You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हिसिंग कॉक्रोच'च्या तस्करीचा प्रयत्न फसला, कोट्यवधी रुपयांची मादागास्कर झुरळं केली जप्त
- Author, लाना लॅम
- Role, सिडनी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील एका व्यावसायिक प्रजनक म्हणजेच ब्रीडरकडून (प्राणी आणि वनस्पतींची पैदास करणारी व्यक्ती) 1 लाखांहून अधिक बेकायदा विदेशी झुरळं जप्त करण्यात आली आहेत. यापैकी काही झुरळं माणसाच्या तळहाताएवढी मोठी होती.
सिडनीपासून सुमारे 200 किलोमीटर पश्चिमेला असलेल्या बाथर्स्ट येथील एका प्रजनकाकडून सुमारे 2 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 1 कोटी 36 लाख रुपये) किमतीची मादागास्कर हिसिंग झुरळं आणि डुबिया झुरळं जप्त करण्यात आली.
या दोन्ही प्रजातींची झुरळं ऑस्ट्रेलियामध्ये आयात करणे, पाळणे, त्यांची पैदास करणे किंवा विक्री करणे कायद्याने बंदी आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, बेकायदा विदेशी अपृष्ठवंशी (इनव्हर्टेब्रेट्स) प्राण्यांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.
हे कीटक रोग पसरवू शकतात आणि स्थानिक वन्यजीव तसेच शेतीचं नुकसान करू शकतात, असेही त्यांनी सांगितलं.
ही बेकायदा झुरळं अनेकदा पाळीव आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या खाद्यासाठी वापरले जातात. आता ही झुरळे नष्ट करून त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.
'प्राण्यांसाठी कायदेशीर पर्याय वापरा'
"विदेशी झुरळांची बेकायदा पैदास आणि व्यापार होत असल्याचे आम्हाला आढळून आले. त्यामुळे पाळीव प्राण्यांशी संबंधित व्यवसाय आणि प्राणी मालकांनी सावध राहावे," असे हवामान बदल, ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी विभागाच्या (डीसीसीईईडब्ल्यू) प्रवक्त्यांनी सांगितलं.
"तुमच्याकडे डुबिया किंवा मादागास्कर हिसिंग झुरळांसारखी विदेशी झुरळं आढळून आली, किंवा तुम्ही त्यांची पैदास अथवा विक्री करत असल्याचे समोर आले, तर ते जप्त केले जातील आणि तुमच्यावर केंद्रीय कायद्यानुसार कारवाई होऊ शकते," असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
प्रवक्त्यांनी पाळीव सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मालकांना डुबिया झुरळांऐवजी कायदेशीर पर्याय वापरण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी क्रिकेट्स (रातकिडा) आणि वूड रोचेससारख्या (लाकडात राहणारे रानटी झुरळ) कीटकांचा वापर करण्याचा सल्ला दिला.
फुत्कारासारखा मोठा आवाज काढणारी झुरळं
मादागास्कर हिसिंग झुरळं ही जगातील सर्वात मोठ्या झुरळांच्या प्रजातींपैकी एक आहेत. ही झुरळं फुत्कारासारखा मोठा आवाज काढू शकतात, त्यामुळे त्यांना 'हिसिंग' झुरळं असे म्हटले जाते.
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (एबीसी) वृत्तानुसार, बाथर्स्टमधील स्नेक कॅचर (साप पकडणाऱ्या) स्टेफनी लेसर यांनी, ही बेकायदा झुरळं आणि इतर कीटक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या खाद्यासाठी ऑनलाइन विकले जात असल्याचे त्यांनी पाहिले असल्याचे सांगितले.
"ही झुरळं आकाराने खूप मोठी असतात. ती जवळपास माणसाच्या तळहाताएवढी असल्याने अनेक लोकं ती ठेवतात," असे त्यांनी एबीसीशी बोलताना सांगितले.
"ही झुरळं मोठी असल्यामुळे ती खाद्यासाठी किफायतशीर आणि सोयीची पडतात. प्रत्येक सरड्याला लहान 3-4 वूड रोचेस देण्याऐवजी एका मोठ्या झुरळानेच काम भागू शकते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)