ममता बॅनर्जी यांच्यावर 'हल्ल्या'चा प्रयत्न; हल्लेखोर महिलेबाबत पोलिसांनी दिली 'ही' माहिती

ममता बॅनर्जी
फोटो कॅप्शन, ममता बॅनर्जी
    • Author, रुप्सा सेनगुप्ता
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर एका महिला सिव्हिक व्हॉलंटिअरने कथितरीत्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी घडली.

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) डोला सेन यांनी दावा केला की, ममता बॅनर्जी एका पूजेच्या कार्यक्रमासाठी जात असताना कालीघाट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ तनिष्ठा साहा (38) नामक महिलेने त्यांच्यावर कथितरीत्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि कालीघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत दावा करण्यात आला आहे की, तनिष्ठा साहाने ममता बॅनर्जी यांना शिवीगाळ करत चाकूने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिला नशेत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी गटाने दाखल केलेल्या तक्रारीची पोलिसांनी पुष्टी केली. मात्र, संबंधित महिलेकडून कोणतंही शस्त्र जप्त करण्यात आलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, घटनास्थळी या महिलेने जोरदार वाद केल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. तर, ममता बॅनर्जी यांना पुरवण्यात आलेल्या झेड-प्लस सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी निर्माण झाल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी गटाने दाखल केलेल्या तक्रारीत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव तनिष्ठा साहा असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, पोलिसांनी तिचं नाव अनुषा साहा असल्याचं सांगितलं.

कोलकात्याचे पोलीस आयुक्त अजय नंदा याबाबत माहिती देताना म्हणाले, "घटनास्थळावरून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्राथमिक अहवालानुसार, तिची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक नसल्याचं दिसत आहे. तिच्या हेतू काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे."

तृणमूल काँग्रेसकडून काय सांगण्यात आलं?

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर एका महिलेने चाकू हल्ला करण्याचा केल्याचा दावा साकेत गोखले यांनी केलाय. साकेत गोखले हे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी खासदार आहेत.

साकेत गोखले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, "व्यसनाधीन असलेली एक महिला ममता बॅनर्जी यांच्या घरापर्यंत पोहोचली आणि तिने त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला."

साकेत गोखले यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती अशी आहे की, झेड-प्लस सुरक्षा असलेल्या आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्या देखील सुरक्षित नाहीत. दिल्लीत भाजपला आव्हान देण्याचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे, त्यामुळे भाजपने हा सुनियोजित कट रचला होता का?"

ममता बॅनर्जी

साकेत गोखले यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची प्रतही एक्सवरून शेअर केली आहे.

या पोलीस तक्रारीनुसार, 'आज (13 ऑक्टोबर) संध्याकाळी सुमारे सहा वाजता एक महिला आक्रमक अवस्थेत तिथे पोहोचली आणि तिने ममता बॅनर्जी यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.'

तक्रारीनुसार, या महिलेने आपण ममता बॅनर्जी यांची भाची असल्याचा दावाही केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)