अनियंत्रित लैंगिक संबंधांमुळे होणारा 'हा' संसर्ग काय आहे? जगभरातील सुमारे एक तृतीयांश महिला प्रभावित?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

महिलांमध्ये बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस (बीव्ही) होणं ही आरोग्याबाबत एक गंभीर समस्या आहे. या स्थितीमध्ये महिलांच्या योनीमध्ये संसर्ग होतो आणि त्याचा त्रास सुरू होतो.

बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस हे विविध कारणांमुळे होऊ शकतं. यात अनियंत्रित लैंगिक संबंध, अस्वच्छता किंवा जीवनशैलीशी संबंधित इतर कारणांचा समावेश असू शकतो.

'बीव्ही'ची वेळीच ओळख करून योग्य उपचार घेतल्यास यावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं.

संशोधकांचं म्हणणं आहे की, योनीमध्ये होणारे बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस लैंगिक संबंधांद्वारे परसणारा संसर्ग (एसटीआय) देखील असू शकतो.

इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस म्हणजेच एनएचएस म्हणतं की, बीव्ही 'तुमच्या योनीतील जीवाणूंच्या नैसर्गिक समतोलातील बदलामुळं होतो आणि तो एसटीआय नाही.' हे सेक्समुळं देखील होऊ शकतं.

एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, बीव्हीमुळं जगभरातील सुमारे एक तृतीयांश महिला प्रभावित आहेत.

हा आजार वंध्यत्व, मुदतपूर्व प्रसुती आणि नवजात बालकांच्या मृत्यूचं कारण बनू शकतो.

संभोग करताना हा रोग पसरू शकतो. त्यामुळे त्याला लैंगिक संबंधांद्वारे परसणारा संसर्ग (एसटीआय) म्हणणं योग्य आहे.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनमध्ये प्रकाशित झालेल्या एका ऑस्ट्रेलियन अभ्यासात असं आढळून आलं आहे की, हा संसर्ग बरा करण्यासाठी केवळ रुग्णावरच नव्हे, तर त्याच्या लैंगिक जोडीदारावरही उपचार करणं आवश्यक आहे.

बीव्ही म्हणजे काय?

बीव्हीचे कारण असामान्य योनीस्राव आहे. या स्रावाला माशासारखा तीव्र वास येतो. त्याचा रंग आणि चिकटपणा वेगवेगळा असू शकतो. स्राव तपकिरी किंवा पांढरा देखील असू शकतो.

त्याचबरोबर, एक पातळद्रवासारखा स्त्राव देखील असू शकतो.

परंतु, यात अडचण अशी आहे की, बॅक्टेरियल व्हॅजिनोसिसने ग्रस्त असलेल्या अर्ध्या महिलांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. यामुळं सहसा वेदना किंवा खाजही येत नाही.

त्यावर प्रतिजैविक (अँटीबायोटिक) गोळ्या, जेल किंवा क्रीमने उपचार केले जाऊ शकतात.

बीव्ही हा लैंगिक संक्रमित रोग आहे का?

संशोधकांनी बीव्हीग्रस्त 164 जोडप्यांवर लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) म्हणून उपचार केले. या कालावधीत, त्यांच्या लैंगिक जोडीदारांना अँटीबायोटिक्स देखील देण्यात आले.

या अभ्यासात लैंगिक जोडीदारांचा समावेश केल्यानं बीव्ही संसर्गाचं प्रमाण निम्मे झाले. यानंतर डॉक्टरांनी त्यांचा अभ्यास थांबवला.

या अभ्यासातील प्रमुख संशोधकांपैकी एक असलेल्या प्रोफेसर कॅटरिना ब्रॅडशॉ म्हणाल्या, "आमच्या चाचणीत असं दिसून आलं की, महिलांना त्यांच्या जोडीदाराच्या संसर्गामुळं वारंवार बीव्हीचं संक्रमण होत आहे. यावरून हे निश्चित होतं की, हा खरोखर लैंगिक संक्रमित रोग आहे."

त्या म्हणाल्या, "बीव्ही लैंगिक संक्रमित आहे की नाही हे ठरवण्यात अडचण येत आहे. याचं एक कारण म्हणजे नेमके कोणत्या बॅक्टेरियामुळे हे होत आहे, हे अद्याप आम्हाला नीट माहिती नाही. जीनोम सिक्वेन्सिंगमुळं हे गूढ उकलण्यास मदत होत आहे."

'बीव्ही'मुळे मुळे वंध्यत्व येतं का?

बीव्ही वंध्यत्व किंवा इफर्टिलिटीसाठी कारणीभूत आहे का? यावर अमेरिकेतील सेंट लुईसच्या वॉशिंगटन युनिव्हर्सिटी ऑफ सेंट लुईसमध्ये (WashU) संशोधन करण्यात आलं. हे संशोधन प्री-प्रिंट जर्नल Biorxiv मध्ये छापण्यात आलंय.

संशोधकांच्या माहितीनुसार, रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, बीव्ही बॅक्टेरिया एका प्रकारचं रसायन (toxin) रिलीज करतो. या रसायनामुळे स्पर्मची म्हणजे वीर्याची कार्याक्षमता कमी होते आणि स्पर्मची फर्टिलायझेशन क्षमता देखील कमी होते.

संशोधकांना असा अंदाज आहे की बीव्ही अनेक महिलांमध्ये वंध्यत्वासाठी कारणीभूत एक महत्त्वाचा घटक असू शकतो. ज्या महिलांना बीव्ही होतो.

हे संशोधन वॉशिंगटन युनिव्हर्सिटी ऑफ सेंट लुईसच्या पोस्ट डॉक्टरल रिसर्च असोसिएट डॉ. श्वेता भागवत, प्रो. डॉ. सिलिया सँटी यांच्या टीमने केलं आहे. हा रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगो यांच्यासोबत करण्यात आलं आहे.

संशयाला दुजोरा

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठ आणि अल्फ्रेड हेल्थच्या संशोधकांनी मेलबर्न लैंगिक आरोग्य केंद्रात एक अभ्यास केला.

यातील निम्म्या पुरुषांना अँटीबायोटिक औषधं आणि अँटीबायोटिक क्रीम त्वचेवर आठवडाभर लावण्यासाठी देण्यात आले. उर्वरित लोकांवर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत.

त्यानंतर आलेल्या निष्कर्षांवर आधारित उपचार पद्धती बदलण्यात आली. दोन्ही जोडीदारांवर नियमित उपचार करण्यात आले.

ब्रिटिश असोसिएशन फॉर सेक्शुअल हेल्थ अँड एचआयव्हीनं म्हटलं आहे, "हा शोध महत्त्वाचा पुरावा देतो की, बीव्हीशी संबंधित बॅक्टेरिया लैंगिक क्रियेतून संक्रमित होऊ शकतो."

प्रवक्त्यानं सांगितलं, "हे संशोधन बीव्हीबद्दलची आमची समज वाढवतं. हे आश्वासक दृष्टी प्रदान करतं आणि उपचार पद्धतींचं मार्गदर्शन देखील करतं."

तुम्हाला एसटीआयची लक्षणं आढळल्यास किंवा बीव्हीबद्दल काळजी असल्यास तुमच्या डॉक्टरांना भेटा किंवा स्थानिक लैंगिक आरोग्य क्लिनिकला भेट द्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)