You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
योगी आदित्यनाथ जिच्या प्रश्नानंतर उठून गेले, ती महिला पत्रकार कोण आहे?
- Author, प्रेरणा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, लखनौ
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पत्रकार परिषदेतील एक व्हीडिओ समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हीडिओत एक महिला पत्रकार मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहे आणि मुख्यमंत्री त्यांना हात दाखवत पुढे निघून जाताना दिसत आहेत.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेले भाजपचे इतर नेते देखील त्यांच्यासोबत जाताना दिसत आहेत.
या व्हीडिओनंतर सदर महिला कोण आहे याबाबत समाज माध्यमांवर उत्सुकता दिसत आहे. या पत्रकाराचे नाव दिव्या श्रीवास्तव आहे.
'टॉप सिक्रेट' नावाच्या एका युट्युब चॅनेलवर श्रीवास्तव यांनी असा दावा केलाय की मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना काही जणांनी घेरलं आणि त्यांच्यासोबत अशिष्ट व्यवहार केला.
भाजपने म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांचा हा कार्यक्रम प्रश्नोत्तराचा नव्हता.
युट्युब चॅनेलसोबत बोलताना दिव्या श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की तुमच्या घरावर बुलडोझर चालवले जाईल, अशी धमकी त्यांना काही लोकांकडून देण्यात आली आहे.
बीबीसी हिंदीने दिव्या श्रीवास्तव यांच्याशी बातचीत केली आणि हा मुद्दा समजून घेतला आहे.
दिव्या यांनी बीबीसी हिंदीला सांगितले की त्या एक मुक्त पत्रकार म्हणून काम करतात आणि याआधी देखील त्या भाजपच्या पत्रकार परिषदांना गेल्या आहेत.
दिव्या यांनी सांगितले की उत्तर प्रदेशात पाऊस पडल्यानंतर रस्ते तुंबणे आणि एक्सप्रेस-वे संबंधित प्रश्न मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे होते.
त्यांनी सांगितले की पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास आधी आपले म्हणणे मांडले. नंतर त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्याची संधीच देण्यात आली नाही.
दिव्या यांनी हे देखील म्हटले आहे की हा व्हीडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर त्यांना लक्ष्य केले जात आहे आणि त्यांना धमकावले जात आहे.
त्या म्हणाल्या की त्या लखनौमध्ये एकट्याच राहतात आणि आपल्या सुरक्षेबाबतची चिंता त्यांना सतावत आहे.
या प्रकरणावर युथ काँग्रेसने एक्सवर भाष्य केले आहे. त्यांनी पत्रकार दिव्या श्रीवास्तव यांना पाठिंबा दर्शवताना राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत.
भाजपने काय म्हटले?
भाजप प्रवक्ता राकेश त्रिपाठी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी सांगितले की ही पत्रकार परिषद भाजपच्या 'सेवा संकल्प अभियानाबद्दल माहिती देण्याकरता होती. यात प्रश्नोत्तराचे सत्र नव्हते.
त्यांच्यानुसार, प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये मॉडरेटर हे ठरवतो की प्रश्नोत्तरे होणार की नाहीत.
त्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री गेल्यानंतर मुद्दामहून सदर महिला असा व्हीडिओ बनवण्याच्या उद्देशानेच याप्रकारे बोलली.
संबंधित महिला कोणत्या माध्यम संस्थेशी संबंधित आहे हे देखील आपल्याला माहीत नाही असे देखील या प्रवक्त्याने म्हटले आहे.
त्यांनी पुढे देखील असे म्हटले की "जर कुणा महिला पत्रकाराला सोशल मीडियावर धमकी मिळत असेल तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायला हवी आणि पोलिसांनी कारवाई करायला हवी."
अखिलेश यादव आणि विरोधी पक्षनेत्यांनी काय म्हटले?
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी माध्यमांना सांगितले, "आपले मुख्यमंत्री देखील कमाल आहेत. नावे बदलणारे, पत्रकार परिषद बोलवून केवळ स्वतःच बोलणारे आहेत. ते प्रश्नांची उत्तर देऊच शकले नाहीत. त्यांनी अशी पाठ फिरवली की जणू ते मैदान सोडून पळत आहेत. विचार करा जे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाहीत ते निवडणुकांमध्ये जनतेच्या प्रश्नाला काय उत्तर देतील?"
आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवर पार्टीने पोस्ट केले आहे की प्रश्नांपासून दूर पळणे ही भाजपची जुनी सवय आहे. एका महिला पत्रकाराच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची त्यांची हिम्मत झाली नाही तर मुख्यमंत्री योगी पळाले.
नॉर्वेत पंतप्रधान मोदी पळाले आणि आता योगी जी यांच्यावर पळण्याची वेळ आली. त्यांना प्रश्नांची इतकी भीती का वाटते?
उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रमुख अजय राय यांनी एक्सवर लिहिले , "दिव्या जी तुम्ही एकट्या नाहीत. तुमचा आवाज दाबू पाहण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत. पत्रकारांचे काम प्रश्न विचारणे आहे. प्रश्न विचारल्यावर धमक्या मिळणे हा लोकशाहीचा अपमान आहे. या भीतीसमोर पत्रकारिता झुकणार नाही. प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक आवाजाची आम्ही साथ देऊ."
ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या प्रमुख अलका लांबा लिहितात, "या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळेच कुणी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत करत नाही. आता पाहिला का परिणाम, ती महिला पत्रकार हिम्मतवाली मूर्ख निघाली आणि पुरुष पत्रकार समजूतदार. उत्तर प्रदेश भीतीत वावरत आहे - वंदे मातरम."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)