सोन्याचा खजिना शोधताना झाली मोठी चूक; 53 वर्षांनी असं उलगडलं इंका शहराचं गूढ

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फिओना मॅकडोनाल्ड
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
एका अमेरिकन प्राध्यापकाने 1911 मध्ये पेरूच्या अँडीज पर्वतरांगांतील दाट आणि दुर्गम भागात शेवटच्या इंका राजाचा प्राचीन पर्वतीय किल्ला शोधल्याचा दावा केला होता.
परंतु, तब्बल 53 वर्षांनंतर दुसऱ्या एका संशोधकाने हा दावा चुकीचा असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर काही काळातच बीबीसीच्या टीमनेही त्या संशोधकाच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणाचा शोध घेतला.
"आता यात कोणताही वाद नाही की, हीच प्राचीन विल्काबांबाची जागा होती," असे शब्द त्या येल विद्यापीठातील अभ्यासकाने लिहिले होते, ज्यांनी 1911 मध्ये पेरूमधील माचू पिचूच्या अवशेषांची जगाला ओळख करून दिली होती.
हिराम बिंगहॅम तिसरे यांना स्थानिकांनी हरवलेल्या इंका शहराचा शोध घेण्यासाठी मदत केली होती. या शहरात लपलेला मोठा खजिना असल्याच्या कथा प्रचलित होत्या. बिंगहॅम यांना मात्र आपण हेच हरवलेलं शहर शोधून काढलं आहे, असा ठाम विश्वास होता.
पण, साधारण 50 वर्षांनंतर बिंगहॅम यांच्या या दाव्याला दुसऱ्या एका अमेरिकन संशोधकाने आव्हान दिलं. या संशोधकाला 'खरा इंडियाना जोन्स' असंही म्हटलं जायचं.
'आत्म्यांचं मैदान आणि प्राचीन अवशेषांचा समूह'
ऑगस्ट 1964 मध्ये जीन सॅव्हॉय यांनी आपणच ते हरवलेलं इंका शहर शोधल्याचा दावा केला. हे ठिकाण माचू पिचूपासून सुमारे 60 किलोमीटर वायव्येला होतं.
सॅव्हॉय यांच्या मते, त्याच्या मोहिमेदरम्यान एस्पिरितू पांपा येथे शेवटच्या इंका राजाचा पर्वतीय किल्ला सापडला होता. 'एस्पिरितू पांपा' म्हणजे 'आत्म्यांचं मैदान' किंवा विल्काबांबा. ॲमेझॉनच्या एका उपनदीच्या उंचावर, दुर्गम आणि ढगांनी वेढलेल्या जंगलात या प्राचीन अवशेषांचा समूह आहे.
सॅव्हॉय यांनी हा शोध लावल्याच्या अवघ्या 6 आठवड्यांनंतर बीबीसीची एक टीम त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाली.
या प्रवासात टीमने रबरच्या छोट्या बोटीतून वेगवान नदी पार केली. या वेळी त्यांची बोट उलटलीही. त्यानंतर खेचरांच्या मदतीने त्यांनी दरीतील अतिशय उंच आणि कठीण चढण चढली. पुढे दाट जंगलातून वाट काढत ते अखेर त्या ठिकाणी पोहोचले.
"प्रवासादरम्यान त्यांना मिळालेल्या काही माहितीमुळे सॅव्हॉय यांच्या काही दाव्यांबाबत शंका निर्माण झाली होती," असं त्या कार्यक्रमाच्या निवेदकाने सांगितलं. पण, इतका लांब आणि खडतर प्रवास केल्यानंतर त्यांना स्वतःच तिथे जाऊन सत्य काय आहे, हे पाहायचं होतं.
या शोधाचं महत्त्व खूप मोठं होतं. कदाचित त्यांना "एका अज्ञात शहराचं मध्यवर्ती ठिकाण' सापडलं असावं. अशी शक्यता वाटते की, शेवटच्या इंका सम्राटाने आपल्या उरलेल्या लोकांना याच ठिकाणी एकत्र केलं असावं."
20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विल्काबांबा हे शहर इतिहास आणि दंतकथांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. प्राचीन क्वेचुआ भाषेत विल्काबांबा म्हणजे 'पवित्र मैदान'.
1536 मध्ये स्पॅनिश आक्रमकांनी इंका साम्राज्याची राजधानी कुस्को ताब्यात घेतली. राजा मॅन्को त्यांना रोखू शकला नाही. त्यानंतर त्याने आपल्या पराभूत झालेल्या लोकांना घेऊन दूरच्या पर्वतीय रांगांमध्ये आश्रय घेतला.
असं सांगितलं जातं की, त्यांच्यापैकी काही हजार लोकांनी मँकोच्या निर्वासित राजधानीत राजवाडे आणि मंदिरं बांधली. मॅँकोने आपला सोन्याचा खजिना, झळाळणाऱ्या मूर्ती आणि आपल्या पूर्वजांच्या ममी या सर्व वस्तूही तिथे आणल्या होत्या.
सोळाव्या शतकातील पेरूवरील स्पॅनिश विजयाची नोंद करणारे धर्मगुरू मार्टिन दे मुरुआ यांच्या मते, "त्या दूरच्या आणि निर्वासित भूमीतही इंका लोकांचे जीवन कुस्कोसारखंच ऐषोआरामी, चैनी, वैभव आणि संपत्तीने भरलेले होते."
विल्काबांबा हे केवळ इंका लोकांचं निर्वासित ठिकाण नव्हतं, तर स्पॅनिश आक्रमकांविरोधातील त्यांच्या प्रतिकाराचं केंद्रही होतं. इथून ते स्पॅनिश सैन्याविरोधात गनिमी काव्याने लढण्याच्या योजना आखत आणि इतर भागांतही बंडाला प्रोत्साहन देत.
परंतु, 1572 मध्ये स्पॅनिश सैन्याने विल्काबांबावर आक्रमण केलं. त्यावेळी इंका लोकांनी शहराला आग लावली आणि त्यांनी तिथून पळ काढला.
इंकांची शेवटची राजधानी हळूहळू दाट जंगलात गडप झाली आणि शेकडो वर्षे तिचं नेमकं ठिकाण गूढच राहिलं.
हरवलेल्या गूढ शहराच्या शोधात
पेरूमधील काही जमीनमालकांनी 1909 मध्ये बिंगहॅम यांची 'चोकेकिराओ' नावाचं ठिकाणच ते प्रसिद्ध हरवलेलं इंका शहर आहे का, हे शोधण्यासाठी बोलावलं. चोकेकिराओचा अर्थ 'सोन्याचा पाळणा' असा होतो.
त्यावेळी बिंगहॅम 34 वर्षांचे होते. ते लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक होते आणि त्या भागात प्रवास करत होते. बिंगहॅम पुढे अमेरिकेचे सिनेटरही झाले.
विशेष म्हणजे, बिंगहॅम पुरातत्त्वशास्त्रज्ञ नव्हते आणि ते इंका संस्कृतीचे अवशेषांचा शोध घेण्यासाठीही निघाले नव्हते.
पण, स्थानिक सरकारी अधिकारी आणि अपुरिमाकचे प्रीफेक्ट (प्रांतीय प्रमुख) जुआन जोसे न्युनेझ यांनी हार मानली नाही. त्यांनी बिंगहॅम यांना हा शोध घेण्यासाठी अखेर तयार केलंच.
बिंगहॅम यांनी लिहिलं, "न्युनेझ यांचा माझ्यावर ठाम विश्वास होता. मी डॉक्टर आणि पीएच.डी असल्यामुळे मला पुरातत्त्वशास्त्राची चांगली माहिती असेल, असं त्यांना वाटत होतं. चोकेकिराओ इथे दडलेला खजिना किती मौल्यवान आहे, हेही मी सांगू शकेन, असा त्यांचा विश्वास होता."
बिंगहॅम यांनी आपण पुरातत्त्वशास्त्राचे जाणकार नाही, असं सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, न्युनेझ यांनी बिंगहॅम यांचा हा नकार नम्रपणा म्हणूनच घेतला.
बिंगहॅम यांनी पुढे स्पष्ट केलं की, "मला इंका संस्कृतीबद्दल फारशी माहिती नव्हती."
त्यामुळे त्यांनी ब्रिटिश रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या 'हिंट्स टू ट्रॅव्हलर्स' या पुस्तकाची मदत घेतली. या पुस्तकात एखाद्या पुरातत्त्वीय स्थळाचा शोध लागल्यावर काय करावं आणि त्याची पाहणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या.

फोटो स्रोत, Alamy
चोकेकिराओमध्ये सोन्याचा खजिना आहे किंवा तेच प्रसिद्ध हरवलेलं इंका शहर आहे, याबाबत बिंगहॅम यांना शंका होती. तरीही या प्रवासामुळे त्यांना 1911 मध्ये येल विद्यापीठाच्या मोहिमेचं नेतृत्व करून शेवटच्या इंका राजाच्या आश्रयस्थानाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली.
ते म्हणाले, "या पर्वतरांगांच्या पलीकडे एक अज्ञात प्रदेश असल्याचे दिसत होतं. तिथे काही महत्त्वाच्या गोष्टी सापडण्याची शक्यता होती. कदाचित मँकोची राजधानी तिथेच लपलेली असावी."
खरं तर, बिंगहॅम यांना स्थानिक मार्गदर्शकांनी त्याच ठिकाणी नेलं होतं, जे सुमारे 50 वर्षांनंतर सॅव्हॉयने शोधल्याचा दावा केला. हे ठिकाण कुस्कोपासून 150 किलोमीटर ईशान्येला होतं.
परंतु, खराब हवामानामुळे बिंगहॅम यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्याकडचं अन्नही कमी पडू लागलं आणि त्यांच्यासोबतचे सामान वाहून नेणारे लोकही साथ सोडण्याची धमकी देऊ लागले. त्यामुळे बिंगहॅम तिथून लवकरच पुढे निघून गेले. त्यानंतर त्यांनी माचू पिचू हेच हरवलेलं इंका शहर शोधून काढल्याचा दावा केला.
हरवलेल्या शहराच्या शोधासाठी आणखी एक धाडसी मोहीम
1964 मध्ये पोर्टलँड, ओरेगॉन येथील 37 वर्षीय संशोधक जीन सॅव्हॉय हे पेरूचे संशोधक अँटोनियो सँटँडर कॅसेली यांच्यासोबत एस्पिरितू पांपा परिसर येथे पोहोचले.
सुरुवातीला स्थानिक लोकांनी त्यांना या ठिकाणी नेण्यास नकार दिला. कारण, या ठिकाणाचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला देव शिक्षा करून मारतात, अशी स्थानिक दंतकथा होती.
बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर अखेर काही पेरुव्हियन लोक सॅव्हॉय आणि सँटँडर यांना तिथे घेऊन गेले. तिथे त्यांना शेवाळाने झाकलेले विल्काबांबाचे प्राचीन अवशेष दिसून आले.
सॅव्हॉय म्हणाले, "आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. प्रत्येक दिवसागणिक हे ठिकाण आणखी अद्भुत आणि आश्चर्यकारक असं वाटत होतं."
सॅव्हॉय आणि सँटँडर यांना तीन पर्वतीय पठारांवर पसरलेले प्राचीन अवशेष आढळून आले. त्यात राजवाडा, ग्रॅनाइट आणि चुनखडीच्या इमारती तसेच कारंजे होते. विशेष म्हणजे, पहिलं पठारच माचू पिचूपेक्षा साधारण चारपट मोठं होतं.
या परिसराचा शोध घेतल्यानंतर सॅव्हॉय यांना वाटलं की, "नवीन आक्रमकांविरोधात शेवटचा संघर्ष करणाऱ्या इंका लोकांनी हे ठिकाण आश्रयासाठी वापरलं असावं."
परंतु, अवघ्या 2 आठवड्यांनंतर त्यांचे मार्गदर्शक एक-एक करून त्यांना सोडून जाऊ लागले. स्थानिक दंतकथा आणि अंधश्रद्धांमुळे ते घाबरले होते. सॅव्हॉय म्हणाले, "सामान्यपणे ते आमच्याशी मैत्रीपूर्णपणे आणि हसत बोलायचे. पण त्या जंगलात गेल्यावर त्यांच्या वागण्यात बदल झाला."
शेवटी सॅव्हॉय आणि सँटँडर यांनी तिथून परत जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढील शोधासाठी पुन्हा या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला.
सॅव्हॉय यांच्या मोहिमेनंतर अवघ्या 6 आठवड्यांनी बीबीसीची एक टीमही त्याच मार्गाने त्या ठिकाणी पोहोचली. चित्रपट कॅमेरा घेऊन तिथे जाणारा हा प्रवास विशेष होता. कारण तब्बल 400 वर्षांपासून फारच कमी युरोपीय लोक या मार्गाने गेले होते.
डेव्हिड अॅटनबरो यांच्या बीबीसी 'ॲडव्हेंचर' मालिकेसाठी हा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक टोनी मॉरिसन यांनी सांगितलं की, टीमने एक आठवडा कठीण प्रवास केला. दाट आणि सतत पावसाने भिजलेल्या डोंगराळ जंगलातून उतरत अखेर ते इंका लोकांच्या प्राचीन वसाहतीच्या अवशेषांपर्यंत पोहोचले.
दाट जंगलामुळे हे शहर शेकडो वर्षे जगापासून लपून राहिले होते. तिथे पोहोचण्यासाठी संशोधकांना कपोकची मोठी झाडं, वेली, झुडपं आणि फर्नची दाट झाडं कापत कापत वाट काढावी लागायची.
एका अहवालानुसार, "भव्य वृक्षांची मुळे शहराच्या भिंती आणि पायऱ्यांभोवती घट्ट गुंतली होती. झाडांच्या फांद्यांवर टेलिफोनच्या केबल्सइतक्या जाड आणि मजबूत वेली पसरल्या होत्या."
सॅव्हॉय म्हणाले, "मला या जंगलाचा खूप त्रास होतो." पण, त्याच वेळी त्यांनी पुढे सांगितलं, "पण या जंगलाचा शोध न घेण्यापेक्षा तिथेच मरून जाणं मला पसंत आहे."
सॅव्हॉय आणि सँटँडर यांना सापडलेल्या अवशेषांवरून एस्पिरितू पांपा हेच इंका साम्राज्याची शेवटची राजधानी होती, हे सिद्ध झालेलं नव्हतं. पण, तिथे सापडलेली एक महत्त्वाची गोष्ट पुढे हे ठिकाणच विल्काबांबा असल्याचं सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरली, ती म्हणजे छतावरील कौलं.
1964 मध्ये बीबीसीच्या निवेदकाने सांगितलं, "आतापर्यंतचा सर्वात ठोस पुरावा म्हणून या कौलांना मानता येईल. त्यांची रचना स्पॅनिश पद्धतीची आहे, पण त्यांचा रंग आणि त्यावरील खुणांमध्ये इंका संस्कृतीचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो."
या कौलांना मिळालेलं महत्त्व नंतर जॉन हेमिंग यांनीही ओळखलं. ते 1975 ते 1996 या काळात लंडनच्या रॉयल जिओग्राफिक सोसायटीचे संचालक होते आणि ते इंका संस्कृतीचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते.
त्यांनी विल्काबांबाबद्दलच्या प्रत्यक्षदर्शींच्या नोंदी आणि जुन्या वर्णनांचा अभ्यास केला. त्यात धर्मगुरू मार्टिन डी मुरुआ यांच्या नोंदींचाही समावेश होता. या वर्णनांची तुलना त्यांनी एस्पिरितू पांपा येथील अवशेषांशी केली. दोन्ही ठिकाणांबद्दलच्या अनेक गोष्टी एकमेकांशी जुळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
'जंगलाच्या आत आणखी एक शहर'
कौलं सापडणं ही एक महत्त्वाची आणि अनोखी गोष्ट होती, कारण इंका लोक साधारणपणे घरांच्या छतासाठी गवताचा वापर करत असत. परंतु, मुरुआ यांनी इंका लोकांच्या निर्वासित राजधानीचं वर्णन करताना एक महत्त्वाची माहिती दिली होती.
ते म्हणतात, "इंकांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर बांधलेला एक राजवाडा होता आणि त्यांच्या छतावर कौलं होती."
सॅव्हॉय यांनी नंतर सांगितलं, "हे शहर इतक्या वर्षांपासून चर्चेत होतं की, ते इतिहासातून जवळजवळ दंतकथेत बदलून गेलं होतं. आता आम्ही त्याला पुन्हा इतिहासाच्या पटलावर आणलं आहे."
यावरून असं दिसून येतं की, 1911 मध्ये बिंगहॅम ज्या ठिकाणाचा शोध घेत होते, त्या ठिकाणापासून ते अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून गेले होते. हेच ठिकाण इंका साम्राज्याचं अखेरचं आश्रयस्थान होतं.
पण, सॅव्हॉय यांच्यासाठी एक गूढ अजूनही कायम होतं. त्यांनी 1967 मध्ये एस्क्वायर मासिकाला सांगितलं, "इंका लोकांचा सोन्याचा आणि दागिन्यांचा फक्त थोडाच भाग सापडला आहे. उरलेला खजिना स्पॅनिश लोकांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी तो तलावांमध्ये आणि गुहांमध्ये लपवला असावा."
ते पुढे म्हणाले, "माझ्या आधीच्या मोहिमांमध्ये मला नकाशावर नसलेले तलाव, सरोवर आणि भिंती बांधून बंद केलेले, पण कुठेही नोंद नसलेले भुयारी मार्गही सापडले होते."
शेवटचं इंका शहर असावं असं मानलं जाणाऱ्या या ठिकाणाचा शोध लागला असला, तरी आजही त्याचा बहुतांश भाग दाट जंगलात गाडला गेलेला आहे. दगडी बांधकामांभोवती वेली आणि झाडांची मुळं घट्ट गुंतलेली असून, त्यांनी शहराचे प्रवेशद्वारही झाकून टाकले आहेत. या शोधामुळे उत्तरं मिळण्यापेक्षा आणखी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पेरूच्या संस्कृती मंत्रालयातील पुरातत्वशास्त्रज्ञ जेव्हियर फोन्सेका यांनी 2018 मध्ये द गार्डियनला सांगितलं, "हा परिसर खूप महत्त्वाचा आहे, कारण इथल्या अवशेषांचं अजूनही कोणी नुकसान केलेलं नाही किंवा त्यांची लूटही झालेली नाही."
इतकंच नाही, तर जंगलाच्या आणखी आत अजून एक प्राचीन शहर असल्याचेही वृत्त समोर आलेले आहे.
सॅव्हॉय यांनी 1967 मध्ये म्हटलं होतं, "ज्याला 'हरवलेला इंका खजिना' म्हटलं जातं, तो अद्याप सापडलेला नाही, हे आपल्याला माहीत आहे. जर हा खजिना खरंच अस्तित्वात असेल, तर तो कुठे लपवला असेल याचा आपण अंदाज लावू शकतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























