You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चालताना किंवा जिने चढताना सारखी धाप लागते? हे कोणत्या आजारांचं लक्षण असू शकतं?
जिने चढताना किंवा थोडं वेगानं चालताना धाप लागणं ही अनेकांसाठी नेहमीची गोष्ट असू शकते. वाढतं वय, वजन वाढणं, व्यायामाचा अभाव किंवा शारीरिक तंदुरुस्ती कमी असणं यामुळेही काही प्रमाणात श्वास लागणे स्वाभाविक मानलं जातं. मात्र, पूर्वी सहज करता येणारी कामं करताना अचानक धाप लागू लागली, कमी श्रमात श्वास लागतोय असं जाणवू लागलं किंवा हा त्रास हळूहळू वाढत गेला, तर त्याकडे केवळ थकवा किंवा वयाचा परिणाम म्हणून पाहणं धोकादायक ठरू शकतं.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, श्रम करताना येणारी धाप ही हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तक्षय (ॲनिमिया), थायरॉईडचे विकार किंवा इतर काही आरोग्य समस्यांची सुरुवातीचं लक्षण असू शकते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये छातीत वेदना होण्यापूर्वीच श्रम करताना धाप लागणे हे हृदयविकाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा किंवा धूम्रपानाचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी या लक्षणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
धाप लागण्यासोबत छातीत दडपण, चक्कर येणं, अनियमित हृदयाची धडधड, थंड घाम येणे किंवा पायांना सूज येणे अशी लक्षणं जाणवत असतील, तर त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक ठरतं.
धाप लागण्यामागचं कारण कसं शोधलं जातं?
जिने चढताना किंवा चालताना धाप लागण्यामागे नेमकं कारण काय आहे, हे केवळ लक्षणांवरून ठरवता येत नाही.
हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तक्षय, थायरॉईडचे विकार, लठ्ठपणा, मूत्रपिंडांचे आजार किंवा काही वेळा मानसिक तणाव यांचाही त्यामागे वाटा असू शकतो. त्यामुळे योग्य निदानासाठी रुग्णाची सविस्तर वैद्यकीय माहिती आणि आवश्यक तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.
सहसा सुरुवातीच्या टप्प्यात रक्तदाब तपासणी, ईसीजी (ECG), छातीचा एक्स-रे आणि विविध रक्तचाचण्या केल्या जातात. रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी, रक्तातील साखर, थायरॉईडचे कार्य, मूत्रपिंड आणि यकृताची कार्यक्षमता यांचाही आढावा घेतला जाऊ शकतो.
हृदयाशी संबंधित समस्या संशयास्पद वाटल्यास इकोकार्डिओग्राफी, ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट किंवा सीटी कोरोनरी अँजिओग्राफीसारख्या तपासण्या सुचवल्या जाऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेच्या चाचण्याही आवश्यक ठरतात.
तज्ज्ञांच्या मते, अचानक सुरू झालेली, झपाट्याने वाढणारी किंवा विश्रांती घेतल्यानंतरही न कमी होणारी धाप ही गंभीर इशारा असू शकते. अशा वेळी लवकर निदान आणि उपचार सुरू केल्यास हृदयविकार, हार्ट फेल्युअर किंवा इतर गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.
तपासणीचं महत्त्व
तुम्हाला अशी धाप लागायला सुरुवात झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. परंतु स्वतःच त्याचं निदानही करू नये. त्यासाठी तपासणी अतिशय आवश्यक आहे.
व्यायाम करताना, उदाहरणार्थ जिने चढताना जाणवणारा श्वास लागणं (धाप लागणं) यामागचं कारण शोधण्यासाठी योग्य तपासणी हेच पहिलं पाऊल आहे. विशेषतः ही समस्या अलीकडेच सुरू झाली असेल, हळूहळू वाढत असेल किंवा केलेल्या श्रमांच्या प्रमाणाच्या तुलनेत अधिक जाणवत असेल, तर तिचे गांभीर्याने मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
त्यामुळेच याच्या तपासणीच्या आवश्यकतेबद्दल आम्ही मुंबईतील न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांना विचारलं.
ते म्हणाले, "निदानाचा विचार करता आम्ही सर्वप्रथम रुग्णाचा सविस्तर वैद्यकीय इतिहास जाणून घेतो. यात श्वास लागण्याचे स्वरूप, कालावधी आणि तीव्रता यांची माहिती घेतली जाते. तसेच छातीत दुखणं, हृदयाची धडधड वाढणं, खोकला, घरघर, अशक्तपणा, पायांना सूज येणं अशा संबंधित लक्षणांची चौकशी केली जाते. याशिवाय रुग्णाच्या महत्त्वाच्या जीवनशैलीविषयक सवयी आणि त्याला असलेल्या इतर आजारांचीही माहिती घेतली जाते."
"शारीरिक तपासणीमधूनही या समस्येमागील कारणांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. निदानतज्ज्ञ म्हणून आमचे काम म्हणजे केवळ लक्षणांवर उपचार करण्याऐवजी, समस्येचे नेमके कारण शोधण्यासाठी डॉक्टरांना योग्य तपासण्या सुचवणं आणि त्यांना निदानापर्यंत पोहोचण्यास मदत करणं हे आहे."
सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्या चाचण्या केल्या जातात असं विचारल्यावर डॉ. अजय शाह म्हणाले, "रुग्णाच्या लक्षणांनुसार तपासण्यांची निवड केली जाते; मात्र काही निदान चाचण्या जवळपास प्रत्येक वेळी करणे आवश्यक असते. रक्त तपासण्यांमध्ये सीबीसी (Complete Blood Count - CBC) महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे ॲनिमिया (रक्ताल्पता) किंवा संसर्ग यांसारख्या श्वास लागण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या समस्यांची माहिती मिळते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी, यकृताची कार्यक्षमता (Liver Function Tests), मूत्रपिंडांची कार्यक्षमता (Kidney Function Tests), थायरॉइड प्रोफाइल आणि शरीरातील दाह (Inflammation) तपासण्यासाठीच्या चाचण्याही केल्या जाऊ शकतात. रुग्णामध्ये हृदयविकाराचा संशय असल्यास कार्डिॲक बायोमार्कर्सच्या चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो."
"छातीचा एक्स-रे (Chest X-ray) फुफ्फुसांमध्ये किंवा हृदयात काही दोष आहे का हे दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच ईसीजी (ECG) चाचणीमुळे हृदयाची लय (Rhythm) योग्य आहे का, तसेच हृदयावर कोणताही अतिरिक्त ताण आहे का, याची माहिती मिळण्यास मदत होते."
लवकर निदान का गरजेचं?
धाप लागणं किंवा अचानक चालताना- फिरताना थकवा यायला लागणं याची तपासणी करुन लवकर निदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्वास लागणं हे एखाद्या समस्येचं लक्षण असू शकतं. त्यामुळे निदानाला विलंब झाल्यास मूळ आजार लक्षात न येता त्याची तीव्रता वाढू शकते.
हृदय निकामी होणं (Heart Failure), कोरोनरी हृदयरोग, दीर्घकालीन फुफ्फुसांचे आजार, पल्मनरी एम्बोलिझम (फुफ्फुसांतील रक्तवाहिनीत रक्ताची गाठ होणं), ॲनिमिया आणि विविध चयापचयविषयक (Metabolic) आजार यांसारख्या स्थितींमध्ये लवकर निदान झाल्यास उपचारांचे परिणाम अधिक चांगले असल्याचं दिसून आलं आहे.
चाचण्यांच्या मदतीनं डॉक्टरांना रुग्णाची समस्या वेळेत लक्षात येते आणि त्वरित उपचार सुरू करता येतात. यामुळे भविष्यातील गुंतागुंत, वारंवार रुग्णालयात दाखल होण्याची गरज आणि आरोग्यावरील गंभीर परिणाम टाळता येतात. परिणामी रुग्णाचे जीवनमान अधिक चांगलं राहतं.
तसेच अनेक रुग्ण श्वास लागण्याचे कारण वाढतं वय किंवा स्वतःची कमी शारीरिक क्षमता असं समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे निदान उशिरा होतं. लवकर तपासणी आणि योग्य निदान यामुळे हा विलंब टाळता येतो आणि आवश्यक उपचार वेळेत मिळू शकतात.
हृदयरोगाची शक्यता
कमी श्रमात किंवा अगदी दैनंदिन कामं करतानाही धाप लागायला सुरू होणं, हा त्रास हळूहळू वाढत जाणं, विश्रांती घेतल्यानंतरही आराम न मिळणं किंवा त्यासोबत छातीत दडपण, वेदना, चक्कर येणे किंवा घाम येणे अशी लक्षणे दिसत असतील तर ते हृदयविकाराचे संकेत असू शकतात. अशा परिस्थितीत वेळ न घालवता हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
या संदर्भात आम्ही काही प्रश्न पुण्यातील बाणेरस्थित मणिपाल हॉस्पिटल्स येथे कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आणि कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अभिजित जोशी यांना विचारले.
प्रश्न- हृदयरोगाच्या बाबतीत धाप लागणं, लवकरच दम लागणं ही लक्षणं कितपत सामान्यतः दिसतात?
डॉ. अभिजित जोशी- अनेक रुग्णांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये, छातीत वेदना होण्यापूर्वीच श्रम करताना धाप लागणे हे हृदयविकाराचे सुरुवातीचे लक्षण म्हणून दिसून येते. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
प्रश्न- छातीत वेदना नसतानाही हृदयविकाराची शक्यता असते का?
डॉ. अभिजित जोशी- प्रत्येक हृदयविकारामध्ये छातीत वेदना होतातच असे नाही. काही रुग्णांमध्ये धाप लागणे, लवकर थकवा येणे, हृदयाची धडधड वाढणे, चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे हीच प्रमुख लक्षणे असू शकतात. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये 'सायलेंट' हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
प्रश्न- हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यावर कोणते परिणाम दिसून येतात?
डॉ. अभिजित जोशी- हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीराच्या विविध अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे थकवा, धाप लागणे, पायांना सूज येणे, तसेच फुफ्फुसांमध्ये द्रव साचण्याची शक्यता वाढते. यामुळे दैनंदिन कामे करतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
धाप लागण्याचा विचार करता वय वाढल्यानंतर शरीराची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या काही प्रमाणात कमी होते. स्नायूंची ताकद घटते, हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे पूर्वीपेक्षा थोडी अधिक धाप लागणे अपेक्षित असू शकते. मात्र, अचानक वाढलेला किंवा नेहमीपेक्षा जास्त त्रास हा केवळ वयामुळे आहे असे गृहीत धरू नये. तसेच मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
याबाबतीत परळ इथल्या ग्लेनइगल्स हॉस्पिटल येथे कार्डिओलॉजिस्ट आणि संचालक म्हणून कार्यरत असणारे डॉ. राहुल गुप्ता बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल हे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे प्रमुख जोखीम घटक (Risk Factors) आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये श्वास लागणे हे एखाद्या हृदयविकाराचे लक्षण असण्याची शक्यता अधिक असते."
"या जोखीम घटकांपैकी कोणतीही समस्या असलेल्या व्यक्तींना व्यायाम करण्याची क्षमता कमी झाल्याचं जाणवत असेल किंवा पूर्वी सहज करता येणाऱ्या श्रमांमध्ये श्वास लागायला लागला असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण लवकर निदान आणि उपचारांमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा हृदय निकामी होणे (Heart Failure) यांसारख्या गंभीर गुंतागुंती टाळता येऊ शकतात."
एखाद्या व्यक्तीचे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कामकाज (कार्डिओव्हस्क्युलर फिटनेस) चांगले होत आहे हे पाहाण्यासाठी काही सोपे संकेत आहेत का? असा प्रश्न आम्ही डॉ. राहुल गुप्ता यांना विचारला.
ते म्हणाले, "एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन कामकाजादरम्यान अतिरिक्त थकवा किंवा श्वास लागल्याशिवाय काम करू शकते का, हा हृदय व रक्तवाहिन्यांच्या तंदुरुस्तीचा एक व्यावहारिक निर्देशक आहे. उदाहरणार्थ, कोणतीही लक्षणं न जाणवता एक-दोन मजले जिना चढणं किंवा सुमारे 30 मिनिटे वेगाने चालणं शक्य होत असेल, तर ती व्यक्ती कार्यक्षमतेच्या दृष्टीनं चांगल्या स्थितीत आहे असं मानलं जातं. मात्र, स्मार्ट वॉचसारखी उपकरणं किंवा स्वतः केलेलं मूल्यमापन हे वैद्यकीय तपासणीची जागा घेऊ शकत नाही. श्वास लागण्याची समस्या कायम राहत असेल किंवा वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे."
श्वास लागण्यासोबत छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे, बेशुद्ध पडणे, तीव्र चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे (Palpitations), ओठ निळे पडणे, पायांना सूज येणे, खोकल्यातून रक्त येणे किंवा विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
ही लक्षणे हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित एखाद्या गंभीर आपत्कालीन स्थितीची चिन्हे असू शकतात. त्यामुळे वेळेत उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो आणि दीर्घकालीन परिणामही अधिक चांगले राहू शकतात.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)