228 जणांचा बळी घेणाऱ्या विमान अपघात प्रकरणी 2 मोठ्या कंपन्या दोषी, काय घडलं होतं?

    • Author, सोफिया फरेरा सँटोस
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

2009 मध्ये झालेल्या एका विमान अपघात प्रकरणी एअरफ्रान्स आणि एअरबस या दोन कंपन्यांना सदोष मनुष्यवधासाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. या विमान अपघातात 228 जणांचा मृत्यू झाला होता.

पॅरिस अपील कोर्टानं या घटनेसाठी एअरफ्रान्स आणि एअरबस या दोन्ही कंपन्यांना 'पूर्णपणे' जबाबदार मानलं आहे.

या भीषण अपघातात रिओ दि जानेरोहून पॅरिसला जायला निघालेलं 'एएफ447' हे विमान अटलांटिक महासागरात कोसळलं होतं.

या प्रवासी विमानाचं इंजिन वादळामध्ये बंद पडलं होतं आणि ते पाण्यात कोसळलं होतं. या अपघातात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला होता.

फ्रान्सच्या विमान वाहतूक इतिहासातील सर्वात भीषण घटना

याआधी एप्रिल 2023 मध्ये एका न्यायालयानं या कंपन्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केलं होतं. मात्र गुरुवारी (21 मे) या दोन्ही कंपन्यांना दोषी ठरवण्यात आलं.

या खटल्याची सुनावणी 8 आठवडे चालली. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्यावरील आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत आणि ते या निर्णयाविरुद्ध अपील करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

'एएफ447' या विमानात 12 कर्मचारी आणि 216 प्रवासी होते. हे विमान 38,000 फूट (11,580 मीटर) उंचीवरून समुद्रात कोसळलं होतं आणि त्यात या सर्वांचा मृत्यू झाला होता. फ्रान्सच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या इतिहासातील ही सर्वात प्राणघातक घटना ठरली आहे.

समुद्राच्या तळाशी 10,000 चौ. किलोमीटर (3,860 चौ. मैल) इतक्या प्रचंड परिसरात दीर्घकाळ शोध मोहीम चालवल्यानंतर या विमानाचे अवशेष सापडले होते.

मात्र विमानाचा फ्लाईट रेकॉर्डर 2011 मध्ये सापडला होता. अनेक महिने खोल समुद्रात शोध मोहीम चालवल्यावर तो सापडला होता.

फ्लाईट रेकॉर्डर हे उपकरण विमानातील सर्व नोंदींचे जतन करते.

न्यायालयानं कंपन्यांना ठोठावलेल्या दंडावर काही नातेवाईकांची टीका

गुरुवारी (21 मे) या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात या विमान अपघातात मारले गेलेल्या काही प्रवाशांचे नातेवाईक जमले होते. त्यामध्ये प्रामुख्यानं फ्रेंच, ब्राझिलियन आणि जर्मन लोकांचा समावेश होता.

न्यायालयानं या दोन्ही कंपन्यांना कमाल दंड म्हणून प्रत्येकी 2 लाख 61 हजार 720 डॉलर्स (अंदाजे 2 कोटी 50 लाख 43 हजार 987 रुपये) भरण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या काही प्रवाशांच्या कुटुंबीयांनी दंडाच्या या रकमेवर टीका केली आहे. हा नाममात्र दंड किंवा शिक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

डॅनिएल लॅमी या एएफ447 व्हिक्टिम्स असोसिएशन म्हणजे एएफ447 विमान अपघातात मारले गेलेल्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा आहेत.

लॅमी यांनी या अपघातात त्यांचा मुलगा गमावला आहे. त्यांनी न्यायालयाच्या या निकालाचं कौतुक केलं आहे.

त्या म्हणाल्या, "अखेरीस न्यायव्यवस्थेनं मारले गेलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या वेदनांची दखल घेतली आहे. या कुटुबीयांना एका क्रूर आणि असह्य अशा सामूहिक शोकांतिकेला सामोरं जावं लागलं आहे."

न्यायालयाच्या या निकालामुळे या कंपन्यांच्या (एअरबस आणि एअरफ्रान्स) प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असं मानलं जात आहे.

नोव्हेंबर महिन्यात या खटल्याच्या अंतिम युक्तिवादादरम्यान, सरकारी वकिलांनी (डेप्युटी प्रॉसिक्युटर) म्हटलं होतं की, या कंपन्यांचं वर्तन 'अस्वीकार्य' किंवा अमान्य आहे.

तसंच सरकारी वकिलांनी या कंपन्यांवर "निरर्थक बडबड आणि कोणत्याही तथ्य किंवा पुराव्याशिवाय हवेत युक्तिवाद करत असल्याचा" आरोप केला होता.

दीर्घकाळ मोठ्या परिसरात चाललेली शोधमोहीम

या विमान अपघातानंतर दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यापासून 700 मैल (1127 किलोमीटर) पेक्षा अधिक अंतरावर अंटलाटिक महासागराच्या दुर्गम भागात एक गुंतागुंतीची शोध मोहीम चालवण्यात आली.

या शोधमोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात, अपघाताचा तपास करण्याची जबाबदारी फ्रान्सच्या सरकारवर होती, तर मृतदेह बाहेर काढण्याची जबाबदारी ब्राझीलच्या सैन्यानं घेतली होती.

या मोहिमेच्या पहिल्या 26 दिवसांमध्ये 51 मृतदेह सापडले होते. त्यापैकी बहुतांश मृतदेहांचे सीटबेल्ट अजूनही बांधलेल्या स्थितीत होते.

या अपघातात मृत्यू झालेल्या एका प्रवाशाच्या कुटुंबातील एका सदस्यानं बीबीसी न्यूजला 2019 मध्ये सांगितलं होतं की, ही घटना घडल्यानंतर 2 वर्षांहून अधिक काळानंतर त्यांना त्यांच्या मुलाच्या पार्थिवावर अंत्यविधी करता आले होते.

एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 40 वर्षांचा इंजिनीअर मुलगा नेल्सन मारिन्हो फिल्हो यांचं रिओ दि जानेरोच्या गालेओ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारं हे विमान अगदी थोडक्यात हुकलं असतं. नेल्सन हे या विमानात चढणारे शेवटचे व्यक्ती होते.

विमानात अनेक देशांच्या प्रवाशांचा समावेश

या विमानातील प्रवासी 33 वेगवेगळ्या देशांमधील होते. यात 61 फ्रेंच, 58 ब्राझिलियन, 26 जर्मन, 2 अमेरिकन, 5 ब्रिटिश आणि 3 आयरिश नागरिकांचा समावेश होता.

यातील एक ब्रिटिश प्रवासी ब्रिस्टल इथला अलेक्झांडर ब्जोरॉय हा 11 वर्षांचा मुलगा होता. तो ब्राझीलमध्ये त्याच्या शाळेच्या सुट्ट्या घालवून फ्रान्समार्गे यूकेमध्ये परतत होता.

यात 3 आयरिश महिलांचादेखील मृत्यू झाला. काउंटी डाऊन इथल्या एथ्ने वॉल्स, काउंटी डब्लिन इथल्या जेन डीसी आणि काउंटी टिपररी इथल्या एस्लिंग बटलर या 3 महिला होत्या.

या तिघीही डॉक्टर होत्या आणि ब्राझीलमध्ये सुट्टी घालवून त्या घरी परतत होत्या.

ब्राझीलचे राजपुत्र पेद्रो लुईस द ऑरलियन्स ई ब्रॅगान्झा यांचादेखील या विमान अपघातात मृत्यू झाला. ते 26 वर्षांचे होते.

या विमानातील 216 प्रवाशांपैकी 126 पुरुष होते, तर 82 महिला होत्या, 7 मुलं होती आणि 1 बालक होता.

या विमानातील 12 कर्मचाऱ्यांपैकी एकजण वगळता उर्वरित सर्वजण प्रामुख्यानं फ्रान्सचे नागरिक होते. तो एक कर्मचारी ब्राझिलियन होता.

सह-वैमानिकांना अशी परिस्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण नव्हतं

नंतर 2012 मध्ये फ्रेंच तपास अधिकाऱ्यांना असं आढळून आलं की, विमानाच्या सेन्सर्समध्ये बर्फ साचल्यानं निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाड आणि विमानाचं अचानक खाली झेपावणं याला प्रतिसाद देण्यात किंवा त्यावर कृती करण्यात वैमानिकांना आलेलं अपयश या गोष्टींच्या संयुक्त परिणामातून विमान समुद्रात कोसळलं.

विमानातील सदोष एअर-स्पीड म्हणजे हवेतील वेगाच्या रीडिंग्समुळे सह-वैमानिकांचा गोंधळ उडाला. त्यावेळेस विमानाचा वैमानिक विश्रांती घेत होता. विमान जेव्हा स्टॉल झालं म्हणजे विमानाला हवेत तरंगण्यासाठी शक्ती कमी पडू लागली, तेव्हा त्यांनी विमानाचं नाक किंवा पुढचा भाग खालच्या बाजूला करण्याऐवजी चुकून वरच्या दिशेला केला.

अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला की, अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण सह-वैमानिकांना देण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर वैमानिकांच्या प्रशिक्षणात सुधारणा करण्यात आली आहे. तसंच स्पीड सेन्सर्स बदलण्यात आले आहेत.

या विमान अपघाताच्या वेळेस एअर फ्रान्सनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं की, विमानाच्या वैमानिकाला 11,000 तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. यात याचप्रकारच्या विमानाच्या 1,700 तासांच्या उड्डाणाच्या अनुभवाचा समावेश होता.

या विमानाची देखभालीसाठी शेवटची तपासणी 16 एप्रिल 2009 ला झाली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)