कॅन्सरविरुद्ध लढायला शरीराला तयार करणारी इम्युनोथेरपी काय आहे? हे उपचार कसे काम करतात? महत्त्वाचं संशोधन

कर्करोगाच्या पेशी अनेकदा त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या इतर निरोगी पेशींसारख्याच दिसतात. त्यामुळे रोगप्रतिकारक व्यवस्थेला त्या ओळखू याव्यात यासाठी काही मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासू शकते

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

फोटो कॅप्शन, कर्करोगाच्या पेशी अनेकदा त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या इतर निरोगी पेशींसारख्याच दिसतात. त्यामुळे रोगप्रतिकारक व्यवस्थेला त्या ओळखू याव्यात यासाठी काही मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासू शकते.
    • Author, जेमी ड्युशार्म
    • Role, बीबीसी फ्युचर
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

कर्करोगाविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे उपचार, जवळपास 100 वर्षांच्या संशोधन आणि विकासानंतर आता परिपक्व होत आहेत. या उपचारांमुळे रुग्णांचे जीव वाचत आहेत.

याबाबतीत मॉरीन सिडेरिस यांचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. मॉरीन सिडेरिस 71 वर्षांच्या असताना 2008 मध्ये त्यांच्यावर मोठ्या आतड्याच्या कर्करोगासंदर्भात (कोलन कॅन्सर), उपचार करण्यात आले. त्यावेळेस त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यातून सावरण्याची प्रक्रिया अतिशय त्रासदायक होती.

मॉरीन सिडेरिस न्यूयॉर्कमध्ये राहतात. उपचार यशस्वी झाल्यानंतर 14 वर्षांनी मॉरीन सिडेरिस यांना अन्ननलिकेचा कर्करोग (इसोफेगल कॅन्सर) झाल्याचं निदान झालं. यावेळेस मॉरीन यांच्यावर क्लिनिकल ट्रायलद्वारे उपचार करण्यात आले. ते आधीच्या उपचार पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

त्यावेळेस डोस्टारलिमॅब नावाच्या औषधाच्या 45 मिनिटं चालणाऱ्या इन्फ्युजनसाठी (इंजेक्शन किंवा सीरिंजद्वारे शरीरात औषध घेणं) त्या दर 3 आठवड्यांनी, न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये जात असत.

फक्त 4 महिने उपचार घेतल्यानंतर, मॉरिन सिडेरिस यांची कर्करोगाची गाठ नाहीशी झाली. हे उपचार कोणतीही शस्त्रक्रिया न होता, केमोथेरेपी किंवा रेडिएशन न होता झाले होते. त्याचा मॉरिन यांना जाणवलेला एकमेव दुष्परिणाम म्हणजे ॲड्रेनलचा विकार. यात ॲड्रेनल ग्रंथींची कमतरता झाल्यामुळे थकवा येतो.

"हे उपचार अविश्वसनीय आहेत. ते एखाद्या विज्ञानकथेसारखेच आहेत," असं मॉरिन म्हणाल्या.

असं असूनही, हे खरं आहे. कर्करोगावरील इम्युनोथेरेपीच्या उपचारांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. मॉरिन सिडेरिस त्यापैकी एक आहेत. एक शतकाहून अधिक काळ या उपचार पद्धतींमध्ये विकास झाल्यानंतर आता ही उपचार पद्धती प्रभावी ठरते आहे, परिपक्व होते आहे.

या उपचार पद्धतीच्या माध्यमातून वैयक्तिक स्वरुपाचे उपचार, दीर्घकाळ टिकणारी कर्करोगापासूनची मुक्ती आणि केमोथेरेपी, रेडिओथेरेपी यासारख्या इतर उपचारांपेक्षा कमी दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) याची खात्री मिळते.

वैयक्तिक स्वरुपाच्या इम्युनोथेरेपींमुळे, डॉक्टरांना अधिक अचूकपणे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करता येईल, त्यातून आजार बरा होण्याची शक्यता वाढेल

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

फोटो कॅप्शन, वैयक्तिक स्वरुपाच्या इम्युनोथेरेपींमुळे, डॉक्टरांना अधिक अचूकपणे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करता येईल, त्यातून आजार बरा होण्याची शक्यता वाढेल
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जेनिफर वार्गो या टेक्सासमधील एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरमध्ये सर्जनिकल ऑन्कोलॉजीच्या प्राध्यापिका आणि इम्युनोथेरेपीच्या संशोधक आहेत.

आपल्या शरीरात "तुमच्या नेहमीसारख्या न दिसणाऱ्या पेशी ओळखण्याची आणि त्या नष्ट करण्याची नैसर्गिक क्षमता असते," असं कॅरेन नुडसेन म्हणाल्या. त्या पार्कर इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर इम्युनोथेरेपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही एक एनजीओ असून ती इम्युनोथेरेपीच्या विकासाला चालना देण्यासंदर्भात काम करते.

जर सर्व काही व्यवस्थितपणे काम करत असेल, तर त्यात कर्करोग झालेल्या पेशींचाही समावेश असायला हवा. मात्र काहीवेळा, कर्करोगाच्या पेशी शरीरातील व्यवस्थेला चुकवतात किंवा तिच्यावर मात करतात. यामुळे त्यांची धोकादायक स्वरुपाची अनियंत्रित वाढ होते. या कर्करोगाच्या पेशी, आजूबाजूच्या निरोगी पेशींपासून वेगळ्या ओळखल्या जाणार नाहीत, अशाप्रकारे लपून राहतात.

इम्युनोथेरेपीचं उद्दिष्ट कर्करोगाच्या अशा पेशींना ओळखणं किंवा समोर आणण्याचं आहे. जेणेकरून रोगप्रतिकार व्यवस्थेला त्यांचं मूळ स्वरुप ओळखता येईल. यामुळे रोगप्रतिकार व्यवस्थेची संरक्षण यंत्रणा मजबूत होते. त्यामुळे या व्यवस्थेला कर्करोगाच्या पेशींचा शोध घेऊन त्या नष्ट करता येतील. त्यातून संभाव्यपणे अविश्वसनीय परिणाम साधले जाऊ शकतात.

इम्युनोथेरेपीद्वारे आज कर्करोगावर कशाप्रकारे उपचार केले जात आहेत?

इम्युनोथेरेपीचे 2 सर्वात सुप्रसिद्ध प्रकार म्हणजे सीएआर टी-सेल थेरेपी आणि इम्युन चेकपॉईंट इनहिबिटर. सीएआर टी-सेल थेरेपींमध्ये रुग्णाच्या रक्तातील टी सेल काढल्या जातात.

टी सेल्स या अतिशय विशिष्ट प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशी असतात. त्या बाहेरच्या पेशी किंवा घटकांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करतात.

रुग्णाच्या रक्तातून काढलेल्या या टी सेल्समध्ये प्रयोगशाळेत बदल केले जातात. जेणेकरून त्यांना कर्करोगाच्या पेशींचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ला करता येईल. नंतर या सुधारित म्हणजे अधिक शक्ती आणि कार्यक्षमता असलेल्या टी-सेल्सना शरीरात सोडलं जातं. सध्या रक्ताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी या थेरेपींचा वापर केला जातो.

दरम्यान, इम्युन चेकपॉईंट इनहिबिटर्स ही अशी औषधं असतात, ती रोगप्रतिकार शक्तीमधील एक मूळातच क्रिया 'बंद' करण्याला निष्क्रिय करतात. जणूकाही ही क्रिया बंद करण्याचं ते बटण असतं. हा या रोगप्रतिकार व्यवस्थेचा महत्त्वाचा उद्देश असतो. यामुळे शरीरातील निरोगी पेशींचं नुकसान करणारा रोगप्रतिकार शक्तीचा अतीआक्रमक प्रतिसाद रोखला जातो.

कर्करोगाच्या काही पेशी हा अती-आक्रमकपणा बंद करणारी क्रियाच थांबवू शकतात. यामुळे टी सेल्स निष्क्रिय होतात आणि पेशी ओळखण्याची प्रक्रिया टाळली जाते. इम्युन चेकपॉईंट इनहिबिटर्स असं घडण्यापासून रोखतात. म्हणजेच, टी सेल्स कर्करोगाच्या पेशींची ओळख एक धोका म्हणून पटवतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात.

ज्या वैज्ञानिकांनी या शोधाची सुरुवात केली किंवा ज्यांनी या नव्या उपचारांची पायाभरणी केली, त्यांना 2018 मध्ये नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज ही औषधं कर्करोगाच्या अनेक प्रकारांवर वापरली जातात.

तरीदेखील, दोन्ही उपचार पद्धतींनी मर्यादा आहेत. यासंदर्भात जरी संशोधन सुरू असलं, तरीदेखील घन स्वरुपातील ट्युमरच्या (रक्ताच्या कर्करोगाच्या तुलनेत) बाबतीत सीएआर टी-सेल थेरेपी प्रभावी ठरण्यासाठी वैज्ञानिकांना अडचणी येत आहेत.

नवीन रुग्णांमध्ये अशा कर्करोगाचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यावरचे उपचारदेखील खर्चिक आणि त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते.

"दरम्यान, इम्युन चेकपॉईंट इनहिबिटर्समुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात," असं समरा तुराजलिक म्हणाल्या. त्या लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत.

कारण, इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकार व्यवस्थेमधील क्रिया बंद करण्याची यंत्रणा, शरीराला स्वत:च्याच ऊतींवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी असते. हे संरक्षण काढून टाकल्यामुळे ट्युमरबरोबरच कर्करोग नसलेल्या पेशींनाही धोका निर्माण होऊ शकतो.

यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, याच्या सामान्य दुष्परिणामांमध्ये त्चवेचवर पुरळ येणं, अतिसार होणं आणि थकवा येणं या गोष्टींचा समावेश आहे. तर काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये यात यकृत, ह्रदय आणि मूत्रपिंडामध्ये इन्फ्लेमेशनदेखील होऊ शकतं.

जर औषधामुळे गंभीर स्वरुपाच्या आणि झपाट्यानं वाढणाऱ्या कर्करोगावर नियंत्रण मिळणार असेल, तर त्याचे दुष्परिणाम स्वीकारार्य असू शकतात किंवा सहन केले जाऊ शकतात. मात्र असं नेहमीच होत नाही. ऑन्कोलॉजीच्या संपूर्ण क्षेत्रासमोर एक मोठी समस्या अशी आहे की, कोणतीही इम्युनोथेरेपी 100 टक्के रुग्णांवर प्रभावी ठरत नाही, असं तुराजलिक म्हणतात.

त्यामागे अनेक संभाव्य कारणं आहेत. त्यात ट्युमरच्या रचनेपासून, ज्यामुळे रोगप्रतिकार व्यवस्थेसाठी असणारी त्याची उपलब्धता कमी होऊ शकते, ते रोगप्रतिकारक पेशींच्या वैशिष्ट्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

सर्वसाधारणपणे, 20 टक्के ते 40 टक्के रुग्ण इम्युनोथेरेपीला प्रतिसाद देतात. त्याचा अर्थ, असंख्य रुग्ण - किंबहुना बहुतांश - कोणताही फायदा होण्याची शक्यता नसताना, फक्त दुष्परिणामांना सामोरे जातात. यात त्यांचा वेळ वाया जातो आणि आशाही व्यर्थ ठरते.

विविध उपचार पद्धतींद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न

इम्युनोथेरेपीपासून जास्त रुग्णांना फायदा कसा मिळवून देता येईल? संशोधक या समस्येवर विविध अंगांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

वार्गो याचं संशोधन प्राथमिक स्वरुपाचं आहे. मात्र तरीदेखील त्यातून असं दिसून येतं की जे रुग्ण अधिक फायबरयुक्त आहार घेतात. त्यांच्या बाबतीत आतड्यांमधील मायक्रोबायोममध्ये होणाऱ्या बदलांमुळे चांगले परिणाम दिसू शकतात. ज्याचा रोगप्रतिकारक व्यवस्था आणि ट्युमर या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो.

इतर आश्चर्यकारक संशोधनातून असं दिसून येतं की, स्टॅटिन्स, जी स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध असणारी कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं आहेत, त्यांच्यामुळे पेशींच्या संवादात अनपेक्षित बदल घडून त्यातून इम्युनोथेरेपीचा प्रभाव वाढू शकतो. अगदी उपचाराची वेळ देखील महत्त्वाची ठरू शकते.

अलीकडच्या काही संशोधनातून असं दिसून आलं आहे की ज्या रुग्णांना सकाळच्या वेळेस औषध दिलं जातं, त्यांची तब्येत दिवसभरात नंतर उपचार किंवा औषध घेतलेल्या रुग्णांपेक्षा अधिक सुधारते.

रेडिएशन किंवा अल्ट्रासाऊंड यासारख्या कर्करोगावरील इतर उपचारांबरोबर इम्युनोथेरेपी घेतली तर तो प्रतिसाद वाढवण्याचा आणखी एक मार्ग ठरू शकतो.

"रेडिएशनमुळे प्रत्यक्षात...रोगप्रतिकारक व्यवस्थेला ट्युमर दिसू शकतो," असं वेल कॉर्नेल मेडिकल सेंटरमधील सँड्रा डेमारिया म्हणाल्या.

त्यांनी अशाप्रकारच्या एकत्रित उपचार पद्धतीवर संशोधन केलं आहे. अल्ट्रासाऊंड थेरेपीमुळे देखील तसंच होऊ शकतं. ही थेरेपी उच्च-वारंवारितेच्या (हाय फ्रिक्वेन्सी) ध्वनी लहरींचा वापर ट्युमरवर उपचार करण्यासाठी करते.

इम्युनोथेरेपीमध्ये रुग्णांच्या आवश्यकतेनुसार बदल करण्याची क्षमता आहे. इतर संशोधक इम्युनोथेरेपीच्या या क्षमतेचा फायदा घेत आहेत आणि रुग्णांसाठी संभाव्यरित्या सर्वोत्तम ठरू शकणारे उपचार काळजीपूर्वक निवडत आहेत.

विविध उपचार पद्धतींद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/ BBC

रुग्णांच्या आवश्यकतेनुसार केल्या जाणाऱ्या औषधोपचारामुळे अनेक शाखांमध्ये उत्साह निर्माण होतो आहे. मात्र, या आजारातील विविधता लक्षात घेता, ऑन्कोलॉजीसाठी हे विशेषकरून महत्त्वाचं आहे, यावर नुडसेन भर देतात.

"कर्करोग हा काही एकच आजार नाही. ते 200 वेगवेगळे आजार असतात. ते सर्व वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवतात आणि त्यांच्यावर वेगवेगळे उपचार करण्याची आवश्यकता असते," असं नुडसेन म्हणाल्या.

अगदी एकाच प्रकारचा आणि समान टप्प्यावरील कर्करोग असलेल्या दोन रुग्णांच्या बाबतीत पेशींच्या स्तरावर वेगवेगळे आजार असू शकतात.

"हे क्षेत्र महत्त्वाचे बदल होण्याच्या टप्प्यावर आहे. आता आपण कर्करोग नाही तर खऱ्या अर्थानं रुग्णावर उपचार करण्याच्या दिशेनं वाटचाल करू शकतो," असं डेमारिया म्हणाले.

मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील वैज्ञानिकांनी एका आशादायी पद्धतीची चाचणी आधीच केली आहे. ही चाचणी एका निष्कर्षावर आधारित आहे. तो म्हणजे विशिष्ट जनुकीय प्रोफाईल किंवा रचना असलेल्या ट्युमरकडून डोस्टारलिमॅबसारख्या इम्युन चेकपॉईंट इनहिबिटर्सना चांगला प्रतिसाद दिला जातो. म्हणजेच अशा ट्युमवर डोस्टारलिमॅबचा चांगला परिणाम होतो.

यासंदर्भात 2022 आणि 2024 मध्ये दोन छोट्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात या उपचार पद्धतीनं रेक्टल कॅन्सर म्हणजे गुदाशय किंवा गुदद्वाराच्या कर्करोगावर उपचार करण्यात आले. त्यात या उपचारांमुळे ट्युमर्स पूर्णपणे नष्ट झाले.

त्यानंतर संशोधकांच्या टीमनं त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती वाढवली आणि त्यात 117 रुग्णांचा समावेश केला. या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्युमर होते. त्यात अन्ननलिका, मूत्राशय आणि पोटाच्या ट्यमुरचा समावेश होता. यामधील जनुकीय वैशिष्ट्यं समान होती. ज्या 103 लोकांनी या उपचाराचा पूर्ण कोर्स केला, त्यापैकी सिडेरिस यांच्यासह 84 जणांचे ट्युमर पूर्णपणे नष्ट झाले. फक्त 2 जणांना अतिरिक्त शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली.

एमडी अँडरसनमधील संशोधकांनी, एका वेगळ्या चेकपॉईंट इनहिबिटर वापरून केलेल्या उपचार पद्धतीच्या बाबतीत असेच निष्कर्ष नोंदवले आहेत.

इतर संशोधकांनी दाखवून दिलं आहे की जरी रुग्णांना शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली तरी, जर ट्युमरवर आधी इम्युनोथेरेपीनं उपचार करण्यात आले, तर किमान काही प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रियेचे परिणाम अधिक चांगले असू शकतात.

यासंदर्भात अधिक संशोधनाची आवश्यकता असली तरी अशाप्रकारचे निष्कर्ष आशादायक आहेत. कारण त्यामुळे कमी आक्रमक मात्र अत्यंत प्रभावी अशा उपचार पद्धतींचे दरवाजे खुले होतात, असं लुईस डियाझ म्हणाले. ते मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये सॉलिड ट्यमुर ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.

"आपल्याला मध्ययुगीन काळातून आधुनिक काळात वाटचाल करावी लागेल. तुमचं गुदाशय किंवा पोट किंवा मूत्राशय ही अतिशय कठोर बाब आहे. त्यामुळे आपण उपचारासाठी यापेक्षा अधिक चांगले पर्याय शोधले पाहिजेत," असं लुईस म्हणाले.

यातील इशारा किंवा पूर्वसूचना अशी आहे की, जवळपास फक्त 5 टक्के ट्युमर्समध्येच अशी जनुकीय रचना असते, जी डियाझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केलेल्या, शस्त्रक्रिया-विरहित इम्युनोथेरेपीच्या उपचारांसाठी योग्य ठरते.

"उर्वरित 95 टक्के ट्युमर्ससाठी तितक्याच प्रभावी उपचार पद्धतीची आवश्यकता आहे," असं ते पुढे म्हणाले.

कर्करोगावरील लशींच्या बाबतीतील आशादायी चित्र

त्या कारणास्तव, संशोधक नवीन इम्युनोथेरेपी पद्धतींचा शोध घेत आहेत. तसंच कर्करोगाच्या लशींसारख्या जुन्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पारंपारिक लशींमध्ये, शरीराला विषाणूसारख्या रोगजंतूंच्या संपर्कात आणलं जातं. जेणेकरून शरीर खऱ्या विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती तयार करू शकेल.

अशीच संकल्पना कर्करोगाच्या बाबतीतदेखील उपयोगी ठरू शकते. फक्त यात या लसीचा वापर, आजार होण्यापासून प्रतिबंध करण्याऐवजी आजारावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो, असं नुडसेन म्हणतात.

कर्करोगाच्या पेशींच्या पृष्ठभागावर किंवा बाह्य आवरणावर विविध प्रकारचे प्रोटीन असतात. लशीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, संशोधक रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला हे प्रोटिन ओळखण्यास आणि त्यांना लक्ष्य करण्यास प्रशिक्षित करू शकतील. त्यामुळे रुग्णांच्या विशिष्ट कर्करोगाविरोधात एक मजबूत प्रतिसाद सुरू होईल, असं नुडसेन म्हणतात.

या पद्धतीला पाठिंबा देणारे काही प्राथमिक पुरावे आधीच उपलब्ध आहेत. अमेरिकेतील डॅना-फार्बर कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी मूत्रपिंडाच्या एक प्रकारच्या कर्करोगानं पीडित असणाऱ्या 9 रुग्णांसाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लशी तयार केल्या. या रुग्णांमधील ट्युमर शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आले. त्यानंतर रुग्णांच्या शरीरात शिल्लक राहिलेल्या ट्युमर किंवा कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी त्यांना ही लस देण्यात आली.

यासंदर्भात 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात, या टीमनं नमूद केलं की सर्व 9 रुग्णांनी कर्करोगाला विरोध करणारा रोगप्रतिकारक प्रतिसाद सुरू केला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक वर्षे ते कर्करोगमुक्त राहिले. लशींनी मेलानोमा (त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार) उपचारांमध्येही या वैयक्तिक स्वरुपाच्या लसी उपयोगी ठरू शकतात.

"नवे, मोठे आणि उत्साहवर्धक बदल होत आहेत. प्रिसिजन मेडिसिन म्हणजे अचूक उपचार पद्धतीची ही व्याख्या आहे. आता कदाचित आपण अतिशय वेगानं, तुम्हाला झालेल्या कर्करोगाच्या गाठीनुसार त्यावर उपचार करण्यासाठी लसीकरणाची पद्धत विकसित करू शकतो," असं नुडसेन म्हणतात.

अर्थात अशी उत्साहाची बाब असली, तरीदेखील यासंदर्भात अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.

संशोधनाखाली असलेल्या काही उत्साहवर्धक उपचार पद्धतींना पाठिंबा देण्यासाठी आणि भविष्यात डॉक्टरांना रुग्णांवर त्यांच्या विशिष्ट कर्करोगावर प्रभावी ठरणारे उपचार अचूकपणे आणि खात्रीशीरपणे करता यावेत, यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे.

"अशी अनेक अत्यंत आश्वासक लक्ष्यं आणि नवीन औषधं होती, जी सुरुवातीच्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांच्या पुढे जाऊ शकली नाहीत," असं डेमारिया म्हणतात.

काही ठराविक रुग्ण कोणत्याही प्रकारच्या इम्युनोथेरेपीला प्रतिसाद न देण्याची शक्यता आहे, असं डायझ म्हणतात.

कर्करोगांमध्ये वेगवेगळ्या 'महाशक्ती' असतात, ज्यामुळे त्यांची वाढ होते आणि त्यांचा विस्तार होतो. रोगप्रतिकारक व्यवस्था ही इतरांच्या तुलनेत काही कर्करोगांच्या बाबतीत अधिक प्रभावी ठरते.

मात्र जे रुग्ण प्रतिसाद देतात, त्यांच्यासाठी इम्युनोथेरेपी आधीच, जीवनरक्षक आणि जीवन बदलणारी, दोन्ही ठरते आहे.

न्यूयॉर्कमधील रुग्ण असलेल्या सिडेरिस, डियाझ यांच्या चाचण्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या. सिडेरिस यांना वाटतं की त्या कर्करोगाच्या उपचारांसाठीच्या एका उज्ज्वल भविष्याचाच भाग आहेत.

"आपली एका अत्यंत योग्य दिशेनं वाटचाल होते आहे. एका डॉक्टरांनी मला सांगितलं की पुढील 10 वर्षांमध्ये उपचारासाठी कोणत्याही प्रकारची केमोथेरेपी किंवा रेडिएशनचा वापर करणं, हे रक्तमोक्षणासारखी म्हणजे अतिशय जुनाट पद्धतींसारखं मानलं जाईल," असं सिडेरिस म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)