स्मित मच्छरवर हल्ला करणारा पायलट कोण? ओमान एयरमधून हटवलं असूनही तो तिथं कसा आला?

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात भारतीय कॅप्टनवर हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा आरोप ज्या सह-पायलटवर होत आहे, त्याच्याबाबत आता अनेक नवी माहिती समोर येत आहे.

तो सह-पायलट विमान कोसळवण्याचा प्रयत्न करत होता,असा आरोप त्याच्यावर केला जातोय. तो ओमानचा नागरिक आहे, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.

मात्र, फ्लायदुबईनं अद्याप अधिकृतपणे सह-पायलटच्या राष्ट्रीयत्वाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

तथापि, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्याच्याविषयी विविध माहिती प्रसिद्ध केली जात आहे.

"सह-पायलट ओमानचा नागरिक आहे. ओमान एयरने त्याला सुरक्षा जोखमीचा व्यक्ती म्हणून ओळखलं होतं आणि त्याला विमान उडवण्यास बंदी घातली होती.", असं एबीसी न्यूजनं म्हटलंय.

एबीसी न्यूजच्या माहितीनुसार, "2024 मध्ये ओमान एयरमध्ये प्रशिक्षणार्थी सह-पायलट म्हणून काम करत असताना हमाम अल-हमामी याच्याकडे अतिरेकी विचारसरणीशी संबंधित साहित्य आढळलं होतं. सूत्रांच्या मते, त्यानंतरही त्याला प्रशासकीय भूमिकेत काम सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती."

एबीसी न्यूजने पुढे म्हटलं आहे की, "तपास अधिकारी आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की संशयित हल्लेखोराला नंतर फ्लायदुबईसाठी उड्डाण करण्याची परवानगी कशी मिळाली आणि तो इस्रायलला जाणाऱ्या विमानाच्या कॉकपिटमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कसा पोहोचला."

सूत्रांच्या मते, अल-हमामीला गुरुवारी सौदी अरेबियातून संयुक्त अरब अमिरातीत आणण्यात आलं.

तो अधिकाऱ्यांसोबत "सहकार्य" करत आहे आणि त्याने विमान इस्रायलमध्ये कोसळवण्याचा उद्देश असल्याचे संकेत दिले आहेत, असं तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.

फ्लायदुबई, ओमान एयर आणि ओमानच्या दूतावासातील प्रतिनिधींनी एबीसी न्यूजच्या प्रतिक्रियेच्या विनंतीला तातडीनं उत्तर दिलेलं नाही.

हल्लेखोर सह-पायलट यापूर्वी कुठे काम करत होता?

फ्लायदुबईनं शुक्रवारी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीनं एक निवेदन जाहीर केलं. अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार तेल अवीवसाठीची उड्डाणं पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत, असं त्यात म्हटलं होतं.

निवेदनात असंही सांगण्यात आलं की, "संबंधित अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि फ्लायदुबईच्या पूर्ण सहकार्याने अधिकृत तपास सुरू आहे."

एक मोठी दुर्घटना टळली, कारण विमानाचे कॅप्टन स्मित मच्छर यांनी हल्लेखोराला प्रतिकार केला आणि अनेक प्रवाशांनी त्याला आवर घातला. या दरम्यान हल्लेखोरानं विमान झपाट्यानं खाली आणण्यास सुरुवात केली होती.

वॉल स्ट्रीट जर्नलनेही आपल्या वृत्तात हेच म्हटलं आहे. त्यांच्या वृत्तानुसार, "बंदी असूनही त्या पायलटला फ्लायदुबईनं नोकरी दिली. त्याला यूएई आणि इस्रायलदरम्यानच्या संवेदनशील मार्गावर उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. तपासाशी संबंधित इतर व्यक्तींनी सांगितलं की कथित हल्लेखोर ओमानचा नागरिक असून त्याचं नाव हमाम अल-हमामी आहे."

त्यांच्यानुसार, ओमाननं पायलटच्या वाढत्या कट्टरतावादाबाबतच्या चिंता इतर देशांशी किंवा विमान कंपन्यांशी शेअर केल्या होत्या की नाहीत, हे स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या कथित कट्टरतेचं स्वरूपदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, या घटनेचा तपास यूएईच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यूएईच्या एका प्रवक्त्यानं ओमानमधील त्याच्या पूर्वीच्या नोंदींबाबत भाष्य करण्यास नकार दिला. तपासावर परिणाम होऊ नये आणि पूर्वग्रह निर्माण होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

शुक्रवारी यूएईचे राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ राजनैतिक सल्लागार अन्वर मोहम्मद गर्गाश यांनी प्रथमच या कथित विमान अपहरणाच्या प्रयत्नाला दहशतवादी कृत्य म्हटलं.

गर्गाश यांनी एक्सवर लिहिलं, "पायलट स्मित मच्छर यांची कृती प्रशंसनीय आहे. गंभीर दहशतवादी धोका आणि संभाव्य आपत्तीसमोर त्यांनी धैर्य आणि जबाबदारीनं उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली."

त्यांनी पुढे म्हटलं, "घटनांचं अतिसुलभीकरण किंवा कटकारस्थानाच्या सिद्धांतांचा प्रसार करण्याऐवजी अतिरेकी विचारसरणी आणि दहशतवादाच्या धोक्यांविषयी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे."

"हल्लेखोराचा इस्लामी कट्टरतावादाकडे कल झाला होता. विमानातील प्रवाशांसह विमान कोसळवण्याच्या उद्देशानं तो विमानात चढला होता", असं नेतान्याहू म्हणाले होते.

सुरक्षेतील गंभीर त्रुटी?

हवाई वाहतूक सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटलंय की ही घटना सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर उणीव दाखवणारी आहे.

त्यांच्या मते, तपास प्रक्रियेमधील एखाद्या त्रुटीमुळे शस्त्र विमानापर्यंत पोहोचू शकतं, परंतु हल्ल्याचा हेतू असलेल्या व्यक्तीची ओळख विमानतळापर्यंत पोहोचण्याआधीच पटायला हवी होती आणि त्याला थांबवायला हवं होतं.

उड्डाणादरम्यान नेमकं काय घडलं याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. हल्लेखोर ओमानचा नागरिक होता, पण त्याची इतर ओळख अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही, असं नेतान्याहू म्हणाले आहेत.

त्याने हे कृत्य एकट्याने केलं की इतर कुणाच्या मदतीने, याचाही तपास इस्रायल करत आहे.

शुक्रवारी कॅप्टन स्मित मच्छर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं की दुसरा पायलट त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत असताना त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला.

त्यांनी सांगितलं, "त्या वेळी मी माझा जीव वाचवण्यासाठी झुंज देत होतो. मी इतका गंभीर जखमी झालो होतो की खाली पडलो. मला आठवतंय, मी विचार करत होतो की जर मी पुन्हा उठू शकलो नाही तर काय होईल. मला माहिती होतं की मला फक्त दरवाजापर्यंत पोहोचायचं आहे. मग मी दरवाजा उघडला आणि लोक आत आले."

विमानाचे कॅप्टन आणि सह-पायलट यांना गुरुवारी सौदी अरेबियातून यूएईमध्ये आणण्यात आलं. हल्लेखोराची चौकशी व्हावी अशी इस्रायलची अपेक्षा आहे.

CNN च्या वृत्तातील नवी माहिती

अमेरिकन वृत्तसंस्था CNNने आपल्या वृत्तात म्हटलंय, "फ्लायदुबईच्या विमानातील कॅप्टनवर हल्ला करणाऱ्या संशयित पायलटला ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीतून त्याच्या अतिरेकी विचारांबाबतच्या चिंतेमुळे काढून टाकण्यात आलं होतं."

CNN च्या माहितीनुसार, "त्या पायलटचं नाव हमाम अल-हमामी असून तो ओमानचा नागरिक आहे. त्याचा जन्म संयुक्त अरब अमिरातीत झाला. त्याचे वडील ओमानी तर आई सीरियन आहे. त्यानं आयुष्याची अनेक वर्षं यूएईमध्ये घालवली आहेत."

एका इस्रायली अधिकाऱ्यानं आणि सौदी अरेबियाच्या सरकारी माध्यमांनीही त्याची ओळख स्पष्ट केल्याचा दावा CNN ने केला आहे.

CNN च्या वृत्तानुसार, हमाम अल-हमामीच्या नावानं असलेल्या लिंक्डइन प्रोफाइलमधील माहितीनुसार त्याने ओमान एयरमध्ये सात वर्षं काम केलं. फेब्रुवारी 2025 मध्ये त्याने ती नोकरी सोडली. त्यानंतर जून 2025 मध्ये त्याने रॉयल एअर मॅरोकमध्ये काम सुरू केलं आणि जानेवारी 2026 मध्ये तिथून बाहेर पडला.

त्या प्रोफाइलमध्ये फ्लायदुबईचा कोणताही उल्लेख नव्हता. एका सूत्रानं ते प्रोफाइल या प्रकरणातील पायलटचंच असल्याची पुष्टी केली होती. त्यानंतर ते प्रोफाइल हटवण्यात आलं.

CNN च्या वृत्तानुसार, एका प्रादेशिक राजकीय सूत्रानं सांगितलं की, कट्टरतावादी विचारसरणीबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर त्याला उड्डाण प्रशिक्षणातून हटवण्यात आलं होतं आणि ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीत दुसऱ्या भूमिकेत नेमण्यात आलं होतं.

लिंक्डइनवरील पोस्टमधून काय समोर आलं?

CNN नुसार, त्या लिंक्डइन प्रोफाइलवर फक्त दोन पोस्ट होत्या आणि त्या दोन्ही घटना घडल्यानंतर सुमारे नऊ तासांनी प्रकाशित करण्यात आल्या होत्या.

पहिल्या पोस्टमध्ये बोइंग 737 मॅक्स विमानाच्या कॉकपिटमधून चित्रीत केलेल्या अनेक व्हीडिओ क्लिप होत्या. या घटनेतील विमान फ्लायदुबईचं 737 मॅक्स 8 मॉडेल होतं.

एका क्लिपमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या इस्रायली विमान कंपनी एल अलच्या विमानावर झूम केल्याचं दिसत होतं.

व्हीडिओतील कॉकपिट स्क्रीनवर OMA624 हा उड्डाण क्रमांक आणि 11 ऑक्टोबर 2023 ही तारीख दिसत होती. हा उड्डाण क्रमांक सामान्यतः दुबई-मस्कत मार्गावरील उड्डाणासाठी वापरला जातो. ती तारीख तो ओमान एयरमध्ये कार्यरत असलेल्या काळाशी जुळते.

इतर क्लिपमध्ये एल अलची आणखी काही विमानं तसेच इस्रायली विमान कंपनी अर्कियाची विमानंही दिसत असल्याचं CNN ने म्हटलं आहे.

ओमानी नागरिकाला परवानगी कशी मिळाली?

इस्रायलला मान्यता न देणाऱ्या ओमानचा एक नागरिक तेल अवीवला जाणाऱ्या विमानात पायलट म्हणून कसा कार्यरत होता? यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यूएईची सरकारी वृत्तसंस्था WAMनुसार, या घटनेच्या तपासाचा अधिकार यूएईकडे आहे. कारण संबंधित विमानाची नोंदणी यूएईमध्ये झाली आहे. यूएईच्या कायद्यानुसार, यूएईमध्ये नोंदणीकृत विमानांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर, ते देशाबाहेर घडले असले तरी, यूएईचाच कायदा लागू होतो.

बुधवारी उशिरा रात्री इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी CNN चे पत्रकार जिम स्कियूटो यांच्याशी बोलताना सांगितलं की, विमानाला आपत्कालीन परिस्थितीत वळवून सौदी अरेबियात उतरवण्यात आल्यानंतर तिथेच हल्लेखोराची चौकशी करण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की या तपासात इस्रायलचाही सहभाग होता.

नेतान्याहू म्हणाले, "मी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांनी इस्रायललाही चौकशीत सहभागी करून घेण्यास सहमती दर्शवली होती."

संशयित ओमानी पायलट विमानात कसा पोहोचला, असा प्रश्न विचारल्यावर नेतान्याहू म्हणाले की, ज्या देशांचे इस्रायलसोबत राजनैतिक संबंध नाहीत, त्या देशांतील पायलटांना साधारणपणे इस्रायलमध्ये उड्डाण करण्याची परवानगी दिली जात नाही.

ते पुढं म्हणाले, "स्पष्टपणे सांगायचं तर, या प्रकरणात नियमांच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिली होती. आम्ही आता ती दुरुस्त करत आहोत. या प्रक्रियेत अमिराती सरकारचं पूर्ण सहकार्य मिळत आहे. अशी घटना पुन्हा घडू नये, याची खात्री करण्याची आमची दोघांचीही इच्छा आहे."

यूएईच्या उलट ओमाननं अजूनही इस्रायलसोबत औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेले नाहीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)