You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बाळ होऊ देऊ नका,' प्रदूषित पाण्यामुळे त्वचेच्या समस्येवर उपचार घेणाऱ्या महिलेला डॉक्टरांचा सल्ला
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील दत्त नगरमध्ये सुमारे 20,000 लोक राहतात. वेगवेगळ्या कारखान्यांना लागून असलेल्या या भागात जमिनीखालचं पाणी चक्क भडक पिवळं झालं आहे. नाशिक महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना हे पाणी वापरू नये, असा सल्ला दिला आहे.
पण हा प्रश्न केवळ पाण्याच्या रंगापुरता मर्यादित नाही.
दत्त नगरमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय एका महिलेला डॉक्टरांनी सध्या बाळ होऊ न देण्याचा सल्ला दिला आहे.
या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "या भागातील महिलांना प्रदूषित पाण्यामुळे हात-पायांवर पुरळ येत असू शकतात. त्यावर उपचार करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या काही औषधांचा गर्भधारणेवर परिणाम होऊ नये म्हणून उपचार सुरू असताना गर्भधारणा टाळण्याचा सल्ला दिला जातो."
दत्त नगरच्या रहिवाशांसाठी मात्र हा पाण्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांचा नाही.
'पंधरा वर्षांपासून आम्हाला त्रासच आहे'
आशा घायाळ दत्त नगरमध्ये राहतात. त्यांनी 2010 मध्ये पहिली बोअरवेल घेतली. "नंतर आम्ही 4-5 वर्षांनी दुसरा बोअर घेतला. त्यालाही असंच पाणी यायला लागलं. मग नाइलाजाने आम्ही थोडं थोडं याच पाण्यात कपडे धुतो. मग काय, दवाखान्यात पैसे घालावे लागतात," त्या सांगतात.
"आम्हाला पाण्याचा खूपच त्रास आहे. महापालिकेचं पाणी कमी दाबात आलं किंवा आलंच नाही तर आम्हाला या पिवळ्या पाण्याने कपडे धुवावे लागतात, भांडी धुवावी लागतात. धुतलं तर आमच्या हाताला खाज येते, पायाला खाज येते," आशा सांगतात.
"लहान बाळ आहे. आमची मुलं त्या पाण्यात खेळतात. त्यांच्या हाताला, पायाला जखमा होतात. माझ्यावर उपचार सुरू आहेत, माझ्या दिराची आणि मोठ्या जावेवरही उपचार सुरू आहेत. डॉक्टर म्हणतात पाण्याचा परिणाम आहे, इन्फेक्शन आहे. पण नाइलाज आहे. आम्हाला तेच पाणी वापरावं लागतं," असं त्या सांगतात.
या भागात महापालिकेचं पाणी दिवसातून साधारण 1 ते 1.5 तास येतं आणि तेही कमी दाबाने येतं, असं तिथल्या नागरिकांनी सांगितलं.
शोभा घायाळ यांचा या पाण्याचा अनुभव आणखी त्रासदायक आहे. "ते पाणी वापरता येत नाही. पिवळं पाणी हातावर उडलं की हाताला फोड येतात. फोड आला की दवाखान्यात जावं लागतं. डॉक्टर गोळ्या देतात, औषधं देतात, लावायला मलम देतात. पण फरक पडत नाही. पुन्हा पुन्हा दवाखान्यात जावं लागतं. किती म्हणून खर्च करायचा?" त्या म्हणतात.
"15 वर्षांपासून आम्हाला पाण्याचा त्रासच आहे. आम्ही दोन वेळा नळ घेतले. दोन-दोन नळाचं पाणीही पुरत नाही. बोअर घेताना वाटलं होतं की बोअर घेतला तर आमचं कल्याण होईल, पाणी व्यवस्थित लागेल. पण कशाचं काय? हे असलं पिवळं पाणी येतं."
'हा प्रश्न फक्त एका बोअरवेलचा नाही'
दत्त नगरमधील पाण्याचा प्रश्न समोर आणणारे पर्यावरण कार्यकर्ते रोशन केदार यांनी या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
रोशन म्हणतात, "माझ्या समोर अक्षरशः डिझेलसारखं पाणी बोअरवेलमधून येत होतं. माझ्या नळाला जर एक दिवस थोडंसं जरी खराब पाणी आलं, तर त्याची बातमी बनू शकते. पण ही गरीब कामगारांची वस्ती 10-12 वर्षांपासून ही समस्या सहन करतेय. यांचं कोणीच ऐकत नाही, यावर काहीही कारवाई होत नाही. या भागात हजारो लोक राहतात."
"नाशिकमध्ये अंबड आणि सातपूर या दोन एमआयडीसी आहेत आणि या दोन्ही एमआयडीसीला CETP म्हणजे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, ज्याला मराठीत 'सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र' असं म्हणतो, तोच नाहीये. मग या सगळ्या कंपन्यांमधून सोडलं जाणारं सांडपाणी नेमकं कुठे जातं? त्याचं काय होतं? हा प्रश्नच आहे."
रोशन म्हणतात, "पाण्याला कळत नाही की आपण कुठल्या वॉर्डात राहतो. हे पिवळं पाणी प्रदूषित आहे हे तर डोळ्यांना दिसतंय. पण संपूर्ण नाशिकमध्ये भूगर्भातून जे पाणी येतं, ज्याला रंग नाही, ते सुद्धा शुद्ध असेल हे कशावरून? इथे आढळणारी रसायनं त्या पाण्यात थोड्याफार प्रमाणात तरी असतीलच. त्यामुळे हा फक्त या वस्तीचा नाही, तर संपूर्ण नाशिकचा प्रश्न आहे."
हे दावे मात्र प्रयोगशाळेच्या अहवालातून सिद्ध होणे बाकी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अधिकाऱ्यांनी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतरच या पाण्यात नेमकी कोणती रसायनं आहेत आणि त्यांचं प्रमाण किती आहे, हे स्पष्ट होईल.
एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा स्रोत शोधण्याची आणि परिसरातील उद्योगांच्या पाण्याचेही नमुने घेऊन त्यांची तुलना करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं आहे.
'हे पाणी नंदिनीला जातं आणि नंदिनी पुढे गोदावरीला मिळते'
राजेश पंडित मागच्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या पर्यावरणाच्या समस्यांवर काम करत आहेत. त्यांनी गोदावरी आणि तिच्या उपनद्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
राजेश पंडित म्हणतात, "आपण बघू शकता की इथे हा पाण्याचा पिवळा प्रवाह आहे. हा प्रवाह पुढे नंदिनी नदीला मिळतो. नंदिनी पुढे थेट गोदावरीला मिळते. ती ज्या ठिकाणी गोदावरीत जाते, तिथेच कुंभमेळ्याचे महत्त्वाचे घाट आहेत. इथले जवळपास सगळे भूगर्भीय साठे प्रदूषित झाले आहेत. त्याच्यामध्ये हे रसायन असलेलं पाणी यायला लागलं आहे. त्यामुळे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे."
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची मागणी करतात.
"आता करोडो लोक नाशिकमध्ये येणार आहेत. इथले स्थानिक तर त्याचा त्रास सहन करतातच आहेत. परंतु भाविकांसाठी जे घाट बांधले आहेत, त्या नदीपर्यंत हे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे."
पंडित यांच्या मते, या परिस्थितीसाठी एमआयडीसी आणि एमपीसीबी जबाबदार आहेत.
"या संस्थांनी ठरवलं तर रसायनाचा एक थेंबदेखील पाण्यात मिसळणार नाही."
दुष्काळाच्या काळात भूजलावर अवलंबून राहावं लागणार असल्याने ही समस्या अधिक गंभीर असल्याचं ते सांगतात.
"शेवटी तुम्हाला जमिनीखालच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागणार आहे."
गोदावरीबाबत ते म्हणतात, "कुंभ कशामुळे आहे? गोदावरीमुळे आहे. हे सगळे लोक गोदावरीमध्ये आंघोळीसाठी येणार आहेत. म्हणजे गोदावरी तुम्हाला नीट ठेवली पाहिजे. ती तुमची पहिली प्राथमिकता असायला हवी."
एमपीसीबीच्या तपासणीत काय समोर आलं?
दत्त नगरच्या पाण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एमपीसीबीचे अधिकारी परिसरात पोहोचले आणि त्यांनी बोअरवेलच्या पाण्याचे नमुने घेतले.
एमपीसीबीचे विभागीय अधिकारी विद्यासागर किल्लेदार म्हणतात, "आम्ही स्वतः इथे येऊन पाहणी केलेली आहे आणि बोअरवेलच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. आता हे पाणी तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवणार आहोत. त्याचा अहवाल आल्यानंतरच हे पाणी नेमकं कुठून येतं आहे, हे स्पष्ट होईल."
"हा परिसर एमआयडीसीला लागून आहे. त्याच्या बाजूलाच उद्योग आहेत. उद्योगांच्या जवळच हा निवासी परिसर आहे. इथे सीईटीपी (CETP) नाहीये, पण त्याचं काम चालू झालेलं आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरू होईल," असं किल्लेदार म्हणाले.
दरम्यान, 30 सप्टेंबर 2026 रोजी एमपीसीबीने एका कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार, 28 सप्टेंबर रोजी कंपनीच्या युनिटची पाहणी करण्यात आली. यामध्ये बऱ्याच नियमांचं उल्लंघन होत असल्याचा उल्लेख आहे.
कंपनीला या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत उत्तर न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एमपीसीबीने दिला आहे.
अनेक वर्षांपासून सीईटीपी (CETP)चा प्रश्न
एमपीसीबीच्या 2020 च्या एका अहवालात नाशिकच्या सातपूर आणि अंबड एमआयडीसीमध्ये सुमारे 3500 उद्योग असल्याचं सांगण्यात आलं आहे.
2020 च्या अहवालात औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपीची तरतूद करण्यात आली होती. मात्र 2026 मध्येही हा प्रकल्प पूर्णपणे कार्यरत झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याचं काम सुरू झालं असून पुढील 2 महिन्यांत तो कार्यरत होण्याची अपेक्षा आहे.
नाशिक महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुरकर यांनीही दत्त नगरमध्ये सुमारे 300 फूट खोल असलेल्या बोअरवेलमधून पिवळ्या रंगाचं पाणी येत असल्याचं पाहणीत आढळल्याचं सांगितलं.
पाण्याच्या तपासणीचे अहवाल येईपर्यंत हे पाणी वापरू नये, असा सल्ला महापालिकेने दिला आहे. त्याऐवजी महापालिकेचं पाणी किंवा चांगल्या आणि सुरक्षित असल्याची खात्री असलेल्या बोअरवेलचं पाणी वापरावं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मात्र, दत्त नगरमधल्या रहिवाशांसमोर प्रश्न तसाच आहे. नळाला पाणी कमी दाबाने आणि मर्यादित वेळ येत असताना बोअरवेलचं पाणी वापरायचं नाही, तर पर्याय काय?
शोभा घायाळ म्हणतात, "सरकारला एवढंच सांगायचं आहे की हे पिवळं पाणी आम्हाला सफेद करून द्यावं. कंपनीवाल्यांना बोला, काहीतरी करा. पण आमचं पाणी व्यवस्थित झालं पाहिजे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.