दारूतून विष पाजून 8 जणांना मारल्याचा आरोप, पुरलेले मृतदेह बाहेर काढले; पोलिसांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Alok Putul
- Author, आलोक पुतुल
- Role, रायपूरहून बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
छत्तीसगडमधील बलोदा बाजार-भाटापारा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ वाद आणि वैयक्तिक वैमनस्यातून लोकांना विषारी मद्य पाजल्याची घटना समोर आली आहे. आठ ग्रामस्थांची हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांचा असा दावा आहे की, चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला आहे.
या प्रकरणात, वेगवेगळ्या महिन्यांत मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आले आणि त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं.
मात्र, जमिनीखाली गाडलेला खजिना मिळवण्यासाठी आरोपीने या हत्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परंतु, पोलिसांनी या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.
पोलिसांचं म्हणणं आहे की, आतापर्यंतच्या तपासात असा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच, चौकशीदरम्यान आरोपीनेही यासंदर्भात काहीही नमूद केलेलं नाही.
दरम्यान, आरोपीच्या मुलाने असा दावा केला की त्याच्या वडिलांना यामध्ये गोवलं जात आहे आणि ते निर्दोष आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक ओ.पी. शर्मा यांनी सांगितलं की, "कसडोलमधील खारवे गावातील रहिवाशांनी 6 जून रोजी गावातील आठ जणांच्या संशयास्पद मृत्यूबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपास आणि चौकशीच्या आधारे रामसहाय जयस्वाल या आरोपीला अटक करण्यात आली. किरकोळ वादातून दारूमध्ये विष मिसळून या लोकांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे."
मृतांसोबत शेवटचा दिसला तो आरोपीच
खारवे गावातील रहिवाशांचं म्हणणं आहे की, या वर्षी 6 फेब्रुवारी ते 14 मे या कालावधीत गावातील आठ जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, मद्यपान केल्यानंतर त्या सर्वांचा मृत्यू झाला आणि त्यांना शेवटचं त्याच गावातील रहिवासी असलेल्या रामसहाय जयस्वाल यांच्यासोबतच पाहण्यात आलं होतं.
गावातील कामता प्रसाद साहू यांचे भाऊ छत्तूराम यांचं 12 मार्च रोजी निधन झालं, तर त्यांचे पुतणे विनोद साहू यांचं 31 मार्च रोजी निधन झालं.

फोटो स्रोत, Alok Putul
कामता प्रसाद साहू म्हणतात की, "गावात एकापाठोपाठ एक झालेल्या मृत्यूंनंतर असं उघडकीस आलं की, जमिनीखालील खजिना मिळवण्याच्या हव्यासापोटी रामसहाय जयस्वाल 21 लोकांचा बळी देण्याची योजना आखत होता. त्यानंतर, आम्ही 6 जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली."
आपल्या तक्रारीत ग्रामस्थांनी असा आरोप केला होता की, अंधश्रद्धा आणि जमिनीखालील गुप्त खजिना मिळवण्याच्या लोभापायी रामसहाय जैस्वाल 21 जणांची हत्या करण्याचा कट रचत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गावातील कार्तिक नावाच्या एका व्यक्तीलाही विष मिसळलेली दारू प्यायला दिली होती. मात्र, ती थोड्या प्रमाणात प्यायल्यानंतरच तो आजारी पडला आणि त्याला उलट्या होऊ लागल्या.
त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, या घटनेनंतर गावातील लोकांचा संशय अधिकच बळावला.
दारूमध्ये 'बोराक्स' मिसळल्याचा आरोप
गावकऱ्यांच्या तक्रारींनंतर, पोलिसांनी सर्वप्रथम एका मृत व्यक्तीचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला आणि तो रायपूर येथील डॉ. भीमराव आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवला. तिथे मृत व्यक्तीचं शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. त्यानंतर, संशय बळावल्यामुळे इतर मृतदेहही जमिनीतून बाहेर काढून तपासणीसाठी पाठवण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी ते 14 मे या कालावधीत मृत्यू झालेल्या आठ जणांपैकी बुधराम जयस्वाल यांच्यावर अंत्यसंस्कार (दहन) करण्यात आले, तर उर्वरित सात जणांचे मृतदेह दफन करण्यात आले.

फोटो स्रोत, Alok Putul
गावातील बहुतांश लोक 'कबीरपंथ' या पंथाचे अनुयायी आहेत. या पंथात मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे. हे सात मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आले आणि एका विशेष वैद्यकीय पथकाद्वारे त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं.
पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान एक पथक लोकांची चौकशी करण्यासाठी गावात तैनात होतं, तर दुसरं पथक तांत्रिक पुरावे गोळा करण्यात गुंतलेलं होतं.
दरम्यान, आरोपीने गावातील एका व्यक्तीकडून 'सुहागा' नावाचा विषारी पदार्थ मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा पदार्थ उंदराचं विष म्हणून वापरलं जातं. यालाच 'बोराक्स' असंही म्हणतात. 'सोडियम टेट्राबोरेट' असं त्याचं रासायनिक नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला हा विषारी पदार्थ एका कुत्र्यावर वापरून पाहिला. त्यानंतर, त्याने दारूमध्ये 'बोराक्स' मिसळून ते विविध लोकांना पाजण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
पोलिसांचा तपास काय सांगतो?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान आरोपीने सुरुवातीला आरोप फेटाळून लावले होते, परंतु नंतर त्याने गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादांमुळे, शाब्दिक अपमानामुळे, वैयक्तिक तक्रारींमुळे, चारित्र्याविषयीच्या संशयामुळे आणि काळी जादू किंवा जादूटोण्याशी संबंधित संशयामुळे विविध व्यक्तींना लक्ष्य केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

फोटो स्रोत, Alok Putul
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश होता ज्यांच्याशी आरोपीचे जमिनीवरून वाद किंवा आर्थिक व्यवहार होते. तसेच, ज्यांच्याबद्दल त्याच्या मनात वैयक्तिक राग होता. याच कारणांमुळे आरोपीने त्यांना एकेक करून पाजलेल्या दारूत विष मिसळलं होतं, असा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये आठ जणांची हत्या आणि एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न यांसारख्या आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, आरोपी रामसहाय जयस्वाल यांचा मुलगा रुद्रेश्वर जयस्वाल म्हणाला की, "माझ्या वडिलांना गोवलं जात आहे. त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. तरीही, आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आज ना उद्या सत्य समोर येईलच."
हत्यांमागील कारणांबाबत पोलिसांनी काय सांगितलं?
- 6 फेब्रुवारी 2026 : बद्रीचा मृत्यू झाला. पोलिसांचा असा दावा आहे की, आरोपीने बद्रीला पिण्यासाठी दिलेल्या दारूमध्ये विष मिसळलं होतं. आरोपीच्या म्हणण्यानुसार, बद्री त्याला वारंवार अपशब्द बोलायचा आणि दारू देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकायचा.
- 20 फेब्रुवारी 2026 : बुठालू यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, समाजाचा अपमान आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेला वाद या कारणांमुळे आरोपीने त्यांना लक्ष्य केलं होतं.
- 12 मार्च 2026 : छत्तूराम साहू यांचे निधन झालं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, छत्तूराम आपल्या पत्नीकडे अयोग्य नजरेनं पाहत असल्याचा संशय आरोपीला होता.
- 20 मार्च 2026 : बुधराम जयस्वाल यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जमिनीचा व्यवहार आणि सामाजिक वादामुळे आरोपींनी त्यांना लक्ष्य केलं होतं.
- 31 मार्च 2026 : विनोद कुमार साहू यांचा कसडोल रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांचा असा दावा आहे की, शाब्दिक अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपीने त्यांना विषारी दारू दिली होती.
- 28 एप्रिल 2026 : गजानंद यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गजानंद आपल्यावर करणी-बाधा (काळी जादू) करत असल्याचा आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्याचा संशय आरोपीला होता.
- 29 एप्रिल 2026 : चैतूराम यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चैतूराम यांच्याकडून घेतलेले 50,000 रुपयांचे कर्ज (व्याजासह) परत करणं टाळण्यासाठी आरोपीने ही हत्या करण्याचा कट रचला होता.
- 14 मे 2026 : महेतरू राम यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 2023 च्या निवडणुकांदरम्यान झालेल्या वादातून आणि त्यानंतरच्या हिणवण्यामुळे आरोपीने त्यांना लक्ष्य केलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























