मुलाला 'बॉडीबिल्डर' बनवलं आणि खुनांसाठी वापरलं; एका महिलेचं थरारक कारस्थान कसं उघडकीस आलं?

    • Author, प्रवीण शुभम
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

(इशारा: या बातमीतील माहिती काही वाचकांना अस्वस्थ करू शकते.)

स्वतःच्या मुलाला 'बॉडीबिल्डिंग'चं प्रशिक्षण घ्यायला लावून, त्याच्या मदतीनं 2 खून करणाऱ्या एका आईला आणि तिच्या मुलाला सिद्धीपेट पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी अटक केली आहे.

" राज्याच्या दुर्गम भागात हे खून ज्या पद्धतीने नियोजनपूर्वक करण्यात आले, ते कल्पनाही करता येणार नाही इतके धक्कादायक आहेत," असं सिद्धीपेटच्या पोलीस आयुक्त रश्मी पेरुमल यांनी सांगितले.

"गुन्हे कसे करायचे आणि पोलिसांच्या तावडीतून कसं सुटायचं, याबाबत या आई आणि मुलानं इंटरनेटवर सखोल अभ्यास केला होता," असेही त्यांनी सांगितलं.

यापूर्वी दोन महिलांची हत्या केली होती आणि त्यांच्याकडून पैसे लुटले होते. पुढील टप्प्यात आणखी चार जणांची हत्या करण्याचे नियोजनही त्यांनी केलं होतं. मात्र त्याआधीच दोघांना अटक करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितले.

अर्धवट जळालेल्या मृतदेहामुळे उलगडलं रहस्य

9 ऑगस्ट रोजी पहाटे, सिद्धीपेट जिल्ह्यातील तुप्रानका मंडलातील रामक्कापेटा बाहेरील भागात रस्त्याच्या कडेला एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ग्रामस्थांना आढळला. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.

तपासात मृत महिला पोंपल्ली गावात राहणारी अट्टीकम विजया (44) असल्याचे समोर आलंय.

मृतदेह सापडलेलं ठिकाण पोंपल्लीपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर होतं. त्यानंतर त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गुन्हे शाखेनं तपासले.

या तपासात आरोपी तेल्लकुल राजिता (38) आणि तिचा मुलगा (16) यांची संशयास्पद हालचाल सीसीटीव्हीत दिसून आली.

"दोघेही दुचाकीवर एक जड पोतं घेऊन जाताना दिसले. तसंच त्यांनी पेट्रोल पंपावर प्लास्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल भरून घेतल्याचंही फुटेजमध्ये दिसलं. त्यामुळे त्यांच्यावर संशय गेला," असे रश्मी पेरुमल यांनी सांगितले.

पोलीस काय सांगतात?

सिद्धीपेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोंपल्लीत राहणारी राजिता पूर्वी शिवणयंत्र ऑपरेटर म्हणून काम करत होती. त्यानंतर तिनं किराणा दुकान आणि चहाचं दुकान चालवलं.

तिचा नवरा काही काळ सायकल दुरुस्तीचं दुकान आणि टेंट हाऊस व्यवसाय करत होता. मात्र तो अनेक वर्षांपासून आजारी असल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं होतं.

या परिस्थितीमुळे सहज पैसे कमावण्यासाठी राजितानं निरपराध महिलांना लक्ष्य करण्याची योजना आखली, असे पोलिसांनी सांगितलं.

तिच्या किराणा दुकानात येणाऱ्या आणि वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या असलेल्या महिलांना या आई-मुलाच्या जोडीनं लक्ष्य केलं.

त्या महिलांच्या गावातील वाद, वैयक्तिक अडचणी, कौटुंबिक कलह यांची माहिती ते आधीच गोळा करत आणि त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांची हत्या करत, असं पोलिसांनी सांगितलं.

यानंतर हीच माहिती वापरून इतरांवर संशय निर्माण केला जात असे आणि स्वतः बचाव करण्याचा प्रयत्न केला जाई, हे तपासातून समोर आलंय.

विजया यांची हत्या कशी केली?

मृत विजया यांच्या कुटुंबात काही वाद होते. त्यामुळे त्या स्वतःचं घर सोडून दुसऱ्या वसाहतीत भाड्याच्या घरात राहात होत्या.

"8 ऑगस्ट रोजी किराणा दुकानात आलेल्या विजयाला राजिता आणि तिच्या मुलानं घरी बोलावून तिच्यावर हल्ला केला आणि हत्या केली. त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ते सोनाराकडे विकले.

त्या रात्री सुमारे 10 वाजता त्यांनी मृतदेह दुचाकीवर नेऊन रामक्कापेटा बाहेरील भागात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या रात्री पाऊस आल्यानं मृतदेह पूर्णपणे जळू शकला नाही," असे पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान राजिताने विजयाच्या कुटुंबीयांशी असलेल्या वादांवर भर देत अनेक दिवस पोलिसांची दिशाभूल केली, असंही त्यांनी सांगितलं.

मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खरे संशयित आई आणि मुलगाच असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोघांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.

यापूर्वीचा आणखी एक खून उघड

या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांनी याआधी केलेला आणखी एक खूनही उघडकीस आला.

"या वर्षी मे महिन्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली पोंपल्ली येथील गुंडा रेखा (26) यांचीही अशाच प्रकारे त्यांच्या घरात हत्या करण्यात आली होती. त्यांचे सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले आणि मृतदेह अच्चमय्यापल्ली जंगल परिसरात नेऊन पेट्रोल टाकून जाळण्यात आला.

मात्र रेखा कोणासोबत तरी निघून गेली असावी, असं सांगत राजिताने तपासाची दिशाभूल केली होती. त्यांच्या 'संभाव्य लक्ष्य' करण्यात आलेल्या यादीत आणखी चार जण होते," असे पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

चोरीपासून खुनांपर्यंतचा प्रवास

सुमारे वर्षभरापूर्वी सकाळच्या चालण्यासाठी गेलेल्या पोंपल्ली गावाचे सरपंच रंगय्या जन्नारेड्डी यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावणारेही हेच आई-मुलगा असल्याचे तपासातून समोर आले.

या घटनेबाबत जन्नारेड्डी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "आमच्या गावात सर्वात आधी आम्ही सकाळी चालण्याची सवय सुरू केली. नंतर काही महिला देखील येऊ लागल्या. त्यामुळे मी आणि माझी पत्नी वेगवेगळ्या गटांमध्ये चालायला जाऊ लागलो. 20 जून रोजी तिच्यासोबत नेहमी चालायला येणाऱ्या महिला आल्या नव्हत्या. त्यामुळे ती एकटीच चालायला गेली.

तेव्हा दोन जणांनी तिच्यावर दगडाने हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटली.

वर्षभराहून अधिक काळ तपास होऊनही आरोपी सापडले नव्हते. आता पोलीस तपासातून हे कृत्य याच आई-मुलाने केल्याचे समजल्यावर आम्हालाही धक्का बसला आहे," असे त्यांनी सांगितले.

ही चोरी पचली आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी चोरीपासून खुनांपर्यंत मजल मारली, असे जन्नारेड्डी म्हणाले.

'मुलाला बॉडीबिल्डर बनवणारी आई'

या खुनांच्या प्रकरणातील मुख्य संशयित राजितानं आपल्या मुलाचा 'हत्यार' म्हणून वापर केला, असे सिद्धीपेट पोलिसांनी सांगितले.

"तिने मुलाची मानसिक तयारी केली आणि त्याला बॉडीबिल्डिंग करण्यास प्रवृत्त केलं. घरातच एक लहान व्यायामशाळा तयार केली. मुलाचं वय कमी आहे, हे लक्षात न घेता तिनं खुनासाठी त्याचा वापर केला.

त्यांनी इंटरनेटवर गुन्हेगारी मालिका पाहिल्या. खून केल्यानंतर पोलिसांच्या कचाट्यातून कसं दूर राहायचं याचाही अभ्यास त्यांनी केला.

निरपराध लोकांना लक्ष्य करणं, त्यांची हत्या करणं, मृतदेहांचा मागमूस लागू न देणं आणि पोलिसांची दिशाभूल करणं अशा प्रकारे त्यांचे गुन्हे सुरू होते. मात्र ठोस तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे आम्ही त्यांना पकडले," असे पोलीस आयुक्त रश्मी पेरुमल यांनी सांगितले.

खून केल्यानंतर मृतदेह लपवून नेण्यासाठी लागणारी काही विशेष साधनंही ऑनलाइन मागवण्यात आली होती.

या प्रकरणात आरोपींकडून सुमारे 10 लाख रुपयांच्या किमतीचे सोने-चांदीचे दागिने, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी अल्पवयीन मुलाला (16) बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

स्थानिकांना धक्का

या प्रकरणाबाबत राजिताच्या पतीशी संपर्क साधण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

राजिताच्या जवळच्या एका महिलेने बीबीसीला सांगितले, "पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजिताकडून असे काही घडेल, असे मला कधी वाटले नव्हते. गेल्या 20 वर्षांत आमचे संबंध चांगले नव्हते. पूर्वी तिनं आपल्या पतीलाही मारहाण केली होती. त्यावेळी तिनं असे का केलंस, असंही आम्ही विचारलेलं.

संयुक्त कुटुंबातील मालमत्तेच्या वाटणीवेळीही तिनं त्रास दिला होता. या खुनांमुळे संपूर्ण गाव हादरलं आहे."

सीसीटीव्हीची भूमिका

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे रश्मी पेरुमल यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

"सामान्य गृहिणीसारखी दिसणारी महिला असे प्रकार करेल, असे आम्हालाही वाटले नव्हते. गावातील आवश्यक ठिकाणी अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्याबाबत आम्ही विचार करत आहोत," असे पोंपल्ली गावाचे सरपंच जन्ना रेड्डी यांनी सांगितले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)