You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू, वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
राज्यात काही भागांत मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. मात्र, काही ठिकाणी वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजारे लावली आहे.
अशातच गुरुवारी (17 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागांत वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसादरम्यान 2 ठिकाणी वीज कोसळली आणि 5 जणांचा मृत्यू झाला.
याशिवाय 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार कानावर येतात.
दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं.
त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.
आता आपण वीज अंगावर पडणार हे आपल्या लक्षात कसं येऊ शकतं, वीज अंगावर पडू नये यासाठी काय करावं आणि काय करू नये, तसंच एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यानंतर आपण काय प्रथमोपचार करू शकतो, याची माहिती जाणून घेणार आहोत.
वीज अंगावर पडू नये म्हणून काय करू शकतो?
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यास, भारतात 2017 मध्ये 2 हजार 885, 2018 मध्ये 2 हजार 357 आणि 2019मध्ये 2 हजार 876 इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, वीजेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं एक पत्रक जारी केलं होतं.
त्यात वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती दिली आहे.
सुरुवातीला तुम्ही घराबाहेर असाल तर काय करायचं आणि काय करायचं नाही हे समजून घेऊयात.
- विजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा, खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो.
- सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही, तर उंचीच्या जागांखाली आश्रय घेणं टाळा. जसं की टेकडी, पर्वत यांचा आश्रय घेऊ नका.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं. कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात.
- पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल, तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेउन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीतकमी संपर्क येईल, याची खात्री करा.
- कार्यालयं, दुकानं यांची दारं-खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा.
- विजा चमकत असतांना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास अंगावरील केस उभे राहिल्यास, त्वचेला मुंग्या किंवा झिणझिण्या आल्यास, तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
- धातुंच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा.
- धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा.
- टेलिफोन किंवा वीजेच्या खांबांखाली थांबू नका. हे खांब विजेला आकर्षित करतात.
- विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका.
- लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका.
- जर तुम्ही 4 ते 5 जण एका ठिकाणी असाल, तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- सायकल, मोटरसायकल, छत नसलेला ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावर प्रवास करू नका.
घरात असल्यास काय खबरदारी घ्यावी?
आता तुम्ही घरात असाल तर काय करायचं आणि काय नाही हे जाणून घेऊयात.
- हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी (जनावरांना चारणे, मासेमारीसाठी) बाहेर पडू नका. घरातच थांबा आणि प्रवास टाळा.
- घराच्या खिडक्या, दारं यापासून लांब राहा. धातूच्या वस्तूंचा वापर करू नका.
- विजा चमकत असताना हेयरड्रायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझरसारखी विद्युत उपकरणे चालू करू नका. कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला वीजेचा धक्का बसू शकतो.
- टेलिफोनचा वापर टाळा. कारण वीज टेलिफोनच्या तारांमधून वाहू शकते.
- मुलं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खात्री करून घ्या.
- वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. उदाहरणार्थ - आंघोळ, भांडी धुणं वगैरे. कारण वीजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून वाहू शकतो.
- इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा.
वीज पडल्यानंतर काय करायचं?
एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता. असा स्पर्श करणं सुरक्षित असतं.
यासाठी...
- बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना, हृदयाचे ठोके सुरू आहेत ना ते अगोदर तपासून पाहा.
- जर व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छवास द्या.
- हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डिआक कॉम्प्रेशनचा वापर करा.
- अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाहा.
- गरज पडल्यास संबंधिताला दवाखान्यात घेऊन जा.
- 1078 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या. शक्य असल्याल बाधिताला दवाखान्यात घेऊन जा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)