एक मृतदेह, चार देश आणि 16 वर्षांचं गूढ; इव्हा पेरोन यांच्या मृतदेहाची थरारक गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फियोना मॅकडोनाल्ड
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
अर्जेंटिनाचे माजी राष्ट्राध्यक्ष हुआन पेरोन यांच्या पत्नी इव्हा पेरोन यांचं जुलै 1952 मध्ये निधन झालं. या घटनेच्या 60 वर्षांनंतर बीबीसीनं त्यांचा मृतदेह गूढरित्या बेपत्ता होण्याबाबत आणि जगभरातील त्याच्या 16 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला.
इव्हा पेरोन यांचा 26 जुलै 1952 रोजी मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच डॉ. पेड्रो आरा कामाला लागले होते. ते स्पेनमधले प्रख्यात शरिररचनाशास्त्रज्ञ होते. इव्हा पेरोन यांच्या मृतदेहातं एम्बामिंग म्हणजेच तो मृतदेह दीर्घकाळ जतन करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्याची जबाबदारी आली होती.
रशियानं ज्याप्रकारे लेनिन आणि स्टॅलिन यांचे मृतदेह जतन केले होते, तशाचप्रकारे इव्हा यांचा मृतदेह जतन करण्यात येणार होता.
'इव्हिटा' असं प्रेमानं संबोधलं जाणाऱ्या इव्हा यांचा मृतदेह कामगार मंत्रालयाच्या इमारतीत ठेवलेला होता. तिथं कामगारांचं एक स्मारक उभारलं जाणार होतं आणि त्याच्या जवळच खालच्या बाजूला काचेच्या शवपेटीत (कॉफिन) त्यांना कायम ठेवलं जाईल, अशी योजना होती.
(इशारा: या लेखातील काही गोष्टी तुम्हाला विचलित करू शकतात.)
अवघ्या तीन वर्षांनंतर सप्टेंबर 1955 मध्ये लष्करानं उठाव केला आणि राष्ट्राध्यक्ष हुआन पेरोन यांची सत्ता गेली. त्यांना देश सोडावा लागला आणि निर्वासित म्हणून राहावं लागलं.
सत्तेत आलेल्या नवीन सरकारनं इव्हा पेरोन यांचा मृतदेह चोरायचं ठरवलं आणि तिथूनच या मृतदेहाच्या एका अत्यंत भयावह आणि गूढ अशा 16 वर्षांच्या प्रवासाची सुरुवात झाली.
मृत्यूनंतर 'प्रतीक' बनवण्याचा प्रयत्न
हा मृतदेह आधी लष्कराच्या गुप्तहेर विभागाच्या कार्यालयात ठेवला गेला. नंतर एका व्हॅनमध्ये लपवून ठेवला. पुढं इटलीतील मिलान शहरात गुप्तपणे दफन करण्यात आला आणि स्पेनच्या माद्रिदलाही नेला.
अखेर अंतिम ब्युनस आयर्समध्ये आणला गेला आणि अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या ठिकाणी तो दफन करण्यात आला.
इव्हा पेरोन यांचं वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी गर्भाशयाच्या कर्करोगानं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या मृतचं जतन करण्यामागं असलेल्या राजकीय कारणांचा खुलासा त्यांच्या पतीनं केला होता.
अत्यंत हलाखीची ग्रामीण पार्श्वभूमी आणि 'फर्स्ट लेडी' म्हणून त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळं कामगार वर्गाकडून त्यांना उदंड पाठिंबा मिळाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
पेरोनवादाच्या (Peronism) इतिहासकार फ्लेव्हिया फियोरुची यांनी 2012 मध्ये बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "लोकांचा पाठिंबा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना इव्हा यांचा मृतदेह जतन करून ठेवायचा होता. शिवाय पेरोन आणि पेरोनवादामध्ये 'प्रतिकांना' (Symbols) महत्त्वं होतं आणि इव्हिटा या असंच एक खूप मोठं प्रतीक बनल्या होत्या."
त्यांच्या मृत्यूनंतरच्या काही आठवड्यांतच ते स्पष्ट झालं होतं. डॉ. आरा यांनी पॅराफिन आणि ग्लिसरीनच्या इंजेक्शनची प्रक्रिया वापरून इव्हा यांचा मृतदेह अगदी जिवंत वाटेल अशा पद्धतीनं जतन करण्यात यश मिळवलं होतं.
त्यांचा मृतदेह संसदेत 14 दिवस अंतिम दर्शनासाठी ठेवला गेला. तिथं तब्बल 20 लाख लोकांनी त्याचं अंत्यदर्शन घेतलं. जिवंत असताना त्यांना लोकांचं जे प्रेम आणि आदर मिळाला होता तो त्यांच्या मृत्यूनंतरही तसाच असल्याचं पाहायला मिळालं.
इव्हिटा यांचं प्रतिकात्मक महत्त्वं किती मोठं होतं याचा प्रत्यय त्यानंतरची 16 वर्ष त्यांच्या मृतदेहानं ज्यापद्धतीनं प्रवास केला त्यावरून लक्षात येतं.
1955 मध्ये पेरोन यांना सत्तेवरून पायउतार करण्यात आल्यानंतर जनरल पेड्रो अरम्बुरू यांच्या नेतृत्वातील हुकूमशाही सत्तेनं पेरोनवादाची सगळ्या बाजुनं गळचेपी करण्याचं लक्ष्य ठेवलं. तसंच इव्हा यांचा मृतदेह विरोधाचं प्रतीक बनू शकतो याचीही त्यांना भीती होती.
'त्यांना इव्हा यांच्या मृतदेहाबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं'
पेरोनचे समर्थक इव्हा यांचा मृतदेह परत मिळवण्याचा प्रयत्न करतील या भीतीनं लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल कार्लोस मुरी कोनिग यांनी ते ब्यूनस आयर्स शहरात अनेक ठिकाणी हलवला.
इव्हा यांचा मृतदेह रस्त्यांवर उभ्या असलेल्या एका व्हॅनमध्ये, एका सिनेमाच्या पडद्यामागे आणि शहरातील जलकेंद्रात लपवण्यात आला होता, असं सांगितलं जातं. पण आश्चर्य म्हणजे हा मृतदेह जिथं जिथं नेला, तिथं गूढपणे फुलं आणि मेणबत्त्या ठेवून जायचे.
नंतर कोनिग यांनी मृतदेह स्वतःच्या कार्यालयात आणला. तिथं त्यांनी काचेची शवपेटी उभी ठेवून ती लोकांना दाखवत होते, असा आरोप केला जातो. त्यांना इव्हा यांच्या मृतदेहाबद्दल एकप्रकारचं आकर्षण निर्माण झालं होतं, असं म्हटलं जातं.
1997 मधील 'इव्हिटा, ला तुंबा सिन पाझ' (एव्हिटा:शांतता नसलेली कबर) या माहितीपटात कर्नल हेक्टर कॅबानिलास यांनी सांगितलं की, "मी त्यांना सैनिकी शाळेपासून ओळखत होतो. ते अगदी सामान्य होते. पण मृतदेह हातात आल्यानंतर ते जणू वेडेच झाले."

फोटो स्रोत, Bettmann via Getty Images
अर्जेंटिनाच्या विचारवंत सेसिलिया मॅक्रॉन यांनी 2012 मध्ये बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, इव्हा पेरोन यांच्या मृतदेहाबरोबर घडलेल्या घटनांबाबत अफवा आणि इतिहास यांची एवढी सरमिसळ झाली आहे की सत्य शोधणं कठीण जातं. एक किस्सा असाही आहे की, 1957 मध्ये पदावरून दूर करण्याआधी कोनिग हे त्यांच्याकडे असलेल्या त्या मृतदेहाच्या जणू प्रेमातच पडले होते.
यानंतर इव्हा पेरोन यांचा मृतदेह गायब करण्याची जबाबदारी कॅबानिलास यांच्यावर सोपवण्यात आली. नंतर 1957 मध्ये तो मृतदेह इटलीला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. इटलीतील मिलान येथील एका स्मशानभूमीत इव्हा यांना 'मारिया मॅगी डी मॅजिस्ट्रिस' या खोट्या नावानं दफन करण्यात आलं.
पण त्यांच्या समर्थकांनी त्यांना विसरणं शक्य नव्हतं. ब्यूनस आयर्समध्ये 'इव्हा पेरोन यांचा मृतदेह कुठे आहे?' अशा आशयाचे प्रश्न भिंतींवर लिहून लोक विरोध करू लागले. हा मृतदेह परत मिळवणं ही अर्जेंटिनामधील पेरोनवाद्यांसाठी एक मोठी चळवळ बनली होती.
शरीर परत मिळवलं
फियोरुची यांच्या मते लष्करानं इव्हा यांचा मृतदेह लपवल्यामुळंच लोकांच्या मनातील त्यांचा राग आणि निष्ठा अधिक तीव्र झाली. "इव्हा यांच्या मृतदेहाची जी विटंबना (हाल) केली गेली, ती केवळ एका मृतदेहाची नव्हती तर तो कामगार वर्गावर झालेल्या अन्यायाचाच एक भाग मानला गेला."
1971 मध्ये अर्जेंटिनात नवीन सरकार आलं. त्यांनी देशात पुन्हा लोकशाही आणायचं ठरवलं. पेरोन यांच्या समर्थकांवरील बंदी उठवली आणि इव्हा यांचा मृतदेह हुआन पेरोन यांना परत देण्याचं मान्य केलं. स्पेनमधील माद्रीद शहराबाहेर असलेल्या एका विलामध्ये हा मृतदेह चांदीच्या पेटीत आणून दिला गेला. हुआन पेरोन तिथे त्यांच्या तिसऱ्या पत्नी इसाबेलबरोबर देश सोडून राहत होते.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
हुआन पेरोन यांचे जवळचे सहकारी कार्लोस स्पॅडोनी यांनी सर्वात आधी तो मृतदेह पाहिला होता. 2012 मध्ये बीबीसीबरोबर बोलताना ते म्हणाले, "जनरल पेरोन, आमच्याकडचा माळी आणि मी, आम्ही तिघांनी मृतदेह पेटीतून बाहेर काढला. तो संगमरवरी टेबलावर ठेवला तेव्हा आमचे हात मातीने माखले होते. त्यामुळे मृतदेह स्वच्छ करावा लागला. पेरोन यांच्या पत्नी इसाबेल यांनी सुती कपडा आणि पाणी वापरून अतिशय काळजीपूर्वक तो मृतदेह साफ केला. त्यांनी इव्हा यांचे सोनेरी केस विंचारले. केस लांब असल्यामुळं त्यांनी हळूहळू विंचारून ते ड्रायरने वाळवले."
यानंतर काय घडले याबद्दल पुन्हा एकदा अफवा उठू लागल्या. माजी मंत्री होसे लोपेझ रेगा हे अघोरी विद्यांवर विश्वास ठेवायचे आणि बहुतांश कथा त्यांच्याभोवतीच फिरत होत्या.
एक किस्सा असाही होता की, पेरोन यांनी इसाबेल यांना इव्हा यांच्या मृतदेहाच्या शेजारी झोपायला सांगितलं होतं. इव्हा यांच्या राजकीय ताकदीची जादू इसाबेल यांच्यातही उतरेल, असं त्यांना वाटत होतं.
अशा कथांवरून इव्हा यांच्या समर्थकांच्या मनात त्यांच्याबद्दल किती टोकाची श्रद्धा होती हे स्पष्ट होतं. एकेकाळी डान्स-हॉलमध्ये काम करणारी मुलगी पुढे पतीसोबत सत्तेत आली आणि समर्थकांसाठी एखाद्या आध्यात्मिक गुरूसारखी बनली. समर्थकांसाठी त्यांचा मृतदेह अत्यंत पवित्र होता. तर विरोधकांना त्यांचा तितकाच राग येत होता.
1973 मध्ये हुआन पेरोन पुन्हा अर्जेंटिनाचे अध्यक्ष बनले आणि त्यांच्या पत्नी इसाबेल उपाध्यक्ष बनल्या. इव्हा यांचा मृतदेह तोपर्यंत स्पेनमध्येच होता. पण 1974 मध्ये हुआन यांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर इव्हा यांचा मृतदेह परत ब्यूनस आयर्समध्ये आणण्यात आला.
अखेर कायमचे दफन
डॉमिंगो टेलेचिया एका बारमध्ये बसले असताना काही लोकांनी इव्हा यांच्या मृतदेहाच्या जतन करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला. बीबीसीबरोबर 2012 मध्ये बोलताना ते म्हणाले की, "काळे कपडे परिधान केलेले दोन भयावह लोक आत आले. त्यांनी दारं धाडकन उघडली आणि आमच्याकडं बघितलं. ते अत्यंत भीतीदायक होतं, कारण तेव्हा लोकांना अचानक पळवून नेऊन गायब केलं जायचं आणि ते कधीच परत यायचे नाहीत."
टेलेचिया जुन्या कलावस्तू, प्राचीन वस्तू आणि माणसांचे अवशेष जतन (रीस्टोअर) करायचं काम करायचे. त्या काळात सरकारकडून जिवाला धोका असल्यानं ते आधी खूप घाबरले होते. पण ते दोघे फक्त ड्रायव्हर आहेत हे कळल्यावर त्यांना थोडा दिलासा मिळाला. ते ड्रायव्हर त्यांना इव्हा पेरोन यांचे जुने पर्सनल डॉक्टर ऑस्कर इव्हानिशेविच यांच्याकडे घेऊन गेले.
टेलेचिया यांनी बीबीसीला सांगितलं, "डॉक्टर मला म्हणाले, आमच्याकडे तुमच्यासाठी एक महत्त्वाचं काम आहे. तुम्हाला इव्हा पेरोन यांच्या मृतदेहावर प्रक्रिया करून तो पूर्ववत करायचा आहे."

फोटो स्रोत, Getty Images
जीव धोक्यात आहे हे माहीत असूनही टेलेचिया यांनी हे काम करायला होकार दिला.
ते म्हणाले, "हे काम स्वीकारणं म्हणजे मृतदेह गायब करणाऱ्या शक्तिशाली लोकांचा शत्रू बनण्यासारखं होतं. अनेक लोकांना वाटत होतं की, इव्हा यांचा मृतदेह कधीच परत मिळू नये. या कामामुळे मी मोठ्या अडचणीत येईन याची मला कल्पना होती."
पुढे त्यांना धमक्या येऊ लागल्या. फोनवरून धमकावले गेले आणि त्यांची गाडीही जाळण्यात आली. अर्जेंटिनात सरकारच्या क्रूरतेचा आणि छळाचा अतिरेक वाढल्यामुळे टेलेचिया यांना शेवटी स्वतःचा देश सोडून पळून जावे लागले.
शेवटी ऑक्टोबर 1976 मध्ये इव्हा यांचा मृतदेह दफन करण्यात आला. या दफनविधीला फारच कमी लोक उपस्थित होते. त्यांचा मृतदेह पुन्हा कधीही चोरीला जाऊ नये किंवा त्याला कोणी हात लावू नये यासाठी त्यांची समाधी अतिशय मजबूत आणि सुरक्षित बनवली गेली.
संगमरवरी समाधीच्या फरशीवर एक गुप्त दार होते. ते खाली एका गुप्त खोलीत जायचं. तिथं आणखी एक गुप्त दार होतं. ते थेट खाली दुसऱ्या खोलीत जायचं तिथं शवपेटी (कॉफिन) ठेवली होती.
मृत्यूनंतर 24 वर्षे उलटूनही इव्हा यांचा लोकांवरील प्रभाव इतका शक्तिशाली होता की, त्यांचा मृतदेह चक्क जमिनीखाली 5 मीटर (तब्बल 16-17 फूट) खोल पुरावा लागला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























