'भूत दिसणं' किंवा 'बाजूला कुणीतरी उभं आहे' असा भास होण्यामागचं नेमकं विज्ञान काय आहे?

फोटो स्रोत, David Wall via Getty Images
- Author, डेझी स्टीफन्स
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
जुन्या काळात मेसोपोटेमिया संस्कृतीतल्या माणसांनी रचलेल्या भुतांच्या कथा असोत, की मग चार्ल्स डिकन्स यांची जगप्रसिद्ध 'अ ख्रिसमस कॅरोल' कादंबरी असो, अगदी प्राचीन काळापासून माणसाला भुतांच्या आणि आत्म्यांच्या गोष्टी सांगण्याची जुनीच खोड आहे!
पण आजही भुतांबद्दलचं हे आकर्षण टिकून का राहिलं आहे?
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट जॉर्जियातील सायकोलॉजिस्ट प्रोफेसर क्रिस्टीन सिमंड्स-मूर सांगतात की, लोकांना काही गूढ अनुभव नक्कीच येतात हे नाकारताच येत नाही. विज्ञानाला ज्या घटनांचं कोडं सध्या उलगडता येत नाही, अशा अनुभवांना सर्वसामान्य भाषेत 'पॅरानॉर्मल' किंवा अलौकिक अनुभव म्हटलं जातं.
त्या म्हणतात, "अनुभव घेणाऱ्या व्यक्तीसाठी या गोष्टी पूर्णपणे खऱ्या वाटत असतात आणि त्याचा माणसाच्या मनावर खोलवर परिणाम झालेला असतो."
पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, या सगळ्यामागे खरंच कोणती अमानवी किंवा भूत-प्रेतांची शक्ती होती.
'बदललेली मानसिक अवस्था'
सिमंड्स-मूर यांच्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोर काहीतरी अनाकलनीय किंवा भुताटकीसारखं घडल्याचा भास होतो, तेव्हा खरं तर त्याच्या मेंदूत अनेक विचित्र प्रक्रिया सुरू असतात.
याचं एक सोपं शास्त्रीय कारण म्हणजे 'हिप्नागॉजिक स्टेट' म्हणजेच माणूस पूर्ण जागाही नसतो आणि गाढ झोपलेलाही नसतो अशी झोप आणि जाग यांच्या मधली अर्धवट गुंगीची अवस्था.
सिमंड्स-मूर सांगतात, "असे बहुतांश गूढ अनुभव लोकांना तेव्हाच येतात जेव्हा त्यांची शुद्ध किंवा जाणीव किंचित भरकटलेली असते."
या तंद्रीच्या वेळेत मनात चाललेली कल्पना आणि डोळ्यांसमोरचं खरंखुरं वास्तव यांच्यातली सीमारेषा इतकी पुसट होते की, नेमकं काय खरं आणि काय भास, हे ओळखणंच कठीण जातं.
याच अवस्थेत बऱ्याचदा 'स्लीप पॅरालिसिस' होतो. म्हणजेच अचानक जाग येते पण जणू झोपेत अंग जखडून जातं आणि छातीवर दडपण आल्यासारखं वाटतं.
2011 च्या एका मोठ्या अभ्यासानुसार, जगातल्या सामान्य लोकांपैकी तब्बल 7.6% लोकांनी कधी ना कधी हा थरारक अनुभव घेतलेला असतो.
'स्लीप मेडिसिन रिव्ह्यूज'मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाहणीत कोणत्याही मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांचा समावेश नव्हता. तर सर्वसामान्य नागरिकांवर हा अभ्यास करण्यात आला होता.

फोटो स्रोत, EvgeniyShkolenko via Getty Images
युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या गोल्डस्मिथ्सचे प्रोफेसर ख्रिस फ्रेंच यांच्या शब्दांत सांगायचं तर, हा असा प्रसंग असतो जिथे "तुमचं शरीर तर जागं होतं पण मेंदू अजून झोपेतच असतो." वरवर भुताटकीसारख्या वाटणाऱ्या घटनांमागे नेमकं काय विज्ञान दडलेलं आहे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी 'अॅनॉमलिस्टिक सायकॉलॉजी रिसर्च युनिट' सुरू केलं आहे.
या स्लीप पॅरालिसिसमध्ये शरीरावर अनेक विचित्र परिणाम जाणवतात. यातलं सर्वांत थरकाप उडवणारं लक्षण म्हणजे त्या अंधाऱ्या खोलीत आपल्या अगदी जवळ कुणीतरी उभं आहे असा येणारा तीव्र आणि अस्वस्थ करणारा भास.
फ्रेंच सांगतात, "त्या खोलीत तुम्हाला काही दिसत नसतं किंवा कसला आवाजही येत नसतो, तरीही कुणीतरी तिथं लपून बसलंय अशी जबरदस्त जाणीव मनाला अस्वस्थ करून सोडते."
एवढंच नाही तर स्लीप पॅरालिसिसच्या वेळी लोकांना थेट शारीरिक स्पर्श जाणवण्याइतपत तीव्र भास होतात.
"हा अनुभव अक्षरशः अंगावर काटा आणणारा आणि थरकाप उडवणारा असतो. पण हे निव्वळ मनाचे खेळ असतात यात काडीमात्र तथ्य नसतं," असं फ्रेंच सांगतात.
याशिवाय अस्पष्ट किंवा अस्ताव्यस्त गोष्टींमध्ये नको ते आकार शोधण्याची आपल्या मेंदूची खोड ज्याला विज्ञानात 'पॅरिडोलिया' म्हणतात. यामुळेही लोकांना भुताटकीचे भास होतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कॅनडाच्या मॅकईवान युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर रॉडनी श्माल्ट्झ याचं स्पष्टीकरण देताना म्हणतात, "आपले डोळे ज्या प्रकारे काम करतात त्यामुळे नजर वळवताना कोपऱ्यातून अंधारात काहीतरी दिसल्यासारखं वाटणं आणि तिथे प्रत्यक्षात काहीही नसताना एखादा चेहराच उभा असल्याचा भास होणं ही फार सामान्य गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Elva Etienne via Getty Images
सिमंड्स-मूर सांगतात की, माणूस जेव्हा तणावाखाली किंवा घाबरलेला असतो तेव्हा मेंदूला अंधारात किंवा साध्या सावलीतही विचित्र आकार दिसण्याची शक्यता जास्त वाढते.
तसंच आपण घरात अगदी एकटे असतानाही 'कुणीतरी सोबत आहे' असा जो भास होतो त्यामागे 'डिसोसिएशन' म्हणजेच स्वतःच्या जाणीवेपासून मन अलग होण्याची अवस्था हे कारण असल्याचं काही मानसशास्त्रज्ञांचं मत आहे.
सिमंड्स-मूर यांच्या मते, डिसोसिएशन म्हणजे जेव्हा माणसाची स्वतःचीच जाणीव स्वतःपासून वेगळी झाल्यासारखी वाटते. एका बाजूला भीषण अपघात किंवा तीव्र मानसिक धक्का बसतो तेव्हा माणूस स्वतःच्याच शरीरापासून बाहेर पडल्यासारखा किंवा वेगळा झाल्यासारखा अनुभवतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्या रोजच्या जगण्यातही हे सहज घडतं. जसं की रोजच्या ओळखीच्या रस्त्यावरून गाडी चालवून घरी येताना आपण 'ऑटो पायलट' मोडवर असतो हात-पाय गाडी चालवत असतात पण विचार भलतीकडेच असतात.
खोलीत कोणीतरी उपस्थित असल्याचा जो भास होतो त्याबद्दल सिमंड्स-मूर सांगतात की, प्रत्यक्षात ती व्यक्ती स्वतःच्याच मनाचा एक भाग अनुभवत असते, "पण तो भाग जणू कोणी 'दुसरीच व्यक्ती' आहे असा तिचा गैरसमज होतो."अति ताणतणाव किंवा जागरण आणि अपुरी झोप यामुळे मेंदूची अशी स्वतःपासून अलग होण्याची अवस्था जास्त वेळा निर्माण होते, असंही त्या नमूद करतात.

फोटो स्रोत, agsandrew via Getty Images
याशिवाय काही संशोधनांमध्ये भुताटकीच्या अनुभवांचा संबंध 'ट्रान्सलिमिनॅलिटी' या मानसिक पैलूशी जोडला गेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्यांच्या मनातली कल्पनाशक्ती आणि वास्तव यांच्यातली भिंत अगदी नाजूक असते अशा लोकांमध्ये हा गुणधर्म जास्त दिसतो. सिमंड्स-मूर यांच्या मते, साध्या प्रश्नावलीवरून ही चाचणी करता येते. यात पुढे असणारी माणसं "अफाट कल्पनाशक्ती लाभलेली आणि प्रचंड क्रिएटिव्ह" असतात. अशी माणसं "एखादं गाणं किंवा कला पाहून मनातून हळवी होतात, त्यांना पडलेली स्वप्नं अगदी व्यवस्थित लक्षात राहतात आणि ते त्या स्वप्नांमागे काहीतरी खास अर्थ शोधत बसतात."
अशा लोकांना आपल्या अवतीभोवती कुणीतरी अदृश्य शक्ती वावरते आहे, असा भास होण्याची शक्यता जास्त असते, असं सिमंड्स-मूर सांगतात.
या लोकांमध्ये 'सिनॅस्थेशिया' देखील असू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, मेंदूत एका ज्ञानेंद्रियाची तार हलली की भलत्याच दुसऱ्या इंद्रियाला त्याचा अनुभव येतो.
उदाहरणार्थ, सिनॅस्थेशिया असलेल्या माणसाने नुसता गुलाबी रंग जरी पाहिला तरी त्याच्या मनात गुलाबाच्या फुलाची आठवण जागी होते आणि त्याला चक्क हवेत गुलाबाचा वास दरवळल्यासारखा वाटू लागतो.
पण लक्षात ठेवा, भुताटकीच्या या अनुभवांमागे केवळ मनाचे किंवा मानसशास्त्राचेच खेळ असतात असं नाही. यामागे आणखीही काही शास्त्रीय कारणं दडलेली आहेत.
आपल्या आसपासच्या वातावरणाचा परिणाम
फ्रेंच सांगतात की, काही जागा निसर्गतःच इतरांपेक्षा जास्त "गूढ आणि भीतीदायक" वाटतात.
यामागचं गणित समजावून सांगताना ते म्हणतात, "तुम्ही जेव्हा लख्ख उजेडातून अचानक अंधाऱ्या किंवा मंद प्रकाश असलेल्या जागी जाता किंवा जिथे छत खूप जास्त उंच आहे अशा जुनाट वास्तूत शिरता तेव्हा मेंदूवर त्याचा लगेच परिणाम होतो. अशा ठिकाणी पाऊल टाकताच माणसाच्या छातीत धडधडू लागतं आणि नकळत अस्वस्थता, भीती वाटू लागते."
पण वातावरणातले इतर काही घटक आणखी थोडे गुंतागुंतीचे असतात. याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे 'इन्फ्रासाउंड' म्हणजेच 20 हर्ट्झपेक्षाही कमी फ्रिक्वेन्सी असलेले ध्वनितरंग, जे माणसाच्या कानांना थेट ऐकू येत नाहीत. कारखान्यातली मोठी यंत्रं, रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या आणि विशेषतः जुनाट इमारतींमधल्या जुन्या पाइपलाइन किंवा हीटिंग सिस्टीममधून हे अदृश्य आवाज सतत निर्माण होत असतात.

फोटो स्रोत, Goja1 via Getty Images
श्माल्ट्झ यांच्या मते, आपण 'इन्फ्रासाउंड' म्हणजे मानवी कानांना न ऐकू येणारे अतिशय सूक्ष्म ध्वनितरंग उघडपणे ऐकू शकत नसलो तरी त्याचा आपल्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही असा याचा अर्थ नाही.
त्यांनी केलेल्या एका अभ्यासात असं समोर आलं होतं, की या इन्फ्रासाउंडच्या संपर्कात आल्यामुळे प्रयोगात सहभागी लोकांच्या लाळेतील कॉर्टिसोलची म्हणजेच तणाव वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी किंचित वाढली होती. इतकंच नाही तर यामुळे लोकांमध्ये चीडचीड वाढल्याचंही दिसून आलं होतं.
इन्फ्रासाउंडमुळे खरंच भुताटकीचे भास होतात का, यावर शास्त्रज्ञांमध्ये अजूनही एकमत नाही. खुद्द फ्रेंच यांच्या एका अभ्यासात या दोघांचा एकमेकांशी कसलाही संबंध सापडला नव्हता.
श्माल्ट्झ यांनाही हे मान्य आहे की केवळ इन्फ्रासाउंडमुळेच भूत दिसते असे नाही. पण भुताचा भास होण्यामागे जी अनेक कारणे एकत्र येतात त्यांपैकी हे एक छोटे कारण असू शकते असं ते नमूद करतात. विशेषतः 'पॅरेडोलिया'सारखे म्हणजेच भिंतीवर, धुरामध्ये किंवा सावलीत चेहरे दिसण्यासारखे मानसिक भ्रम माणसाच्या चिंतेमुळे आणि भीतीमुळे अधिकच तीव्र होऊन जातात.
भीती वाटणं किंवा आसपास काहीतरी असल्याचा नुसता भास होणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पण शेवटी असा कोणता विचार आपल्याला या सगळ्याचा संबंध थेट भूत-प्रेत किंवा अमानवी शक्तींशी जोडायला भाग पाडतो?
सत्य शोधणं की स्वतःचा जीव वाचवणं?
काही तज्ज्ञांच्या मते, याचं मूळ कारण दडलंय माणसाच्या उत्क्रांतीमध्ये.
लोक भुतांखेतांवर किंवा अमानवी शक्तींवर का विश्वास ठेवतात याचा अभ्यास करणाऱ्या लोकसाहित्य अभ्यासक डेबोरा हाइड एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्या म्हणतात, "आपलं शरीर आणि मेंदू हे 'अंतिम सत्य' शोधण्यासाठी नाही, तर संकटातून 'स्वतःचा जीव वाचवण्यासाठी' घडवले गेले आहेत."
या पुढे म्हणतात, "आपल्या विचार करण्याच्या क्षमता आणि ज्ञानेंद्रियं ही एखाद्या परिस्थितीचं मूळ सत्य शोधण्यापेक्षा, कोणत्याही धोक्यापासून स्वतःचा जीव कसा वाचवायचा या एकाच गोष्टीभोवती जास्त फिरत असतं.
भूतकाळात सर्वात वाईट परिस्थितीचा आधीच अंदाज बांधणं हे माणसाच्या जगण्यासाठी आणि उत्क्रांतीसाठी फायद्याचंच ठरलं होतं. उदाहरणार्थ, वाटेत दिसलेली साधी सावली एखादं रानटी जनावर असू शकतं किंवा अचानक झालेला कसलातरी आवाज हा मोठा धोका असू शकतो, असं गृहीत धरून सावध राहणं गरजेचं होतं.
हाइड यांच्या मते, यासोबतच माणसाच्या मनात 'एजन्सी डिटेक्शन' नावाची एक उपजत मानसिक प्रवृत्तीही काम करत होती.
फ्रेंच यांच्या मते, याचा अगदी सोपा अर्थ असा की, आपल्या आसपास काही विचित्र घडलं की आपल्या मेंदूला लगेच वाटतं, 'कुणीतरी मुद्दाम आपल्यावर पाळत ठेवूनच हे केलं असावं!'

फोटो स्रोत, Westend61 via Getty Images
फ्रेंच सांगतात, "एकदा मनात धोक्याची शंका आली, की 'हा धोका एखाद्या अदृश्य शक्तीचा किंवा भुताचाच असावा' इथपर्यंत विचार पोहोचायला माणसाला अजिबात वेळ लागत नाही."
याशिवाय, अशा विचित्र अनुभवांमागे 'कन्फर्मेशन बायस' हेही कारण असतं. म्हणजेच आपल्या मनात आधीपासून जी समजूत किंवा अंधश्रद्धा पक्की असते मेंदू प्रत्येक घटनेचा संबंध त्याच समजुतीशी जोडून स्वतःलाच खरं ठरवण्याचा प्रयत्न करतो.
हाइड यांच्या मते, वेगवेगळ्या संस्कृतींनुसार लोकांच्या श्रद्धा बदलत असल्या तरी धर्म आणि अंधश्रद्धा या गोष्टी जणू "माणसाच्या मूळ रचनेतच मुळापासून रुजलेल्या होत्या."
फ्रेंच स्पष्ट करतात, "जर तुमचा आधीपासूनच असा पक्का विश्वास असेल की भूत-प्रेत खरोखर अस्तित्वात असतात, तर अशा अनुभवानंतर 'हे भुतानेच केलं आहे' असा निष्कर्ष काढणं तुमच्यासाठी अस्वाभाविक असतं."
यासोबतच आणखी एक मानवी स्वभावधर्म कारणीभूत ठरतो तो म्हणजे, माणसाला कुठेतरी मनातून भुतांवर विश्वास ठेवायला आवडत असतं.
फ्रेंच सांगतात, "एखादी गोष्ट खरी आहे असं आपल्याला मनातून वाटत असेल किंवा 'ती खरी असावी' अशी आपलीच इच्छा असेल तर मेंदू फक्त त्याच गोष्टीला आधार देणारे पुरावे शोधत बसतो."
"माणसाचा मृत्यूनंतरही जीव किंवा आत्मा शिल्लक राहतो याचा एक मोठा पुरावा म्हणजे 'भूत'! जर माणसाला मृत्यूनंतरही अस्तित्व टिकून राहतं ही कल्पना आवडू लागली तर 'जगात नक्कीच भूत असणार' या समजुतीवर विश्वास ठेवणं त्याला अधिक सोपं जातं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























