'विशीतच नसबंदी केली, आजही त्या निर्णयाचा मला अजिबात पश्चात्ताप नाही'

    • Author, जॉर्ज सँडमन
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

ॲलेक्स वेस्टच्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी त्याच्या पत्नीला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे तो आतून खूप हादरून गेला होता. दुसऱ्या बाळाच्या प्रसूतीवेळी मात्र सर्वकाही सुरळीत पार पडावं, अशी त्याला आशा होती.

दुसऱ्या बाळाची प्रसूतीची प्रक्रिया त्याच्या पत्नीसाठी व्यवस्थित पार पडली. परंतु, ॲलेक्ससाठी मात्र तसं घडलं नाही.

"मला अचानक घाबरल्यासारखं झालं, मला पॅनिक अटॅक आला. मी पूर्णपणे कोलमडून पडलो. जे काही घडलं होतं, ते मी स्वीकारूच शकलो नव्हतो," असं ॲलेक्स सांगतो.

पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी पत्नीला झालेल्या त्रासाचा धक्का ॲलेक्स अजूनही विसरू शकला नव्हता. त्यानंतर त्याला प्रसूतीनंतरचा नैराश्याच्या (पोस्टनॅटल डिप्रेशन) समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे आपल्याला 4 मुलं असावीत, हा दोघांचा आधीचा विचार त्यांनी बदलला.

तो सांगतो की, दोन मुलांच्या जन्मानंतरचे काही महिने त्याच्या आयुष्यासाठी खूप 'उदास' गेले. आयुष्यातील आनंदच हरवल्यासारखं वाटत होतं. परंतु, आजूबाजूचे लोक मात्र त्याला सतत, वडील होणं हा आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव असतो, असंच सांगत असत.

"सर्वजण म्हणतात तसं, वडील झाल्यावर जसं प्रेम आणि जिव्हाळा वाटायला हवा, तसा आपलेपणा मला वाटत नव्हता," असं ॲलेक्स सांगतात.

तो अनुभव पुन्हा नको, म्हणून ॲलेक्स आणि त्याच्या पत्नीने दोन मुलांवरच थांबण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यात पुढाकार ॲलेक्सचाच होता. त्यामुळे गर्भनिरोधक वापरण्याची जबाबदारी 'पत्नीवर टाकणं योग्य नाही', असं त्याला वाटलं.

म्हणूनच, इंग्लंडमधील अलीकडच्या काळात हजारो पुरुषांनी जसा निर्णय घेतला, तसाच ॲलेक्सनेही नसबंदी (व्हॅसेक्टॉमी) करण्याचा निर्णय घेतला.

या प्रक्रियेत प्रत्येक वृषणातून शुक्राणू बाहेर नेणाऱ्या शुक्रवाहिन्या (व्हॅस डिफेरेन्स) कापल्या जातात आणि त्यानंतर त्या बंद (क्लॅम्प) केल्या जातात. त्यामुळे शुक्राणू वीर्यात मिसळत नाहीत. ही नलिका शुक्राणूंना मूत्रमार्गापर्यंत वाहून नेते. सामान्य भाषेत या शस्त्रक्रियेला 'स्निप' असंही म्हटलं जातं.

'एनएचएस इंग्लंड'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2024-25 या वर्षात इंग्लंडमधील रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये 26,385 पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली. 2023-24 च्या तुलनेमध्ये ही संख्या 16 टक्क्यांनी जास्त होती.

35 ते 39 वयोगटातील पुरुषांमध्ये नसबंदी करून घेण्याचे प्रमाण सर्वाधिक होतं. 2024-25 मध्ये या वयोगटातील सुमारे 8,400 पुरुषांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली होती.

मागील वर्षाच्या तुलनेत 30 वर्षांखालील पुरुषांमध्येही नसबंदी करून घेण्याचं प्रमाण थोडं वाढलं आहे. 2024-25 मध्ये इंग्लंडमध्ये 30 वर्षांखालील सुमारे 950 पुरुषांनी ही नसबंदी करून घेतली होती.

गर्भधारणेची भीती

मॉर्गेज ब्रोकर म्हणून काम करणाऱ्या ॲलेक्सने वयाच्या विशीतच नसबंदी करून घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, भविष्यात त्याचा विचार बदलू शकतो, असं सांगत एनएचएसच्या डॉक्टरांनी त्याला 30 वर्षे पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता.

मे 2024 मध्ये शस्त्रक्रियेची वेळ आल्यानंतर ॲलेक्स आणि त्याची पत्नी केंटमधील आपल्या घरातून रेल्वेने लंडनमधील दवाखान्यात गेले.

आता 33 वर्षांचा असलेला ॲलेक्स सांगतो की, "ही शस्त्रक्रिया खूप लवकर झाली आणि मला अजिबात वेदना जाणवल्या नाहीत. मी हेडफोन लावून गाणी ऐकत होतो. तीन गाणीही पूर्ण झाली नव्हती, तोपर्यंत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया झाल्याचंही सांगितलं."

"विश्वास बसणार नाही, इतक्या लवकर सर्व झालं."

आपल्याला मूल नकोय, हे आधीच ठरलं होतं असं अमेरिकेत राहणाऱ्या सॅम नाईटने सांगितलं.

"मी स्वतःला अशा परिस्थितीत आणत होतो की, कधीही मुलं होण्याची शक्यता निर्माण होऊ शकत होती. या विचारानेच मला अस्वस्थ आणि भीती वाटू लागली होती," असं सॅम सांगतो.

सॅम 22 वर्षाचा असताना त्यावेळी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेली महिला गर्भवती राहिली. तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर आपल्या आयुष्यात काहीतरी बदल करण्याची गरज असल्याचं सॅमला जाणवलं.

"माझ्यामुळे एका व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं, याची मला जाणीव झाली. अशी वेळ पुन्हा कधीही यायला नको, असं मला वाटलं."

सॅमने न्यूयॉर्कमधील एका युरोलॉजी क्लिनिकशी संपर्क साधला. ॲलेक्सप्रमाणेच त्यालाही डॉक्टरांना नसबंदी का करून घ्यायची आहे, हे समजावून सांगावं लागलं. डॉक्टरांनी त्याला ही शस्त्रक्रिया कायमस्वरूपी निर्णय समजूनच करावी, असा सल्ला दिला. कारण काही विशिष्ट प्रकरणांमध्येच ती पूर्ववत केली जाऊ शकते.

नसबंदी पूर्ववत करण्यासाठी कठोर नियम

इतक्या कमी वयातच नसबंदी करून घ्यायची असल्याने डॉक्टर कोणते प्रश्न विचारतील, याची सॅमने आधीच तयारी केली होती. 'तुम्ही अजून खूप लहान आहात, पुढे मुलं हवी असं वाटू शकतं', 'भविष्यात तुमचा निर्णय बदलला तर?', 'नसबंदी पूर्ववत करण्याची शस्त्रक्रिया महाग असते आणि ती नेहमी यशस्वी होईलच असं नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना?' असे प्रश्न डॉक्टर विचारू शकतात, याची त्याला कल्पना होती.

"डॉक्टरांनी मला सांगितलं की, त्यांनी अलीकडेच याबाबतचं आपलं मत बदललं आहे. मी जर 6 महिन्यांपूर्वी आलो असतो, तर त्यांनी मला लगेचच नकार दिला असता."

क्लिनिकशी त्याने पहिल्यांदा संपर्क साधल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांत त्याची नसबंदी झाली.

सॅमच्या डॉक्टरांनी हे प्रश्न विचारण्यामागचा उद्देश एकच होता. त्याने घेतलेला निर्णय हा विचारपूर्वक आणि आयुष्यभर टिकेल असा आहे का, याची खात्री करून घेणं.

कारण 'एनएचएस स्कॉटलंड'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 30 वर्षांखालील पुरुषांना नसबंदी केल्यानंतर पुढे त्याबद्दल पश्चात्ताप होण्याची शक्यता तुलनेने अधिक असते.

एनएचएस आणि खासगी रुग्णांना गर्भनिरोधक सेवा देणाऱ्या एमएसआय रिप्रोडक्टिव्ह चॉइसेस या संस्थेच्या वैद्यकीय संचालक आणि माजी जीपी (जनरल प्रॅक्टिशनर) डॉ. सारा साल्केल्ड सांगतात की, नसबंदी 'ही अतिशय सुरक्षित आणि प्रभावी शस्त्रक्रिया' आहे.

परंतु, नसबंदी करून घेण्यापूर्वी हा निर्णय आपल्यासाठी योग्य आहे का, याचा पुरुषांनी 'नीट विचार करावा', असा सल्ला त्या देतात.

"हा निर्णय घेण्यापूर्वी ज्यांना गरज वाटते, त्यांना आम्ही समुपदेशनाची सुविधाही देतो. त्यामुळे त्यांना आवश्यक ती सर्व माहिती मिळते आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतात."

त्या सांगतात की, एनएचएसमध्ये नसबंदी पूर्ववत करण्याची (रिव्हर्सल) शस्त्रक्रिया नियमितपणे उपलब्ध नसते. कारण त्यासाठी काही कडक अटी आणि नियम पूर्ण करावे लागतात.

एनएचएसच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांसाठी नसबंदी व्यतिरिक्तही इतर गर्भनिरोधक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये कंडोमचा वापर किंवा जोडीदाराची गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असलेल्या दिवसांमध्ये लैंगिक संबंध टाळणं किंवा कंडोम वापरणे, या पद्धतींचा यात समावेश आहे.

सॅमने डॉक्टरांना सांगितलं की, त्याला मुलं आवडतात आणि त्यांचं स्वतःचं बालपणही खूप आनंदात गेलं. पण त्याला व्हीडिओ गेमसाठी ध्वनी रचनाकार (साउंड डिझायनर) म्हणून आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं होतं.

सॅम म्हणतो, "मी माझं आयुष्य माझ्या कामासाठी वाहून घेतलेलं आहे. माझ्या मते, मुलांचं संगोपनही अशीच गोष्ट आहे, ज्यासाठी संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं. पण माझ्याकडे त्यासाठी ना पुरेसा वेळ आहे, ना माझी मानसिक तयारी आणि खरं सांगायचं तर तशी इच्छाही नाही."

आता 25 वर्षांचा असलेला सॅम सांगतो की, ज्यांना आई-वडील व्हायचं असतं, त्यांचा त्याला हेवा वाटतो. कारण त्या अनुभवात प्रेम आणि आनंद असतो, हे त्याला मान्य आहे. पण, "मी तोच आनंद संगीत, कला आणि आपल्या कामातून मिळवतो."

2024 मध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या उपचारांसाठी सॅमला एकूण सुमारे 1,200 डॉलर (सुमारे 1 लाख 14 हजार रुपये) खर्च आला. त्यावेळी त्याच्याकडे कुटुंबाचा आरोग्य विमा होता.

2022-23 मध्ये सुमारे 4 हजार पुरुषांच्या सहभागातून करण्यात आलेल्या 'नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथ'नुसार, अमेरिकेमध्ये 18 ते 29 वर्षे वयोगटातील 1 टक्क्यांपेक्षाही कमी पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. सॅम हा त्यापैकीच एक आहे.

नसबंदी करून घेण्याचं प्रमाण चाळीशीच्या उत्तरार्धातील पुरुषांमध्ये सर्वाधिक होतं. या वयोगटातील 15 टक्के पुरुषांनी आपण ही शस्त्रक्रिया करून घेतल्याचं सांगितलं.

पालक होण्याचा निर्णय आणि आव्हानं

नसबंदीनंतर आठवडाभराने सॅमला एकदा खूप तीव्र वेदना झाल्या. डॉ. साल्केल्ड यांच्या मते, हा या शस्त्रक्रियेचा दुर्मीळ दुष्परिणाम आहे. पण, काही तासांतच त्याच्या वेदना कमी झाल्या.

पण, या अनुभवामुळे इतर पुरुषांनी नसबंदी करण्यापासून परावृत्त होऊ नये, असं सॅमला वाटतं. तो म्हणतो, "एकंदरीत, या शस्त्रक्रियेवर केलेला खर्च आणि झालेला त्रास दोन्हीही योग्य होते."

याविषयावर आमच्याशी संवाद सांधलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितलं की, पालकत्वातील जबाबदाऱ्या, त्यासाठी करावे लागणारे त्याग आणि भविष्यात मुलांचं आयुष्य कसं घडेल, याची अनिश्चितता यामुळे त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षीच नसबंदी करून घेण्याचा निर्णय घेतला.

केंटमध्ये राहणाऱ्या ॲलेक्स आणि त्याच्या पत्नीला नसबंदी हा गर्भनिरोधाचा सर्वात योग्य आणि प्रभावी पर्याय वाटला.

अ‍ॅलेक्सला कुटुंब वाढवायचं नाही, हे लक्षात घेऊन दोघांनी अनेक महिने विचार करून हा निर्णय घेतला.

"मला माझी मुलं खूप आवडतात. आता तर ती माझ्यासोबत फुटबॉल खेळण्याइतकी मोठी झाली आहेत," असं ॲलेक्सने म्हटलं.

"जर मी कुटुंबात आणखी भर घातली असती, तर तो माझ्यासाठी योग्य निर्णय ठरला नसता."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.