You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात पावसाची दणक्यात सुरुवात, पण लगेच जोर ओसरला; पुढच्या 24 तासांचा अंदाज पाहा
मान्सूननं महाराष्ट्रात पुढे सरकल्यावर दणक्यात सुरुवात केली, पण आता पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. राज्यात आज (25 जून) काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.
पुढच्या 24 तासांत हवामान कसं असेल, कुठल्या जिल्ह्यांत काय इशारे दिले आहेत आणि पुढच्या 2 आठवड्यांत कुठे किती पाऊस पडू शकेल, जाणून घेऊयात.
25 जून रोजी सॅटेलाईट दृश्यांमध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ ढग जमा झालेले दिसतात. किनारी भागांत आणि घाट प्रदेशात थोड्याफार प्रमाणात पाऊसही झाला आहे. पण अंतर्गत भागात तुरळक ढगच दिसत आहेत.
ग्लोबल फोरकास्टिंग मॉडेलनुसार, पुढच्या 24 ते 48 तासात पावसाचं चित्र दाखवणारा खालील नकाशा पाहता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसंच घाट प्रदेशात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
तर राज्यात इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. भारत फोरकास्टिंग मॉडेलनुसारही साधारण असंच चित्र दिसतं. विदर्भात 28 आणि 29 जूनला पावसाची शक्यता आहे.
बीबीसी वेदरच्या अंदाजानुसार शुक्रवारी 26 जून रोजी, दुपारनंतर घाट प्रदेशात तसंच मराठवाड्याच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी आणि रविवारीही या भागांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
जिल्हानिहाय इशारे
25 जूनच्या उतरार्धासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, साताऱ्याचा काही भाग, सोलापूर, धाराशीव आणि लातूरमध्ये जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
रायगड, कोल्हापूर, पुण्याचा घाट प्रदेश आणि बीड तसंच नांदेडमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार सरींसाठी यलो अलर्ट आहे. इतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडरस्टॉर्मसह पावसाची शक्यता आहे.
26 जून रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाट प्रदेश, साताऱ्याचा घाट प्रदेश, पुण्याचा पठारी भाग इथे जोरदार सरी बरसू शकतात, त्यासाठी इथे यलो अलर्ट दिलेला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलठढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरमध्येही यलो अलर्ट दिला आहे.
पुढच्या दोन आठवड्यांसाठीचा अंदाज
हवामान विभागानं जारी केलेल्या एक्स्टेंडेड रेंज फोरकास्ट म्हणजे विस्तारीत अंदाजानुसार पुढचे दोन आठवडे राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. पण कुठे किती पाऊस पडेल?
तर 25 जून ते 2 जुलैदरम्यान कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
तर त्यापुढील आठवड्यात म्हणजे 2 जुलै ते 9 जुलै दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा बराच जास्त तर मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
थोडक्यात म्हणजे पुढचे काही दिवस पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं, पण त्यानंतरच्या आठवड्यात थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे. यात स्थानिक पातळीवर पावसाचं प्रमाण वेगवेगळं राहू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना आपापल्या विभागासाठी जारी केलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)