कॉक्रोच जनता पार्टीचं 21 मिलियन फॉलोवर्स असलेलं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक, दिपके यांना धमक्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मागच्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी फॉलोवर्स कमावलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स खात्यावरून ही घोषणा करण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेसला पिछाडीवर सोडून कॉक्रोच जनता पार्टीने दोन कोटी फॉलोवर्सचा टप्पा पार केला होता.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स हॅन्डलला भारतात बंद करण्यात आलं होतं. काही कायदेशीर बाबींमुळे हे अकाउंट भारतात बंद केल्याची माहिती एक्सवर देण्यात आली होती.

त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी @CockroachisBack या नावाने दुसरं अकाउंट काढलं. त्यावरही तब्बल 1 लाख 95 हजार लोकांनी त्यांना फॉलो केलं होतं. त्याच खात्यावर 21 मिलियन फॉलोवर्स असलेलं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यूट्यूबर मेघनाद यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये असं म्हटलं आहे की, कॉक्रोच जनता पार्टीचं इन्स्टाग्रामअकाउंट बंद झालं आहे.

अभिजित दिपके सध्या लॉगिन करू शकत नाहीयेत. त्यामुळे हे अकाउंट बंद होऊ शकतं. हे अकाउंट बंद झालं तरी कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांना मी आवाहन करतो की त्यांनी शांत राहावं. सरकार या पार्टीवर खूप नाराज झालं आहे."

जीवे मारण्याच्या धमक्या?

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना धमक्या आल्याचा दावा केला आहे. त्यांनी काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले असून, त्यामध्ये त्यांचा पत्ता विचारण्यात आल्याचं दिसतं.

तसेच, "तू तुझं अकाउंट बंद करून आमच्या पक्षात ये. तुला पैसे देऊ. नाहीतर अमेरिकेतच तुला मारून टाकू," अशा आशयाचे इंग्रजी संदेश आल्याचा दावाही दिपके यांनी केला आहे.

याआधी देशातील काही ठिकाणी 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या नावाने आंदोलनांची घोषणा करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

मात्र, अशा कोणत्याही आंदोलनाचं आवाहन आम्ही केलेलं नसल्याचं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं.

कुटुंबाला धमक्या

अभिजीत दिपके यांनी त्यांच्या त्याच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक तरुण त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाबद्दल अपमानजनक टिप्पणी करताना दिसत आहे.

अभिजीत यांनी लिहिलंय की, त्याच्या कुटुंबाला अजूनही धमक्या मिळत आहेत. या धमक्यांविरोधात प्रशासन काही कारवाई करेल का, असा प्रश्न अभिजीतने विचारला आहे.

अभिजित दिपके यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "माझ्या पालकांना माध्यमांशी बोलण्याची सवय नाही. काही माध्यमांनी त्यांच्या मुलाखती प्रसारित केल्यानंतर माझ्या अडचणी वाढल्या आहेत. मला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. सध्या मी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. पण अजूनही मला धमक्या येतच आहेत."

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अभिजित दिपके यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. "हा माझा निर्णय आहे. माझ्या कुटुंबाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मला त्यांच्या सुरक्षिततेची भीती वाटत आहे," असं त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

तसेच, "कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी शांत राहावं. आम्ही कोणत्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही," असं दिपके यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटलं आहे.

23 मे रोजी पोस्ट केलेल्या त्या व्हिडिओमध्ये दिपके म्हणतात, "मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. काही ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने आंदोलन होणार असल्याच्या बातम्या मी वाचल्या.

मात्र, आम्ही अशा कोणत्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही. सध्या आम्ही कोणतंही आंदोलन करणार नाही. आम्ही जे काही करू, ते पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने करू.

कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांना माझी विनंती आहे की, घाईघाईत असं कोणतंही पाऊल उचलू नका ज्यामुळे आपल्या चळवळीचं नुकसान होईल. सरकार फक्त आपल्या एका चुकीची वाट पाहत आहे.

त्यांना आपली चळवळ थांबवण्याचं कारण देऊ नका. ही मोठी लढाई आहे आणि त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

आम्ही कोणत्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही. आमचे विरोधक अशा आंदोलनांमध्ये त्यांची माणसं घुसवून काहीही करू शकतात.

काही ठिकाणी आंदोलनांची घोषणा झाली असली, तरी त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्ही लोकशाही आणि शांततेच्या मार्गानेच पुढे जाणार आहोत. हिंसेला आम्ही कधीही समर्थन देणार नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.