कंगना रनौत 'जेन झी'ला म्हणाल्या, 'गटर जनरेशन'; नंतर दिलं स्पष्टीकरण

कंगना रनौत

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. नुकतंच दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनावर आणि 'जेन झी' पिढीवर त्यांनी वादग्रस्त व आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे.

आंदोलनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आणि रील्सवर आक्षेप नोंदवताना त्यांनी तरुण पिढीला 'गटर जनरेशन' असं म्हटलं आहे.

कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलक तरुण व तरुणींवर निशाणा साधला.

"मी आयुष्यात इतकं विचित्र आणि इतकं वाईट काही पाहिलेलं नाही. यांना कोणी जन्म दिला, कोण पोसत आहे? ही गटारातील पिढी आहे. या मुली चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत," अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

या वक्तव्यानंतर देशभरातून कंगना रनौत यांच्याविरोधात प्रतिक्रिया आल्या. विविध राजकीय पक्षांनी कंगना रनौत यांच्या विधानाचा समाचार घेतला. यापूर्वीही कंगना रनौत यांनी बॉलीवूड, शेतकरी आंदोलन त्याचबरोबर अनेकवेळा राजकारणावर वक्तव्यं करून वाद ओढावून घेतलेला आहे.

'जेन झी' बद्दल कंगना रनौत नेमक्या काय म्हणाल्या?

"मी माझ्या आयुष्यात एकाच ठिकाणी इतकं विचित्र आणि इतकं वाईट काही पाहिलेलं नाही. जेन झींच्या आंदोलनांचे व्हीडिओ पाहून धक्का बसला. वाईटही वाटत आहे. ते ज्या भाषेचा वापर करतात, ती अतिशय असभ्य आहे. यांना कोणी जन्म दिला आणि कोण यांना पोसत आहे, हेच कळत नाही."

"भारत हा विविधता, संस्कृती आणि सभ्यतेसाठी ओळखला जातो. पण लोक एकमेकांना अपमानास्पद नावांनी हाक मारतात आणि तसंच वागतात, अशा प्रकारची वर्तणूक आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही."

कंगना रनौत

फोटो स्रोत, Getty Images

कंगना रनौत यांनी आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या काही मुलींच्या रील्सवर टीका करत त्यांना 'गटार जनरेशन' म्हटलं. या मुली पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली आहेत. त्या अभ्यासातही चांगल्या नाहीत आणि त्यांच्यात चांगले संस्कारही नाहीत, असा दावा त्यांनी केला.

"या मुली स्वातंत्र्याच्या नावाखाली अमली पदार्थ आणि मद्यपानाचं सोशल मीडियावर प्रदर्शन करतात. मेहनत न करता काम करणाऱ्या महिलांची नक्कल करतात आणि त्यामुळे त्या कुटुंब व जबाबदाऱ्या सांभाळण्यासही योग्य राहिलेल्या नाहीत."

आंदोलनकर्त्यांच्या व्हायरल रील्स पाहून त्या मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाल्या असून, आता त्यांना 'डिजिटल डिटॉक्स'ची गरज वाटत आहे, असंही त्या म्हणाल्या.

'मीडियाकडून मला गँगअप केलं जातंय'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खासदार कंगना रणौत यांनी बुधवारी (29 जुलै) एक व्हीडिओ प्रसिद्ध करत पुन्हा या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.

कंगना रणौत म्हणाल्या की, "ही रील मी मीडियातील लोकांसाठी बनवत आहे. कारण, मी काही आंदोलकांना अनैतिक, गटरछाप, लहान-वृद्ध आणि महिलांसमोर अश्लील वर्तन करणं नॉर्मलाइझ करण्याला विरोध केला होता. आपला समाज हे कधीच मान्य करणारच नाही. कारण, आम्हाला असं वाटत नाही की, आमच्या घरातील मुलांनी अश्लील वर्तन करावं, घरातील ज्येष्ठांना शर्मेने मान खाली घालावी लागेल असं काही करावं. अशा पद्धतीचं वर्तन अजिबात मान्य केलं जाणार नाही, या गोष्टी नॉर्मलाइज केल्या जाणार नाहीत. पण मीडियाकडून मला गँगअप केलं जातंय."

पुढे त्या म्हणाल्या की, "पण मीडिया हे नाही सांगणार की, स्कायरुटसारख्या स्टार्टअपचं देखील मी कौतुक केलं होतं. नीटच्या उमेदवारांना मी स्वतः शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या टीममध्ये, घरात, नातेवाईकांतही जेन झी भाऊ-बहिणी आहेत. पण काही फॉलोअर्ससाठी, कमेंट्स आणि लाईक्ससाठी मीडीयावाले फारच जास्त विकले गेले आहेत. काही अँकर्स मला शिकवत आहेत की प्रतिष्ठेचं ओझं किंवा शिस्तीत राहण्याचं ओझं या पीढीवर का द्यावं? पण आपल्या मुलींना आपण असं शिकवणार आहोत का? मर्यादेत राहणं हा काही पर्याय नाही. दिखाऊपणा सगळेच करतील. पण आपल्याला समाजात संविधानाच्या चौकटीत रहावं आहे."

कंगना रणौत असंही म्हणाल्या की, "तुम्ही तुमच्या बंद खोलीतच अश्लील वर्तन करू शकता. माझं दैवत, आई-वडिल किंवा माझ्या घरातील मुलांबाबत तुमच्या मनात कोणतीही भावना नसेल, पण म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी रस्त्यावर अश्लील शिवीगाळ कराल का, त्यांचा अपमान कराल का? पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थी 'एक्जाम बडी' म्हणतात. तसेच, कुणी त्यांना देव मानतं, कुणी लीडर मानतं, घरातील सदस्य मानतात. त्यांचा तुम्ही अपमान करू शकत नाही. हे कूल बनण्याचं लक्षण नाहीये. हा एक साधा नियम आहे. हे तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला शिकावं लागेल. तुम्ही या स्त्रीवाद्यांकडून प्रभावित होऊ नका. स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. अशा पद्धतीचं अश्लील वर्तन तुम्ही तुमच्या बेडरुममध्येच करू शकता. बाहेर जाऊन तुम्हाला मर्यादेतच राहावं लागेल."

शेवटी कंगना रणौत यांनी गुरूपौर्णिमेच्या सदिच्छाही दिल्या.

आंदोलनांबाबत कंगना रनौत यांची आधीची वादग्रस्त वक्तव्यं

खासदार कंगना रनौत यांनी यापूर्वीही भारतात झालेल्या आंदोलनांवेळी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे त्यांना न्यायालयीन खटल्यांनाही सामोरे जावं लागलं आहे.

1. वयोवृद्ध महिला शेतकरीबद्दल वादग्रस्त वक्तव्य

तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रनौत यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली होती.

डिसेंबर 2020 मध्ये बीबीसीने 88 वर्षीय महिला शेतकरी महिंदर कौर यांचा एक व्हीडिओ शेअर केला होता. कंबर वाकलेली असूनही त्या हातात झेंडा घेऊन पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत मोर्चात सहभागी झालेल्या दिसत होत्या.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर महिंदर कौर यांची तुलना शाहीन बाग आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बिल्किस दादी यांच्याशी केली जाऊ लागली होती.

त्यावेळी कंगना रनौत यांनी बिल्किस दादी आणि महिंदर कौर यांचे फोटो एकत्र पोस्ट करत टीका केली होता. त्यांनी लिहिलं होतं, "हा हा... या त्याच आजी आहेत, ज्यांचा टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला होता... आणि या 100 रुपयांत उपलब्ध आहेत."

कंगना रनौत यांच्या या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच मुद्द्यावरून संतापलेल्या सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने कंगना रनौत यांना मोहाली विमानतळावर कानशिलात लगावली होती.

मंडी मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रनौत आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मंडी मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रनौत आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडल्या आहेत.

2. शेतकरी आंदोलनाची तुलना बांगलादेशातील सत्ताबदलाशी

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौत यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वादग्रस्त भाष्य केलं होतं. त्यावेळी नुकतंच बांगलादेशात आंदोलन झालं होतं आणि त्यामुळे तिथे सत्ताधाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं होतं.

कंगना रनौत यांनी म्हटलं होतं की, "जर आपल्या देशाचं नेतृत्व मजबूत नसतं, तर बांगलादेशात जे घडलं, ते भारतातही घडायला वेळ लागला नसता."

त्यांनी बांगलादेशातील आंदोलन आणि सत्ता बदलाची तुलना भारतातील शेतकरी आंदोलनाशी करत दावा केला होताकी, "शेतकरी आंदोलनात मृतदेह टांगले गेले, बलात्कार झाले..." या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता.

"शेतकरी आंदोलनामागे मोठं प्लॅनिंग होतं, जसं बांगलादेशात घडलं. चीन, अमेरिका यांसारख्या परदेशी शक्ती भारतात अशा कटांमध्ये सहभागी" असल्याचाही कंगना यांनी दावा केला होता.

कंगना रनौत यांच्या या वक्तव्यावरून वाद वाढत असल्याचे लक्षात येताच भाजपने कंगना यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले होते. पक्षाने त्यांना भविष्यात अशाप्रकारची वक्तव्यं करू नका अशी ताकदीही दिली होती.

कंगना रनौत

फोटो स्रोत, ANI

3. शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना आणि मग स्पष्टीकरण

कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक ट्वीट रिट्वीट केलं होतं. या विधेयकांचा एमएसपीवर परिणाम होणार नाही, याचं आश्वासन देणारं ट्वीट पंतप्रधानांनी केलं होतं. कंगना यांनी तेच ट्वीट रिट्वीट केलं होतं. पण रिटि्वट करताना त्यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे टीकेला सामारं जावं लागलं होतं.

कंगना यांनी म्हटलं होतं की, "पंतप्रधानजी, जर कोणी झोपला असेल, तर त्याला जागं करता येतं. पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय. जाणूनबुजून काही न समजल्याचं दाखवत असेल तर आपण समजावून सांगून काही होणार नाही. हे तेच आतंकवादी आहेत, ज्यांनी सीएएमध्ये एकाचंही नागरिकत्व नाही गेलं तरीही रक्ताचे पाट वाहवले होते."

कंगना यांच्या या ट्वीटनंतर #Arrest_Castiest_Kangna हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. कंगना रनौत यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती. कंगना यांनी शेतकऱ्यांना 'दहशतवादी' म्हटलं अशी टीका सोशल मीडियावर झाली होती.

त्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडताना पुन्हा एक टि्वट केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, "सीएएबद्दल जे लोक चुकीची माहिती आणि अफवा पसरवत होते, ज्यांच्यामुळे हिंसाचार झाला, तेच लोक आता कृषी विधेयकावर चुकीची माहिती पसरवत आहेत आणि देशात दहशत निर्माण करत आहेत. तेच लोक दहशतवादी आहे. मी काय म्हटलं हे तुम्हाला माहितीये. पण तरीही चुकीची माहिती पसरवत आहेत."

कंगना यांनी आणखी एक ट्वीट करून म्हटलं, की जर मी शेतकऱ्यांना 'दहशतवादी' म्हटल्याचं सिद्ध करावं, तसं असेल तर मी ट्वीटर सोडेन.

आपल्या ट्वीटवर ठाम असल्याचं कंगना यांनी म्हटलं होतं. 'आपण कृषी विधेयकाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं, शेतकऱ्यांना नाही,' हीच आपली भूमिका आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

विमानतळावर महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली

2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून कंगना रनौत या विजयी झाल्या. त्यानंतर दिल्लीला जात असलेल्या कंगना रनौत यांना चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली होती.

ही महिला कॉन्स्टेबल शेतकरी आंदोलनाची समर्थक होती. मी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, त्यामुळे त्याचा राग तिने माझ्यावर काढला, असे कंगना यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करत माहिती दिली होती.

कंगना रनौत

फोटो स्रोत, ANI

कंगना यांना कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचं नाव कुलविंदर कौर असं होतं. कंगना या सुरक्षा तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या केबिनमधून जात असताना तिने त्यांना कानशिलात लगावली होती.

या प्रकरणानंतर कुलविंदर कौरला सीआयएसएफने निलंबित केलं होतं.

"शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला 100-100 रुपये मजुरी घेऊन बसल्याचं विधान त्यांनी (कंगना) केलं होतं. त्या ज्यावेळी हे बोलल्या त्याचवेळी माझी आई त्या आंदोलनात बसलेली होती," असा कुलविंदर कौरचा व्हीडिओ सौशल मीडियावर व्हायरल झाला होता.

'कंगना यांना भाजपमध्येच कोणी गांभीर्याने घेत नाही'

दरम्यान कंगना रनौत यांच्या जेन झी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देशभरातून विरोध होताना दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी कंगना रनौत यांच्यावर टीका केली.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "सरकारची मर्जी मिळवण्यासाठी एका महिला खासदाराने अशी वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. खासदार म्हणून तुम्ही असं बोलत असाल, तर लोक तुमच्याकडूनच शिकत आहेत, असंच म्हणावं लागेल. मला वाटतं याचे परिणाम त्यांना लवकरच भोगावे लागतील."

कंगना रनौत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी त्यांच्या टीकेला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले. ते म्हणाले की, "कंगना रनौत यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातच गांभीर्याने घेतलं जात नाही. मग आम्ही त्यांना का गंभीरपणे घ्यावं? माझ्या मते, जेन झी, जेन अल्फा किंवा तरुण पिढीतील लोकही त्यांना फारसं गांभीर्याने घेत नाहीत किंवा त्यांचं ऐकत नाहीत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)