राज्यात पाऊस कधी पडणार? जाणून घ्या हवामानाचे ताजे अपडेटस

फोटो स्रोत, Getty Images
नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा 23 जून 2026 च्या सुमारास महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये आणखी विस्तार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे या भागांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 21 जूनपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, ईशान्य भारतातही संपूर्ण आठवडाभर जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर दुसरीकडे, पूर्व उत्तर प्रदेशमध्ये 24 जूनपर्यंत, बिहारमध्ये 22 जूनपर्यंत आणि महाराष्ट्र व तेलंगणात 20 जूनपर्यंत काही भागांत उष्णतेची लाट (हीट वेव्ह) कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, @RMC_Mumbai
राज्यात दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.
तर, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ , हलका ते मध्यम पाऊस , ताशी 40-50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर, 24-25 जूनपासून कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
एरवी मान्सूनपूर्व काळात, एप्रिल ते मे दरम्यान प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरात चक्रीवादळं येतात, तसंच मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाही कमी दाबाचे पट्टे तयार होतात. त्यामुळे मान्सूनला वर सरकताना गती मिळते. मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागरातल्या या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पावसातही वाढ होताना दिसते.
यंदा मात्र मान्सूनपूर्व कालावधीत इथे एकही चक्रीवादळ किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नाही.
90 टक्के म्हणजे किती कमी पाऊस?
संपूर्ण भारताचा विचार केला, तर देशात दरवर्षी साधारणपणे सरासरी 87 सेंटीमीटर (870 मिलीमीटर) पाऊस पडतो. त्यातला 70 टक्के पाऊस जून-सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या काळात पडतो.
शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी हा नैऋत्य मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा ठरतो. देशाची आर्थिक गणितंही याच पावसावर प्रामुख्यानं अवलंबून असतात.

फोटो स्रोत, Getty Images
विशेषतः मान्सून कोअर झोन म्हणजे महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पूर्णतः नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असतात.
त्यामुळे या कालावधीत पाऊस कमी पडला, तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतात.
यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान देशभरात मिळून 87 सेंटीमीटरच्या 90 टक्के म्हणजे सुमारे 78.3 टक्केच पाऊस पडेल, असं आकडेवारी सांगते.
अर्थात या पावसाचं वितरणही सगळीकडे सारखं नसेल.
आसाम, लडाख, ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत तिथल्या सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस पडेल तर महाराष्ट्रासह इतर बहुतांश भागात सरासरीपेक्षा 90 टक्क्यांहून कमी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटालगतचा प्रदेश आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात पावसाचं प्रमाण त्याहीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्याच्या काही भागांत सरासरीएवढा पाऊस पडू शकतो.
एल निनोचा परिणाम
एल निनो हा पॅसिफिक महासागरातला प्रवाह आणि इंडियन ओशन डायपोल म्हणजे IOD ही हिंदी महासागरातली स्थिती या दोन्हींचा मान्सूनच्या पावसावर परिणाम होतो.
एल निनोचा प्रभाव जगभरातील वारे आणि हवेच्या दबावावर होताना दिसतो. त्यामुळे साधारणपणे एल निनोच्या काळात भारतात तुलनेनं कमी पाऊस पडतो. तर IOD सकारात्मक स्थितीत असल्यास तो एल निनोचा प्रभाव कमी करू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
यंदा काय होतंय, तर एल निनो अगदी वेगानं तयार झाला आहे. तोही मान्सूनच्या सुरुवातीलाच. त्याचवेळी IOD न्यूट्रल स्थितीत आहे, तो इतक्यात सकारात्मक होण्याची चिन्हं नाहीत.
थोडक्यात, महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्यासाठी थोडा आणखी वेळ लागू शकतो आणि त्यानंतरही पुरेसा पाऊस पडेलच याची शाश्वती नाही. तसंच जोरदार पाऊस पडला तरी तो सगळीकडे पडेलच असंही नाही.
सध्या तरी शेती आणि पिण्याच्या पाण्याची सध्याची परिस्थिती पाहता, मान्सूनच्या वाटचालीकडे सगळेच डोळे लावून बसले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























