You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
252 फूट लिनन कापडावर विणलेली युद्धकथा, हजार वर्षे जुन्या कलाकृतीत का दाखवले घोडे, माणसाचे 'अवयव'
- Author, डेबोरा निकोल्स-ली
- Role, बीबीसी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
11व्या शतकातील ही कलाकृती मध्ययुगीन सिंहासन मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षाची कहाणी सांगते. ही ऐतिहासिक कलाकृती आता यूकेमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
या भरतकामातून शौर्य आणि सत्ता यांचं प्रतीक म्हणून पुरुष जननेंद्रिय म्हणजेच शिश्न दाखवलं आहे. त्यामुळे या कलाकृतीची कथा आजही तितकीच महत्त्वाची मानली जाते.
इंग्लंडवरील नॉर्मनच्या आक्रमणाची रक्तरंजित आणि नग्नतेची दृश्यं असलेली इतिहासकथा बायू टॅपेस्ट्रीमध्ये सांगितली आहे.
ही 77 मीटर (सुमारे 252 फूट) लांबीच्या लिनन कापडावर केलेली भरतकामाची कलाकृती आहे.
पूर्ण न झालेली आश्वासनं, लालसा आणि आक्रमण यांची ही कथा आहे. हेस्टिंग्सच्या युद्धात राजा हॅरॉल्ड दुसरा याच्या मृत्यूनंतर ही कथा संपते.
साधारण हजार वर्षांनंतर ही प्रसिद्ध कलाकृती फ्रान्समधील नॉर्मंडी येथून इंग्लंडमध्ये आणण्यात आली आहे.
1070 मध्ये अत्यंत कौशल्याने तयार केलेली ही कलाकृती 10 सप्टेंबरपासून ब्रिटिश म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे.
डिजिटल युगातील पुरुषसत्तेचं मध्ययुगीन रूप
या कलाकृतीमध्ये आजच्या डिजिटल 'मॅनोस्फिअर'सारखं मध्ययुगीन जग दाखवलं आहे. हे जग पुरुषत्व आणि पुरुषांच्या अनुभवांभोवती फिरतं. यामध्ये पुरुषांच्या शरीराच्या आकारालाही विशेष महत्त्व दिलं जातं.
11व्या शतकातील ही टॅपेस्ट्री प्रामुख्याने पुरुषांच्या कामगिरीचीच चित्रं दाखवते. यामध्ये दिसणाऱ्या पुरुषांपैकी सुमारे एक तृतीयांश पुरुषांच्या हातात शस्त्रं आहेत.
इतर पुरुष झाडं तोडताना, होड्या बनवताना आणि बांधकामाची काम करताना दिसतात. एक लाकूडतोड्या ओंडक्यावर बसून आपल्या कुऱ्हाडीला धार लावताना दिसतो. तर शिकारी मोठे भाले घेऊन शिकारीसाठी धावताना दाखवण्यात आले आहेत.
यात नॉर्मंडीचा ड्यूक विल्यम आणि हॅरॉल्ड गॉडविन्सन या 2 शक्तिशाली पुरुषांमधील (अल्फा मेल) युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.
"यापेक्षा अधिक पुरुषप्रधान दृश्य पाहणे कठीण आहे," असं इंग्लंडचे इतिहासकार डॉ. ख्रिस्तोफर मंक म्हणतात.
स्वतःचा मोठेपणा आणि पुरुषी ताकद दाखवण्याची ही पद्धत त्या काळातील पुरुषप्रधान समाजाची झलक दाखवते. त्या काळी वाद सोडवण्यासाठी हिंसाचाराचाच मार्ग वापरला जात असत.
हेस्टिंग्सच्या युद्धात शस्त्रधारी लुटारू धुमाकूळ घालताना दिसतात. खालील भागात युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांचे कपडे काढतानाची दृश्यं दाखवली आहेत. हे राजा हॅरॉल्डला मारून त्याचं सिंहासन बळकावल्याचं प्रतीक मानलं जातं.
शिश्नाची चित्रं का दाखवली आहेत?
या प्रसिद्ध कलाकृतीत शिश्नाची चित्रं वारंवार दिसतात.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक जॉर्ज गार्नेट यांनी मोजणी केल्यानुसार, या भरतकामात 93 ठिकाणी शिश्नाची चित्रं दाखवली आहेत. यात 88 घोड्यांची आहेत, तर आणखी 5 पुरुषांची आहेत.
खाली लटकलेल्या म्यानासारखी दिसणारी एक रचना आहे. परंतु, प्राध्यापकांनी ती म्यान असल्याचं मान्य केलेलं नाही. त्यामुळे यावर बरीच चर्चाही झाली आहे.
जनिना रामिरेझ यांनी त्यांच्या फेमिनाः अ न्यू हिस्ट्री ऑफ द मिडल एज, थ्रू द वुमन आऊट ऑफ इट (2022) या पुस्तकात म्हटलं आहे, "बायू टॅपेस्ट्रीमध्ये आकाराला खूप महत्त्व दिलं आहे."
सिंहासनासाठी झालेल्या संघर्षात पुरुषत्वाचा संबंध राजकीय सत्ता आणि लष्करी ताकदीशी जोडलेला आहे.
त्या म्हणतात, "सर्वात मोठं शिश्न युद्धाच्या आदल्या दिवशी विल्यमला भेट दिलेल्या एका उत्तम घोड्याचं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजा हेरॉल्डच्या घोड्याचा क्रमांक लागतो."
पुरुषांच्या तुलनेत महिलांची भूमिका इतकी कमी का?
यूकेच्या एडिनबर्ग विद्यापीठातील अधिव्याख्याता डॉ. एमिली जोन वॉर्ड यांनी बीबीसीला सांगितले की, या संपूर्ण कथेत पुरुषांनाच केंद्रस्थानी ठेवण्यात आल्यामुळे टॅपेस्ट्रीमध्ये महिलांची भूमिका कमी दिसते.
या कलाकृतीत युद्धात सहभागी झालेल्या पुरुषांनाच जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे महिलांची भूमिका इथे फारशी दिसून येत नाही.
स्त्री-पुरुषांचं प्रमाण (1:100) इतकं असण्यामागे ही कलाकृती नेमकी कोणासाठी तयार केली होती, हे कारण असू शकतं.
इतिहासकारांच्या मते, विल्यमचा भाऊ आणि बायेक्सचा बिशप ओडो याने ही कलाकृती तयार करून घेतली असावी. त्यामुळे यात ओडोची भूमिका ठळकपणे दाखवली आहे.
विल्यमला सिंहासन मिळवून देण्यात आपली भूमिका किती महत्त्वाची होती, हे दाखवण्यासाठी त्याने बहुधा या कलाकृतीचा वापर केला असावा.
"यातील माहिती ओडो आणि त्याच्या गटाला आवडेल अशीच आहे. त्या गटात बहुतेक पुरुषच असतील," असं वॉर्ड म्हणाले.
नॉर्मन लोकांनी या कलाकृतीसाठी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे त्यातला संदेशही त्यांना आवडेल अशाच पद्धतीने मांडला गेला असावा.
ते म्हणाले, "या कथेत इतक्या महिलांचा समावेश असणं हे खरं तर थोडं धाडसाचंच होतं."
ते म्हणाले, "कारण विल्यमने आपल्या आईच्या बाजूने असलेल्या राजघराण्याच्या हक्काच्या आधारावर सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हा त्याचा कमकुवत मुद्दा होता. त्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये, म्हणूनच कदाचित या कथेत महिलांचा उल्लेख कमी केला गेला असावा."
या कलाकृतीमध्ये 'एल्फगिफा' नावाची एक रहस्यमय महिला दिसते. एक धर्मगुरू तिच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या मागे, खालील भागात एक नग्न व्यक्तीही दाखवली आहे. ही महिला कोण होती आणि तिला या चित्रात का दाखवलं आहे, याबाबत अनेक वेगवेगळे सिद्धांत, अंदाज आहेत.
'द बायूक्स टॅपेस्ट्री स्टोरी' (2026) या पुस्तकाचे सहलेखक डॉ. डेव्हिड मस्कग्रोव्ह यांच्या मते, धर्मगुरूने केलेला हा लैंगिक छळ किंवा कृत्य म्हणजे 'मध्ययुगीन #मी-टू चळवळी'सारखा प्रकार होता.
इतर इतिहासकारांनी मात्र हा अर्थ नाकारला. विसाव्या शतकातील एका इतिहासकाराने म्हटलं, "यामुळे केवळ गोंधळ वाढतो, कथेला त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे हा भाग सोडून देणंच योग्य आहे."
डॉ. ख्रिस्तोफर मंक यांच्या मते, "या कलाकृतीचा आराखडा आधीच तयार केला गेला होता, हे नक्की. पण याचा अर्थ असा नाही की, ती तयार करणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या सूचनेचं डोळे झाकून पालन केलं."
व्हिक्टोरियन काळातील लाज आणि संकोचाच्या विचारांमुळे या कलाकृतीत दाखवलेली पुरुषांची नग्नता काही प्रमाणात कमी केली.
1885 मध्ये 35 महिलांनी मिळून या कलाकृतीची प्रतिकृती तयार केली. त्यातही सैन्यातील व्यक्ती प्रामुख्याने पुरुषच दाखवले होते. परंतु, घोड्यांच्या शिश्नाचा आकार लहान करून दाखवला होता. तसेच धर्मगुरूची नक्कल करणाऱ्या नग्न पुरुषाच्या चित्राला 'शॉर्ट्स' घातले होते.
ही प्रतिकृती ब्रिटनमधील रीडिंग संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, 1885 च्या या आवृत्तीत प्रत्येक भरतकाम करणाऱ्या महिलेनं आपलं नाव लिहावं यासाठी एक अतिरिक्त पट्टी जोडली होती. त्यामुळे ही उत्कृष्ट कलाकृती तयार करणाऱ्या महिलांना ओळख आणि सन्मान मिळाला.
रामिरिझ यांनी म्हटलं, व्हॅन गॉगचा उल्लेख न करता 'द स्टारी नाईट' या चित्राबद्दल बोलणं शक्य नाही. परंतु, 'बायू टॅपेस्ट्री' बद्दल बोलताना ती तयार करणाऱ्या महिलांचा विचार मात्र फार कमी लोक करतात.
मूळ बायू टॅपेस्ट्री 10 सप्टेंबर 2026 ते 11 जुलै 2027 या काळात लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
त्याचबरोबर, 1885 मध्ये तयार केलेली ही प्रतिकृती रीडिंग म्युझियममध्ये कायमस्वरूपी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)