उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होतेय? प्रखर सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या 'या' आजाराबद्दल जाणून घ्या

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ वाढतेय? सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या आजाराची माहिती घ्या

फोटो स्रोत, Getty Images

एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याकडे उन्हाच्या झळा किती प्रखरपणे जाणवत आहेत हे वेगळं सांगण्याची गरज आहे. त्यातही भारतात बहुतांश भागात मे महिन्यात उन्हाळा अतिशय तीव्र स्वरुप धारण करतो.

उन्हाचे, वाढलेल्या तापमानाचे आपल्या शरीरावर, मनावर थेट परिणाम होत असतात. त्यामुळेच जगभरात हा महिना UV Eye Safety Month म्हणून पाळला जातो.

आता उन्हाच्या चटक्यांचा त्वचेवर कसा परिणाम होतो याबाबत बहुतांश लोकांमध्ये जागरुकता आलेली आहे किंवा त्यांना त्याचे परिणाम तरी माहिती असतात. त्यासाठी उन्हापासून रक्षण करण्यासाठी योग्य कपडे, टोपी, सनस्क्रीन याचा वापर केला जातो.

परंतु या सूर्यप्रकाशाचा डोळ्यांवरही तितकाच गंभीर म्हणावा इतका होत असतो. याची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळेच याची माहिती आपण घेणार आहोत.

अतिनिल म्हणजे तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे डोळ्यांची जळजळ होते. यालाच फोटोकेरटायटिस असं म्हणतात. भारतासारख्या देशात उन्हाळ्यात UV किरणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

दुपारी थेट उन्हात काम करणारे लोक, प्रवासात असणारे नागरिक, शेतकरी, मैदानी खेळ खेळणारी मुले किंवा समुद्रकिनारी वेळ घालवणारे लोक यांना याचा धोका अधिक असतो.

विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे फोटोकेरटायटिस हा आजार केवळ दीर्घकाळ उन्हात राहिल्यानेच होतो असे नाही, तर अगदी थोड्या वेळाच्या तीव्र सूर्यप्रकाशामुळेही तो होऊ शकतो.

डोळ्यांत जळजळ, पाणी येणे, लालसरपणा किंवा प्रकाश सहन न होणे ही लक्षणे साधी वाटली तरी त्यामागे गंभीर कारण असू शकते.

अल्ट्राव्हायोलेट किरणं म्हणजे काय?

सूर्यप्रकाशात असलेली अतिनिल म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरण मानवी डोळ्यांसाठी अतिशय हानिकारक ठरू शकतात.

ही किरणं मुख्यतः UVA, UVB आणि UVC अशा तीन प्रकारची असतात. यापैकी UVC किरण पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत पण UVA आणि UVB किरण मोठ्या प्रमाणात डोळ्यांवर परिणाम करतात.

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ वाढतेय? सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या आजाराची माहिती घ्या

फोटो स्रोत, Getty Images

ही किरणं थेट डोळ्यांच्या पृष्ठभागावर आदळल्याने कॉर्नियाला सूज येऊ शकते आणि त्यामुळे फोटोकेरटायटिस होतो.

उन्हाळ्यात, विशेषतः दुपारी अकरा ते चार या वेळेत UV किरणांची तीव्रता सर्वाधिक असते. पाणी, वाळू किंवा काँक्रीटसारख्या पृष्ठभागांवरून हे किरण परावर्तित होऊन थेट डोळ्यांवर आदळतात. त्यामुळे सावलीत असतानाही डोळ्यांना धोका निर्माण होऊ शकतो.

सतत किंवा वारंवार अशा किरणांच्या संपर्कात राहिल्यास पुढे कॅटरॅक्टसारख्या डोळ्यांच्या दीर्घकालीन आजारांचा धोका वाढू शकतो.

आपल्या डोळ्याचे भाग आणि त्यांचा प्रकाशाशी येणारा संबंध

डोळ्याचा सर्वात बाहेरील पारदर्शक भाग म्हणजे कॉर्निया. हाच भाग सर्वप्रथम सूर्यकिरणांच्या संपर्कात येतो. UV किरणांमुळे कॉर्नियाच्या पेशींना तात्पुरते नुकसान होते, त्यामुळे डोळ्यांत तीव्र जळजळ, दुखणे आणि पाणी येण्यासारखी लक्षणे दिसतात.

त्याखालचा भाग म्हणजे लेन्स, जो कालांतराने UV किरणांमुळे प्रभावित होऊ शकतो. याच लेन्समध्ये बदल होऊन पुढे कॅटरॅक्टची शक्यता वाढते.

आपल्या डोळ्याचे भाग आणि त्यांचा प्रकाशाशी येणारा संबंध

फोटो स्रोत, Getty Images

दीर्घकाळ प्रखर सूर्यप्रकाश आणि UV‑संबंधित ताणामुळे डोळ्याच्या आतील भागावर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो.

विशेषतः लहान मुले प्रौढांपेक्षा अधिक संवेदनशील असतात, कारण त्यांच्या लेन्समधून जास्त प्रमाणात UV किरण आत जातात. त्यामुळे लहान वयापासूनच डोळ्यांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

त्यामुळेच योग्य UV संरक्षण असलेले सनग्लासेस वापरणे, थेट उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाश टाळणे आणि डोळ्यांत कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

सर्वात जास्त धोका कोणाला? त्याची लक्षणं कोणती?

काही व्यावसायिक गटांना हा धोका अधिक असतो. यात वेल्डिंग करणारे कामगार, शेतकरी, वाहतूक पोलीस, बांधकाम मजूर आणि डोळ्यांचे संरक्षण न करता दुचाकी चालवणारे लोक यांचा समावेश होतो.

तसेच समुद्रकिनारे, हिमप्रदेश किंवा पाण्याच्या आसपासच्या भागात UV किरण परावर्तित होऊन अधिक तीव्रतेने डोळ्यांवर पडतात. याशिवाय एकाच वेळी अनेक लोकांवर तीव्र UV संपर्क झाल्यास फोटोकेरटायटिसची अचानक वाढ दिसू शकते.

भारतात अशा काही कार्यक्रमांमध्ये किंवा UV दिव्यांच्या संपर्कामुळे मोठ्या संख्येने लोकांना डोळ्यांचे विकार झालेले आढळले आहेत.

फोटोकेरटायटिसमध्ये डोळ्यांत वेदना होणं किंवा वाळू अडकली आहे अशी भावना जाणवणं ही लक्षणं दिसतात. याशिवाय डोळे लाल होणं, डोळ्यांतून जास्त पाणी येणं, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणं म्हणजेच फोटोफोबिया, धूसर दिसणं आणि काही रुग्णांमध्ये पापण्या सुजणं किंवा आकस्मात पापण्या मिटणं अशी लक्षणं दिसू शकतात.

बहुतांश वेळा दोन्ही डोळ्यांवर याचा परिणाम होतो, कारण सूर्यप्रकाशाचा संपर्क साधारणपणे दोन्ही डोळ्यांना होतो.

सर्वात जास्त धोका कोणाला? त्याची लक्षणं कोणती?

फोटो स्रोत, Getty Images

फोटोकेराटायटिसचा एक गोंधळात टाकणारा पैलू म्हणजे UV किरणांचा संपर्क आणि प्रत्यक्ष लक्षणे दिसणे यामधील विलंब. एखादी व्यक्ती दुपारच्या प्रखर उन्हात तासन्‌तास बाहेर असू शकते आणि तेव्हा मात्र त्यांना काहीही त्रास जाणवलेला नसतो. मात्र रात्री किंवा पहाटे अचानक डोळ्यांत तीव्र वेदना सुरू होतात.

संशोधनानुसार UV किरणांच्या संपर्कानंतर साधारणपणे 6 ते 12 तासांनी लक्षणे दिसतात. अतिशय तीव्र संपर्कात ही लक्षणे 30 मिनिटांतही सुरू होऊ शकतात.

भारतीय संदर्भात, रात्री ही लक्षणे सुरू झाल्यावर अनेकदा लोक याला धुळीची ऍलर्जी किंवा डोळ्यांचा संसर्ग समजतात आणि डॉक्टरांकडे जाणे टाळतात. मात्र बहुतेक वेळा विश्रांती, प्रकाशात जाणं टाळणं आणि साध्या काळजीने ही लक्षणे 24 ते 48 तासांत कमी होतात. दोन दिवसांनंतरही वेदना तीव्र राहिल्या किंवा दृष्टीत बदल झाला तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

पुण्यात शिवाजीनगर येथील एएसजी आय हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संचालक पदावर डॉ. हेमंत कांबळे कार्यरत आहेत. त्यांनी या आजारात नक्की काय त्रास होतो यावर काय सखोल माहिती दिली.

सर्वात जास्त धोका कोणाला? त्याची लक्षणं कोणती?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले, "मानवी डोळ्याच्या बाहेरील बाजूला पारदर्शक, घुमटासारखा थर असतो, ज्याला कॉर्निया म्हणतात. तसेच डोळ्याचा पांढरा भाग झाकणारा एक पातळ पापुद्रा असतो, तिला कंजक्टिव्हा म्हणतात. जेव्हा UV किरण, विशेषतः UVB प्रकारचे किरण, कोणत्याही संरक्षणाविना या पृष्ठभागांवर पडतात, तेव्हा ते कॉर्नियाच्या सर्वात वरच्या पेशीस्तरात शोषले जातात. या पेशींना कॉर्नियल एपिथेलियम म्हणतात. या पेशी हळूहळू तुटू लागतात आणि सोलून निघतात, अगदी त्वचेवर सनबर्न झाल्यावर फोड उठतात तसेच हे होतं.

या पेशी सोलून निघाल्यावर त्यांच्या खाली असलेली अतिशय नाजूक नसांची टोकं उघडी पडतात. त्यामुळेच रुग्णांना तीव्र वेदना, जळजळ आणि असह्य त्रास जाणवतो."

डॉ. हेमंत कांबळे सांगतात, "फोटोकेराटायटिस हा आजार दोन प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे तीव्र (acute) प्रकार, जो कमी वेळात पण खूप तीव्र UV किरणांच्या संपर्कामुळे होतो.

दुसरा म्हणजे दीर्घकालीन (chronic) प्रकार, जो दीर्घकाळ कमी प्रमाणात UV किरणांच्या संपर्कात राहिल्यामुळे होतो.

भारतात प्रामुख्याने तीव्र फोटोकेराटायटिस आढळतो. म्हणजेच उन्हाळ्यात दुपारी काही तास कोणत्याही डोळ्यांच्या संरक्षणाशिवाय बाहेर राहिल्यानंतर काही तासांनी अचानक डोळ्यांत तीव्र वेदना सुरू होतात."

सर्वात जास्त धोका कोणाला? त्याची लक्षणं कोणती?

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढं म्हणाले, "महत्त्वाची बाब म्हणजे हे नुकसान लगेच जाणवत नाही. त्वचेसारखं डोळ्यांना UV किरण पडत असताना लगेच 'जळजळ' वाटत नाही. त्यामुळेच फोटोकेराटायटिस हा आजार फसवा आणि धोकादायक ठरतो."

"बहुतेक प्रकरणांमध्ये योग्य उपचार आणि विश्रांती घेतल्यास हा आजार बरा होतो. मात्र गंभीर किंवा वारंवार होणाऱ्या प्रकरणांमध्ये कॉर्नियाचे खोल स्तर म्हणजेच स्ट्रोमा आणि एंडोथेलियम यांनाही नुकसान पोहोचू शकते, ज्यामुळे दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात."

फोटोकेरटायटिस भारतात किती प्रमाणात आढळतो?

डॉ. जान्हवी मेहता या मुंबईत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कन्सल्टंट ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणून कार्यरत आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "भारतातील सर्वसाधारण लोकसंख्येत फोटोकेरटायटिस खूप मोठ्या प्रमाणात आढळतो असं म्हणता येत नाही, पण तो दुर्मिळही नाही. हा आजार बहुतेक वेळा विशिष्ट उच्च-जोखमीच्या गटांमध्ये दिसून येतो. "

"भारतात याचा नेमका देशपातळीवरील प्रसार सांगणारी आकडेवारी उपलब्ध नाही, कारण अनेक रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात आणि त्याची स्वतंत्र नोंद ठेवली जात नाही. मात्र भारतीय डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार तीव्र सूर्यप्रकाश, बाहेर काम करणारे कामगार, वेल्डिंगसारख्या कामांतील प्रकाश आणि पर्यटनस्थळी होणारा तीव्र UV संपर्क यामुळे फोटोकेरटायटिसचे रुग्ण आढळतात."

फोटोकेरटायटिस भारतात किती प्रमाणात आढळतो?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. हेमंत कांबळे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "भारत उष्ण कटिबंधात असल्यामुळे वर्षभर इथे UV किरणांची तीव्रता जास्त असते. मात्र मार्च ते जून या उन्हाळ्याच्या महिन्यांत अनेक भारतीय शहरांमध्ये UV इंडेक्स इतका वाढतो, की आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या मते तो 'खूप जास्त' (8–10) ते 'अत्यंत तीव्र' (11 पेक्षा जास्त) या श्रेणीत जातो.

अलीकडील आकडेवारी धक्कादायक आहे. मार्च 2026 मध्ये बंगळुरूमधील दुपारचा UV इंडेक्स तब्बल 13 पर्यंत गेला. ही जागतिक आरोग्य संघटनेनुसार 'एक्स्ट्रिम' म्हणजेच अत्यंत धोकादायक पातळी आहे. चेन्नईतही दुपारच्या सुमारास UV इंडेक्स 13 पर्यंत पोहोचल्याच्या नोंदी आहेत."

ते सांगतात, "Kerala State Disaster Management Authority (KSDMA) ने मार्च 2026 मध्ये पठाणमठ्टा, अलप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, कोल्लम आणि पालक्कड या सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्या ठिकाणी UV इंडेक्स 8 पर्यंत पोहोचला होता. हा स्तर कोणतेही संरक्षण नसल्यास डोळे आणि त्वचेला मोजता येऊ शकेल असे नुकसान करू शकतो."

"UV इंडेक्स 11 च्या वर असताना योग्य संरक्षण नसेल तर काही मिनिटांतच कॉर्नियावर ताण येऊन आणि पेशींना इजा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते."

डोळा

फोटो स्रोत, Getty Images

भारतामध्ये फोटोकेराटायटिसची नोंदवलेली मोठी घटना 2018 मध्ये तामिळनाडूतील पलानी येथे झाली होती. एका संगीत कार्यक्रमात मेटल हॅलाइड दिव्याचे बाह्य कवच तुटल्यामुळे उपस्थित लोक UV किरणांच्या थेट संपर्कात आले होते.

तेव्हा 319 लोकांपैकी 284 जणांना म्हणजेच 89 टक्के लोकांना दोन्ही डोळ्यांचा फोटोकेराटायटिस झाला. या रुग्णांचे वय 2 ते 80 वर्षांदरम्यान होते. या घटनेची नोंद शास्त्रीय संशोधन जर्नलमध्ये करण्यात आली असून भारतात सूर्यप्रकाशाबरोबरच कृत्रिम UV स्त्रोतांमधूनही असा धोका निर्माण होऊ शकतो, हे यातून स्पष्ट होते.

कोणाला धोका जास्त?

भारतात काही गटांना त्यांच्या रोजच्या कामामुळे आणि जीवनशैलीमुळे UV‑संबंधित डोळ्यांच्या आजारांचा धोका जास्त असतो.

कोणाला धोका जास्त?

फोटो स्रोत, Getty Images

थेट उन्हात काम करणारे कामगार- बांधकाम मजूर, शेतकरी, मासेमारे, फेरीवाले, ट्रॅफिक पोलीस, डिलिव्हरी कर्मचारी आणि शेतमजूर रोज अनेक तास थेट उन्हात काम करतात. आंतरराष्ट्रीय अभ्यासातून अशा कामगारांकडे डोळ्यांचे संरक्षण अत्यंत कमी असते; भारतात ही समस्या अधिक तीव्र आहे असं दिसून आलेलं आहे.

किनारी आणि ग्रामीण भागातील लोक- ICMR‑EYE SEE या अभ्यासात किनारी भागात UV‑संबंधित डोळ्यांचे आजार अधिक प्रमाणात आढळले. पाण्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारे UV किरण यासाठी कारणीभूत ठरतात.

संरक्षणात्मक चष्मा न घालणारे लोक-ग्रामीण आणि निमशहरी भागात UV‑प्रमाणित सनग्लासेस वापरण्याची सवय फारच कमी आहे. फॅशनेबल पण UV प्रमाणपत्र नसलेले चष्मे मोठ्या प्रमाणावर विकले जातात.

वेल्डर्स आणि औद्योगिक कामगार- वेल्डिंग करताना योग्य फेस शिल्ड न वापरल्यास 'आर्क आय' किंवा 'वेल्डर्स फ्लॅश' नावाचा फोटोकेराटायटिस सहज होऊ शकतो.

प्रखर UV वेळेत प्रवास करणारे लोक- दुचाकीस्वार, शाळेत चालत जाणारी मुले, सकाळी चालायला जाणारे नागरिक, हे सगळे 10 ते 4 या वेळेत धोक्यात असतात.

उंच प्रदेशात राहणारे लोक- हिमालयातील उंच भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम घाटात वातावरण पातळ असल्यामुळे UV किरण अधिक तीव्र असतात.

थोडावेळ उन्हात राहिल्यामुळे त्रास होतो की फारवेळ राहिल्यामुळे?

हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे. अल्पकालीन पण तीव्र UV संपर्कातूनही फोटोकेराटायटिस होऊ शकतो.

डॉ. हेमंत कांबळे सांगतात, "UV नुकसान एका मर्यादेपलीकडे गेले की पेशींना इजा होते. UV इंडेक्स 11 पेक्षा जास्त असताना काही मिनिटांतच ही मर्यादा ओलांडली जाऊ शकते. भारतातील उन्हाळ्यात अशी पातळी आता अनेक शहरांमध्ये नोंदवली जात आहे."

ते सांगतात, "संशोधनानुसार फोटोकेराटायटिस प्रामुख्याने अल्पकालीन पण तीव्र संपर्कातूनच होतो. भारतात दुपारच्या उन्हात छतावर, समुद्रकिनारी किंवा रस्त्यावर अवघे 30–60 मिनिटे संरक्षणाविना राहिलेल्या व्यक्तीमध्ये काही तासांनी लक्षणे दिसू शकतात."

आजूबाजूच्या पृष्ठभागांवरून UV किरण परावर्तित होऊन धोका वाढतो:

● बर्फ – 80%

● समुद्राचा फेस – 25%

● कोरडी वाळू – 15%

● काँक्रीट रस्ते – यातूनही काही प्रमाणात परावर्तन होतं.

अशा प्रमाणात परावर्तन होताना दिसून येतं.

सनग्लासेसचा किती फायदा होतो?

उन्हापासून रक्षण करण्यासाठी सनग्लासेसचं महत्त्व सांगताना, डॉ. जान्हवी मेहता सांगतात, "योग्य प्रकारचे सनग्लासेस वापरले तर UV किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण जवळजवळ पूर्णपणे होऊ शकतं. चष्मा किती गडद आहे यापेक्षा तो UV किरण फिल्टर करतो की नाही हे अधिक महत्त्वाचं आहे. नीट UV संरक्षण असलेले सनग्लासेस फोटोकेरटायटिस होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात."

सनग्लासेसचा किती फायदा होतो?

फोटो स्रोत, Getty Images

त्या पुढे म्हणाल्या, "सनग्लासेस खरेदी करताना UV400 किंवा 100 टक्के UV संरक्षण असा उल्लेख असलेले चष्मे निवडणं महत्त्वाचं आहे. केवळ गडद काचा असलेला पण UV संरक्षण नसलेला चष्मा उलट अधिक धोकादायक ठरू शकतो, कारण त्यामुळे डोळ्यांतील बाहुली मोठी होते आणि अधिक UV किरण आत जातात. डोळ्यांच्या बाजूंनीही किरण थांबवणारा रॅपअराउंड डिझाइन आणि मोठ्या आकाराचे लेन्स अधिक सुरक्षित ठरतात. योग्य सनग्लासेस वापरल्यास डोळ्यांवर पडणारा UV संपर्क 95 टक्क्यांपेक्षा अधिक कमी करता येतो. "

डॉ. हेमंत कांबळे सांगतात, " UV400 किंवा 100% UV protection असलेले प्रमाणित सनग्लासेस फोटोकेराटायटिसपासून संरक्षणासाठी अत्यंत प्रभावी आहेत. मात्र भारतात विकल्या जाणाऱ्या अनेक फॅशनेबल चष्म्यांमध्ये हे नसते."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)