किती सेकंद श्वास रोखून धरला म्हणजे फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं आहे असं समजावं?

    • Author, शनमुगप्रिया सेल्वराज
    • Role, बीबीसी तामिळसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

श्वासोच्छवास ही जगण्यासाठीची अत्यंत आवश्यक, मूलभूत स्वरुपाची क्रिया आहे. त्यामुळे त्यात झालेल्या किरकोळ बदलांकडे देखील दुर्लक्ष करता कामा नये, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ किंवा डॉक्टर देतात.

पल्मोनोलॉजिस्ट म्हणजे फुफ्फुस रोगतज्ज्ञ डॉ. शेरॉन क्लेमेंट यांनी बीबीसीशी बोलताना फुप्फुसांचं आरोग्य जपणं, सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं ओळखणं आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती दिली.

फुफ्फुसाची हानी होण्याची प्रारंभिक लक्षणं कोणती?

डॉ. शेरॉन म्हणतात की, फुफ्फुसाच्या समस्या लवकर लक्षात येणं किंवा त्यांचं लवकर निदान होणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी त्यांनी सांगितलेली लक्षणं पुढीलप्रमाणे :

  • सतत येणारा खोकला
  • कफ किंवा चिकट पदार्थासह येणारा खोकला
  • कफ किंवा चिकट पदार्थासह होणारा रक्तस्त्राव
  • धाप लागणं
  • छातीत दुखणं
  • श्वास घेताना आवाज येणं

डॉ. शेरॉन म्हणतात की, जर ही लक्षणं 48-72 तासांहून अधिक काळ राहिली तर वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे.

तुमच्या फुफ्फुसांची क्षमता तुम्ही स्वत:च तपासू शकता का?

डॉ. शेरॉन म्हणतात की, आपली फुफ्फुसं निरोगी आहेत की नाही हे आपण एका साध्या-सोप्या चाचणीद्वारे जाणून घेऊ शकतो.

त्यांच्या म्हणण्यानुसार, "जर तुम्ही 20 सेकंद किंवा त्याहून अधिक वेळ श्वास रोखून धरू शकत नसाल, तर त्याचा अर्थ ते तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी असल्याचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे जर काही पायऱ्या चढल्यानंतरच तुम्हाला धाप लागत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ती तुमच्यासाठी चिंतेची बाब असली पाहिजे."

ही सर्व सुरुवातीची धोक्याची चिन्हे किंवा इशारा आहेत, यावर भर देत डॉ. शेरॉन म्हणतात की या टप्प्यावर जर उपचार झाले तर श्वसनाचे आजार टाळले जाऊ शकतात.

फुफ्फुसांचं नुकसान होण्यामागची मुख्य कारणं

त्यांनी असंही सांगितलं की विषाणूंचा संसर्ग (व्हायरल इन्फेक्शन) हे फुफ्फुसांचं नुकसान होण्यामागचं कारण असू शकतं.

वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्यावरच्या लेख किंवा मजकुरांमध्ये फुफ्फुसांत संसर्ग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विविध घटकांवर चर्चा करण्यात आली आहेत.

श्वसनाच्या तीव्र स्वरुपाच्या संसर्गावर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या निगराणीतून असं दिसून येतं की इन्फ्लुएंझा आणि श्वसनाच्या संसर्गासाठीचे इतर विषाणू भारतात वर्षभर पसरत असतात.

त्याचप्रमाणे, 'एन्व्हायर्नमेंटल हेल्थ' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटलं आहे की, पीएम 2.5 वायू प्रदूषणाला (पीएम2.5 म्हणजे2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाचे हवेतील सूक्ष्म कण) दीर्घकाळ सामोरं गेल्यास श्वसनाचे गंभीर संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो.

तसंच, नॅशनल हेल्थ सर्व्हेच्या माहितीच्या विश्लेषणातून घरातील धूर, खराब राहणीमाग म्हणजे अस्वच्छता, अपुरा सूर्यप्रकाश, दूषित पाणी इत्यादी आणि सामाजिक-आर्थिक स्थिती यांचा फुफ्फुसाच्या आजारांशी असलेला संबंध अधोरेखित होतो.

"विषाणूमुळे झालेला संसर्ग सर्वसामान्यपणे एक-दोन आठवड्यात बरा होतो. मात्र काहीवेळा हा संसर्ग 4-6 आठवडे राहू शकतो. जर तो पूर्ण बरा झाला नाही, तर त्यातून श्वसनाशी संबंधित दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात," असं डॉ. शेरॉन म्हणतात.

'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज' (सीओपीडी)बद्दल त्या म्हणाल्या, "या समस्येत श्वसनमार्गाला सूज येते आणि ते अरुंद होतात." त्यांनी सांगितलं की यामुळे श्वास घेण्यास आणि बाहेर सोडण्यास अडचण होऊ शकते. धूम्रपान हे त्यासाठीचं एक प्रमुख कारण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

धूम्रपानाचे धोके

तंबाखूचं सेवनामुळे फुफ्फुसांसाठी मोठा धोका निर्माण होतो. यामुळे तीन प्रकारची हानी किंवा अपाय होतो, असं सांगत त्यांनी याबद्दल इशारा दिला. त्यांच्या मते,

डायरेक्ट किंवा थेट धूम्रपान : सिगारेट, विडी, हुक्का इत्यादी गोष्टींचं प्रत्यक्ष सेवन केल्यामुळे होणारं नुकसान.

पॅसिव्ह किंवा अप्रत्यक्ष धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहिल्यानं होणारं नुकसान.

थर्ड हँड स्मोक : पृष्ठभागांवर साचलेले तंबाखूचे अंश श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे होणारे परिणाम.

कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अपायकारक गोष्टींचा धोका कोणाला अधिक असतो?

जे कामगार सतत धूळ, धूर आणि विषारी वायूंच्या संपर्कात येतात किंवा अशा वातावरणात काम करतात, त्यांना मोठा धोका असतो असा इशारा डॉ. शेरॉन देतात.

त्यांनी सांगितलं की राईस मिल किंवा तांदळाच्या गिरणीत काम करणाऱ्या कामगारांच्या बाबतीत धान्यामुळे निर्माण होणाऱ्या धुळीत काम केल्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असतो.

त्याचप्रमाणे त्या म्हणतात, "वेल्डिंगचं काम करणारे कामगार धातूचा धूर आणि वायूंच्या सान्निध्यात काम करतात. स्वच्छता कर्मचारी कचरा आणि धोकादायक सूक्ष्मजीवांमध्ये काम करतात. गोदी आणि बंदरांमध्ये काम करणारे कामगार ॲस्बेस्टॉस आणि ॲल्युमिनियमची धूळ असणाऱ्या वातावरणात काम करतात. या सर्वांना फुफ्फुसांचे आजार होण्याचा धोका असतो."

त्या असंही म्हणाल्या की ज्या लोकांचे पक्षी आणि पाळीव प्राणी असतात, त्यांना या पक्षी-प्राण्यांच्या केसांमधील बुरशीच्या कणांमुळे श्वसनमार्गावर परिणाम होण्याचा किंवा त्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे?

फुफ्फुसांचं योग्यप्रकारे संरक्षण करण्यासाठी डॉ. शेरॉन काही उपाय सुचवतात.

श्वसनाचा 4-7-8 पॅटर्न: 4 सेकंद श्वास आत घ्या, 7 सेकंद श्वास रोखून धरा आणि 8 सेकंद हळूहळू श्वास बाहेर सोडा. फुफ्फुसाची क्षमता वाढण्यासाठी हे दररोज करण्यास सूचवलं जातं.

वाफ घेणं: पेपरमिंट तेल किंवा आल्यासोबत वाफ घेतल्यामुळे कफ कमी होण्यास मदत होते, असं त्या सांगतात.

अँटीऑक्सिडंट असलेलं अन्न: ब्रोकोली, डाळिंब, बीट, आले इत्यादी पदार्थांमुळे इन्फ्लेमेशन कमी होण्यास मदत होऊ शकते, असं डॉ. शेरॉन सांगतात.

व्यायाम: छाती आणि श्वसनाशी संबंधित स्नायूंना बळकट करणाऱ्या व्यायामांमुळे फुफ्फुसाची क्षमता वाढेल, असं त्या सांगतात.

फुफ्फुसाच्या आरोग्याची दररोज काळजी घेतल्यामुळे त्याची कार्यक्षमता टिकून राहण्यास, धोके टाळण्यास आणि श्वसन संस्थेचं कार्य मजबूत होण्यास मदत होईल.

जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दिलेल्या सूचनांनुसार तंबाखू आणि धूम्रपान टाळल्यास, घरातील वायू प्रदूषण कमी केल्यास आणि हवा चांगली खेळती ठेवल्यास श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल.

अमेरिकन लंग असोसिएशन यासाठी नियमितपणे एरोबिक व्यायाम करण्याची आणि दीर्घकाळ रासायनिक धुराच्या संपर्कात न राहण्याची शिफारस करतं.

डॉक्टरकडे कधी गेलं पाहिजे?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च श्वसनाच्या लक्षणांचं लवकर निदान करून आणि उपचारांद्वारे संसर्गाला प्रतिबंध करण्यावर भर देतं.

त्यामुळेच लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं आणि सुरुवातीच्या टप्प्यातच तपासणी करून उपचार घेणं महत्त्वाचं असण्यावर डॉ. शेरॉन भर देतात.

"धूम्रपान करणारे, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध धुळीच्या संपर्कात येणारे आणि ज्यांना फुफ्फुसाच्या आजारांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे अशा लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं," असं त्या म्हणतात.

"फुफ्फुसाच्या किंवा श्वसन संस्थेच्या समस्यांचं जर सुरुवातीलाच निदान झालं, तर त्याचे होणारे दीर्घकालीन परिणाम टाळता येतात," असं डॉ. शेरॉन क्लेमेंट म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)