'सायकॅट्रिस्ट म्हणजे फक्त डॉक्टर नाही'; डॉ. आनंद नाडकर्णी यांनी बदललेली मानसिक आरोग्याची व्याख्या

    • Author, मुक्ता पुणतांबेकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

(प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे 15 मे रोजी निधन झाले. त्यांच्या आठवणींना मुक्ता पुणतांबेकरांनी या लेखाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.)

पूर्वी साधारण अशी कल्पना होती की, मनोविकारतज्ज्ञ किंवा सायकॅट्रिस्ट म्हणजे फक्त केबिनमध्ये बसून काम करणारा व्यक्ती. ती व्यक्ती रुग्णांना तपासते, त्यांना औषधं देते आणि रुग्णांना जास्त वेळ देत नाही.

तर ही संकल्पना किंवा समज डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पूर्णपणे बदलली. हा त्यांच्या स्वभावातील एक भाग होता.

त्यांचे वडील मधुसूदन नाडकर्णी हे जळगावच्या कॉलेजमध्ये प्राचार्य होते. आनंद यांचं बालपण तिथेच गेलं.

मधुसूदन हे आधी प्राध्यापक होते, मग प्राचार्य झाले. तरी विद्यार्थी सर्व त्यांच्या घरी यायचे. ते विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या असंख्य गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे.

आनंद नाडकर्णी त्यांच्या वडिलांचं म्हणजे मधूसूदन नाडकर्णी यांचं सामाजिक कार्य पाहतच मोठे झाले. त्यामुळे नकळतपणे सामाजिक कार्याचे संस्कारदेखील त्यांच्यावर झाले.

मानसशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान

आनंद नाडकर्णी जेव्हा मानसोपचारतज्ज्ञ झाले, तेव्हा ते फक्त रुग्ण म्हणून त्याच्याकडे पाहायचे नाही. हा फक्त एक रुग्ण आहे आणि आपल्याला त्याला बरं करायचं आहे, या दृष्टीनंही ते पाहायचे नाहीत.

त्या रुग्णाची सामाजिक पार्श्वभूमी, त्याला आपल्याला कशी मदत करता येईल, पुढे आधार कसा देता येईल, हे सर्व ते पाहायचे.

याबद्दल माझे बाबा डॉ. अनिल अवचट यांनीदेखील लिहिलं आहे. जेव्हा 'गर्द' हे पुस्तक बाबांनी लिहिलं, तेव्हा डॉ. आनंद नाडकर्णींचं केईएममधील काम बघून ते पुस्तक लिहिलं.

पुस्तकात बाबांनी असं म्हटलं, "तो फक्त केबिनमधील डॉक्टर नव्हता. तो रुग्णांच्या घरी जायचा, वस्तीवर जायचा. त्यांच्याशी बोलायचा, त्यांच्यासाठी सपोर्ट ग्रुप करायचा. त्यामुळे त्याने एकप्रकारे मानसोपचार समाजाभिमुख केले. याबाबत असलेला स्टिग्मा (कलंक) जायला त्याच्या या कामामुळे मदत झाली."

मनोविकारांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन

डॉ. आनंद स्वत:ला 'मनोविकासतज्ज्ञ' म्हणायचे. त्यांनी आयपीएच (इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ) जेव्हा सुरू केलं, तेव्हा त्यांनी आधी त्याचं नाव ठरवलं होतं, 'इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजीकली हँडिकॅप्ड'. मग त्यांनी ते लगेचच बदललं आणि त्याचं नाव 'इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ' असं ठेवलं.

याची सुरुवात अशी झाली की माझ्या आई-बाबांच्या जवळच्या मैत्रिणीचा मुलगा गर्दच्या व्यसनात अडकला. आई-बाबांनी त्याला घरीच उपचार दिले. ती 1984 सालची गोष्ट होती.

बाबा ( डॉ. अनिल अवचट) जरी डॉक्टर असले तरी त्यांना जर्नालिझम, लेखनाची आवड होती. त्यातून बाबांना वाटलं की या प्रश्नाचा अभ्यास करूया. त्यावेळेस डॉ. आनंद नाडकर्णी यांचं नुकतंच एमडी झालेलं होतं.

आनंद नाडकर्णी मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये याच संदर्भात काम करत होते. बाबांनी मुंबईला जाऊन ते सर्व पाहिलं. त्याचं निरीक्षण केलं, मुलाखती घेतल्या.

नंतर बाबांनी 'गर्दच्या जाळ्यात' नावाची लेखमाला लिहिली. आधी ही लेखमाला प्रकाशित झाली आणि मग नंतर पुस्तक प्रकाशित झालं.

तेव्हा पु. ल. देशपांडे यांनी त्यांना बोलावून घेतलं. ते असं म्हणाले की मी तुम्हाला काहीतरी आर्थिक मदत करतो. तुम्ही यावर काम सुरू करा.

मग माझे आई-बाबा आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी या तिघांनी मिळून 29 ऑगस्ट 1986 ला 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा'ची स्थापना केली.

या तिघांनाही व्यसनमुक्ती केंद्र कसं असतं याची काहीच कल्पना नव्हती. कारण तेव्हा महाराष्ट्रात असं केंद्रच नव्हतं. तेव्हा त्यांनी ठरवलं की इथे जे रुग्ण येतील त्यांच्याकडून आपण शिकूया. ते त्यांच्याशी बोलायचे, चर्चा करायचे की कुठल्या प्रकारचे उपचार तुम्हाला आवडतील.

मला हा त्या तिघांचाही खूप मोठेपणा वाटतो. ते तिघेही डॉक्टर, पण त्यांनी रुग्णांकडून शिकायची तयारी दाखवली. त्यातूनच मग हळूहळू मुक्तांगणची उपचार पद्धत विकसित होत गेली.

त्यामुळेच रुग्णांना मुक्तांगणमध्ये खूप आपलेपणा वाटतो. हे कोणतंही रेडिमेड मॉडेल नाही. रुग्णांच्या गरजांमधून तयार झालेलं हे मॉडेल आहे.

मग डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 1990 साली आयपीएचची स्थापना केली. ते महिन्यातून एकदा नियमितपणे मुक्तांगणला यायचे. दिवसभर रुग्णांना तपासणं, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं, मीटिंग हे सर्व त्यांचं दिवसभर चालायचं. मुक्तांगण आणि आयपीएचच्या कामाला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलेलं होतं.

डॉ. आनंद नाडकर्णी यांची इतरही खूप कामं सुरू असायची. ते लिखाण करायचे. त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. नाटक लिहिलं, वेध हा उपक्रम, सपोर्ट ग्रुप इतकं सर्व चालायचं. आता तर आयपीएच पुणे आणि नाशिकमध्येही आहे. त्यांचं हे सर्व काम न थकता शेवटपर्यंत सुरू होतं.

'वेध' उपक्रम आणि महत्त्वाचे निर्णय

सुरुवातीला जेव्हा त्यांनी हे काम सुरू केलं, तेव्हा 'टफ टीम्स क्लब' नावाचा क्लब सुरू केला. तो पौगंडावस्थेतील मुलांसाठी होता. मग त्यातून कल्पना आली की, बऱ्याचवेळा मुलांना पुढे काय करायचं, करियरची निवड कशी करायची याबद्दलची दिशा नसते.

कारण तोपर्यंत असंच होतं की, सायन्स किंवा आर्ट्सला जा. ज्यांना जास्त गुण मिळतात त्यांनी सायन्सला जा आणि ज्यांना कमी गुण मिळतात त्यांनी आर्ट्सला जा. मग डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हा. त्यावेळेस करियरचे पर्याय खूप कमी असायचे.

तेव्हा त्यांनी ठरवलं की 'वेध व्यवसाय परिषद' आपण सुरू करूया. त्याची सुरुवात तर खूप छोट्या प्रमाणात झाली. ठाण्यातील एका छोट्या हॉलमध्ये ती झाली होती. त्यात असंच ठरलं की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक बोलवायचे. ते स्वतः या लोकांच्या मुलाखती घ्यायचे.

इथे मुलांना कोणताही उपदेश वगैरे करायचा नाही. मुलांना आपण हे दाखवू या की काय काय करियर असतं. त्यासाठी काय करावं लागतं. ध्येय कसं निवडायचं. ते साध्य कसं करायचं. हे लोकांच्या अनुभवातून आपण मुलांपर्यंत नेऊया असं त्यांना वाटायचं. त्यानुसार मग सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात झाली.

मग नंतर ठाण्यात, पुण्यात आणि आता तर परभणीत वेध आहे, छ. संभाजीनगरला आहे, कोकणात आहे, नाशिकला आहे. अशा अनेक ठिकाणी आता 'वेध' होतात.

मागच्या वर्षापासून 'ग्लोबल वेध' सुरू करण्यात आलं. ते युट्यूबवर असतं. त्यामुळे ते लाखो लोकांपर्यंत पोहोचतं.

नुकतीच मला एक मुलगी भेटली जी म्हणाली, "मी आठवीत असताना पहिल्यांदा 'वेध'ला हजेरी लावली होती. मला ते इतकं आवडलं की मी दरवर्षी ते करायला लागले. त्यातून मला वाटलं की, मलादेखील मानसशास्त्रात काम करायचं आहे."

मग तिनं त्यामध्येच शिक्षण घेतलं. आता ती आयपीएचमध्ये काम करते आहे. अशी अनेक मुलं आम्हाला भेटतात.

'वेध'मुळे कोणी खगोलशास्त्रज्ञ झालं आहे, कोणी अभिनयाच्या क्षेत्रात गेलं आहे. प्रत्येकानं लहानपणी कधीतरी वेधला हजेरी लावलेली असते. त्याच्या आठवणी ते सांगतात. नकळतपणे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लाखो मुलांच्या आयुष्यामध्ये हा वेगळा मार्ग, वाट या वेधच्या माध्यमातून दाखवली आहे.

गाण्यांचा कार्यक्रम, त्यामागचा विचार आणि REBT

डॉ. अल्बर्ट एलिस यांची रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरेपी (आरईबीटी) आहे. मी जेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेत होते, तेव्हा मीदेखील ही थेरेपी शिकले होते. परीक्षेत ती लिहिलीदेखील होती. मात्र ती अमलात कशी आणायची हे मला काहीही माहीत नव्हतं. माझ्या पिढीतील खूप लोकांचा हा अनुभव आहे की, आम्ही फक्त ती थिअरी शिकायचो आणि पुढे आम्हाला काही कळायचं नाही की ती कशी वापरायची.

मुंबईतील किशोर फडके हे डॉ. अल्बर्ट एलिस यांची थेरेपी शिकले होते. किशोर फडके यांच्याकडून डॉ. नाडकर्णी आणि डॉ. शुभा थत्ते हे दोघे शिकले.

डॉ. नाडकर्णी यांनी ही थेरेपी अतिशय सोप्या शब्दात ही शिकवायला सुरुवात केली. आमच्यासारख्या फक्त मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सलाच नाही, तर सर्वांनाच त्याची गरज असते.

ती थेरेपी स्वत:वर कशी वापरायची, नातेसंबंधांमध्ये कशी वापरायची, हे त्यांनी तेव्हा शिकवायला सुरुवात केली. ते अजूनही शिकवत होते, अगदी मागच्या महिन्यापर्यंत कोर्सेस घेत होते.

इतकी वर्षे भावना या विषयाला कोणी काही महत्त्वच दिलं नाही. ही गोष्ट लोकांना माहीत नाही की भावना बाहेरच्या घटनांमुळे निर्माण होत नाही. तर आपल्याच विचारांमुळे आपल्याच मूल्य-धारणांमुळे भावना निर्माण होते. हे महाराष्ट्राला शिकवण्याचं काम डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केलं.

हे फक्त क्लासरुममधील लेक्चर्सच्या माध्यमातून केलं नाही, तर चित्रपट, गाणी या गोष्टींचाही त्यांनी वापर केला. फक्त थिअरी शिकवण्यापेक्षा लोकांना ते जास्त पटतं. म्हणूनच त्यांनी चित्रपट आणि गाण्यांच्या माध्यमातूनही लोकशिक्षणाचं काम केलं.

भावना कशा ओळखायच्या, त्यातून स्वत:ला कसं बाहेर आणायचं, दृष्टीकोन कसा समजून घ्यायचा हे लोकांना शिकवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पुण्यात एक अनोखा गाण्यांचा कार्यक्रमही केला.

कामावरची निष्ठा, शेवटपर्यंत कार्यमग्न

कामावर निष्ठा कशी असावी, हे डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडून शिकावं. त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही. त्यांचं रविवारीदेखील काहीतरी सुरू असायचं. त्यांचा उत्साह प्रचंड असायचा.

दिवसभर इतके रुग्ण पाहायचे, मग संध्याकाळी निवारा किंवा एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांशी बोलायचे, कधी एखादी ऑनलाईन मीटिंग घेणं, असं त्यांचं सतत काहीतरी सुरू असायचं.

आता जेव्हा मार्च महिन्यात ते आजारी पडले, तेव्हा आम्ही बोलत होतो की, आता त्यांना विश्रांती घ्यायला लावली पाहिजे. खूप काम झालं आहे.

मग जेव्हा कर्करोगाचं निदान झालं, तेव्हा आम्ही घाबरलो होतो. पण तेव्हा ते अध्यात्मिक वाचन करत होते. त्यानुसार त्यांनीच आम्हाला इतकं शांतपणे सगळं सांगितलं की 'कर्करोगात काय असतं?' आणि कसा मी त्यातून बरा होणार आहे.

एक महिना त्यांना घरी राहायचं होतं. आधीचं एक ऑपरेशन झालं होतं आणि पुढच्या ऑपरेशनच्या आधी घरी राहायचं होतं. त्यांनी आधीच एक कोर्स जाहीर केला होता. आम्हाला वाटलं होतं की, आता हा कोर्स रद्द होईल. मात्र, त्यांनी तो सगळा कोर्स ऑनलाइन पद्धतीनं घेतला.

मला हे इतकं आश्चर्यकारक वाटतं की, एक माणूस ज्याला माहीत आहे की आपल्याला कर्करोग झाला आहे आणि आता लवकरच आपली एक मोठी शस्त्रक्रिया होणार आहे, त्यात काहीही होऊ शकतं. तो माणूस अभ्यास करतोय आणि विद्यार्थ्यांना शिकवतोय, राहिलेले शूटिंग्स पूर्ण करतोय.

मला यात वेगळीच अध्यात्मिक उंची जाणवते. त्यांची कामावरची निष्ठा आपण प्रत्येकानं शिकायला हवी.

सामाजिक कार्य कोणाचंही असो, मदतीसाठी सदैव तत्पर

कोणालाही काहीही नवीन सामाजिक काम सुरू करायचं असलं की ते त्यांच्याशी आधीच बोलायला यायचे. कारण डॉ. नाडकर्णींचं काम, स्वभाव माहीत असल्यामुळे ते यायचे. आमच्याच पत्रकार नगरमधील घरी किंवा मुक्तांगणमध्ये माझ्या समोरच अशा खूप बैठका झाल्या.

यासंदर्भात मी एक उदाहरण देते. माझी लहान बहीण यशोदा वाकणकरला लहानपणी फिट्स यायच्या. एपीलप्सीचा आजार होता. पुढे तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. एपीलप्सीतून ती बाहेर आली. त्यामुळे तिला वाटायचं की, माझा आजार बरा झाला आहे. पण ज्यांना हा आजार आहे, त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे.

मग तिनं डॉ. आनंद नाडकर्णींशी चर्चा केली. त्यांनी तिला सांगितलं की, ज्यांना एपीलप्सीची समस्या आहे त्यांच्यासाठी, तू एक स्व-मदत गट सुरू कर. त्यातून मग 'संवेदना' नावाचा गट सुरू झाला.

मग यासाठी निधी कसा उभा करायचा. तर पहिला चेक त्यांनी दिला. त्यांचं म्हणणं की, या रकमेतून आपण हा ट्रस्ट सुरू करू.

त्यांनी फक्त यासाठी मार्गदर्शनच केलं नाही, तर ते त्या ट्रस्टच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये आले. त्याच्या प्रत्येक बैठकीला ते उपस्थित असायचे. हे मी एक उदाहरण सांगितलं.

असंच 'निवारा वृद्धाश्रमा'चं उदाहरण आहे. तिथे त्यांनी वृद्धांसाठी आयपीएचच्या माध्यमातून सपोर्ट ग्रुप सुरू केला. निवाराच्या लोकांना ते सतत मार्गदर्शन करत राहिले.

अशी कितीतरी काम होती की, लोक त्यांच्याकडे येऊन सतत मार्गदर्शन घ्यायचे. ते प्रत्येकाला विनामूल्य मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडे जायचे, त्यांना भेटायचे, तिथे काम पाहायचे, असं प्रचंड मोठं काम त्यांनी केलं.

'वेध', तरुणांची उपस्थिती आणि डॉ. नाडकर्णींचं मार्गदर्शन

एकूणच सर्वच वयोगटातील लोकांना डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी बोलायला खूप कम्फर्टेबल, सोयीचं वाटायचं. मग ते लहान मुलं असो, तरुण असो की ज्येष्ठ नागरिक असो.

त्यामुळे मी मुक्तांगणमध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना पाहायचे. ते तरुण म्हणायचे की मी डॉ. नाडकर्णींना भेटायला आलो आहे. मग डॉ. नाडकर्णी शांतपणे त्याला मार्गदर्शन करायचे.

ते कोणत्याही क्षेत्रासाठी असायचं. अगदी शेती करणारे, संशोधन करणारे यायचे. कोणाला काही पुस्तक लिहायचं आहे, कोणाला काही चित्रपट काढायचा आहे, नाटक लिहायचं आहे, असे तरुण अगदी बिनधास्तपणे त्यांच्याकडे यायचे. ते डॉ. नाडकर्णींशी चर्चा करायचे. फक्त एका भेटीमध्ये त्यांना समाधान मिळायचं.

पण डॉ. आनंद यांची अशी हातोटी होती की, त्यांनी त्या तरुणाला मार्गदर्शन केलं आहे, असं त्यांना वाटायचंच नाही. त्या तरुणाशी बोलता बोलताच मला हे सुचलं की काय करायचं आहे, असं त्यांना वाटायचं. यानंतर ते तरुण खूप समाधानानं घरी जायचे आणि त्यांचे काम सुरू करायचे.

चढउतारांना तोंड देत अव्याहतपणे इतरांसाठी वाहणारा आनंदाचा झरा

मला असं वाटतं की, डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरेपीचा वापर फक्त रुग्णांना मदत करण्यासाठी केला नाही. तर ही थेरेपी त्यांनी स्वत: आत्मसात केली होती. या थेरेपीचा वापर ते स्वत:च्या बाबतीतही करत होते.

आरईबीटीला डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या बुद्धिझमच्या (भगवान बुद्धांची शिकवण) अभ्यासाची, वेदांताच्या अभ्यासाचीही जोड होती. या सगळ्यांचा हा परिणाम होता.

आम्ही अगदी जवळून पाहिलं की, त्यांना किती संघर्षाला तोंड द्यावं लागलं. त्यांना लहानपणी पोलिओचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांना चालता यायचं नाही.

डॉ. नाडकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्यात तर खूप उलथापालथ झाली. जेव्हा मुक्तांगण आणि आयपीएच सुरू होत होतं, त्याकाळात ही उलथापालथ झाली. त्यात आयपीएचला सुरुवातीच्या काळात प्रचंड मोठा आर्थिक तोटा झाला होता.

या सर्व अडचणी असूनसुद्धा डॉ. आनंद यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य, शांतपणा कधीही कमी झाला नाही. त्यांचं मोठेपण यातच होतं की, ते लोकांना जे शिकवत होते, ते आधी स्वत:च्या बाबतीत अमलात आणत होते. त्यामुळे हे सर्व सगळ्यांना सांगण्याचा त्यांना हक्क होता, असं मला वाटतं.

(लेखिका मुक्ता पुणतांबेकर या 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आहेत. या लेखात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही वैयक्तिक आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)