बिस्लेरीचं पाणी असुरक्षित? FSSAI ची खटला चालवण्यास मंजुरी, बिस्लेरीनं दिलं 'हे' स्पष्टीकरण

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडवर खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. FSSAI ने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी पोस्ट केली आहे.
एफएसएसएआयच्या (FSSAI) मते, कंपनीच्या आवारातून पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर अर्थात बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा एक नमुना घेण्यात आला.
तपासणीत असं आढळून आलं की, त्यातील ब्रोमेटचं प्रमाण निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी होतं. परिणामी, तो नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला.
कंपनीच्या अपीलनंतर, हा नमुना एका रेफरल फूड लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला. तिथे चाचणी करण्यात आल्यानंतर, त्या पाण्यात पॉलिन्यूक्लियर ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHS) आढळल्यानं ते पाणीही असुरक्षित असल्याचं आढळून आलं.
एफएसएसएआयच्या (FSSAI) मते, या तपासात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 अंतर्गत नियमांचं उल्लंघन झाल्याचं उघड झालं आहे.
यानंतर, या कायद्यान्वये कंपनीवर खटला चालवण्यास परवानगी देण्यात आली.
दरम्यान, यांनंतर बिस्लेरी कंपनीच्या वतीनं सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलं असून, त्यांचं पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
'आमचं पाणी पिण्यासाठी सुरक्षित'; बिस्लेरीचं स्पष्टीकरण
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) नोटीस बजावल्याच्या वृत्तावर बिस्लेरीनं आता स्पष्टीकरण दिलेलं आहे.
कंपनीनं एका एक्स-पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे प्रकरण सुमारे 14 महिने जुनं आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर 2025 मध्ये गोव्यातील त्यांच्या एका प्लांटमध्ये पाण्याच्या एका बॅचची चाचणी करण्यात आली. हा प्लांट कंपनीच्या 143 प्लांटपैकी एक आहे.
एफएसएसएआयनं 30 सप्टेंबर, 2025 रोजी या प्लांटमधून पाण्याचे सहा नमुने गोळा केले. प्राथमिक तपासणीत असं दिसून आलं की, पाच नमुने सर्व विहित मानकांची पूर्तता करतात.
सहाव्या नमुन्यात ब्रोमेटची पातळी 12 मायक्रोग्राम प्रति लिटर आढळली, तर शिफारस केलेली मर्यादा 10 मायक्रोग्राम प्रति लिटर आहे.
कंपनीनं 22 नोव्हेंबर, 2025 रोजी या निकालावर अपील केलं. यानंतर, FSSAI नं नमुना पुनर्तपासणीसाठी एका रेफरल लॅबोरेटरीमध्ये पाठवला.

फोटो स्रोत, Firdous Nazir/NurPhoto via Getty Images
बिस्लेरी कंपनीच्या म्हणण्यानुसार, संदर्भ प्रयोगशाळेच्या चाचणीत ब्रोमेटची मात्रा शिफारस केलेल्या मर्यादेत आढळली. मात्र, प्रयोगशाळेनं नमुन्यात पॉलिन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) ची उपस्थिती असल्याचंही कळवलं.
कंपनीनं सांगितलं की दोन्ही चाचण्यांच्या निकालांमध्ये तफावत आढळल्यानं, त्यांनी तोच नमुना दुसऱ्या FSSAI-मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासून घेतला.
या तपासणीतही ब्रोमेटचं प्रमाण निश्चित केलेल्या मर्यादेत आढळून आलं.
बिस्लेरीनं पुढे सांगितलं की, त्यांनी आपला तपास अहवाल 2 फेब्रुवारी 2026 रोजी एफएसएसएआयच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाला पाठवला आहे.

फोटो स्रोत, Bisleri/X
यानंतर, त्याला FSSAI कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीला वाटलं की हे प्रकरण मिटलेलं आहे.
कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांना अद्याप ईमेलद्वारे किंवा छापील स्वरूपात कोणतीही सूचना मिळालेली नाही आणि त्यांना FSSAI च्या वेबसाइटवरही ती सूचना सापडली नाही.
बिस्लेरीनं सांगितले की, पाण्याची सुरक्षितता हे त्यांचं प्राधान्य आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या उत्पादन प्रक्रियेच्या 10 टप्प्यांमध्ये 90 हून अधिक चाचण्या घेतल्या जातात.
कंपनीनं असंही सांगितलं की, आम्ही नियामक प्रक्रियेत FSSAI ला सहकार्य करत राहू तसेच बिस्लेरीचं पाणी पिण्यास सुरक्षित असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























