साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

डहाणू तालुक्यात हा अपघात झाला आहे

फोटो स्रोत, Jitu Patil

फोटो कॅप्शन, डहाणू तालुक्यात हा अपघात झाला आहे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या डहाणू तालुक्यातील धानीवारी येथे भीषण अपघात झाला. त्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.

पोलीस अधीक्षक यतीश देशमुख बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, आज (18 मे) सायंकाळी 3.30 ते 4 च्या दरम्यान ही घटना घडली.

"हा वऱ्हाडींना घेऊन जाणारा आयशर टेम्पो विरुद्ध दिशेने जात होता. समोरून येणाऱ्या कंटेनरची आणि आयशरची धडक झाली. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे," असे यतीश देशमुख यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

ज्या तरुणाचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता त्याने सांगितले की, समोरून आलेला कंटेनर आयशरला धडकला आणि हा अपघात झाला.

आयशरमध्ये 35 ते 40 वऱ्हाडी असावेत, असंही देशमुख यांनी नमूद केलं.

अपघातातील काही जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यातील 16 जणांना धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय कासा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद तरसे यांनी दिली आहे.

पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे असे डॉ. सावरा यांनी म्हटले. जखमींना तातडीने मदत केली जाईल तसेच त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील असे डॉ. सावरा यांनी सांगितले.

पालघर प्रशासनाने काय सांगितलं?

प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार 13 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. 14 जखमींना उपचारासाठी डहाणूतील वेदांता रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर रुग्णांना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार दिले जात आहेत.

पालघर प्रशासनाने जे निवेदन प्रसिद्ध केले त्यानुसार मुंबई-गुजरात लेनमधून आयशर टेम्पो विरुद्ध दिशेने जात होता. हा टेम्पो वऱ्हाडींना घेऊन जात होता. तेव्हा समोरुन येणाऱ्या ट्रेलरचे नियंत्रण सुटले आणि त्यावरील कंटेनर आयशरला धडकले. या अपघातावेळी एक मोटर सायकल जात होती. ती देखील या अपघातात सापडल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख

फोटो स्रोत, Jitu Patil

फोटो कॅप्शन, पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख

प्रशासनाने मृतांची नावे जाहीर केली आहेत.

1. सुरेश लाखात

2. पांडू लाखात

3. कलु लाखात

4. सुनिल दांडेकर

5. चिरमा कुऱ्हाडा

6. नमिता दांडेकर

7. सारिका लाखात

8. आयुष लाखात

9. वंदना वळवी

10. सलोनी वळवी

11. अजय अहाडी

12. रियांक्षी लाखात

13. सागर शेंडे

अपघातस्थळ

फोटो स्रोत, Jitu Patil

फोटो कॅप्शन, अपघातस्थळ

अपघातास्थळावर कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य ती दक्षता घेतली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. तपासाचे आणि जखमींच्या प्रकृतीची माहिती वेळोवेळी दिली जाईल. असे प्रशासनाने सांगितले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)