TET पेपरफुटीवर राहुल गांधी म्हणाले, 'ही तर तरुणांच्या भविष्याची चोरी'

Published
वाचन वेळ: 11 मिनिटे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जूनला घेतली जाणारी 'टीईटी' परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज (27 जून) टीईटीचा पेपर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जूनला संपूर्ण राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. एकूण 4 लाख 28 हजार 122 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी 2 लाख 26 हजार 363 सेवेत असलेले शिक्षक परीक्षेला बसणार होते.

NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. मात्र, सर्व उपाययोजनेनंतरही परीक्षेच्या एक दिवसाआधी पेपर फुटल्याने परीक्षार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे.

दरम्यान, शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या टीईटी परीक्षेसाठीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांच्या स्वप्नावर पाणी फेरल्याचं चित्र असून उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आधी NEET परीक्षा आणि आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने विरोधी पक्षाने सत्ताधारी सरकारला धारेवर धरलं आहे. हे सरकार पेपर फुटीचं सरकार असल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार आज (27 जून) पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही व्यक्तींकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजले. त्यामुळे भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी छापे टाकले.

यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली. या लोकांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परिस्थिती लक्षात घेता 28 जूनला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत असल्याचं या पत्रकातून सांगण्यात आलं आहे.

शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

असे पकडले टीईटीचा पेपर विकायला आलेले आरोपी

ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी आरोपींना कसं पकडलं हे सांगितलं.

दुधे म्हणाले, "उद्या 28 जून रोजी महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार होती. आज सकाळी येथील पोलीस उपायुक्त यांना एक गोपनीय माहिती मिळाली की उद्या होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी काही लोक आज भिवंडीमध्ये येणार आहेत. त्यांनी आमची टीम तयार करून सापळा लावला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आम्हाला कळलं की तीन लोक प्रश्नपत्रिका विकण्यासाठी आले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्याकडे उद्या होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील ही प्रश्नपत्रिका टीईटीची असल्याची खात्री केली."

दुधे पुढे म्हणाले, "या तीन लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि काही क्रेडिट व डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. हे तीन लोक दिल्लीवरून इथे आले होते. यापैकी एक जण हरियाणाचा आहे आणि इतर दोन आरोपी बिहारचे आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्यासाठी आम्ही एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वात हे पथक काम करेल. वेगवेगळ्या राज्यात आम्ही पथकं पाठवली आहेत. आरोपींना प्रश्नपत्रिका कुठून मिळाली, त्यांच्याकडे ती कशी आली याचा तपास सुरु आहे."

अशोक दुधे यांनी सांगितलं, "प्रश्नपत्रिकेचे चार संच मिळाले आहेत. हे लोक दीड कोटींमध्ये ही प्रश्नपत्रिका विकणार होते. त्यानंतर ती पुढे वितरित केली जाणार होती. त्याआधीच आम्ही तिघांना ताब्यात घेऊन प्रश्नपत्रिका जप्त केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचा आम्हाला संशय आहे. आज एफआयआर दाखल झालेला आहे. त्यामुळे सध्या काही अंदाज लावणं चुकीचं असेल."

'2028च्या आता टीईटी उत्तीर्ण व्हा म्हणताय, आता आम्ही कसं करायचं?'

टीईटीची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी याचिका करणारे किरण शिंदे यांनी सांगितलं की, "आम्हा शिक्षकांसाठी ही सुवर्णसंधी होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची तयारी झाली होती. आता इतर अनेक गोष्टी आहेत. आपली व्यवस्था एवढी कमकुवत आहे का की एवढे पेपर फुटतात. आता नवीन परीक्षेत काठिण्यपातळी वाढवून येईल, परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने यावर निर्णय घेतला पाहिजे."

शिंदे पुढे म्हणाले, "आधी NEET आणि आता TET. शिक्षकांना 2028च्या आत ही परीक्षा उत्तीर्ण होण्यास सांगितलं आहे. आम्ही 15-15 वर्षं नोकरी केली आहे आता आम्ही कसं करायचं? नोकरी लागल्यावर परीक्षा हे कुठलं धोरण आहे? टीईटी नकोच अशीच आमची भूमिका आहे."

किरण शिंदे यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.

टीईटी परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले, "लाखो विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत अशाप्रकारे वाया जात असेल तर परीक्षा पद्धती वरच विश्वास ठेवणे अवघड आहे. NEET ही शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारी अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणून तर शिक्षकांसाठी TET बाबत अशी पेपर फुटीची परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे."

शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी देखील या पेपरफुटीचा निषेध केला आहे.

"शिक्षक पात्रता (TET) परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना अत्यंत धक्कादायक, दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा आणि उमेदवारांचा शासन व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पेपरफुटीस जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा व्यवस्थेत अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि प्रभावी यंत्रणा उभारावी," असं ते म्हणाले.

दोन दिवसांत नवी तारीख जाहीर करणार - प्रिया शिंदे

टीईटी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या पत्रकार परिषदेत उपायुक्त प्रिया शिंदे यांनी माहिती दिली.

त्या म्हणाल्या, "परीक्षा परिषदेच्या पेपरफुटीप्रकरणानंतर एकाही विद्यार्थ्याकडून शुल्क घेतले जाणार नाही. उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही आणि त्यांच्याकडून कोणतीही अतिरिक्त फी आकारली जाणार नाही."

प्रिया शिंदे पुढे म्हणाल्या, "पेपरफुटीनंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारखेबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. दोन-तीन दिवसांत नव्या तारखेची घोषणा करण्यात येईल.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अंतिम निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते.

या प्रकरणात उमेदवारांचा कोणताही दोष नसून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सध्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत."

गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांना सांगितलं, "काही अनोळखी इसमांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली. तात्काळ आमच्या पोलिसांनी त्या इसमांना पकडलं आणि सदर पेपर हा टीईटीचाच असल्याचं शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खात्री केली. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ती पुढे ढकलण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीनेच ती घेण्यात येईल."

'ही तरुणांच्या भविष्याची चोरी' - राहुल गांधी

या प्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमधून प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी लिहिलं, "आणखी एक पेपरफुटी. आणखी एक परीक्षा रद्द. यावेळी महाराष्ट्राची टीईटी परीक्षा. देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था ही वसुलीची व्यवस्था बनवण्यात आली आहे, ज्यामुळे देशातील प्रत्येक तरुण असुरक्षित आहे."

ते पुढे म्हणाले, "ही केवळ पेपरफुटी नाही, तर तरुणांच्या भविष्याची चोरी आहे."

'डबल इंजिन सरकार आता डबल लीक सरकार बनलं आहे' - अभिजित दिपके

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणावर आता कॉक्रोच जनता पार्टीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सीजेपीने म्हटलं, "उद्या टीईटीची परीक्षा होणार होती. मात्र, एक दिवस आधीच परीक्षा रद्द करण्यात आली. यावरून हे स्पष्ट झालं आहे की, भाजपला देश असो की राज्य कुठल्याही पातळीवर या देशात एकही परीक्षा सुरळीतपणे घेता येत नाही. "

अभिजीत दीपके म्हणाले, "यांचं (भाजपचं) डबल इंजिन आता डबल लीक सरकार बनलं आहे."

ते पुढे म्हणाले, "हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. मला देशातील तरुणांना सांगायचं आहे की, भाजप सरकारला तुमच्या भविष्याशी काहीही देणं-घेणं नाही. त्यांना तुमच्या शिक्षणाचीही कोणतीही चिंता नाही."

कॉकरोच जनता पार्टीने दावा केला की, "2015 पासून आतापर्यंत 148 पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 20 वर्षांत 10 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा तुमचा प्रश्न नाही, तर पुन्हा एकदा विचार करा."

सीजेपीने पुढे म्हटलं, "आपण आताच आपल्या हक्कांसाठी उभे राहिलो नाही, तर ही व्यवस्था कधीच बदलणार नाही."

'शिक्षकांना छळणाऱ्या टीईटीची पुनर्रचना करा' - भाऊ चासकर

शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते भाऊ चासकर म्हणाले, "NEET पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सहन कराव्या लागलेल्या गैरसोयी यांच्या बातम्यांची शाई वाळत नाही तोच पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महाटीईटी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा कारभार यापूर्वीही वादग्रस्त राहिला आहे. पेपरफुटी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. काही अधिकाऱ्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. तरीही त्यातून परीक्षा परिषदेने कोणताही धडा शिकलेला नाही, हे दुर्दैवी आहे."

टीईटी परीक्षेबाबत बोलताना चासकर पुढे म्हणाले, "परीक्षेचा पेपर 28 जून रोजी नियोजित होता. ऐनवेळेस वाहनांच्या उपलब्धतेच्या समस्या, वाहतूक कोंडी आणि इतर अडचणींमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर होऊ नये म्हणून अनेक शिक्षक आज शनिवारी सकाळी रजा घेऊन परीक्षा केंद्र असलेल्या शहरांच्या दिशेने प्रवासाला निघाले होते. उद्या सकाळी पहिला आणि दुपारी दुसरा पेपर देण्यासाठी मानसिक तयारी पूर्ण झाली असतानाच प्रवासात पेपरफुटीची बातमी येऊन मेंदूवर आदळली.

वास्तविक नोकरीत येऊन अडीच-तीन दशके उलटलेली असताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्वाळ्यामुळे टीईटी सक्ती लादली गेली आहे. यामुळे देशभरातील सुमारे 25 लाख शिक्षक आधीच अस्वस्थ, अस्थिर आणि असुरक्षित मानसिकतेत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पेपर फुटल्याने हजारो शिक्षकांच्या पदरी पुन्हा एकदा मोठा मनस्ताप पडला आहे."

भाऊ चासकर यांनी सांगितलं, "मुळात कायदा यायच्या आधी सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना सेवेत येण्यासाठी निश्चित केलेली टीईटी परीक्षा देण्यास भाग पाडणे हाच अन्याय आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरुन नाही. प्रत्यक्ष वर्गात काम करणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता आणि पात्रता दीड-दोन तासांच्या पाठांतराधारित आणि स्मरणशक्तीवर आधारित परीक्षेत मोजण्याचा प्रयत्न हा शिक्षकी पेशाचा अवमान करणारा चमत्कारिक प्रकार आहे.

आजची पेपरफुटीच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की महाटीईटी परीक्षेची संपूर्ण पुनर्रचना करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष वर्गातील कामकाजावर आधारित सादरीकरण, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, नवोपक्रम, शिक्षणाशी संबंधित विविध विषयांवर आधारित असाइनमेंट लिहून घेणे आदी बाबी निश्चित करून त्यावर आधारित क्रेडिट बेस्ड मूल्यांकनाची पद्धत विकसित केली पाहिजे ही शिक्षकांची रास्त मागणी आहे. शिकवण्याची क्षमता आणि कौशल्य तपासण्यासाठी एमपीएससी परीक्षेच्या धर्तीवर कठीण वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका सोडवायला देऊन त्यात उत्तीर्ण होण्यासाठी 60 टक्के गुण मिळवणे हा एकमेव निकष कसा काय असू शकतो? हा सवाल अनुत्तरित राहतो."

"या परीक्षेने हजारो शिक्षकांची स्थिती केविलवाणी झालीय. शिक्षकांकडून कामाची अपेक्षा जरूर ठेवा मात्र त्यांना छळण्यासाठी परीक्षा असू नयेत. शिक्षकांची व्यावसायिक गुणवत्ता, क्षमता आणि कौशल्य तपासण्यासाठी, त्यात वृद्धी करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी परीक्षा असल्या पाहिजेत. त्यामुळे महाटीईटी आणि संघराज्य सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या सीटीईटी या दोन्ही परीक्षांच्या पुनर्रचनेची शिक्षकांची जुनी मागणी आहे," असं चासकर यांनी सांगितलं.

परीक्षेसाठीच्या नियमांवरून झाला होता वाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं शिक्षक पात्रता (TET) परीक्षेसंदर्भात काही कडक नियम जाहीर केले होते. 28 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेदरम्यान उमेदवारांची ओळख स्पष्ट व्हावी यासाठी केंद्रांवर Live CCTV निरीक्षणाची व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे परीक्षा कालावधीत चेहरा पूर्णपणे झाकला जाईल असे कपडे जसे की दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी किंवा इतर कोणतेही आच्छादनवापरण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.

परिषदेनं याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, हे निर्बंध कोणत्याही धार्मिक प्रथांवर आधारित नसून केवळ परीक्षा प्रक्रियेला पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी लागू करण्यात आले होते. देशातील UPSC, SSC, MPSC यांसारख्या इतर स्पर्धा परीक्षांमध्येही उमेदवारांची ओळख पटेल यासाठी अशाच प्रकारचे नियम लागू असतात, असेही परिषदेनं नमूद केले होते.

अलीकडच्या काळात परीक्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून गैरप्रकार केल्याच्या घटना लक्षात घेऊन हे नियम जाहीर करण्यात आले होते. काही उमेदवारांकडून कपड्यांमध्ये किंवा डोक्यावरच्या आच्छादनाखाली उपकरणे लपवण्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे ओळख पटवताना अडचणी निर्माण होत असल्याने चेहरा, डोळे, कान हे अवयव स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे परिषदेनं स्पष्ट केलं होतं.

महिला उमेदवारांना त्यांच्या परंपरेनुसार पोशाख वापरण्याची मुभा होती, मात्र परीक्षा कक्षात चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं होतं. परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी हे नियम आवश्यक असल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं होतं.

हे सरकार 'पेपर लीक सरकार' बनलंय - काँग्रेस

काँग्रेसने आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरून टीका करत म्हटलं, "आणखी एक पेपर लीक. महाराष्ट्रात TET परीक्षेचा पेपर लीक झाला आहे. ही परीक्षा उद्या होणार होती, ती आज रद्द झाली आहे. भाजप सरकारमध्ये आसा कोणताच पेपर नाही, जो लीक होत नाहीये. हे सरकार 'पेपर लीक सरकार' बनलंय."

NEET पेपरफुटी प्रकरणावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी म्हटलं आहे की, "आणखी एक पेपरफुटी. आता हे नेहमीचंच झालं आहे. या देशातील मंत्र्यांनी कोणत्याही अपयशाची जबाबदारी कधीच स्वीकारायची नाही, अशी जणू शपथच घेतली आहे. जनतेने मात्र हे सगळं सहन करत राहायचं, कारण मंत्र्यांकडून याचं उत्तरदायित्व कधीच स्वीकारलं जाणार नाही."

विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील एक्सवर पोस्ट करून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सत्यजित तांबे यांनी म्हटलं, "कधी MPSC, कधी NEET आणि आता TET... पेपरफुटीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. विभागातील भ्रष्टाचार हेच यामागचं मुख्य कारण आहे. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि भवितव्य यामुळे धोक्यात येत आहे. TET ही परीक्षा अनेक शिक्षकांसाठी नोकरी टिकवण्याशीही संबंधित आहे, त्यामुळे या प्रकाराचा फटका विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही बसला आहे. जग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचलं असताना आपण अजूनही सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, हे दुर्दैवी आहे. परीक्षा व्यवस्था जाणीवपूर्वक पारदर्शक केली जात नाही, असं माझं ठाम मत आहे. सरकारने ही व्यवस्था तातडीने सुधारण्याची गरज आहे."

'हे कमकुवत सरकार आहे', दानवेंची टीका

या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करत जाब विचारला.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, "या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात आहे, हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं."

"कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा पेपरफुटीमध्ये कुठेतरी सहभाग आहे."

पुढे बोलताना दानवे म्हणाले, "जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत, त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो, याचा अर्थ आपण कुठे चाललोय हे पाहण्याची आवश्यकता आहे."

"हे कमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत. या छोट्या परीक्षेचा पेपर सरकार सांभाळू शकत नाही, याचाच अर्थ हे सरकार भगवान भरोसे चालू आहे."

या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं? हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रश्न

"पेपरफुटी हा आता अपवाद राहिलेला नाही, तर या दलिंदर सरकारची ओळख बनली आहे", अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

टीईटी पेपरफुटीवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले, "उद्या (28 जून) महाराष्ट्रात होणारा TET परीक्षेचा पेपर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत."

"लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर आणि भविष्यावर पाणी फेरणाऱ्या या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं आहे?"

"एकीकडे 'पारदर्शक कारभार'च्या घोषणा, तर दुसरीकडे पेपरफुटीचं अखंड सत्र! विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कोणाकडे पोहोचतोय याची चिंता करायची?"

"या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरणार आहे," असं सपकाळ म्हणाले.

महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "महाराष्ट्राची ओळख ही शिक्षण, आणि स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे होती. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीची झाली आहे, ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले होते. आता ठाण्यात TET चा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने कष्ट करून, रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली. पण काही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्या सर्व मेहनतीवर एका क्षणात पाणी फेरले गेले."

वडेट्टीवार पुढे म्हणाले, "ही केवळ पेपरफुटी नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या भविष्याची चोरी आहे. सरकारी भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार पेपरफुटी होत असताना सरकार मात्र नेहमीप्रमाणे चौकशीच्या घोषणा करण्यातच व्यग्र असते. दरवेळी दोषींवर कारवाई करू असे सांगितले जाते, पण पुढचा पेपर पुन्हा फुटतो. याचा अर्थ दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नाही किंवा त्यांना कुणाचे तरी संरक्षण मिळत आहे."

"आज महाराष्ट्रातील युवक बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. महायुती सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा पेपर नेमका कसा फुटला? त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे? त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण आहे का? याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. केवळ लहान-मोठ्या दलालांना अटक करून चालणार नाही, तर या रॅकेटमधील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)