भारतातून अमेरिकेच्या शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची? 'हे' आहेत नियम

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणारे अनेकदा हा प्रश्न विचारतात. याचं उत्तर होय किंवा नाही असू शकतं. मात्र त्यासाठी आपण काही मूलभूत आणि कायदेशीर बाबी समजून घेतल्या पाहिजेत.

भारतातून परदेशात गुंतवणूक करण्यासाठीची कायदेशीर चौकट काय आहे?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय, भारतीय नागरिकांना जागतिक पातळीवर गुंतवणूक करण्याची परवानगी देतं. भारतीयांकडून परदेशात केली जाणारी गुंतवणूक फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) आणि लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस)च्या अंतर्गत निंयत्रित केली जाते.

एलआरएसअंतर्गत कोणताही भारतीय रहिवासी दर आर्थिक वर्षात 2,50,000 डॉलरपर्यंतची रक्कम परदेशात पाठवू शकतो. यात परदेशातील शेअर्समधील गुंतवणुकीचादेखील समावेश आहे. अर्थात ही रक्कम आरबीआयच्या नियम-कायद्याअंतर्गत पाठवली गेली पाहिजे.

परदेशात गुंतवणूक करण्यासाठीचे नियम

परदेशात गुंतवणूक करण्यासाठी आरबीआयनं नियम बनवले आहेत. त्यांची विभागणी मुख्यत: दोन श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिली ओव्हरसीज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (ओडीआय) आणि दुसरी ओव्हरसीज पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट.

ओव्हरसीज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (ओडीआय): सर्वसाधारणपणे बिगर-नोंदणीकृत परदेशी कंपन्यांच्या इक्विटी किंवा शेअर्स खरेदी करण्याला ओव्हरसीज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात. एखाद्या गुंतवणुकदाराची एखाद्या लिस्टेड म्हणजे नोंदणीकृत परदेशी कंपनीत 10 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी असेल, तर अशा प्रकारांचादेखील यात समावेश आहे.

ओव्हरसीज पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट: यामध्ये, जी इक्विटी गुंतवणूक ओडीआयच्या श्रेणीत येत नाहीत, त्यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ, नोंदणीकृत परदेशी कंपन्यांमध्ये 10 टक्क्यांहून कमी भागीदारी विकत घेणं किंवा नियंत्रित आंतरराष्ट्रीय फंड्स (रेग्युलेटेड इंटरनॅशनल फंड्स)मध्ये गुंतवणूक करणं.

अमेरिकेच्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात का?

मग तुम्हाला थेट टेस्ला किंवा ॲपलसारख्या अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात का?

ओव्हरसीज पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट नियमांअंतर्गत तुम्ही परदेशी ट्रेडिंग अकाउंट उघडून टेस्ला, ॲपल किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करू शकता. मात्र त्यासाठी काही अटी आहेत.

कोणत्याही परदेशी कंपनीत तुमची भागीदारी सर्वसामान्यपणे 10 टक्क्यांपेक्षा कमी असली पाहिजे (सर्वसाधारणपणे रिटेल म्हणजे सर्वसामान्य गुंतवणुकदारांची यापेक्षा कमी गुंतवणूक किंवा भागीदारी असते). दुसरी अट म्हणजे गुंतवणुकदार कंपनीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी एलआरएसअंतर्गत वैध बँकिंग चॅनल म्हणजे माध्यमांचा वापर करणं आवश्यक असतं.

भारतातून परदेशातील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

परदेशातील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त एकच मार्ग नाही. तुम्ही तुमची सुविधा, गुंतवणूक रक्कम आणि अनुभवाच्या आधारे पर्याय निवडू शकतात.

आंतरराष्ट्रीय ब्रोकरद्वारे गुंतवणूक

हा सध्याच्या काळातील सर्वात लोकप्रिय पद्धत किंवा मार्ग आहे. असं करण्यासाठी तुम्हाला पुढील पावलं उचलावी लागतील.

अमेरिकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देत असलेल्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट सुरू करा. एलआरएसअंतर्गत परदेशात पैसे ट्रान्सफर करा आणि रुपयाचं रुपांतर डॉलरमध्ये करा. अनेक भारतीय फिनटेक प्लॅटफॉर्मनी परदेशी ब्रोकर्सबरोबर भागीदारी करून जागतिक पातळीवर गुंतवणूक करणं सोपं केलं आहे. या फिनेटक प्लॅटफॉर्म्समुळे अकाउंट सुरू करणं, फंड ट्रान्सफर करणं आणि कॉम्प्लायन्स प्रोसेस म्हणजे अनुपालनाची प्रक्रिया सोपी झाली आहे. जे गुंतवणुकदार नव्यानंच गुंतवणूक करत आहेत आणि ज्यांना गुंतागुंतीची प्रक्रिया टाळायची आहे, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे.

भारतीय लोक परदेशी कंपन्यांच्या एम्प्लॉयी स्टॉक्स ऑप्शन प्लॅन म्हणजे ईसॉप्समध्ये गुंतवणूक करू शकतात. जर ते त्या कंपनीच्या भारतीय शाखेत किंवा अशा एखाद्या भारतीय कंपनीत काम करत असतील ज्यामध्ये परदेशी कंपनीची भागीदारी असेल तर अशी गुंतवणूक करता येते.

ईसॉप्सकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं. त्यांना आरबीआयनं प्रतिबंधित केलेल्या सेक्टर्समध्ये देखील परवानगी मिळू शकते आणि त्यांच्यावर 10 टक्क्यांची मर्यादा लागू होत नाही.

परदेशात गुंतवणूक करण्याआधी कर प्रणाली समजून घेणंदेखील महत्त्वाचं आहे. इक्विटी म्हणजे शेअर्समधून होणारा फायदा कॅपिटल गेन टॅक्सअंतर्गत येतो. तर डिव्हिडंड म्हणजे लाभांश आणि व्याज 'इतर स्त्रोतांपासूनचं उत्पन्न' या निकषांअंतर्गत करपात्र असतात. सर्व परदेशी मालमत्तेची माहिती प्राप्तिकर परताव्यात (इन्कम टॅक्स रिटर्न्स) देणं आवश्यक असतं. नियमांचं पालन न झाल्यास दंड होऊ शकतो.

आता प्रश्न निर्माण होतो की तुम्ही परदेशी शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी का?

जागतिक पातळीवरील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय तुमच्या वित्तीय उद्दिष्टांवर अवलंबून असतो. अर्थात गुंतवणुकीसंदर्भातील कोणताही निर्णय घेण्याआधी गुंतवणूक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं नेहमीच श्रेयस्कर ठरतं. तुम्हाला गुंतवणुकीत वैविध्य आणत चांगले फायदे मिळवता यावेत यासाठी गुंतवणुकीशी संबंधित जोखीम योग्यप्रकारे समजून घेणं आवश्यक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)