरुणांचे भविष्य अधिक चांगले घडवणाऱ्या शैक्षणिक सुधारणांची मागणी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचा वापर राष्ट्रविरोधी घटकांकडून गोंधळ निर्माण करण्यासाठी किंवा आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी केला जाऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे."

अभिनेत्री पुढे म्हणाली, "ऑनलाईन वाढत चाललेला द्वेष आणि समाजात निर्माण होणारे विभाजनाचे वातावरण पाहून मला काळजी वाटते. देशांतर्गत आणि परदेशातील काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक विद्यार्थ्यांच्या संतापाचा आणि अडचणींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशी भीती वाटते."

प्रीती झिंटाने पुढे लिहिले की, "मी नेहमीच मेहनत, समानता आणि उत्कृष्ट कामावर विश्वास ठेवला आहे आणि या मूल्यांशी कधीही तडजोड होता कामा नये. माझा आपल्या लोकशाहीवर, कायदा-सुव्यवस्थेवर आणि सरकारवरही विश्वास आहे."

ती पुढे म्हणाली, "दोन्ही बाजूंनी अर्थपूर्ण आणि सकारात्मक संवाद सुरू व्हावा, तसेच या आंदोलनातून आणि चर्चेतून चुकीचे हेतू बाळगणाऱ्या व्यक्ती व मुद्द्यांना दूर ठेवले जावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. जेणेकरून आपल्या तरुणांचे आणि आपल्या लोकशाहीचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल."

यापूर्वीही प्रीती झिंटाने विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करत, त्यांचे आरोग्यही या लढ्याइतकेच महत्त्वाचे असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, सोमवारी (20 जुलै) झालेल्या 'संसद मोर्चा'दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला होता. त्यानंतर अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

नसीरुद्दीन शाह म्हणाले, 'विद्यार्थ्यांवरील लाठीमार पाहून संताप अनावर झाला'

'कॉक्रोच जनता पार्टी'च्या समर्थकांवर आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोमवारी (20 जुलै) 'संसद मार्च'दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचा चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी निषेध व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थ्यांना धीर देत म्हटले की, त्यांनी हिंमत हारू नये. अनेक लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना त्यांची सहानुभूती आहे.

इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत ते म्हणाले, "अभिनयाचे दोन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही मला अभिनयाबद्दल सर्वाधिक शिकवण त्या विद्यार्थ्यांकडून मिळाली, ज्यांना शिकवण्याचा मी प्रयत्न केला. माझी संपूर्ण सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. प्रत्येक श्वासागणिक मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि प्रत्येक शिक्षक दिनी त्यांना वंदन करतो."

ते पुढे म्हणाले, "सध्या माझे मन जड झाले आहे. आपल्या मुलांवर होत असलेल्या क्रूरतेमुळे माझ्या मनात प्रचंड संताप खदखदत आहे. विद्यार्थ्यांशी अशी वागणूक करणारे लोक मला अमेरिकेतील इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) एजंट्सची आठवण करून देतात, ज्यांच्या हातात लाठ्या आणि चेहऱ्यावर मुखवटे असायचे. कधीतरी स्वतःच्या मुलांचाही विचार करा आणि हेही लक्षात ठेवा की, तुमच्या कृत्यांचे परिणाम एक दिवस तुम्हालाही भोगावे लागतील."

नसीरुद्दीन शाह म्हणाले, "मी या सर्व विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छितो की, हिंमत हारू नका. अनेक लोक तुमच्या पाठीशी आहेत. या देशाच्या तरुण पिढीकडून मला नेहमीच आशा होती आणि आता ती आशा अधिक दृढ झाली आहे. या देशाच्या सरकारला मी एवढेच सांगू इच्छितो की, हे सर्व लोकांच्या कायम लक्षात राहील."

दरम्यान यापूर्वी सोनाक्षी सिन्हा, प्रीती झिंटा, सोनू सूद, दिलजीत दोसांझ, रितेश देशमुख, अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे.

जंतर मंतरवर उद्धव ठाकरेंची उपस्थिती

दिल्लीमध्ये 21 जुलै रोजी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काही काळानंतर सोडून दिले.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या जनसमुदायासमोर आपले विचार प्रकट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की मी या ठिकाणी भाषण देण्यासाठी नाही तर युवा शक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे. राजकारणात संघर्ष हा तर रोजच असतो पण आपण कुणासाठी संघर्ष करतोय हे देखील पाहायला हवे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर 21 जुलै रोजी आंदोलन केले. त्यावेळी त्यांना सुरक्षा दलांनी काही काळासाठी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी हे आपल्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर करुन घेत आहेत.

राहुल गांधी यांच्या 5 मागण्या

राहुल गांधी यांनी मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. तसेच त्यांनी पाच मागण्या ठेवल्या आहेत.

राहुल गांधी म्हणाले, काही प्रश्न आहेत जे विचारणे गैर नाही. ते म्हणाले, आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था का कोलमडली आहे? भारतात शिक्षण इतकं महाग का झालं आहे? मुलांना शिक्षण देण्यासाठी पालक आर्थिकदृष्ट्या का उद्ध्वस्त होत आहेत?

राहुल गांधी यांनी सरकारसमोर पाच मागण्या मांडल्या आहेत:

1. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

2. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.

3. विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

4. या मुद्द्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी.

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या वागणुकीबद्दल देशाची माफी मागावी.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, 'राहुल गांधी विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करत आहेत'

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर करून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

मंगळवारी (21 जुलै) रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला.

एक्सवरील पोस्टमध्ये प्रधान यांनी लिहिले की, "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करत आहेत, जेणेकरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अडथळा निर्माण करता येईल. राहुल गांधी आणि काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास झाला आणि ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांकडेही दुर्लक्ष करण्यात आले."

ते पुढे म्हणाले, "सरकारने या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची तयारी आधीच स्पष्ट केली होती. तरीही काँग्रेसने लोकशाही मार्गाने चर्चेत सहभागी होण्याऐवजी राजकीय आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे नव्हता, तर राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी अडथळे निर्माण करणे हा होता. राहुल गांधींसाठी हा विषय विद्यार्थ्यांचा नाही. चर्चा करण्याचा मार्ग खुला झाल्यानंतरही प्रत्येक वेळी संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे."

प्रधान म्हणाले, "आमचे सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि तरुणांच्या प्रत्येक योग्य चिंतेवर संसदेत उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारतातील विद्यार्थ्यांना राजकीय मोहिमेचा भाग बनवण्यापेक्षा अधिक चांगली वागणूक मिळायला हवी. त्यांना गोंधळ नव्हे, तर विश्वास हवा आहे. घोषणा नव्हे, तर उपाय हवेत. अडथळे नव्हे, तर जबाबदारी हवी."

ते पुढे म्हणाले, "आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या केवळ रागालाच नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास, सुधारणा करण्यास आणि जबाबदारी स्वीकारण्यासही बांधील आहोत. आमचे सरकार यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे."

दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले होते.

यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, काही तासांनंतर राहुल गांधी आणि ताब्यात घेण्यात आलेल्या इतर नेत्यांची छत्रसाल स्टेडियममधून सुटका करण्यात आली.

21 जुलै रोजी काय घडले ?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर ठिय्या देणाऱ्या इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांनी 21 जुलै रोजी आधी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

बीबीसीचे प्रतिनिधी पवनकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना छत्रसाल स्टेडियमवर नेण्यात आलं होतं.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.

राहुल गांधी यांच्यासोबत अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

याआधी, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सांगितलं होतं की, पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशी गैरवर्तन केले आणि पक्षाच्या नेत्यांना कुठे नेण्यात आले आहे, याची त्यांना कल्पना नाही.

पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करत असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींशी चर्चा करत होते. जितेंद्र सिंह यांनी नुकताच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की, "मी त्यांच्याशी चर्चा करून संसदेत यावर चर्चा होईल, असं आश्वासन दिलं पण त्यांनी आपल्या मागण्या वाढवत नेल्या. ते आधीपासूनच ठरवून आले होते की, काहीतरी संघर्ष व्हावा आणि गोंधळ व्हावा, पण सामान्य लोकांना ही राजकीय नौटंकी समजते."

दुसरीकडे, संसदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर चर्चा करू दिली जात नाहीये, आम्हाला संसदेतही बोलू दिलं जात नाही. पंतप्रधान संसदेत येत नाहीत आणि बोलूही देत नाहीयेत, तर मग आम्ही काय करायचं, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार विचारत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)