पंतप्रधान नरेंद्र मोदींची परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा, नंदन निलेकणींकडे दिली जबाबदारी

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, narendramodi/instagram

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, या टास्क फोर्सच्या अहवालाच्या आधारे परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी शक्य तितक्या लवकर आवश्यक पावलं उचलली जातील.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे, ते आज तुरुंगात खितपत पडले आहेत. आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली आहेत. कठोर कायदेशीर तरतुदींसह नवीन कायदा करण्याच्या दिशेने आम्ही कालही संसदेत पुढे जात होतो."

ते पुढे म्हणाले, "मात्र, आपल्याला भविष्यासाठीही विचार करावा लागेल. आपली परीक्षा पद्धती विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी, तसेच त्यामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या सर्व बाबी लक्षात घेऊन जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे."

ते म्हणाले, "ही टास्क फोर्स परीक्षा सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल. तिच्या अहवालाच्या आधारे येणाऱ्या परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी शक्य तितक्या लवकर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील."

संजय शिरसाट यांनी घेतली अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांची भेट

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी (26 जून) अभिजीत दिपके यांच्या घरी जात त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली.

"त्यांचं आंदोलन काल संपलं म्हणून आज मी अभिजीत दिपके यांच्या घरी आलो. त्यांच्या आई-वडिलांशी माझे जुने संबंध आहेत. मात्र, राजकारणाच्या क्षणी मी इथे आलो नाही, कारण त्यावर वेगळ्या पद्धतीने गदारोळ निर्माण झाला असता.

त्यांच्याशी माझी जी चर्चा झाली, त्यावरून आजही त्यांना विश्वास बसत नाही की त्यांच्या मुलाचं नाव इतकं मोठं झालं आहे किंवा तो इतक्या उंचीवर पोहोचला आहे. केंद्र सरकारनेही त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या", असं शिरसाठ यावेळी म्हणाले.

अभिजीत दिपके यांच्या आई वडिलांबरोबर संजय शिरसाट.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अभिजीत दिपके यांच्या आई वडिलांबरोबर संजय शिरसाट.

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज 26 जुलै रोजी सकाळी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला.

या व्हीडिओत अभिजीत दीपकेंनी सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

ते म्हणाले, "तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं. जंतरमंतरवर काल शेवटपर्यंत ठामपणे उभे राहिलेल्या लोकांचे मी आभार मानू शकलो नाही. त्याबद्दल तुम्हा सर्वांची माफी मागतो."

पुढे अभिजीत म्हणाले, "तुम्हाला माहितीच आहे की मला टायफॉईड झाला आहे. काल मला खूप ताप आला होता, त्यामुळे मला घरी परतावे लागले. जंतरमंतरवर तब्बल 37 दिवस थांबून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही देशासाठी जे केलं, त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो."

अभिजित दिपके

फोटो स्रोत, Reuters

अभिजीत दिपके यांनी आंदोलनावर टीका करणाऱ्यांचेही आभार मानले. ते म्हणाले, "ज्यांनी आमच्यावर टीका केली, आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि 'तुम्ही गंभीर नाही, तुम्हाला आंदोलन करता येत नाही,' असं म्हटलं, त्या लोकांचेही मी आभार मानू इच्छितो. तुम्ही आमच्यवर उपस्थित केलेले प्रश्न आणि टीकेमुळेच आम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळाली."

ही तर फक्त सुरुवात आहे. कॉक्रोच जनता पार्टीला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असंही दिपके म्हणाले.

ठाकरे बंधूंचा मुंबईत 'तिरंगा मार्च'

नीट पेपरफुटीप्रकरणी जंतरमंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ आज 26 जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून मुंबईत तिंरगा मोर्चाची घोषणा करण्यात आली होती.

मात्र काल 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंच्या या कार्यक्रमाचं स्वरुप बदलण्यात आलं.

देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी आज मुंबईत 'ठाकरे बंधूं'कडून संयुक्त तिरंगा मार्च आयोजित करण्यात आला होता.

ही रॅसी देशभरातील विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी उभारलेल्या आंदोलनाच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी 'देर आए दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुरली मनोहर जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "उशिरा का होईना, पण योग्य निर्णय झाला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मला आशा आहे की पंतप्रधान या प्रकरणी वेळेवर निर्णय घेतील."

मुरली मनोहर जोशी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुरली मनोहर जोशी

पुढे त्यांनी लिहिले, "ज्या सर्व विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन संपवले, त्यांचं मी अभिनंदन करतो. आता भारतीय शिक्षण क्षेत्रात लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी व प्रगतीसाठी भरपूर संधी मिळतील, अशी मला आशा आहे."

धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

मुरली मनोहर जोशी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मानव संसाधन विकासमंत्री होते. त्या काळात उच्च शिक्षण विभाग या मंत्रालयाच्या अखत्यारीत होता.

गुरुवारी (23 जुलै) मुरली मनोहर जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली होती.

त्यांनी एक्सवर याबाबत लिहिले होते की, "देशाच्या विविध भागांतून आलेले विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून नवी दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलन करत असल्याचे पाहून खूप दुःख होते."

परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांची चिंता रास्त असून त्यावर संवेदनशीलतेने तोडगा काढण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले होते.

अमित शाह धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, भाजपमध्ये कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश अधिक महत्त्वाचा आहे.

शनिवारी (25 जुलै) उशिरा रात्री त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं की, मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात आवश्यक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे.

अमित शाह यांनी लिहिलं, "भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश, आपली तरुण पिढी आणि विद्यार्थी अधिक महत्त्वाचे आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिलेला राजीनामा हेच दर्शवतो."

ते पुढे म्हणाले, "मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात आवश्यक सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. पेपरफुटीप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, या उपाययोजनांमुळे नीट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे न्याय मिळेल."

सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

फोटो स्रोत, Debajyoti Chakraborty/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, गृहमंत्री अमित शाह

अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, मातृभाषेतून परीक्षांची तरतूद, पीएम श्री शाळांचा विस्तार, डीजिटल शिक्षणाला चालना, कौशल्य विकास तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय मजबूत करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या.

परीक्षा व्यवस्था अधिक सर्वसमावेशक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी त्यांनी केलेले त्यांचे प्रयत्नही उल्लेखनीय आहेत. विकसित भारताच्या संकल्पनेप्रती त्यांची बांधिलकी त्यांच्या कार्यकाळातून स्पष्टपणे दिसून येते."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.