महिलांमध्ये पित्ताशयाचे खडे होण्याचे मुख्य कारण काय? वाचा लक्षणे, उपचार आणि 14 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. हिमानी
- Role, रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
"अचानक माझ्या पोटाच्या उजव्या बाजूला खूप दुखू लागले. गॅस झाला असेल असं समजून मी औषध घेतले. पण तरीही वेदना थांबल्या नाहीत. जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली तेव्हा पित्ताशयात खडे झाल्याचे समोर आले."
असे अनुभव बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकायला मिळतात.
आजकाल जगभरात पित्ताशयात खडे होणे ही पचनसंस्थेशी (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) संबंधित अतिशय सामान्य समस्या बनली आहे.
अनेक लोकांना वर्षानुवर्षे या त्रासाची काहीच लक्षणं जाणवत नाहीत. पण काही रुग्णांना मात्र असह्य वेदना, इन्फेक्शन, काविळ किंवा स्वादुपिंडाला सूज येणं यांसारखा गंभीर त्रास होऊ शकतो.
वेळेवर निदान होऊन योग्य उपचार केले तर या समस्येतून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.
1. पित्ताशय म्हणजे काय?
पित्ताशय हा आपल्या लिव्हरच्या (यकृताच्या) अगदी खाली असलेला पिशवीसारखा भाग आहे. याची लांबी 7 ते 10 सेमी एवढी असते.
लिव्हर रोज जे पित्त तयार करते ते तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवणे हे पित्ताशयाचे मुख्य काम आहे.
आपण जास्त तेलकट किंवा तुपकट खाल्ल्यावर हे पित्त लहान आतड्यात सोडले जाते आणि अन्न सहज पचवायला मदत करते.

फोटो स्रोत, Getty Images
2. पित्ताशयात खडे कसे तयार होतात?
पित्तामध्ये प्रामुख्याने तीन महत्त्वाचे घटक असतात:
- कोलेस्ट्रॉल
- पित्त क्षार (Bile Salts)
- बिलिरुबिन
जेव्हा या तीन घटकांमधील समतोल बिघडतो तेव्हा बारीक कण किंवा क्रिस्टल्स जमा व्हायला सुरुवात होते. हळूहळू हेच कण मोठे होऊन खडे बनतात.

फोटो स्रोत, Getty Images
खडे तयार होण्याची मुख्य कारणे:
- पित्तामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असणे
- पित्ताशय वेळेवर किंवा पूर्णपणे साफ/रिकामे न होणे
- शरीरात बिलिरुबिन जास्त प्रमाणात तयार होणे
- पित्ताशयाला सूज येणे किंवा इन्फेक्शन होणे
3. पित्ताशयातील खड्यांचे किती प्रकार असतात?
- कोलेस्ट्रॉल खडे : हा अतिशय सामान्य प्रकार असून जवळपास 80% लोकांमध्ये याच प्रकारचे खडे आढळून येतात.
- पिगमेंट (रंगद्रव्य) खडे: शरीरात बिलिरुबिन वाढल्यामुळे हे बनतात. लिव्हरच्या समस्या किंवा रक्ताच्या संबंधित आजारांमुळे हे खडे तयार होतात.
- मिश्र खडे: कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम आणि बिलिरुबिन एकत्र जमा होऊन हे खडे तयार होतात.

फोटो स्रोत, Getty Images
4. कोणाला अधिक धोका असतो?
डॉक्टरांच्या मते '5 F' च्या नियमाने हे सहज लक्षात ठेवता येते:
- फीमेल (Female) – महिला
- फॉर्टी (Forty) – 40 किंवा त्याहून अधिक वयाचे लोक
- फॅट (Fat) – जास्त वजन असणारे
- फर्टाइल (Fertile) – प्रजननक्षम स्त्रिया
- फेअर (Fair) – पाश्चिमात्य देशांतील गोऱ्या रंगाचे लोक
यातील बरेचसे धोके भारतीय रुग्णांच्या बाबतीतही तितकेच लागू पडतात.
5. इतर कोणती कारणे किंवा धोके असू शकतात?
- लठ्ठपणा किंवा जास्त वजन
- मधुमेह
- वाढलेले कोलेस्ट्रॉल
- प्रसूती
- इस्ट्रोजेन हार्मोनच्या गोळ्या घेणे
- अनुवंशिकता
- दीर्घकाळ उपाशी राहणे
- वेगाने वजन कमी करणे
- जास्त चरबीयुक्त (स्निग्ध) आहार
- कमी फायबर असलेला आहार
- यकृताचे (लिव्हरचे) आजार
- हेमोलिटिक ॲनिमिया
- वाढते वय (वृद्धत्व)

फोटो स्रोत, Getty Images
भारतात पित्ताशयात खडे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकूण लोकसंख्येपैकी 5 ते 15% लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी या समस्येला सामोरे जावे लागते.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा त्रास 2 ते 3 पटीने जास्त प्रमाणात आढळतो आणि 40 वर्षांनंतर याचा धोका आणखी वाढतो.
वजन वाढणे, व्यायाम न करणे आणि खूप जास्त फास्ट फूड खाणे यामुळे आजकाल तरुणांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
6. पित्ताशयात खडे झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात?
बऱ्याच लोकांना याची काहीच लक्षणे जाणवत नाहीत. इतर कोणत्याही कारणासाठी सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड) करताना हे खडे अचानक सापडतात.
ही लक्षणे कधी जाणवू शकतात?
- पोटाच्या उजव्या बाजूला असह्य वेदना होणे
- पाठीत किंवा खांद्यापर्यंत वेदना जाणे
- जास्त तळलेले किंवा तेलकट खाल्ल्यावर पोट दुखणे
- मळमळणे
- उलट्या होणे
- अपचन
- पोट गच्च किंवा फुगल्यासारखे वाटणे
- गॅसचा त्रास होणे

फोटो स्रोत, Getty Images
गंभीर धोक्याची लक्षणे:
- ही लक्षणे दिसल्यास अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचे आहे-
- ताप येणे
- थंडी वाजून येणे
- काविळ होणे
- डोळे पिवळसर दिसणे
- लघवीचा रंग खूप गडद होणे
- पांढऱ्या किंवा फिकट रंगाची शौच होणे
- पोटात तीव्र आणि असह्य वेदना होणे
- सतत उलट्या होणे
7. पित्ताशयातील खडे ओळखण्यासाठी कोणत्या चाचण्या करतात?
- अल्ट्रासाऊंड (सोनोग्राफी): ही सर्वात सोपी, कमी खर्चात होणारी आणि अगदी अचूक माहिती देणारी टेस्ट आहे.
- रक्ताच्या चाचण्या: सीबीसी आणि लिव्हरची तपासणी (LFT) ज्यामध्ये बिलिरुबिन आणि लिव्हर एन्झाईम्स तपासले जातात.
- MRCP चाचणी
- CT स्कॅन: पित्तनलिकेत खडे अडकल्याची शंका आल्यास CT स्कॅन केला जातो.
- ERCP चाचणी: ही पद्धत केवळ खड्यांचे निदान करण्यासाठीच नाही तर काही प्रसंगी ते खडे बाहेर काढण्यासाठीही वापरली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
8. यावर सध्या कोणते उपचार उपलब्ध आहेत?
लक्षणे नसतील तर किडनी स्टोन असलेल्या बहुतांश रुग्णांना उपचारांची अजिबात गरज पडत नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लक्ष ठेवणे पुरेसे असते.
पण त्रास सतत होत असेल आणि पोटात पुन्हा पुन्हा दुखत असेल तर ऑपरेशन करणे हाच सर्वात चांगला पर्याय ठरतो.
लॅपरोस्कोपीद्वारे पित्ताशय काढणे: आजकाल जगभरात पित्ताशय काढण्यासाठी याच पद्धतीचा वापर केला जातो. याला 'लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी' म्हणतात.
लॅपरोस्कोपिक पित्ताशय शस्त्रक्रियेचे फायदे:
- खूप लहान टाके असतात
- दुखणे खूप कमी होते
- कमी रक्तस्त्राव
- लवकर आराम मिळतो
- 1-2 दिवसांत हॉस्पिटलमधून घरी जाता येते
- माणूस लवकर आपल्या नेहमीच्या कामाला लागू शकतो
तातडीने ऑपरेशन कधी करावे लागते?
- पित्ताशयाला भयंकर सूज आल्यावर
- पित्ताशय फुटण्याचा धोका असल्यास
- पित्तनलिकेत अडथळा (ब्लॉकेज) निर्माण झाल्यास
- स्वादुपिंडाला सूज आल्यास
- खूप इन्फेक्शन पसरल्यास

फोटो स्रोत, Getty Images
औषधांद्वारे खडे विरघळतात का?
काही विशिष्ट प्रसंगी औषधे दिली जातात. पण या औषधांचा उपयोग सर्वांनाच होतो असे नाही. लहान आकाराचे कोलेस्ट्रॉलचे खडे असतील तर औषधांचा फायदा होऊ शकतो.
या उपचारांना काही महिने किंवा वर्षेसुद्धा लागू शकतात. तरीही खडे परत होण्याची भीती राहतेच. त्यामुळे ऑपरेशन करणे हाच यावरचा कायमस्वरूपी उपाय मानला जातो.
10. पित्ताशय काढल्याने काही धोका होतो का?
- या प्रश्नाची भीती बऱ्याच लोकांच्या मनात असते.
- पित्ताशय काढले तरी लिव्हर सतत पित्त तयार करत राहते आणि ते थेट लहान आतड्यात जाते.
- त्यामुळे ऑपरेशननंतरही लोक आधीसारखेच अगदी सामान्य जीवन जगू शकतात.
11. उपचाराला उशीर झाल्यास काय होऊ शकते?
- पित्ताशयाला खूप जास्त सूज येणे
- पित्ताशयात पू साचणे
- पित्ताशयाच्या ऊती खराब होणे
- पित्ताशयाला छिद्र पडणे
- पित्त अडकल्यामुळे काविळ होणे
- पित्तनलिकेला सूज आणि संसर्ग होणे
- स्वादुपिंडाला तीव्र सूज येणे
- आतडे बंद पडणे / ब्लॉक होणे
- पित्ताशयाचा कॅन्सर होण्याचा किरकोळ धोका

फोटो स्रोत, Getty Images
12. प्रतिबंध किंवा आजार टाळणे शक्य आहे का?
- 100% हा आजार टाळता येत नाही पण त्याचा धोका खूप प्रमाणात कमी करता येतो.
- शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा.
- लठ्ठपणा कमी केला पाहिजे. पण ते अचानक कमी करू नका.
- एका महिन्यात 2 ते 4 किलोपेक्षा जास्त वजन घटवणारे कडक डाएट करणे टाळा.
- रोज कमीत कमी 30 ते 45 मिनिटे नियमित व्यायाम नक्की करा.
- संतुलित आहार: फळे, भाज्या, धान्य आणि फायबर असलेले अन्न भरपूर खा.
- हे पदार्थ कमी खा: फास्ट फूड, तळलेले पदार्थ, जास्त तूप किंवा बटर असलेले पदार्थ, ट्रान्स फॅट(डालडा / वनस्पती तूपयुक्त चरबी) आणि खूप गोड पदार्थ खाणे टाळा.
13. लोकांमधील गैरसमज आणि त्याचे खरे सत्य:
गैरसमज: पोटात खडे झाले की ऑपरेशन करावेच लागते.
सत्य: कोणतीही लक्षणे नसलेल्या बहुतांश लोकांना शस्त्रक्रियेची गरज नसते.
गैरसमज: आयुर्वेदिक किंवा घरगुती उपायांनी खडे पूर्णपणे विरघळतात.
सत्य: या गोष्टीला कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. स्वतःहून कसलेही उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
गैरसमज: पित्ताशय काढले तर आयुष्यभर पचनाचा त्रास होत राहील.
खरे सत्य: बहुतेक लोक यानंतर अगदी नेहमीसारखे सामान्य आयुष्य जगू शकतात.
14. डॉक्टरांकडे कधी जावे?
खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्ही न घाबरता किंवा अजिबात उशीर न करता तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजे
- पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र आणि असह्य वेदना होणे
- वेदना सलग 4 ते 6 तासांपेक्षा जास्त वेळ राहणे
- ताप
- उलट्या होणे
- काविळ
- डोळे पिवळे पडणे
- लघवीचा रंग गडद होणे

फोटो स्रोत, Getty Images
आजच्या काळात पित्ताशयात खडे होणे ही एक सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. बहुतांश लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणे दिसून येत नसली तरी काही रुग्णांमध्ये यामुळे तीव्र वेदना, इन्फेक्शन, काविळ आणि स्वादुपिंडाला सूज यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, वजन नियंत्रणात ठेवणे आणि रोज नियमित व्यायाम केल्यास हा त्रास होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.
पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला सतत दुखत असेल तर घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवून सोनोग्राफी करून घेतलेली केव्हाही चांगली. आधुनिक लॅपरोस्कोपी ऑपरेशनमुळे या समस्येवर सुरक्षित, प्रभावी आणि कायमस्वरूपी उपचार उपलब्ध आहेत.
योग्य वेळी निदान, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैली हीच पित्ताशयातील खड्यांपासून बचाव करण्याचे मुख्य मार्ग आहेत.
(टीप: हा लेख एका डॉक्टरांनी लिहिला आहे. वैद्यकीय उपचार आणि आजारांबद्दल माहिती देणे हाच यामागील हेतू आहे. आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























