पोटातील बाळाला हृदयाचा गंभीर आजार; गर्भपातास नकार देणारी सरोगेट आई सुप्रीम कोर्टात का गेली?

    • Author, मॅडलिन हॅल्पर्ट
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेमध्ये सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या एका बाळाच्या पालकत्वावरून वाद निर्माण झाला आहे. गर्भातील बाळाला हृदयाचा गंभीर आजार असल्याचं समोर आल्यानंतर गर्भपात करण्याची विनंती करण्यात आली होती.

परंतु, सरोगेट आईने त्यास नकार देत बाळाला जन्म दिला. आता बाळाच्या पालकत्वाचा हा वाद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.

कॅलिफोर्नियातील ओमर अहमद आणि नौशीन गिलकर या दाम्पत्याने आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी मॅकेन्ना वेस्ट या महिलेला सरोगेट मदर म्हणून निवडलं होतं. मॅकेन्ना यांच्या गर्भातील बाळाला आरोग्याशी संबंधित समस्या असल्याचं समोर आलं. त्यामुळे या दाम्पत्याने मॅकेन्ना यांना गर्भपात करण्यास सांगितलं.

मॅकेन्ना यांनी मात्र या मागणीला नकार देत बाळाला जन्म दिला. आता बाळाच्या संगोपनावरून त्यांचा आणि त्या दाम्पत्याचा वाद सुरू आहे. या वादात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत मॅकेन्ना यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मॅकेन्ना वेस्ट यांनी आधीच्या न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करत लगेचच अपील केलं आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार, मॅकेन्ना यांनी जन्म दिलेल्या बाळावर ओमर अहमद आणि नौशीन गिलकर या दाम्पत्याला पालकत्वाचे अधिकार देण्यात आले होते.

गर्भधारणेच्या 20व्या आठवड्यात केलेल्या स्कॅनमध्ये बाळाच्या हृदयात गंभीर दोष असल्याचं समोर आलं. त्यामुळे अहमद आणि गिलकर या दाम्पत्याने वेस्ट यांना गर्भपात करण्याची विनंती केली. परंतु, वेस्ट यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्या टेक्सासला गेल्या आणि तिथे बाळाला जन्म दिला.

टेक्सासमध्ये गर्भपात करणं अवैध आहे. वेस्ट यांना काही रिपब्लिकन नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रकरणी अहमद आणि गिलकर यांच्या वकिलांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

जन्मानंतर बाळावर लगेचच शस्त्रक्रिया

ऑगस्टमध्ये जन्मलेल्या या बाळाला हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम असल्याचं समोर आलं. या आजारात बाळाच्या हृदयाचा डावा भाग पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे हृदयाचा डावा भाग शरीराला पुरेसं रक्तपुरवठा करू शकत नाही.

या आजारावर उपचारासाठी अनेकवेळा एकापेक्षा जास्त शस्त्रक्रिया कराव्या लागतात. परंतु, या शस्त्रक्रियांमुळे हृदयातील दोष पूर्णपणे बरा होत नाही. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार (सीडीसी), या आजारामुळे अशा बाळांना आयुष्यभर आरोग्याशी संबंधित समस्या होण्याची शक्यता असते.

वेस्ट टेक्सासला गेल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे टेक्सासचे ॲटर्नी जनरल केन पॅक्स्टन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. बाळाला टेक्सासमध्येच उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी न्यायालयाकडून तातडीचा आदेश मिळवला. जन्मानंतर काही वेळातच बाळावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.

उपचाराचे पर्याय समजल्यानंतर मॅकेन्ना यांनी हे बाळ आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अहमद आणि गिलकर या दाम्पत्याने केलेली गर्भपाताची विनंती आपण नाकारली, असं वेस्ट यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं.

एकमेकांवर आरोप-प्रत्योराप

वेस्ट यांनी सांगितलं की, बाळाला जीवघेणा आजार असल्याचं समजल्यानंतर त्या दाम्पत्याने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाळाला आवश्यक ते उपचार ते कदाचित दिले जाणार नाहीत, अशी भीती आपल्याला वाटते, असं वेस्ट यांनी म्हटलं. त्यामुळे बाळाचा ताबा त्याच्या जैविक आई-वडिलांकडे देऊ नये, असा युक्तिवाद त्यांनी केला.

'असोसिएटेड प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, गिलकर यांनी यापूर्वीच्या न्यायालयातील सुनावणीदरम्यान सांगितलं की, त्यांनी आपल्या बाळाचं नाव 'रुमी' ठेवलं असून, हे बाळ त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.

वेस्ट यांनी आपल्याला न सांगता टेक्सासला जाऊन बाळाला जन्म दिला आणि बाळाच्या वैद्यकीय स्थितीची माहिती मिळवण्यापासून आपल्याला रोखलं, असा आरोप या दाम्पत्याने केला आहे.

कॅलिफोर्नियाच्या न्यायालयाने यापूर्वी अहमद आणि गिलकर यांना बाळाचे कायदेशीर पालकत्व दिलं होतं. त्याच वेळी, टेक्सासच्या न्यायालयाने वेस्ट यांना बाळाला भेटण्यास मनाई करणारा आदेश दिला होता.

गेल्या महिन्यात या दाम्पत्याच्या वकिलांनी सांगितलं की, बाळाची प्रकृती गंभीर आहे. बाळाला पुढे आणखी आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही, तर बाळाच्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला पुढे मिळणार नाही, असं वेस्ट यांनी म्हटलं.

वेस्ट यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला आहे की, अहमद आणि गिलकर हे बाळाला हॉस्पिस केअरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

हॉस्पिस केअर म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या किंवा असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना शारीरिक आराम, वेदनांपासून मुक्ती आणि भावनिक आधार देणारी विशेष काळजी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)