You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साप खरंच 'या' केमिकल स्प्रे आणि वनस्पतींमुळे पळून जातात?
- Author, के. शुभगुणम
- Role, बीबीसी तमिळ
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
घर, बाग आणि शेतजमिनीत साप येऊ नयेत, यासाठी विविध प्रकारचे स्प्रे आणि रसायने ऑनलाईन विकली जातात.
मात्र, ही उत्पादनं खरंच सापांना दूर ठेवतात का? ही उत्पादनं खरंच परिणामकारक असतात का?
इंटरनेटवर 'Snake Repellent' असं शोधल्यास, 'सापांना घरात प्रवेश करण्यापासून रोखतं', 'विशिष्ट परिसरात साप येऊ देत नाही' असा दावा करणारी अनेक उत्पादनं आढळतात.
उपलब्ध उत्पादनांच्या वर्णनांनुसार, काहींमध्ये विविध आवश्यक तेल (Essential Oils) वापरलेली असतात, तर काहींमध्ये गंधक (सल्फर) आणि नॅप्थलीनसारखी रसायनं असतात.
काही उत्पादनांमध्ये निर्माण होणाऱ्या तीव्र वासामुळे साप परिसरापासून दूर राहतात, असाही दावा केला जातो.
मात्र, एखाद्या पदार्थाला तीव्र वास आहे, याचा अर्थ तो सापांना दूर ठेवेलच, असं नाही, असं मदुराई येथील रेप्टाईल सोसायटीचे संस्थापक विश्वनाथन सांगतात.
विश्वनाथ हे गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ सापांचे जीवशास्त्र आणि साप-मानव संबंधांचा अभ्यास करत असून सर्पमित्र म्हणूनही काम करतात.
अभ्यास काय सांगतो?
भारतातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO मधील संशोधकांनी केलेला अभ्यास या संदर्भातील महत्त्वाच्या अभ्यासांपैकी एक मानला जातो.
हा अभ्यास 29 जुलै 2012 रोजी 'सायंटिफिक रिपोर्ट्स' या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. भारतातील विषारी सापांपैकी नाग, बँडेड क्रेट, रसेल वायपर आणि सॉ-स्केल्ड वायपर यांच्यासह काही सापांवर काही सर्पप्रतिबंधक उत्पादनांची चाचणी घेण्यात आली.
प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात करण्यात आलेल्या या प्रयोगांमध्ये काही उत्पादनांमुळे साप दूर राहिल्याचं आढळून आलं.
विशेषतः लवंगाच्या तेलात आढळणाऱ्या यूजेनॉलचा (Eugenol) सापांना दूर ठेवण्यात काही परिणाम दिसून आला.
मात्र, इथे एक महत्त्वाची बाब आहे. हे प्रयोग नियंत्रित प्रयोगशाळेतील वातावरणात करण्यात आले होते. घर, बाग किंवा शेत यांसारख्या नैसर्गिक वातावरणात हे निष्कर्ष थेट लागू करता येणार नाहीत, असं संशोधकांनी नमूद केलं आहे.
अशा उत्पादनांचा वापर केला तरी त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं किंवा त्यांना सुरक्षिततेचा पूर्ण उपाय मानणं योग्य नाही, असंही या अभ्यासात सावध करण्यात आलं आहे.
प्रयोगशाळेबाहेरच्या वातावरणातही दिसतो का परिणाम?
सर्पप्रतिबंधक म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत हा महत्त्वाचा प्रश्न आहे की, ही उत्पादने प्रत्यक्ष नैसर्गिक वातावरणातही काम करतात का?
2008 मध्ये 'Applied Herpetology' या सरीसृपशास्त्राशी संबंधित नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात नॅप्थलीन आणि गंधकाच्या मिश्रणाची सापांवर चाचणी घेण्यात आली.
नैसर्गिक वातावरणासारखी जागा तयार करून, त्या ठिकाणी हा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी रसायनांचा वापर केलेला परिसर टाळणारे साप फारच कमी होते. अनेक साप त्या परिसरातून नेहमीप्रमाणे फिरताना आढळले.
या अभ्यासाच्या अखेरीस संशोधकांनी निष्कर्ष काढला की, अशा सर्पप्रतिबंधक मिश्रणांमुळे साप पूर्णपणे दूर राहत नाहीत आणि त्यामुळे सापांपासून सुरक्षिततेची खात्री देता येत नाही.
नैसर्गिक तेलांचा वापर करणारे स्प्रे किती प्रभावी?
ऑनलाइन विकली जाणारी अनेक नवीन उत्पादने 'नैसर्गिक उत्पादने' असल्याचं सांगून विकली जातात. त्यामध्ये दालचिनी, पेपरमिंट, लवंग आणि देवदाराच्या लाकडापासून मिळणाऱ्या तेलांसारख्या पदार्थांचा समावेश असतो.
मात्र, 'नैसर्गिक' असणं म्हणजे 'सापांना दूर ठेवणं' असं नाही.
अलीकडे 'Frontiers in Public Health' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या सर्पप्रतिबंधक मिश्रणांचा अभ्यास करण्यात आला.
यापैकी अनेक उत्पादनांमध्ये आवश्यक तेलांसह विविध रसायने असल्याचं संशोधकांनी नमूद केलं. मात्र, ही उत्पादने प्रभावी असल्याचे वैज्ञानिक पुरावे फारच कमी आहेत.
बाह्य वातावरणात करण्यात आलेल्या काही प्रयोगांमध्ये तर तपासण्यात आलेल्या कोणत्याही उत्पादनाने साध्या पाण्यापेक्षा चांगल्या प्रकारे सापांना दूर ठेवलं नाही, असंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.
सापांना दूर ठेवणाऱ्या वनस्पती खरंच असतात का?
अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड एक्स्टेंशन सर्व्हिसच्या तज्ज्ञ मार्गदर्शक सूचनांनुसार, विविध प्रकारच्या सर्पप्रतिबंधक उपायांची चाचणी घेण्यात आली असली तरी, त्यापैकी कोणत्याही उपायाने सातत्याने प्रभावी परिणाम दिल्याचं सिद्ध झालेलं नाही. हे मार्गदर्शन 2 एप्रिल 2021 रोजी प्रकाशित करण्यात आलं होतं.
यावर भर देताना विश्वनाथन म्हणाले, "स्नेक प्लांट, सिरियन नांगई, पेरिया नांगई, सर्पगंधी आणि चोत्रू कॅक्टस यांसारख्या वनस्पती सापांना दूर ठेवतात, अशी आपल्या गावांमध्ये समजूत आहे. मात्र, त्यासाठी अद्याप कोणताही वैज्ञानिक पुरावा आम्हाला मिळालेला नाही. उलट, प्रत्यक्षात आम्ही या वनस्पतींच्या आसपास साप फिरताना पाहिले आहेत."
त्यांच्या मते, "जर सापांची शिकार असलेले उंदीर आणि घुशी यांसारखे प्राणी परिसरात मोठ्या प्रमाणात असतील, तर सर्पप्रतिबंधक वनस्पती असोत किंवा सर्पप्रतिबंधक स्प्रेसारखी रासायनिक उत्पादने असोत, त्यांच्यामुळे सापांचा वावर थांबणार नाही."
याशिवाय, "लहान मुलं दररोज घरात खेळत आणि फिरत असतात. एखादा चेंडू उचलताना किंवा एखाद्या ठिकाणी हात ठेवताना त्यांच्या हाताला ही रसायने लागू शकतात."
"मुलं हात व्यवस्थित धुतल्यानंतरच तो तोंडाला लावतील, याची 100 टक्के खात्री देता येत नाही. त्यामुळे सापांपासून मुलांचं संरक्षण करण्याऐवजी अशा उत्पादनांमुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे," असा इशारा विश्वनाथन यांनी दिला.
सापांना घरात येण्यापासून कसं रोखता येईल?
सर्पदंश रोखण्यासाठी रासायनिक सर्पप्रतिबंधकांवर अवलंबून राहण्याऐवजी परिसराचं योग्य व्यवस्थापन करण्याच्या उपायांना महत्त्व देण्यावर जागतिक आरोग्य संघटनेनेही भर दिला आहे.
याबाबत विश्वनाथन सांगतात की, "घराभोवती गवत आणि झुडपं खूप वाढू न देणं, कचरा आणि साप लपू शकतील अशी ठिकाणं साफ करणं आणि साप घरात शिरू शकतील अशा जागा बंद करणं यांसारखे उपाय करणे महत्त्वाचे आहे."
तसंच, सापांची आवडती शिकार असलेले उंदीर आणि घुशी घराभोवती मोठ्या प्रमाणात वाढणार नाहीत, याची काळजी घेणंही महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.
मग सर्पप्रतिबंधक स्प्रे निरुपयोगी आहेत का?
तज्ज्ञांच्या मते, घराभोवती अशा स्प्रेची फवारणी केल्यास साप नक्कीच दूर राहतील, असं सांगण्यासाठी सध्या पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
त्यामुळे ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या सर्पप्रतिबंधक स्प्रेंना सापांपासून बचावाचा हमखास उपाय मानणं चुकीचं आहे, असं रेप्टाईल ऑर्गनायझेशनचे संस्थापक विश्वनाथन सांगतात.
यापूर्वी सर्पमित्र आणि वन्यजीव कार्यकर्ते सॅमसन किरुबाकरन यांनीही बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं होतं की, "घरात साप शिरू नयेत यासाठी प्रवेशाच्या जागा बंद करणं, घराभोवतीची झुडपं आणि कचरा हटवणं आणि उंदीर यांसारख्या सापांच्या भक्ष्यांवर नियंत्रण ठेवणं हे सर्वात विश्वासार्ह प्रतिबंधात्मक उपाय आहेत."
तज्ज्ञांच्या मते, एखाद्या उत्पादनावर '100 टक्के सर्पप्रतिबंधक' असा दावा केला जाणं आणि ते नैसर्गिक वातावरणात प्रभावी असल्याचं वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होणं, यात मोठा फरक आहे.
साप घरात येऊ नयेत यासाठी आणखी काय करता येईल?
साप घरात येऊ नयेत यासाठी सर्वसामान्यांनी काही उपाय नियमितपणे करावेत, असं सर्प संशोधक सांगतात. हे उपाय केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर वर्षभर पाळले पाहिजेत. त्याचबरोबर घरात काही गोष्टी टाळण्याचा सल्लाही ते देतात.
बीबीसी तमिळशी बोलताना सर्पमित्र विश्वनाथ म्हणाले, "उन्हाळ्यात अनेकजण हवा लागावी म्हणून जमिनीवर झोपतात. अशावेळी त्यांच्या भोवती मच्छरदाणी किंवा अशा प्रकारचं संरक्षण असणं महत्त्वाचं आहे.
काही साप दरवाजातून घरात येतात. स्वयंपाकघरातील सिंकच्या पाइपमधूनही ते घरात येऊ शकतात. अशा प्रकारे आलेले काही साप आम्ही पकडले आहेत. त्यामुळे अशा पाइपला झाकण लावणं महत्त्वाचं आहे."
"बूट घराबाहेर ठेवण्याऐवजी ते खिळ्यावर किंवा एखाद्या उंच जागी टांगून ठेवणं चांगलं. अन्यथा छोटे साप त्यामध्ये जाऊन लपू शकतात. बूट हलवले तरी ते बाहेर येतीलच असं नाही. थंडीच्या दिवसांत साप गाड्यांच्या आतही जाऊ शकतात. डांबरी रस्ते दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती बाहेर सोडतात, त्यामुळे साप रस्त्यावर पडलेले असू शकतात. म्हणून रात्री अंधारात टॉर्चशिवाय बाहेर जाणं टाळावं," असा सल्ला विश्वनाथ यांनी दिला.
सिराजुद्दीन यांच्या मते, "उन्हाळ्यात इमारतींचे कोपरे आणि विटांची बांधकामं तुलनेने थंड राहतात आणि त्यामुळे साप अशा ठिकाणी लपू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. घराभोवती लाकडं, पुठ्ठ्याचे बॉक्स आणि अनावश्यक वस्तूंचे ढीग करून ठेवणं टाळणं चांगलं."
मात्र, याला पाठिंबा देणारा संशोधनाधारित डेटा उपलब्ध नाही, असं चेन्नई स्नेक पार्कचे प्रशासक आणि सरीसृप संशोधक गणेशन सांगतात. उन्हाळ्यात साप घरांमध्ये अधिक प्रमाणात येतात आणि इतर ऋतूंमध्ये कमी येतात, अशी सर्वसाधारण समजूत आहे.
"ऋतू कोणताही असो, साप घरांच्या दिशेने येणं ही सामान्य बाब आहे. साप घरात शिरला तर त्याला मारण्याचा किंवा हाकलून लावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जवळच्या वन विभागाला किंवा अग्निशमन दलाला माहिती देणं योग्य आहे. घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे," असं गणेशन सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)