लाल किल्ल्यावरील भाषणात 'दिमागी नक्षल' बाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी, तरुणांसाठी केल्या 'या' घोषणा

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

भारत आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

या प्रसंगी, वार्षिक परंपरेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता तिरंगा फडकवला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधून भाषण केलं.

या ऐतिहासिक स्थळावरून नरेंद्र मोदींचं हे सलग 13 वे स्वातंत्र्यदिन भाषण आहे.

भाषणापूर्वी, तिन्ही सशस्त्र दलं आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांचा समावेश असलेल्या 'गार्ड ऑफ ऑनर'कडून पंतप्रधान मोदींनी सलामी स्वीकारली. त्यानंतर राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेल्या भाषणात सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचला. यावेळी भाषणाच्या केंद्रस्थानी तरुणाई असल्याचंही दिसून आलं.

तरुणांसाठी मोफत एआय प्रशिक्षण, मोफत ऑनलाई कोचिंगची सुविधा अशा काही घोषणाही त्यांनी वेळी केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान यावेळी बोलताना पंतप्रधानांनी देशातून नक्षलवाद जवळपास संपत असल्याचा दावा केला आहे.

तसंच, "एकीकडे देशात नक्षलवाद संपुष्टात येत असताना देशात काही 'दिमागी नक्षलवादी' असून ते संधीच्या शोधात असतात, त्यांना ओळखावं लागेल," असंही मोदी म्हणाले.

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी आणि देशाला संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधानांनी महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर पुष्पार्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात वंदे मातरमचा 150 वा वर्धापन दिनही साजरा होत आहे. याबाबतचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी आपल्या संबोधनात म्हणाले की, "लाल किल्ल्यावर पहिल्यांदा वंदे मातरमचे शब्द निनादत आहेत." सुरूवातीलाच त्यांनी म्हटलं की, "मी महात्मा गांधींसहित स्वातंत्र्यलढ्यातील सर्व धुरिणांना नमन करतो."

'1947 पर्यंत विकसित भारत, युवक प्राथमिकता'

पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा विकसित भारताचा संकल्प दृगोच्चर केला.

ते म्हणाले की, "1947 पर्यंत विकसित भारत नक्कीच होणार, हा आमचा संकल्प आहे. भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, "आपला निर्धार पक्का असायला हवा. कारण जेव्हा निर्धार पक्का असतो, तेव्हा आपले प्रयत्नही अधिक मोठे असतात. भारतही नवी उंची गाठण्याचं स्वप्न पाहत आहे. 2047 मध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षं पूर्ण करेल, तेव्हा आपल्याला देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जगात वेगानं वाढत असलेली आपली अर्थव्यवस्था आहे. बारा वर्षांत आपण प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहिलो, असंही पंतप्रधान म्हणाले. 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेतून बाहेर आल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "विकसित भारतात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थीही युवा आहे. युवक हेच सर्वोच्च प्राथमिकता आहेत. युवकांसाठी खूप काही गेल्या बारा वर्षात झालंय. स्टार्टअप इंडिया सुरू आहे."

"एक लाख कोटी रूपये आपण त्यासाठी दिले आहेत. रिसर्चसाठी प्रोत्साहन, डिजीटल इंडिया, स्वस्त डेटा, स्कील इंडिया, खेलो इंडिया पॉलिसी, नवी एज्यूकेशन पॉलिसी आपण आणली. याचा फायदा मध्यमवर्गाला झाला आहे. 2014 च्या आधी 350 हून कमी विद्यापीठं होती. पण 650 आपण नवी विद्यापीठं केली. आपण येत्या एक वर्षात एक कोटी युवकांना एआय स्कीलचं ट्रेनिंग देणार आहोत."

"कोचिंग क्लासेसची स्पर्धा ही मध्यमवर्गीय पालकांसाठी मोठी चिंता झाली आहे. कुटुंबावर आर्थिक बोजा येऊ नये म्हणून आम्ही युवकांसाठी वेगवेगळ्या परिक्षांसाठी फ्री ऑनलाईन कोचिंगचं नेटवर्क सुरू करणार आहोत," असंही ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी 'वंदे मातरम' सादर

ध्वजारोहण समारंभादरम्यान स्वदेशी बनावटीच्या 105 मिमी 'लाइट फील्ड गन'द्वारे 21 तोफांची सलामी देण्यात आली.

पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी 'वंदे मातरम' सादर करण्यात आलं. एनसीसी कॅडेट्स आणि 'माय भारत'चे स्वयंसेवक यांनी ते सादर केलं. त्यानंतर राष्ट्रगीत झालं.

या समारंभासाठी उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रांतील विशेष अतिथी, सामान्य नागरिक आणि देशातील तरुणांचा समावेश होता.

स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देशाला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी 'X' वर लिहिलं आहे की, "माझ्या सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हा राष्ट्रीय सण आपल्याला देशाच्या शूर वीरांनी दाखवलेले असीम धैर्य, अथक संघर्ष आणि मातृभूमीप्रती असलेली अतुलनीय निष्ठा यांची आठवण करून देतो. चला, आपण त्यांचे आदर्श अंगीकारूया आणि विकसित भारताचा संकल्प साकार करूया."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)