You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रेकअपनंतर पूर्व प्रियकराने मागितले खर्च केलेले पैसे परत; कोर्टाने कशी केली उघडणी?
- Author, केली एनजी
- Role, सिंगापूर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
एका सिंगापूरच्या व्यक्तीने आपल्या माजी प्रेयसीसोबत नात्यात असताना तिच्यावर खर्च केलेले लाखो डॉलर परत मिळवण्यासाठी दाखल केलेला खटला गमावला आहे.
चंदर अग्रवाल यांनी आपली माजी प्रेयसी फेलिशिया ली हिच्यावर उडवलेले 468,000 सिंगापूर डॉलर्स (सुमारे ₹3 कोटी 10 लाख) परत मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हे पैसे त्यांनी स्वतःच्या मर्जीने आणि स्वेच्छेने खर्च केले होते, असा स्पष्ट निकाल सिंगापूर उच्च न्यायालयाने दिला आहे.
ज्येष्ठ न्यायाधीश ली सिउ किन म्हणाले की, दोघांचे नाते सुरू होण्याआधीपासूनच अग्रवाल यांनी ली हिच्यावर महागड्या भेटवस्तूंची उधळण केली होती आणि या बदल्यात तिला कोणताही परतावा द्यावा लागणार नाही, असा विश्वासही ते सातत्याने देत होते.
एका लॉजिस्टिक्स कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असणाऱ्या अग्रवालची आणि माजी एअर होस्टेस फेलिसिया ली यांची पहिली भेट 2019 मधील एका विमानातील प्रवासादरम्यान झाली होती. पुढे सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या काळात दोघे एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते, अशी माहिती कोर्टासमोर आली.
मात्र, फेलिशियाचे बाहेर दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय अग्रवाल यांना आला आणि दोघांचे नाते तुटले.
त्यानंतर मार्च 2024 मध्ये अग्रवाल यांनी थेट कोर्टाची पायरी चढत असा दावा केला की, नात्यात असताना फेलिशियाने स्वतःच्या गरजांसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी "विनाव्याज कर्ज" म्हणून हे पैसे घेतले होते.
त्याने कोर्टात असा दावा केला की, यात तिच्या क्रेडिट कार्डचे बिल 2,06,000 सिंगापूर डॉलर्स (सुमारे ₹1 कोटी 36 लाख), परदेश दौऱ्यांचे 1,29,000 डॉलर्स (सुमारे ₹85 लाख), तिच्या घरासाठी फेंगशुई तज्ज्ञाला दिलेले 17,000 डॉलर्स (सुमारे ₹11 लाख) आणि तिच्या लाइफ इन्शुरन्सच्या हप्त्यांचे 20,000 डॉलर्स (सुमारे ₹13 लाख) अशा रकमांचा समावेश होता.
पण ली हिने मात्र हा सगळा दावा फेटाळून लावला. "हे कोणतंही कर्ज नसून, प्रेमापोटी आणि जिव्हाळ्यातून मला दिलेल्या या सगळ्या भेटवस्तू होत्या," असा ठाम युक्तिवाद तिने कोर्टात केला.
न्यायाधीशांनी फेलिशिया ली यांची बाजू ग्राह्य धरताना स्पष्ट केले की, चंदर अग्रवाल यांच्याकडे आपल्या दाव्याचे कोणतेही ठोस लेखी पुरावे नव्हते. विशेष म्हणजे, फेलिशियाने कर्ज मागितले होते किंवा ते पैसे तिला मिळाले होते, याबद्दलची कोणतीही पोचपावती किंवा पुरावा अग्रवाल कोर्टात देऊ शकले नाहीत.
न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, "माझ्यापुढील पुराव्यांवरून हे स्पष्ट दिसते की, फिर्यादी चंदर अग्रवाल हे प्रतिवादी फेलिशियाच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते आणि नात्यात असताना त्यांनीच तिच्यावर अत्यंत महागड्या भेटवस्तूंची उधळण केली होती."
"पण दुर्दैवाने, जेव्हा नात्याचा शेवट इतका कडवट झाला, तेव्हा अग्रवाल यांच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि तिच्याकडून काहीही करून पै अन् पै वसूल करण्याच्या ते मागे लागले."
न्यायाधीशांनी दोघांच्या आर्थिक परिस्थितीची तुलना करताना म्हटले की, अग्रवाल हे "उघडपणे अफाट संपत्ती आणि भारी शौक असलेले व्यक्ती आहेत", तर फेलिशियाची मात्र "त्यांच्याशी बरोबरी करण्याइतकी आर्थिक ऐपत नव्हती."
दोघांमधील अनेक चॅट्सचा दाखला देत न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, "जेव्हा जेव्हा अग्रवाल यांनी महागड्या गिफ्ट्सची ऑफर दिली, तेव्हा फेलिशियाने आश्चर्याने थक्क होऊन त्या स्वीकारण्यास नकार देण्याचाही प्रयत्न केला होता."
आपल्या अंतिम निकालात न्यायाधीशांनी प्रसिद्ध इंग्रजी नाटककार विल्यम काँग्रीव्ह यांच्या एका नाटकातील ओळी उद्धृत केल्या: ज्याचा अर्थ असा आहे की प्रेमात नाकारलेली व्यक्तीला संताप होतो की त्याची तुलना तर कुठेच होऊ शकत नाही.
मूळ नाटकात ही गोष्ट स्त्री बद्दल म्हटलेली असली तरी न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले की प्रेमात नाकारले जाण्याची किंवा प्रेमाचे रूपांतर द्वेषात झाल्यावर जो राग निर्माण होतो तो कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीसाठी समानच असतो. त्यात स्त्री किंवा पुरुष असा भेद केला जाऊ शकत नाही.
यापूर्वी 2023 च्या सुरुवातीलाही सिंगापूरमध्ये असाच एक प्रकार घडला होता. आपल्या प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीवर संतापून एका पुरुषाने तिच्याविरोधात 30 लाख सिंगापूर डॉलर्सहून (साधारण 18 ते 19 कोटी रुपये) अधिक रकमेची भरपाई मागत कोर्टात खेचलं होतं.
के. कौशिगन याने कोर्टात दावा केला होता की, नोरा टॅन हिने नकार दिल्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला असून समाजात त्याची बदनामी झाली आहे.
मात्र, सिंगापूरच्या कोर्टाने त्याचे दोन्ही दावे फेटाळून लावले. यानंतर नोरा टॅन हिनेही मागे न हटता कौशिगनवर उलट दावा ठोकला. त्याच्या छळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोर्टकचेरीत जो खर्च झाला, तो कौशिगनकडूनच वसूल करण्याची मागणी तिने केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)