You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी महाराजांचं चित्र असलेली भारतीय संविधानाची हस्तलिखित प्रत, आजही अशा प्रकारे केली जात आहे जतन
- Author, ज्योती
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
भारतीय संविधानाचा विषय जेव्हाही निघतो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचा उल्लेख नेहमीच केला जातो.
पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की, संविधानाच्या पहिल्या अधिकृत प्रती या हस्तलिखित होत्या आणि त्या भारताचा इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या चित्रांनी सजवलेल्या होत्या.
या चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा गांधींपर्यंत अनेक ऐतिहासिक व्यक्तींचा समावेश आहे.
भारताचं संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. भारताचं हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेकडून स्वीकारण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आलं.
राज्यघटनेच्या स्वीकृतीनंतर त्याच्या पहिल्या दोन प्रती हस्तलिखित होत्या. एक प्रत इंग्रजीमध्ये आणि एक हिंदीमध्ये लिहिलेली होती.
भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात लांब हस्तलिखित राज्यघटना असून, ती एकूण 221 पानांची आहे.
संविधानाच्या हस्तलिखित प्रती कुणाकडे होत्या?, त्यांची मांडणी आणि सजावट कुणी केली? या हस्तलिखित प्रती सध्या कुठे उपलब्ध आहेत? आणि त्यांचं जतन करण्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले जातात? हे आपण जाणून घेणार आहोत.
संविधान हातानं लिहिण्याची कल्पना कशी सुचली?
भारतीय संसदेच्या 'A Brief Note on the Calligraphy of the Constitution of India in English and Hindi' या अधिकृत दस्तऐवजानुसार, ही सूचना संविधान सभेचे सदस्य प्रा. के. टी. शाह यांनी केली होती.
भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आलं. पण त्याच्या काही दिवसांपूर्वीच संविधान हस्तलिखित सुलेखन, सुंदर चित्रांनी सजवलेलं आणि मुद्रित असावं अशी कल्पना सुचवण्यात आली होती.
भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजीच लागू होणार असल्यानं, त्यातील सुलेखनाचं काम किमान 20 जानेवारी 1950 पर्यंत पूर्ण करावं आणि रंगकाम संविधान लागू झाल्यानंतरही पूर्ण करता येईल, असं ठरवण्यात आलं.
पुढचा प्रश्न असा होता की, भारताच्या या अधिकृत संविधानाचं सुलेखन कोण करणार आणि ते कोण रंगवणार?
संविधान लिहिणारे कलाकार कोण होते?
प्रा. के. टी. शाह यांच्या सूचनेनंतर, ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यासाठी कलाकारांचा शोध सुरू झाला.
भारत सरकारच्या 'भारताच्या संविधानातील कला आणि सुलेखन' या अधिकृत दस्तऐवजानुसार, संविधानाची इंग्रजी प्रत लिहिण्याची जबाबदारी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर हिंदी प्रत लिहिण्यासाठी वसंत के. वैद्य यांची निवड करण्यात आली होती.
प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधानाच्या प्रत्येक पानावर आपलं नाव लिहावं अशी मागणी केली होती. घटना समितीनं ती मान्य केली.
त्यामुळं संविधानाच्या इंग्रजी प्रतीच्या प्रत्येक पानाच्या तळाशी पाहिल्यास, एका कोपऱ्यात इंग्रजीमध्ये 'PREM' असं लिहिलेलं दिसून येईल.
सुलेखन कोण करणार हे स्पष्ट झालं तरी त्यातील चित्रांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता.
भारतीय संसदेच्या दस्तऐवजानुसार, संविधान सभेचे अध्यक्ष कृष्ण कृपलानी यांच्या सांगण्यावरून, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन कला भवनचे प्रमुख नंदलाल बोस यांना एक पत्र लिहिलं.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या विनंतीवरून, नंदलाल बोस यांनी संविधानाची हस्तलिखित प्रत रंगवण्यास सहमती दर्शवली.
वेळ कमी असल्यानं, सुलेखनानं (हस्तलेखनानं) सुरुवात करण्याचं ठरलं, पण प्रत्येक पानावर चित्रांसाठी जागा सोडण्यात आली.
28 नोव्हेंबर 1949 रोजी, प्रेम बिहारी नारायण रायजादा संविधान सभेच्या कार्यालयात बसले आणि त्यांनी संविधानाची इंग्रजी प्रत हाताने लिहायला सुरुवात केली. एप्रिल 1950 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण झाले.
रायजादांनी संविधानाची काही पानं हातानं लिहिल्यावर, ती पानं शांतिनिकेतनला पाठवण्यात आली. तिथं कलाकारांनी त्यावर चित्रं काढली.
नंदलाल बोस यांनी त्यांचे शिष्य बेओहर राममनोहर सिन्हा आणि शांतिनिकेतनशी संबंधित इतर कलाकारांच्या मदतीने संविधानाच्या हस्तलिखित प्रतीसाठी चित्रांचं नियोजन करण्यास सुरुवात केली.
भारत सरकारच्या 'भारताच्या संविधानातील कला आणि सुलेखन' या अधिकृत दस्तऐवजानुसार, नंदलाल बोस आणि बेओहर राममनोहर सिन्हा यांच्या व्यतिरिक्त, दीनानाथ भार्गव, विनायक शिवराम मासोजी, बिस्वरूप बोस, ए. पेरुमल, निबेदिता बोस, अमला सरकार, धीरेंद्र कृष्णा देब बर्मन, गाणे जाम भजना, जगतल, कृष्णा, जाम बुरमन, विनायक शिवराम मासोजी पटेल, रजनीकांत, किरपाल सिंग शेखावत आणि सुमित्रा नारायण यांनीही राज्यघटनेच्या प्रतीमध्ये कलाकुसर करण्याच्या कामात योगदान दिलं.
संविधानावर काढलेल्या प्रत्येक चित्रावर ती प्रतिमा तयार करणाऱ्या कलाकाराची स्वाक्षरी दिसून येते.
भारतीय संसदेच्या अधिकृत दस्तऐवजानुसार, जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी देशाचं संविधान लागू झालं, तेव्हा संविधानाच्या हस्तलिखित इंग्रजी प्रतीची केवळ 99 पाने तयार झाली होती. त्यापैकी फक्त 15 पानांवरील कलाकुसर पूर्ण झाली होती, तर 70 पानं शांतिनिकेतनमध्ये नंदलाल बोस यांच्याकडे उपलब्ध होती.
इंग्रजी प्रतीच्या सुलेखनाचं काम पूर्ण होण्यास सुमारे पाच महिने लागले, तर चित्रांच्या कामाला त्याहून थोडा जास्त वेळ लागला.
कोरीव काम करण्याचं महत्त्व काय आहे?
राज्यघटनेच्या हस्तलिखित प्रतींमधील चित्रे केवळ सजावटीसाठी नव्हती, तर त्यातून भारताचा इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्यलढा यांचंही चित्रण होणार होतं.
भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं, तेव्हा त्यात 395 कलमं, 22 भाग आणि 8 अनुसूची होत्या.
नंदलाल बोस आणि त्यांच्या टीमनं संविधानाच्या मूळ 22 भागांशी संबंधित 22 मुख्य प्रतिमा तयार केल्या.
त्यातील प्रत्येक प्रतिमा ही अगदी मोहेंजो-दडो काळापासून स्वातंत्र्यापर्यंत, भारताची कहाणी सांगणारी आहे.
संविधानाच्या पहिल्या पानावर देशाचं राष्ट्रचिन्ह, 'अशोक स्तंभावरील सिंहचिन्ह' आणि त्याखाली 'सत्यमेव जयते' ही राष्ट्रीय घोषणा लिहिलेली आहे. ही प्रतिमा दीनानाथ भार्गव यांनी डिझाइन केली आहे.
दुसऱ्या पानावर कलाकार बेओहर राममनोहर सिन्हा यांनी डिझाइन केलेली संविधानाची प्रस्तावना आहे.
त्याच्या सभोवतालच्या बॉर्डरच्या प्रत्येक कोपऱ्यात अशोक स्तंभाचे चार प्राणी म्हणजेच बैल, हत्ती, घोडा आणि सिंह यांचं चित्रण केलेलं आहे.
यानंतर संविधानाचे 22 भाग सुरू होतात. ही 22 चित्रं मोहेंजो-दडो कालखंड, वैदिक कालखंड, महाकाव्य कालखंड, महाजनपद आणि नंद कालखंड, मौर्य कालखंड, गुप्त कालखंड, मध्ययुगीन कालखंड, मुघल कालखंड, ब्रिटिश कालखंड आणि भारताच्या स्वातंत्र्याचा लढा यांचं चित्रण करतात.
उदाहरणार्थ, मूलभूत हक्कांचं वर्णन करणाऱ्या तिसऱ्या विभागात, रामायणापासून प्रेरित एक चित्र आहे. त्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांचं चित्रण आहे. हे चित्र जमुना सेन यांनी तयार केलेलं आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचं वर्णन करणाऱ्या चौथ्या विभागामध्ये महाभारतापासून प्रेरित एक चित्र आहे. त्यामध्ये कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना दाखवलेलं आहे. हे चित्र बाणी पटेल, नंदलाल बोस आणि विनायक शिवराम मासोजी यांनी तयार केलं होतं.
याव्यतिरिक्त, महात्मा बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर दिलेला पहिला उपदेश, नालंदा विद्यापीठ, नटराज आणि स्वस्तिक ही चिन्हं चित्रित करण्यात आली आहेत.
मुघल साम्राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अकबराच्या दरबाराचंही चित्र साकारण्यात आलं आहे.
संविधानाच्या 15 व्या भागामध्ये निवडणुकांशी संबंधित कायद्यांचं वर्णन आहे. त्या पानावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंगजी यांचं चित्र आहे.
या चित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंगजी यांच्या ऐतिहासिक कामगिरीचं चित्रण करण्यात आलं आहे. या पृष्ठावरील चित्रं धीरेंद्र कृष्ण देब बर्मन, नंद लाल बोस आणि किरपाल सिंग शेखावत यांनी काढलेली आहेत.
याशिवाय महाराणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधींचा दांडी मार्च आणि सुभाषचंद्र बोस यांची चित्रंही दिसतात.
भारताचे भौगोलिक स्थान स्पष्ट करण्यासाठी, हिमालयापासून वाळवंट आणि महासागरांपर्यंतच्या प्रतिमांचाही समावेश करण्यात आला आहे.
हस्तलिखित संविधानाचं जतन
सध्या, भारतीय संविधानाच्या इंग्रजी आणि हिंदी हस्तलिखित प्रती नवी दिल्लीतील संसदेच्या ग्रंथालयात ठेवल्या आहेत.
खास तयार केलेल्या सीलबंद काचेच्या पेट्यांमध्ये त्या ठेवल्या आहेत. या पेट्या नायट्रोजन वायूने भरलेल्या असतात आणि त्यात ऑक्सिजन उपलब्ध नसतो.
ऑक्सिजन नसल्यामुळे संविधानाच्या कागदपत्रांची ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबवता येते.
भारतीय संविधानाच्या हस्तलिखित प्रतींचं योग्य प्रकारे जतन करण्यासंबंधीची काळजी 1980 च्या दशकाच्या मध्यात सुरू झाली होती. तोपर्यंत त्या हस्तलिखित प्रती 30 वर्षांहून अधिक जुन्या झाल्या होत्या. अशा परिस्थितीत, त्यांचं जतन करणं आवश्यक झालं होतं.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनुसार (CSIR), संविधानाच्या हस्तलिखित प्रतींच्या जतनासाठी संसद ग्रंथालयानं सर्वप्रथम राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेशी संपर्क साधला होता.
1988 ते 1989 या काळात राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत अनेक प्रयोग करण्यात आले. परंतु, काही तांत्रिक त्रुटींमुळे यश मिळू शकलं नाही. त्यानंतर अनेक परदेशी संस्थांकडूनही सल्ला घेण्यात आला.
अखेरीस, जुलै 1993 मध्ये, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने अमेरिकेतील गेटी कॉन्झर्व्हेशन इन्स्टिट्यूटसोबत भारतीय संविधानाच्या इंग्रजी आणि हिंदी हस्तलिखित प्रतीसाठी दोन स्वतंत्र हवाबंद पेट्या बनवण्याकरिता एका करारावर स्वाक्षरी केली.
गेटी कॉन्झर्वेशन इन्स्टिट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार, या पेट्यांमध्ये हवा प्रवेश करू शकत नाही. संविधानाच्या प्रती जतन करण्यासाठी, या पेट्या नायट्रोजन वायूनं भरल्या जातात आणि त्यात एक टक्क्यापेक्षा कमी ऑक्सिजन असेल याची खात्री केली जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, या बॉक्समध्ये एक असं उपकरण बसवण्यात आलं आहे, जे बॉक्समधील ऑक्सिजनचं प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त होणार नाही याची खात्री करण्यासाठी ऑक्सिजनच्या प्रमाणावर सतत लक्ष ठेवतं.
या पेट्या ठेवण्यासाठी संसद ग्रंथालयात एक विशेष खोली बांधण्यात आली आहे. तिचं तापमान सुमारे 20 अंश आणि आर्द्रता सुमारे 30 टक्के राखली जाते.
या वैज्ञानिक तंत्रज्ञानाद्वारे, संविधानाच्या हस्तलिखित प्रतींचं ऑक्सिडेशन, सूक्ष्मजंतू आणि वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण केलं जातं.
या पेट्या गेटी कॉन्झर्व्हेशन इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आल्या आणि मार्च 1994 मध्ये त्या भारताच्या संसद ग्रंथालयात पोहोचवण्यात आल्या.
संसद ग्रंथालयात सुमारे एक वर्षभर या पेट्यांच्या गुणवत्तेची तपासणीही करण्यात आली. त्यानंतर, 27 ऑक्टोबर 1995 रोजी, संविधानाच्या दोन्ही हस्तलिखित प्रती औपचारिकपणे या पेट्यांमध्ये ठेवण्यात आल्या.
दरवर्षी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) शास्त्रज्ञ या पेट्या तपासतात आणि संविधानाच्या दोन्ही हस्तलिखित प्रतींच्या गुणवत्तेचीही पाहणी करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)