खाद्य तेलाच्या बाबतीत स्वावलंबी असलेला भारत जगातला सर्वात मोठा आयातदार बनण्याची कारणं

    • Author, जॅस्मिन निहलानी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना खाद्य तेलाच्या वापरात 10 टक्के कपात करण्याचं आवाहन केलं होतं.

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचं परकीय चलन वाचवण्याच्या व्यापक आवाहनाचा हा एक भाग होता.

मोदींनी नागरिकांना इंधनाच्या वापरात कपात करण्याचं, सोनं खरेदी न करण्याचं आणि अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचं आवाहनदेखील केलं होतं.

मार्च 2026 ला सरलेल्या आर्थिक वर्षात भारतानं खाद्य तेलाच्या आयातीवर जवळपास 19.5 अब्ज डॉलर (अंदाजे 1,83,944 कोटी रुपये) खर्च केले.

जगभरात 2025/26 मध्ये झालेल्या वनस्पती तेलाच्या एकूण आयातीमधील जवळपास पाचवा भाग एकट्या भारताचाच होता. यामुळे भारत खाद्य तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश बनला.

अमेरिकेच्या कृषी विभागा (यूएसडीए)च्या आकडेवारीनुसार युरोपियन युनियन, चीन आणि अमेरिका यात बरेच मागे होते.

मात्र नेहमीच अशी परिस्थिती नव्हती.

'स्वावलंबी भारत'

खाद्यतेलाच्या आयातीचा विचार करता, 1994-95 मध्ये भारताच्या आयातीचं प्रमाण फक्त 5 टक्के होतं.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसतं की 2024-25 पर्यंत भारत खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी 56 टक्के आयातीवर अवलंबून होता.

तर 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या नीती आयोगाच्या एका अहवालानुसार, 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत भारत खाद्य तेलाच्या उत्पादनात 'जवळपास स्वावलंबी' झाला होता.

मात्र 1990 च्या दशकाच्या मध्यापासून स्वस्त आयात आणि वेगानं झालेल्या आर्थिक प्रगतीनं मागणीत वाढ झाली.

प्रति व्यक्तीमागे होणारा खाद्य तेलाचा वापर वाढला. त्यानंतर देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सातत्यानं आयातीवर अवलंबून होत गेला.

आकडेवारीतून दिसतं की आयातीवरील हे अवलंबित्व सातत्यानं वाढलं. 2004-05 मध्ये 38 टक्के असलेले हे प्रमाण 2015-16 मध्ये 63 टक्क्यांवर पोहोचलं होतं. तर 2024-25 मध्ये हे प्रमाण कमी होत 56 टक्क्यांवर आलं.

नीती आयोगाच्या अहवालात असंही म्हटलं आहे की, खाद्य तेलाच्या आयातीवरील देशाचं हे अवलंबित्व 'देशाच्या परकीय चलनसाठ्यावर नकारात्मक परिणाम करतं आहे.'

कोणत्या खाद्य तेलांची आयात होते?

भारतातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी 14.3 टक्के जमिनीवर तेलबियांची लागवड केली जाते. भारत एरंड, करडई, तीळ, रामतीळ, शेंगदाणा आणि मोहरी-राई यांचा प्रमुख उत्पादक आहे.

मात्र भारताच्या खाद्यतेलाच्या आयातीत मुख्यत: 3 प्रकारच्या तेलांचा समावेश आहे. ते म्हणजे, पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल.

निव्वळ पाम तेलाचाच खाद्यतेलाच्या आयातीतील वाटा 57 टक्के आहे. तर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा वाटा अनुक्रमे 29 टक्के आणि 14 टक्के आहे.

भारतात खाद्य तेलाच्या वापरात बदल कसा झाला?

गेल्या 2 दशकांमध्ये भारतातील खाद्य तेलाच्या वापराचं स्वरुपदेखील मोठ्या प्रमाणात बदललं आहे.

भारतात सॉलव्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 2001-02 मध्ये पाम तेल हे सर्वाधिक खपाचं खाद्य तेल होतं. एकूण खपामध्ये त्याचा वाटा 29 टक्के होता. तर 2022-23 पर्यंत याचं प्रमाण वाढून 37.6 टक्के झालं.

भारतात हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग ही क्षेत्रं पाम तेलाचे सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी आहेत.

स्नॅक्स, रेडी-टू-ईट उत्पादनं, बेकरी पदार्थ आणि मिठाई यासारख्या पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड अन्नपदार्थांच्या वाढत्या मागणीबरोबरच पाम तेलाच्या मागणीत देखील वाढ झाली.

याच कालावधीत कधीकाळी भारतात सर्वात कमी खप होणाऱ्या खाद्य तेलांपैकी एक असलेल्या सूर्यफुलाच्या तेलाचा वाटा (3.1 टक्के) वाढून 2022-23 पर्यंत 11.6 टक्के झाला.

मात्र शेंगदाणा तेलाचा खप 2001-02 मध्ये 12 टक्के होता. तो घसरून 2022-23 मध्ये 3 टक्के झाला. तर मोहरीच्या तेलाचा खप 17 टक्क्यांवरून कमी होऊन 13.6 टक्क्यांवर आला.

तेलबियांच्या उत्पादनातील फरक

भारतात अन्नधान्यानंतर सर्वाधिक लागवडीखालील जमिनीत तेलबियांची लागवड केली जाते. जागतिक पातळीवरील तेलबियाच्या लागवडीखालील क्षेत्राचा 15-20 टक्के भाग भारतात आहे. मात्र उत्पादकतेमध्ये भारत बड्या उत्पादकांपेक्षा मागे आहे.

नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार, भारतात तेलबियामध्ये सर्वाधिक लागवड सोयाबीनची होते. सोयाबीनचं 2020-2022 मधील प्रति हेक्टरी उत्पादन एक टन होतं.

त्याच्या तुलनेत, जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादकांपैकी एक असलेल्या अमेरिकेत प्रति हेक्टरी उत्पादन 3.4 टन होतं.

हा फरक इतर तेलबियांच्या उत्पादनात देखील दिसून येतो. भारतातील मोहरीचं प्रति हेक्टरी उत्पादन 1.5 टन आहे. तर जर्मनीत प्रति हेक्टरी उत्पादन 3.7 टन आणि फ्रान्समध्ये 3.3 टन आहे.

भुईमूगाच्या बाबतीत भारतातील प्रति हेक्टरी उत्पादन 1.8 टन आहे. तर अमेरिकेत याचं प्रमाण प्रति हेक्टरी 4.5 टन आणि चीनमध्ये 3.9 टन आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.