'लैंगिक छळ प्रकरणात मीही सर्व्हायवर'; बृजभूषण यांच्याबाबत काय म्हणाली विनेश फोगाट?

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

ऑलिम्पिक विजेत्या भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी रविवारी (3 मे) सोशल मीडियावर आपल्या सुरक्षेचा संदर्भा देत, भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय-फेडरेशन ऑफ इंडिया) रँकिंग टूर्नामेंटबाबत शंका व्यक्त केल्या आहेत.

तसंच, त्या म्हणाल्या की, "भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या सहा महिला सर्व्हायवरपैकी मी स्वतःही एक आहे."

डब्ल्यूएफआयने एक रँकिंग टूर्नामेंट आयोजित करण्याची घोषणा केली आहे आणि ही स्पर्धा बृजभूषण शरण सिंह यांच्या गोंडा क्षेत्रात घेतली जात आहे, असं विनेश फोगाट यांनी सांगितलं आहे.

विनेश यांनी आपली सुरक्षा तसेच या स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीर शंका व्यक्त केली आहे.

विनेश फोगाट यांच्या सुरक्षेची 'वैयक्तिक हमी' घेत असल्याचं, डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष संजय सिंह यांनी इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. तसेच, विनेश या काँग्रेसच्या आमदारही असल्यामुळे त्यांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

विनेश फोगाट यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर करून स्वतःला त्या प्रकरणातील सर्व्हायवर असल्याचे सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, सध्या या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की, त्यांना हे सांगणं भाग पडत आहे.

विनेश यांच्या या वक्तव्यावर बातमी प्रकाशित होईपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या मुद्द्यावर त्यांची प्रतिक्रिया किंवा इतर कोणतेही विधान आले तर इथे अपडेट केलं जाईल.

2023 मध्ये डब्ल्यूएफआयचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगाट यांचाही समावेश होता.

विनेश फोगाट यांनी काय सांगितलं?

विनेश फोगाट यांनी सांगितलं की, "एक महिन्यापूर्वी कुस्ती महासंघाने रँकिंग टूर्नामेंट आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ही स्पर्धा उत्तर प्रदेशातील गोंडा येथे घेतली जात आहे, जिथे बृजभूषण यांचं घर आणि त्यांचं खासगी महाविद्यालय आहे."

इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसनुसार ही रँकिंग टूर्नामेंट उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात असलेल्या नंदिनी नगर महाविद्यालयात 10 ते 12 मे दरम्यान होणार आहे. गोंडाचे माजी खासदार असलेले बृजभूषण शरण सिंह हे या नंदिनी नगर महाविद्यालयाचे संस्थापक आहेत.

विनेश फोगाट यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं की, "तिथे प्रत्येक मेहनती खेळाडूला त्याचा हक्क मिळेल, हे शक्य नाही. कोणता रेफरी कोणत्या सामन्यात जाईल, कोणाला किती गुण दिले जातील, मॅट चेअरमन कुठे बसतील, कोणाला जिंकवायचं किंवा हरवायचं हे सगळे बृजभूषण यांच्या लोकांकडून नियंत्रित केलं जाईल."

"सर्व मेहनती खेळाडूंचे वजन योग्य प्रकारे तपासले जाईल आणि त्यांच्या मेहनतीचा खरा निकाल मैदानावर दिसेल असं मला वाटत नाही."

विनेश म्हणाल्या की, "तीन वर्षांपूर्वी आम्ही लैंगिक छळाविरोधात आवाज उठवला होता. सहा महिला खेळाडूंनी तक्रारी केल्या होत्या आणि त्यावर आजही साक्ष सुरू आहे."

"सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की, कोणत्याही सर्व्हायवरची ओळख उघड केली जाऊ नये. पण आज परिस्थिती अशी आहे की, मला हे सांगणं भाग पडत आहे की, त्या 6 सर्व्हायवरपैकी एक मी स्वतः आहे, जिने तक्रार केली होती."

त्या पुढे म्हणाल्या, "खेळाडूंवर आधीच खूप दबाव असतो आणि अशा परिस्थितीत जाऊन मी 100 टक्के कामगिरी करू शकेन, असं मला वाटत नाही. अशा वातावरणात खेळणं एका मुलीसाठी खूप कठीण असतं आणि ज्या खेळाडूंनी अशा परिस्थितीचा अनुभव घेतला आहे ते नक्कीच माझ्याशी सहमत होतील."

विनेश पुढे म्हणाल्या की, "जर मी त्या स्पर्धेत गेले, तर माझ्यासोबत माझी टीम आणि हितचिंतकही असतील. आणि जर कोणाबरोबर काही दुर्घटना घडली, तर त्याला थेट जबाबदार भारत सरकार असेल."

विनेश यांनी सांगितलं की, "मला कोणतीही विशेष सवलत किंवा वेगळी वागणूक नको आहे. मला फक्त इतकंच वाटतं की, मॅटवरचा निर्णय प्रत्येक खेळाडूच्या मेहनतीवर आधारित असावा, कोणत्याही गुंड किंवा बदमाशाच्या प्रभावावर नाही. कारण काही लोक ठरवतील कोणाला जिंकवायचं आणि कोणाला हरवायचं."

'सुरक्षेची वैयक्तिक हमी'

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार विनेश यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले की, ते विनेश फोगाट यांच्या सुरक्षेची 'वैयक्तिक हमी' देतात. मात्र त्यांनी असंही म्हटलं की, विनेश या काँग्रेसच्या आमदार असल्याने त्यांनी या मुद्द्याचे राजकारण करू नये.

संजय सिंह यांनी वृत्तपत्राला सांगितलं की, "मी विनेश यांना त्यांच्या सुरक्षेची वैयक्तिक हमी देतो. डब्ल्यूएफआयचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना आणि त्यांच्या टीमला खात्री देतो की, गोंडामध्ये त्या पूर्णपणे सुरक्षित असतील. मी स्वतः त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईन. कृपया या आणि मॅटवर तुमची सर्वोत्तम कामगिरी नोंदवा."

ते पुढे म्हणाले, "जर त्यांना राजकारण करायचं असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे मी त्यावर काहीही भाष्य करणार नाही. सत्य समोर येऊ द्या."

संजय सिंह यांनी असंही सांगितलं की, "गोंडामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ओपन रँकिंग टूर्नामेंटसाठी सुमारे 1200 एंट्रीज आल्या आहेत, ज्यापैकी जवळपास 800 हरियाणातील कुस्तीपटूंच्या आहेत. इतर कोणत्याही कुस्तीपटूने याबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवलेला नाही."

ते पुढे म्हणाले, "जर विनेश यांना रेफरी पक्षपाती असण्याची चिंता असेल, तर मी त्यांना खात्री देतो की, या स्पर्धेसाठी निवडले जाणारे सर्व रेफरी भारतीय कुस्ती महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) पॅनलमधून असतील. ही निवड पूर्णपणे निष्पक्ष असेल आणि कोण रेफरी बनेल यात बृजभूषण शरण सिंह किंवा माझा कोणताही हस्तक्षेप नसेल."

लैंगिक अत्याचाराविरोधातील आंदोलन

2023 मध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले होते. त्यानंतर काही भारतीय कुस्तीपटूंनी त्यांच्याविरोधात मोठं आंदोलन केलं. परंतु, बृजभूषण यांनी हे सर्व आरोप नाकारले होते.

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आपले सरकारी सन्मान 'खेल रत्न' आणि 'अर्जुन पुरस्कार' दिल्लीतील कर्तव्य पथवर ठेवले होते. हे पुरस्कार पंतप्रधानांकडे सोपवावेत, अशी विनंती त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली होती.

गेल्या वर्षी मे महिन्यात विनेश फोगाटसह बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना धक्का बसला होता. कारण दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दाखल झालेलं 'पोस्को' प्रकरण बंद केलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)