You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जिथं मादी नव्हे, तर नर गर्भधारणा करून पिल्लांना जन्म देतो'; 2026 मधील समुद्राचे सर्वात प्रभावी 10 फोटो
- Author, इसाबेल गेरेटसेन, मार्था हेन्रिक्स आणि कॅथरीन लॅथम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
कुतूहलाने समुद्राकडे पाहणारे सील, पिल्लांना सांभाळणारे नर सीहॉर्स (समुद्री घोडा) आणि क्वचितच दिसणारे खोल समुद्रातील जीव- 'ओशन फोटोग्राफर ऑफ द इयर 2026' स्पर्धेतील ही काही सर्वाधिक प्रभावी छायाचित्रं आहेत.
महत्त्वाचं : या लेखात अशा एका छायाचित्राचा समावेश आहे, जो काही वाचकांना अस्वस्थ करू शकतो.
दरवर्षी 'ओशन फोटोग्राफर ऑफ द इयर' स्पर्धेत जगभरातील समुद्रांची विलोभनीय छायाचित्रं काढणाऱ्या छायाचित्रकारांना (फोटोग्राफर्स) आपली सर्वोत्तम छायाचित्रं पाठवण्याची संधी मिळते.
वरील छायाचित्रात फोटोग्राफर मॅथ्यू स्मिथ यांनी 'सदर्न एलिफंट सील'च्या एका उत्सुक पिल्लाचं छायाचित्र टिपलं आहे. हे पिल्लू पहिल्यांदाच समुद्रात उतरत होतं. फॉकलंड बेटांवरील सी लायन आयलंडच्या उथळ खडकाळ पाण्यात त्याला फिरताना टिपलं आहे.
जगातील महासागरांचं सौंदर्य आणि त्याच्यासमोरची आव्हानं दाखवणारी आणखी 9 अप्रतिम छायाचित्रं पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
पिल्लाची काळजी घेणारा बाबा
ज्युलियन अँटॉन यांनी टिपलेलं हे छायाचित्र या स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट छायाचित्र ठरलं आहे. यात एक नर सीहॉर्स आणि त्याच्यासमोर उभं असलेलं त्याचं छोटंसं पिल्लू दिसत आहे.
बहुतेक सीहॉर्समध्ये मादी नव्हे, तर नर गर्भधारणा करतात, पिल्लांना जन्म देतात आणि त्यांचं संगोपन करतात. हे छायाचित्र फ्रेंच पॉलिनेशियातील मूरिया बेटाच्या उथळ पाण्यात टिपण्यात आलं आहे.
डोळ्याभोवतीचं अनोखं जग
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या सांता कॅटालिना बेटाजवळ स्टीफन लोपेझ यांनी हे छायाचित्र टिपलं आहे. यात एका मोठ्या ब्लॅक सी बास माशाच्या डोळ्यात कोपेपॉड्स नावाचे अतिशय छोटे परजीवी कवचधारी समुद्री जीव दिसत आहेत.
साधारण 50 वर्षांपूर्वी या भागातून हा मासा जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होता. परंतु, आता त्यांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.
लपून केलेली शिकार
फिलिपिन्समध्ये अँड्रिया मिशेलुट्टी यांनी टिपलेल्या यांनी काढलेल्या छायाचित्रात एक लाल स्कॉर्पियनफिश लिझार्डफिशला पकडून खाताना दिसत आहे. या दृश्यातून स्कॉर्पियनफिश लपून शिकार कसा करतो आणि समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये जगण्यासाठी प्राण्यांमध्ये सतत कशी धडपड सुरू असते, हे दिसून येतं.
महाकाय पण शांत जीव
मेक्सिकोमध्ये 2025 मध्ये झालेल्या सार्डिन माशांच्या स्थलांतरादरम्यान (सार्डिन रन) छायाचित्रकार अनिता वर्दे यांनी हा अनपेक्षित पाहुणा कॅमेऱ्यामध्ये टिपला. हा महाकाय ओशेनिक सनफिश आकाराने एका लहान कारएवढा होता.
"तो निळ्याशार पाण्यातून आमच्या दिशेने येत होता. त्यावेळी तो एखाद्या प्रकाशमान जीवासारखा म्हणजे तेजाने उजाळल्यासारखा दिसत होता. जणू समुद्राच्या पृष्ठभागाखाली एखादा मोठा चंद्र उगवत आहे, असं वाटत होतं," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
"या माशाच्या डोळ्यात पाहिल्याशिवाय राहवत नाही. तो दिसायला खूपच वेगळा आणि अतिशय सुंदर आहे."
खोल समुद्रातून आलेला अनोखा पाहुणा
मित्सुना कावाई यांनी जपानमधील ओसेझाकीच्या किनाऱ्याजवळ हिवाळ्यातील 'ब्लॅक-वॉटर डायव्ह'दरम्यान हे छायाचित्र काढलं. रिबनफिशची छोटी पिल्लं जिवंत अवस्थेत क्वचितच दिसून येतात, कारण ती समुद्राच्या सुमारे 900 (2950 फूट) मीटर खोलीवर राहतात.
या माशाचं पिल्लू काही सेंटीमीटरच लांब असू शकतं. परंतु, मोठं झाल्यावर हा मासा 1.8 मीटर म्हणजेच साधारण 6 फुटापर्यंत वाढू शकतो.
एका रांगेत
अमेरिकेतील हवाई बेटांजवळ जॉन कोवित्झ यांनी समुद्राच्या वाळूमय तळावरून एकत्र पोहत असलेल्या पाच स्पॉटेड (ठिपकेदार) ईगल रे माशांचं हे सुंदर छायाचित्र काढले आहे.
हे मासे अनेकदा एकत्र फिरून शिकार शोधतात. वाळूत लपलेले छोटे शिंपले आणि इतर समुद्री जीव शोधण्यासाठी ते शरीरातील विशेष संवेदनाचा (इलेक्ट्रोसेप्टर्स) वापर करतात.
पिल्लांना तोंडात ठेवून सांभाळणारा
इंडोनेशियामधील मावली येथे सुलिमान अलातिकी यांनी हे जवळून टिपलेलं (क्लोज-अप) सुंदर छायाचित्र काढलं आहे. यात एक नर बांग्गाई कार्डिनलफिश नुकतीच जन्मलेली पिल्लं आपल्या तोंडात ठेवून त्यांची काळजी घेताना दिसत आहे. तो तब्बल 10 दिवस तोंडात पिल्लांना ठेवतो आणि या काळात तो काहीही खात नाही.
पिल्लांना तोंडात ठेवून त्यांचं संरक्षण करण्याच्या या खास पद्धतीमुळे त्यांना शिकारी प्राण्यांपासून सुरक्षित ठेवता येतं. पिल्लं स्वतः जगण्याइतकी सक्षम होईपर्यंत नर मासा त्यांची अशा प्रकारे काळजी घेताना दिसतो.
हजारो लॉब्स्टरचं घर
फ्रान्सेस्का पेज यांनी टिपलेल्या या छायाचित्रातील हजारो अतिशय छोट्या आणि नाजूक लॉब्स्टरच्या पिल्लांना दरवर्षी यूकेमधील पॅडस्टो येथील नॅशनल लॉब्स्टर प्रजनन केंद्रामध्ये (हॅचरी) वाढवलं जातं.
समुद्रामध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या 20 हजार पिल्लांपैकी केवळ एकच लॉब्स्टर प्रौढ होऊ शकतो. पण, अशा हॅचरीमध्ये वाढवलेल्या पिल्लांच्या प्रौढ होऊन प्रजनन करण्याच्या वयापर्यंत जगण्याची शक्यता सुमारे हजार पट जास्त असते.
डेन्मार्कच्या राज्याचा भाग असलेल्या आणि स्वायत्त प्रशासन असलेल्या फॅरो बेटांवर एका शिकाऱ्याने पायलट व्हेलला मारलं. कार्स्टन मिशेल्स यांनी हे छायाचित्र काढलं आहे.
'ग्रिंडाड्रॅप' या पारंपरिक पद्धतीत पायलट व्हेलच्या कळपांना समुद्रकिनाऱ्यावर हाकलून आणलं जातं आणि त्यांची शिकार केली जाते.
व्हेलची अत्यंत कमी प्रमाणात केली जाणारी शिकारही समुद्राच्या खोल भागातील पर्यावरणावर मोठा परिणाम करू शकते. कॅथरीन लॅथम यांच्या या लेखातून याबद्दल अधिक जाणून घ्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)