You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सिद्धिविनायक मंदिराचे 18 कोटी रुपये गायब', राज ठाकरेंनी वाचून दाखवलेल्या 'त्या' पत्रात काय म्हटलंय?
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी तब्बल 18 कोटीं रुपयांचं नुकसान होत असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केला.मंदिर प्रशासनानं मात्र राज ठाकरे यांचा आरोप फेटाळला आहे.
"विद्यार्थ्यांना सरकारवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणून ते देवळात जाणार तर त्या देवळातच चोरी सुरु आहे, या मुलांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?" असा प्रश्न त्यांनी या कार्यक्रमात विचारला होता.
हा दावा करताना त्यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यासानं तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेले एक पत्रही वाचून दाखवले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून मंदिर प्रशासन आणि विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत.
राज ठाकरे यांनी वाचून दाखवलेल्या पत्रानुसार, दानपेटीतील पैसे चोरणारे काही कर्मचारी पकडण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या कथित पत्रात म्हटले आहे की, संबंधित कर्मचारी पकडण्यापूर्वी मंदिराच्या दानपेट्यांमधून आठवड्याला 50 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा होत होती. मात्र, हे कर्मचारी पकडल्यानंतर आठवड्याची जमा रक्कम 1.5 कोटींवर पोहोचली. त्यामुळे यापूर्वी दानपेट्यांमध्ये जमा होणाऱ्या रकमेतील काही हिस्सा लंपास होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
या तफावतीमुळे मंदिराचे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे नुकसान होत असावे, असा संशय पत्रात नोंदवण्यात आला असून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
या दाव्यावर स्पष्टीकरण देताना सिद्धिविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांचा आरोप फेटाळून लावला.
"तुमच्याकडे जे पत्र आहे, त्यात 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा कोणताही उल्लेख नाही. सध्या मंदिराला दरमहा सुमारे 98 लाख रुपये दान मिळते, तर यापूर्वी सुमारे 45 लाख रुपये मिळत होते. या दोन आकड्यांतील तफावत वर्षभरासाठी मोजल्यास ती अंदाजे 18 कोटी रुपये होते. हा फरक का निर्माण झाला, पूर्वी दान इतके कमी का जमा होत होते, दानपेट्यांमध्ये काही त्रुटी होत्या का, याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही पत्र पाठवले होते," असे त्यांनी सांगितले.
सरवणकर पुढे म्हणाले, "ज्या व्यक्ती चोरीप्रकरणात सहभागी असल्याचा संशय होता त्यांना पकडण्यात आले आहे. ज्या-ज्या प्रकरणांमध्ये संशय निर्माण झाला त्या सर्व ठिकाणी आम्ही योग्य ती कारवाई केली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रत्यक्ष चोरीची रक्कम म्हणून पाहू नये. चौकशीनंतरच नेमके सत्य समोर येईल."
दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर प्रकरणातील काही संशयित आरोपी ठाकरे गटाशी संबंधित असल्याचा आणि त्यांना स्थानिक नेत्यांनी कामावर ठेवल्याचा आरोपही सदा सरवणकर यांनी केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "या ज्या गोष्टीबद्दल मला माहिती नाही, त्यावर मी बोलणार नाही. हा तांत्रिक मुद्दा आहे आणि मी या विषयाच्या खोलात गेलेलो नाही, त्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर माहिती नाही."
भाजप आमदार राम कदम यांनी सांगितलं की, "ज्या व्यक्तींना अटक झाली आहे, त्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणातील प्रत्येक पैलूची तपासणी होईल. कोणत्याही गैरकृत्याला समर्थन देता येणार नाही आणि सरकार यावर कठोर कारवाई करेल. ट्रस्टी आणि प्रशासन काय सांगत आहेत, याचीही तपासातून पडताळणी होईल. सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल."
शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना, "मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी चोरी झाल्याचं म्हटलं आहे. आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईल आणि अहवाल समोर येईल. ज्यांनी चोरी केली आहे त्यांच्यावर कारवाई होईल. ज्या कार्यकर्त्यांची नावे समोर आली आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संबंधित असून त्यांची नियुक्ती त्यांच्या कार्यकाळात झाली होती," असा दावा केला.
काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. "राज ठाकरे अनेकदा काही तथ्यांच्या आधारेच बोलतात. यापूर्वीही त्यांनी विविध विषयांवर घेतलेल्या भूमिका तथ्याधारित होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. मंदिरांमधील आर्थिक व्यवहारांमध्ये कोणताही गैरप्रकार होत असेल तर तो थांबवला गेला पाहिजे," असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून भाजपवर टीका केली. "नाशिक महाकुंभ असो, सिद्धिविनायक मंदिर असो किंवा देशातील इतर धार्मिक संस्थांचे व्यवहार असोत, भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. कुठेही गैरव्यवहार झाला असेल तर तो उघडकीस आणला गेला पाहिजे," असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या विधानानंतर मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण, चौकशीची मागणी आणि विविध राजकीय प्रतिक्रिया समोर आल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. आता पोलीस तपास आणि अधिकृत चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)