भर रस्त्यात कॅबमधून उतरवलं, तरुणीचा वाहनाच्या धडकेनं मृत्यू; 330 कोटी रुपये भरपाई देण्याचे 'उबर'ला आदेश

कॅलिफोर्निया: उबर चालकाने हायवेवरच खाली उतरवले अन् तरुणीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू; कुटुंबास 330 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे उबरला आदेश

फोटो स्रोत, Panish, Shea, Ravipudi

    • Author, मॅडेलाइन हाल्पर्ट
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये उबर कॅब चालकाने 23 वर्षांच्या तरुणीला हायवेवरच गाडीतून खाली उतरवले होते. त्यानंतर वाहनाची धडक बसून तरुणीचा मृत्यू झाला.

आता या प्रकरणात उबर कंपनीला त्या तरुणीच्या कुटुंबीयांना 4 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 330 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोर्टातील कागदपत्रांनुसार, 12 ऑगस्ट 2023 रोजी एमिली नॉर्मंडिन-पार्कर आणि तिच्या मैत्रिणीने घरी जाण्यासाठी उबर केली होती. मात्र, प्रवासादरम्यान तिच्या मैत्रिणीची तब्येत बिघडली आणि तिने गाडीतच उलट्या केल्या.

तिच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने गाडी हायवेच्या कडेला थांबवली आणि नशेत असलेल्या या दोघींनाही जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर लगेचच भरधाव आलेल्या एका दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने एमिलीचा जागीच मृत्यू झाला.

उबर कंपनीने न्यायालयात स्वतःचा बचाव करताना म्हटले होते की, चालक हा त्यांचा स्वतंत्र कंत्राटदार होता, त्यामुळे त्याच्या वर्तणुकीची जबाबदारी कंपनीची नाही.

"उबर प्रवाशांना ज्या नियमांचे पालन करायला सांगते, ते सर्व एमिलीने केले होते. स्वतः गाडी न चालवण्याचा एक जबाबदार निर्णय तिने घेतला होता आणि उबर तिला सुरक्षित घरी पोहोचवेल असा विश्वास आम्हाला होता," असं तिच्या पालकांनी निवेदनात म्हटलंय.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून पदवी पूर्ण केलेल्या आपल्या मुलीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, "त्या विश्वासाची किंमत आमच्या मुलीला स्वतःचा जीव गमावून चुकवावी लागली."

पीडित कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या 'पॅनिश, शिया, रविपुडी' या विधी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवस चाललेल्या कायदेशीर मध्यस्थीनंतर (आर्बिट्रेशन) न्यायाधीश रिचर्ड स्टोन राइडशेअर कंपनी उबरला ही रक्कम नॉर्मंडिन-पार्कर यांच्या पालकांना देण्याचे आदेश दिले.

कॅलिफोर्निया: उबर चालकाने हायवेवरच खाली उतरवले अन् तरुणीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू; कुटुंबास 330 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे उबरला आदेश

फोटो स्रोत, Getty Images

कायदेशीर मध्यस्थी (Arbitration) म्हणजे एखाद्या निष्पक्ष आणि पात्र मध्यस्थाच्या मदतीने या प्रकरणात एका निवृत्त न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्यायालयाबाहेर वाद सोडवण्याचा एक पर्यायी मार्ग आहे.

कुटुंबाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणींना हायवेवर तसंच वाऱ्यावर सोडल्यानंतर चालक वू ट्रॅनने त्यांच्या मदतीसाठी साधी कुणाला हाकही मारली नाही किंवा पोलिसांना कळवले नाही. उलट त्याने गाडी थांबवून आधी थेट उबरला फोन लावला आणि गाडी घाण केल्याबद्दल नॉर्मंडिन-पार्करकडून 'क्लिनिंग फी' वसूल करावी, अशी मागणी केली.

न्यायाधीश स्टोन यांनी निरीक्षण नोंदवले की, ट्रॅनला आपल्या प्रवाशांच्या जिवापेक्षा नव्या गाडीचीच जास्त फिकीर होती. त्याने हायवेवरून पुढचा एक्झिट घेऊन त्या दोघींना एखाद्या सुरक्षित जागी सोडणे सहज शक्य होते.

कॅलिफोर्निया: उबर चालकाने हायवेवरच खाली उतरवले अन् तरुणीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू; कुटुंबास 330 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे उबरला आदेश

फोटो स्रोत, Getty Images

या दुर्घटनेसाठी कंपनीला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार ठरवणे चुकीचे आहे, असा दावा उबरने केला आहे.

कंपनीने एका निवेदनात स्पष्ट केले की, "गेल्या काही वर्षांत आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवनवीन तंत्रज्ञान, कडक नियम आणि सुरक्षा तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपायांचा वापर करून व्यवस्था अधिक सक्षम केली आहे. यामध्ये प्रवाशांना कोणत्याही धोकादायक किंवा असुरक्षित जागी न उतरवण्याबाबत चालकांसाठी तयार केलेल्या अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वांचाही समावेश आहे."

कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या संस्थेने सांगितले की, उबरने सुरुवातीला या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पालकांना 1 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 83 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण त्या बदल्यात या घटनेवर तोंड बंद ठेवण्याची अट घातली होती. पालकांनी मात्र हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)