ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या जहाजाचे इंजिन बंद, जहाजावर 14 भारतीय असल्याचं वृत्त

ओमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या जहाजाचे इंजिन बंद असल्याचे वृत्त आहे. (संग्रहित छायाचित्र)
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ओमानमधील भारतीय दूतावासानं रविवारी (14 जून) एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे की, ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या एका जहाजाचं इंजिन बंद पडल्याचं वृत्त त्यांना मिळालं आहे.

भारतीय दूतावासानं एक्सवर लिहिलं, "दूतावासाला ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असणारं 'विराट-1' या जहाजाशी संबंधित एका घटनेची माहिती मिळाली आहे."

"जहाजावर कथितरित्या 14 भारतीय कर्मचारी होते. या घटनेसंदर्भात ओमानचे अधिकारी आणि जवळपास असलेली जहाजं मिळून बचाव मोहीम चालवत आहेत."

यानंतर दूतावासानं आणखी एक पोस्ट टाकत माहिती दिली आहे की, जहाजाच्या इंजिनात बिघाड झाला होता.

दूतावासानं लिहिलं, "मिळालेल्या माहितीनुसार, जहाजातील इंजिनात बिघाड झाला होता. त्यानंतर जहाजावरील सर्व खलाशांना सुरक्षितपणे एका लाईफराफ्ट (रेस्क्यू बोट)वर पाठवण्यात आलं."

"सध्या ओमानचे अधिकारी आणि जवळपास असलेल्या जहाजांच्या मदतीनं बचाव मोहीम सुरू आहे."

याआधी ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अमेरिकेच्या नौदलानं केलेल्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाला होता.

त्यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)