कॅलिफोर्निया : निवृत्त सैनिकाने नैराश्यातून केलेल्या गोळीबाराने घेतले 12 बळी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एक बारमध्ये गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. नैराश्येतून त्याने हे कृत्य केलं असावं असा संशय आहे. इआन डेव्हिड लाँग (28) असं त्याचं नाव असून त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली, त्याचा मृतदेह घटनास्थळी मिळाला आहे. लाँग हा माजी सैनिक होता.

काल झालेल्या या हल्ल्यात 12 जणांचा बळी गेला असून 10 गंभीर जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की लाँग याच्याविरोधात लोकांनी पूर्वी पोलिसांत तक्रारी केल्या होत्या. लाँग याने स्वःच्या घरी काही महिन्यांपूर्वी गोंधळ घातला होता, त्यात हस्तक्षेप करण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं होतं, अशी माहिती पुढं आली आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी लाँग याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा आजार असण्याची शक्यता व्यक्त केली होती. या आजाराला PTSD असंही म्हटलं जात. एखाद्या धक्कादायक घटनेनंतर काही लोक नैराश्येत जावू शकतात. त्यांच्या हातून हिंसक घटनाही घडतात.

इथल्या थाउजंड ओक्स शहरात हा प्रकार घडला आहे. बॉर्डरलाईन बार आणि रेस्तराँ नावाच्या या बारमध्ये हा हल्ला झाला आहे.

ही भयंकर घटना असल्याचं ट्विट डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे. तसंच त्यांनी पोलिसानं दाखवलेल्या धासडाचं कौतुक केलं आहे.

या ठिकाणी एका म्यूजिक नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं. साधारण 200 जण यावेळी या बारमध्ये उपस्थित होते.

पार्टी सुरू असताना डान्स फ्लोअरवर फायरिंग करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. सुरुवातीला हा फटाक्यांचा आवाज आहे असं काहींना वाटलं. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडक्या फोडून बाहेर उड्या मारल्या तर काहींनी टॉयलेटचा सहारा घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)