You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पावसाळ्यात उड्या मारत नृत्य करणारा, रंग बदलणारा 'हा' पक्षी का होतोय दुर्मिळ?
- Author, गोपाळ कटेशिया
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील वेलावदर गावाजवळ असलेलं काळवीट राष्ट्रीय उद्यान (ब्लॅकबक नॅशनल पार्क) सध्या पावसामुळे हिरव्यागार गवताने आच्छादलेलं आहे.
या उद्यानात काळवीट, नीलगाय आणि इतर अनेक प्राणी पाहायला मिळतात.
मात्र 34 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या उद्यानामध्ये सध्या अधिकारी आणि संशोधकांचे लक्ष 'तणमोर' (लेसर फ्लोरिकन) पक्ष्यांकडेच आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर तणमोर पक्षी गाणी म्हणत आणि जमिनीवर उड्या मारत नाचत असल्याने उद्यानाचा परिसर त्यांच्या आवाजाने आणि नृत्याने गजबजून गेला आहे.
या उद्यानात तणमोर म्हणजेच जमिनीवर वावरणाऱ्या मोरांच्या प्रजातीच्या (ग्राऊंड पीफाऊल) संरक्षणासाठी सरकारने एक केंद्र सुरू केलं आहे. या पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दरवर्षी सरकारकडून या पक्ष्यांची गणनाही केली जाते.
यावर्षी 19 ऑगस्ट रोजी पक्ष्यांची गणना करण्यात आली. या गणनेत काळवीट राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात एकूण 28 तणमोर पक्षी आढळून आले, अशी माहिती या राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक नीलेश जोशी यांनी बीबीसीला दिली.
यापैकी 22 पक्षी उद्यानाच्या हद्दीत, तर 6 पक्षी उद्यानाच्या आसपासच्या परिसरात आढळून आले, असं त्यांनी सांगितलं.
या 28 पक्ष्यांपैकी 22 नर आणि 6 मादी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, मादी तणमोर खूप लाजाळू असतात. त्या शांत बसल्या असताना त्यांच्या रंग आणि रूपामुळे गवतामध्ये माणसांना त्या सहजपणे दिसून येत नाहीत.
परंतु, पावसाळ्यात नर तणमोरचा रंग आणि रूप बदलतं. त्यामुळे ते अगदी सहजपणे माणसांच्या नजरेस पडतात.
यावर्षी वेलावदर आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे 42 तणमोर पक्षी असल्याचा अंदाज आहे.
पावसाळ्यातच हे पक्षी का दिसतात?
पावसाळ्यामध्ये तणमोर पक्षी वेल्वादारसोबतच कच्छमधील कच्छ माळढोक वन्यजीव अभयारण्य आणि आसपासच्या परिसरातही दिसून येतात.
पावसाळा संपल्यानंतर हे पक्षी कुठे जातात आणि कुठे थांबतात, याचा अभ्यास करण्यासाठी गुजरात वन विभाग, द कॉर्बेट फाउंडेशन आणि भावनगरमधील महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठातील संशोधकांनी 2020 ते 2025 या काळात एक अभ्यास केला.
या अभ्यासाचा भाग म्हणून 2020 मध्ये सासन वन्यजीव विभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. मोहन राम, द कॉर्बेट फाउंडेशनचे उपसंचालक डॉ. देवेश गढवी आणि इतर तज्ज्ञांनी वेलावदरमधील एका नर आणि एका मादी तणमोर पक्ष्याला सॅटेलाइट टॅग लावले.
हे सॅटेलाइट टॅग सॅटेलाइट किंवा मोबाइल नेटवर्कच्या टॉवरला सिग्नल पाठवत असत. त्यामुळे टॅग लावलेले पक्षी कुठे जातात, दिवसा की रात्री जास्त उडतात, किती उंचीवर उडतात आणि कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबतात, यासारखी माहिती मिळत होती.
सॅटेलाइट आणि मोबाइल नेटवर्कचा वापर करून जानेवारी 2025 पर्यंत या पक्ष्यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्ष 19 ऑगस्ट 2026 रोजी प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात देण्यात आले आहेत.
अभ्यासात असं आढळून आलं की, टॅग लावलेली एक मादी तणमोर पक्षी नोव्हेंबर 2020 मध्ये वेलावदरहून उडून तब्बल 776 किलोमीटरचा प्रवास करत तेलंगणापर्यंत पोहोचली.
तेथे साधारण 6 महिने राहिल्यानंतर हा पक्षी पुन्हा गुजरातच्या दिशेने निघाला. पण, महाराष्ट्रात एका उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या (हायटेंशन विजेची तार) तारेच्या संपर्कात आल्याने त्या पक्षाचा मृत्यू झाला.
टॅगच्या मदतीने संशोधकांना एका नर पक्ष्याने गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशदरम्यान स्थलांतर केल्याचे दिसून आले.
एका नर पक्ष्याने गुजरातहून उडून महाराष्ट्रमार्गे कर्नाटक गाठले. त्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रातून गुजरातला परतला. पुढे गुजरातहून राजस्थानला गेला आणि तिथून पुन्हा गुजरातमध्ये आला. त्यानंतर त्याने पुन्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दिशेने प्रवास सुरू केला.
डॉ. मोहन राम यांनी बीबीसीला म्हटलं की, प्रजननाच्या काळात मादी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी नर पक्षी नृत्य करतात. हे नृत्य मादीला दिसावे यासाठी त्यांना कमी उंचीचे गवत असलेली जागा लागते. मादी पक्ष्यांनाही घरटे बांधण्यासाठी अशाच प्रकारचे छोटे गवत आवश्यक असते.
ते म्हणाले, "प्रजननासाठी जून ते सप्टेंबर या काळात तणमोर पक्षी मोठ्या संख्येनं एकत्र येतात. विशेषतः काळवीट राष्ट्रीय उद्यान आणि कच्छ माळढोक वन्यजीव अभयारण्यात त्यांची संख्या जास्त असते."
डॉ. राम यांनी सांगितलं, "प्रजननाचा काळ संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान, विशेषतः नर पक्षी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यांसारख्या राज्यांकडे स्थलांतर करतात. काही मादी पक्षीही अशाच प्रकारे स्थलांतर करतात."
तणमोर खास का आहेत?
तणमोर हा माळढोक कुळातील एक पक्षी आहे. या कुटुंबातील चार प्रकारचे पक्षी भारतात आढळून येतात - माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड), तणमोर (लेसर फ्लोरिकन), आशियाई हौबारा (मॅकक्वीन्स बस्टर्ड) आणि बंगाल फ्लोरिकन.
जगातील माळढोक कुळातील पक्ष्यांमध्ये तणमोर हा आकाराने सर्वात लहान पक्षी आहे. माळढोक, तणमोर आणि आशियाई हौबारा हे तिन्ही पक्षी एकाच ठिकाणी आढळणारे कच्छ माळढोक वन्यजीव अभयारण्य हे एकमेव ठिकाण आहे.
तणमोर हा गवताळ प्रदेशात जमिनीवर राहणारा पक्षी आहे. नाकतोडे, कीटक आणि इतर छोटे जीव हे त्याचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे या जीवांची संख्या नियंत्रणात ठेवून तणमोर शेतीच्या पिकांचंही संरक्षण करतो.
तणमोरची संख्या का कमी होत आहे?
देशात तणमोर पक्ष्यांची संख्या किती आहे, याचा अंदाज घेण्यासाठी वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. सुतीर्थ दत्ता आणि इतर शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण केलं. 2018 मध्ये या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यावेळी देशात केवळ 480 तणमोर पक्षी उरले असल्याचे सांगण्यात आलं होतं.
1999 मध्ये या पक्ष्यांची संख्या सुमारे 3530 इतकी होती. परंतु, दोन दशकांत त्यांची संख्या तब्बल 80 टक्क्यांनी कमी झाली. पक्ष्यांची संख्या खूपच कमी झाल्यामुळे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) तणमोरचा समावेश धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत केला आहे.
सुतीर्थ दत्ता आणि इतर शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात वेलावदर हे तणमोर पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या अंदाजानुसार, या गवताळ प्रदेशात साधारण 95 ते 115 नर तणमोर वास्तव्यास आहेत.
मोहन राम म्हणाले, "गवताळ प्रदेशालगतच्या जमिनीवर पूर्वी वर्षातून एकच पीक घेतलं जात असत. आता तिथे वर्षातून 3 पिके घेतली जातात. शेतीचंही यांत्रिकीकरण होत आहे, त्याचबरोबर कंत्राटी शेतीही वाढत आहे. त्यामुळे तणमोर पक्ष्यांचा अधिवास कमी झाला आणि त्यांची संख्या घटली."
"यासाठी काही नैसर्गिक घटकही जबाबदार आहेत. तणमोर पक्ष्यांचा प्रजनन काळ पावसाळ्यातील पावसावर थेट अवलंबून असतो. पाऊस वेळेवर झाला नाही किंवा कमी झाला, तर या पक्ष्यांचे प्रजनन होत नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.