You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सूर्याचं अनोखं आणि थक्क करणारं रूप; आतापर्यंतची सर्वात स्पष्ट छायाचित्रे
- Author, व्हिक्टोरिया गिल
- Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
जगातील सर्वात शक्तिशाली सौर दुर्बिणीच्या (टेलिस्कोप) मदतीने शास्त्रज्ञांनी सूर्याच्या पृष्ठभागाची आजवरची सर्वात स्पष्ट आणि अत्यंत तपशीलवार अशी छायाचित्रं टिपली आहेत.
या छायाचित्रं आणि व्हीडिओंमध्ये सूर्यावरील 'भोवऱ्या'सारख्या हालचाली स्पष्ट दिसून येतात. अशा हालचाली यापूर्वी कधीही इतक्या स्पष्टपणे पाहायला मिळाल्या नव्हत्या.
सूर्यामधील अतिउष्ण वायू (गॅस) सतत हालचाल करत असल्यामुळे त्याचं चुंबकीय क्षेत्र वाकतं, फिरतं आणि त्याची रचना बदलत राहते.
सूर्यावरील या सततच्या भोवऱ्यासारख्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर फेकली जाते. त्यामुळे 'अंतराळातील हवामान' (स्पेस वेदर) तयार होतं. यामुळे पृथ्वीवरील वीज यंत्रणा, उपग्रहांमध्ये व्यत्यय आणि अंतराळात काम करणाऱ्या अंतराळवीरांवरांना इजाही होऊ शकते.
"ही सर्व ऊर्जा आणि 'स्पेस वेदर' निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे सूर्यच आहे," असं अमेरिकेतील नॅशनल सोल ऑब्झर्व्हेटरीचे (एनएसओ) डॉ. डेव्हिड बोबोल्ट्झ यांनी सांगितलं.
बोबोल्ट्झ यांच्या मते, सूर्याची अधिक तपशीलवार छायाचित्रं मिळाल्यास हवामान समजून घेणं आणि त्याला तोंड देण्यासाठी आधीच तयारी करणं सोपं होईल.
"स्पेस वेदर नेमकं कसं तयार होतं आणि त्याचा आधीच अंदाज कसा घेता येईल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला सूर्याचं विज्ञान अगदी लहानातल्या लहान तपशिलापर्यंत समजून घ्यावं लागेल."
हे संशोधन 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध झालं आहे. हवाई येथील उंच पर्वतावर उभारलेल्या 'इनोये सोलर टेलिस्कोप'मुळे हे शक्य झालं. या ठिकाणी स्वच्छ, निळं आणि धुळीपासून मुक्त आकाश असतं. त्यामुळे सूर्याचं अत्यंत स्पष्ट निरीक्षण करता येतं.
सूर्याच्या पृष्ठभागाचं अगदी जवळून निरीक्षण करताना शास्त्रज्ञांनी त्यावरील भोवऱ्यासारख्या फिरणाऱ्या हालचालींचे अत्यंत तपशीलवार फोटो टिपले.
एनएसओचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड कुरिद्झे यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, "या वळण घेणाऱ्या आणि फिरणाऱ्या हालचालींमुळे चुंबकीय ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा साचत गेल्यानंतर सूर्यावरील मोठ्या स्फोटांना कारणीभूत ठरू शकते."
सूर्यावरील स्फोटक घडामोडी
शास्त्रज्ञांनी सूर्यावर पाहिलेल्या या प्रक्रियेला 'केल्विन-हेल्महोल्ट्झ इन्स्टॅबिलिटी' असं नाव दिलं आहे.
ही प्रक्रिया तेव्हा घडते, जेव्हा दोन गरम वायूंचे प्रवाह एकमेकांच्या बाजूने सरकतात. त्यामुळे सुरुवातीला निर्माण होणारे छोटे बदल हळूहळू मोठ्या भोवऱ्यांमध्ये रूपांतरीत होतात.
समुद्रातही अशीच प्रक्रिया घडत असते. छोट्या-छोट्या लाटा पुढे जाऊन मोठ्या आणि शक्तिशाली लाटांमध्ये कशा बदलतात, हे यामुळे समजून घेण्यास मदत होते.
एनएसओचे डॉ. फ्रेडरिक वोगर यांनी सांगितलं की, सूर्याच्या पृष्ठभागावर ही प्रक्रिया सापडल्यामुळे केवळ स्पेस वेदर म्हणजेच अंतराळातील हवामान कसं तयार होतं हेच नाही, तर सूर्याचा पृष्ठभाग इतका प्रचंड गरम का असतो, याचंही स्पष्टीकरण मिळालं आहे.
यातून ऊर्जा वरच्या दिशेने कशी पोहोचते, हे लक्षात येतं.
ते म्हणाले, "सूर्याच्या वरच्या थरांमध्ये पुरेशी ऊर्जा साचली की ती अचानक बाहेर पडते. तेव्हा सौर ज्वाला (सोलर फ्लेअर) किंवा 'कोरोनल मास इजेक्शन' म्हणजेच सूर्याकडून प्रचंड प्रमाणात वायू आणि चुंबकीय ऊर्जा अवकाशात फेकली जाते."
डॉ. बोबोल्ट्झ म्हणाले, स्पेस वेदर समजून घेणं आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच हे नवीन संशोधन सूर्य ही एक 'अद्वितीय प्रयोगशाळा' असल्याचीही आठवण करून देतं.
ते म्हणाले, "सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास केल्याने आपल्याला भौतिकशास्त्राचे अनेक मूलभूत नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतात."
ते म्हणाले, "आइन्स्टाइनच्या 'सामान्य सापेक्षता सिद्धांताचा' (जनरल रिलेटिव्हिटी) पहिला प्रयोगातून मिळालेला पुरावा सूर्यग्रहणाच्या निरीक्षणांमधूनच मिळाला होता."
ते पुढे म्हणाले, "मानवी ज्ञानात भर पडण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग आणि संशोधन सातत्याने होत राहणं खूप गरजेचं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)