You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आयुर्वेद आणि होमिओपॅथीवर प्रश्न उपस्थित करणारे 'लिव्हर डॉक्टर' कोण आहेत?
- Author, विकास पांडे
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
कोची येथील राजागिरी रुग्णालयाच्या हेपॅटोलॉजी (यकृतविकार) क्लिनिकबाहेरची वेटिंग रूम आशा आणि निराशेच्या भावनांनी भरलेली आहे.
एक व्यक्ती शांतपणे खाली मान घालून बसला आहे, तो एकटक जमिनीकडे पाहत आहे. यकृताच्या (लिव्हर) गंभीर आजारामुळे तो खूप अशक्त झाला आहे. त्याला तातडीने उपचारांची गरज आहे.
शेजारीच एक कुटुंब जुन्या वैद्यकीय अहवालांची (मेडिकल रिपोर्ट्स) फाइल हातात घेऊन बसलं आहे. हे रुग्णालय आपल्या माणसाचा जीव वाचवेल, अशी अजूनही त्यांना आशा आहे.
आत डॉ. सिरिएक ॲबी फिलिप्स शांतपणे रुग्णाची तपासणी करत आहेत. एक रुग्ण त्यांच्या समोर बसला आहे. डॉ. फिलिप्स त्याच्याकडे थोडे पुढे झुकतात, त्याला एक प्रश्न विचारतात. त्यानंतर ते पुन्हा शांत होतात.
मी केरळमधील या क्लिनिकमध्ये 2 दिवस घालवले. मला वाटलं होतं की, मी एका वेगळ्याच व्यक्तीला भेटेल. कारण, फिलिप्स हे सध्या भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेले आणि वादग्रस्त डॉक्टरांपैकी एक आहेत.
त्यांचे समर्थक त्यांना 'पुराव्यांवर आधारित उपचारपद्धती किंवा वैद्यकशास्त्राचा' निर्भीड समर्थक मानतात. तर टीकाकारांच्या मते, ते वाद निर्माण करून लक्ष वेधून घेणारे व्यक्ती आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 3 लाखांहून अधिक लोक त्यांना 'लिव्हर डॉक' नावाने फॉलो करतात. तिथे त्यांनी होमिओपॅथीला 'खोटी उपचारपद्धती' असे म्हटलं आहे.
त्यांनी पर्यायी उपचार करणाऱ्यांना 'भोंदू डॉक्टर' असे म्हटले आहे. त्याचबरोबर, टीकाकारांना त्यांनी 'तुम्ही तुमची बुद्धी गहाण ठेवली आहे' अशा प्रकारचं वक्तव्यही केलं आहे.
पर्यायी वैद्यशास्त्राचे समर्थक आरोप करतात की, डॉ. फिलिप्स यांना भारतीय उपचारपद्धतीची पुरेशी माहिती नाही आणि ते त्यावर अयोग्यरीत्या टीका करतात.
त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सार्वजनिक आरोग्यविषयक माहिती असते. त्याचबरोबर तीव्र आणि परखड टीकाही पाहायला मिळते.
त्यांच्या पोस्टमध्ये अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींशी झालेल्या वादांचाही उल्लेख असतो. त्यांच्या बोलण्याची शैली अनेकांना उद्धट, असभ्य वाटते.
पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींची जबाबदारी असलेल्या आयुष मंत्रालयाने डॉ. फिलिप्स यांच्या प्रकरणावरून दोन औपचारिक समिती बैठका घेतल्या आहेत.
एकदा उत्तर प्रदेशमधील एक पोलीस निरीक्षक 2 दिवसांचा रेल्वेप्रवास करून त्यांची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यामागचं कारण म्हणजे त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट होती.
मागील 6 वर्षांत फिलिप्स यांच्याविरोधात 16 कायदेशीर प्रकरणं दाखल झाली आहेत. त्यापैकी काही प्रकरणांची सुनावणी अजूनही सुरू आहे.
सोशल मीडियावरील इमेजपेक्षा वेगळे 'लिव्हर डॉक्टर'
सोशल मीडियावर दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षात ते जरा वेगळे वाटले. आमच्या संभाषणादरम्यान ते अत्यंत शांत, संयमी आणि मोजकेच बोलणारे दिसले.
त्यांचे जुने रुग्ण, सहकारी आणि त्यांना जवळून ओळखणारे इतर डॉक्टरही त्यांच्याबद्दल असच सांगताना दिसले.
ते त्यांना नम्र, साधे आणि सभ्य व्यक्ती म्हणून ओळखतात.
परंतु, ते याबद्दल कोणताही संकोच न करता म्हणतात, "हे एक गूढ व्यक्तिमत्व आहे."
"सोशल मीडियावर माझ्यावर टीका करणारे लोक माझा तिरस्कार करतात. पण मी देत असलेली माहिती चुकीची आहे, हे ते सिद्ध करू शकत नाहीत. कधी कधी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी ठामपणे बोलावं लागतं, थोडा आवाज वाढवावा लागतो. माझ्या मुख्य संदेशावरून लोकांचं लक्ष विचलित होऊ नये, म्हणून मी मुद्दाम ट्रोलर्सला उत्तर देतो."
ते म्हणतात, "मी प्रत्यक्षात तसा नसतानाही लोक मला उद्धट किंवा रागीट समजत असतील, तर ती किंमत मोजायलाही मी तयार आहे."
भारतातील पारंपरिक आयुर्वेद उपचारपद्धती आणि मद्य यावर ते सातत्याने टीका करताना दिसतात.
आयुर्वेदावर लाखो लोकांचा विश्वास आहे. सरकारच्या मदतीने चालणाऱ्या अनेक वैद्यकीय महाविद्यालयांचाही त्यांना पाठिंबा मिळतो. त्यामुळे आयुर्वेद आजही अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे.
मग त्यांनी त्याला आव्हान देण्याचा करण्याचा निर्णय का घेतला? आणि सोशल मीडियावर इतकी आक्रमक भूमिका का स्वीकारली?
याचं उत्तर माझ्या स्वतःच्या आयुष्यात दडलं आहे, असं ते यावर म्हणतात.
वादाच्या केंद्रस्थानी असलेले डॉ. फिलिप्स कोण आहेत?
फिलिप्स यांना सुरुवातीला डॉक्टर व्हायचं नव्हतं. त्यांना लेखक बनायचं होतं. चित्रपटांचीही त्यांना मोठी आवड होती. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं त्यांचं कधीच स्वप्न नव्हतं.
परंतु, केरळमधील प्रख्यात गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉ. फिलिप ऑगस्टिन यांचा मुलगा असल्याने, डॉक्टर होण्याचा त्यांचा निर्णय हा जवळपास आधीच ठरलेला होता.
पहिल्याच प्रयत्नात त्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी त्रिशूरमधील एका निवासी कोचिंग सेंटरमध्ये 9 महिने घालवले.
तिथे त्यांना 40 मुलांसोबत छोट्या खोलीत दाटीवाटीने राहावं लागायचं. त्या दिवसांची आठवण सांगताना ते म्हणतात, "पहिल्या आठवड्यात मी रडत-रडतच कसाबसा झोपायचो."
दुसऱ्या प्रयत्नात ते वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.
ते हसत सांगतात, "बंगळुरूच्या सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजमध्ये शिकताना मी खूप आनंदी होतो."
एक वेळ अशीही आली की, मद्यपानाच्या परिणामांमुळे त्यांना स्वतःच्याच प्राध्यापकांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करावं लागलं.
कोलकात्यात एमडी करत असताना त्यांना वैद्यकीय क्षेत्राचं खरं महत्त्व जाणवलं.
ते 3500 खाटांचे सरकारी रुग्णालय होते. तिथे नेहमीच औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असायची.
त्यांनी पाहिलं की, इन्सुलिनचा साठा संपल्यामुळे डॉक्टरांना मधुमेहाच्या गंभीर रुग्णांवरही इन्सुलिनशिवाय उपचार करावे लागत होते.
मर्यादित साधनांमुळे कोणत्या रुग्णाला आधी उपचार द्यायचे, यासारखे कठीण निर्णय डॉक्टरांना घ्यावे लागत असल्याचेही त्यांनी पाहिलं.
ते म्हणतात, "इतक्या मर्यादित सुविधा असूनही लोक आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करत होते. रुग्णांनाही अनेक अडचणी होत्या, पण तरीही ते समाधानी होते. माणसा-माणसांमधील असं नातं मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं."
यानंतर त्यांनी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलिअरी सायन्सेसमध्ये यकृतविकार (हेपॅटोलॉजी) विषयाचे प्रशिक्षण घेतले.
ते आपली शैक्षणिक कारकीर्द घडवत होते. त्याच काळात त्यांच्या वडिलांचं रुग्णालय एका उद्योगसमूहाने आपल्या ताब्यात घेतलं.
वडिलांची वैद्यकीय प्रॅक्टिस पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला.
ते म्हणतात, हा निर्णयही पूर्णपणे त्यांचा स्वतःचा नव्हता.
पर्यायी वैद्यकशास्त्रावर टीका
केरळमधील एका नवीन रुग्णालयात काम करत असताना त्यांनी पहिल्यांदाच मद्यपानाच्या व्यसनाचे दुष्परिणाम जवळून पाहिले.
नियंत्रणाशिवाय वापरल्या जाणाऱ्या हर्बल औषधांमुळे (वनौषधी) किती नुकसान होत आहे, हेही त्यांनी पाहिलं आहे.
एक 6 वर्षांची मुलगी कावीळ आणि यकृत अचानक निकामी झाल्याच्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली.
कुटुंबीयाने तिला ताप आणि सर्दीसाठी घरात तयार केलेला हर्बल काढा दिला होता.
ते म्हणतात, "त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना मला 2 आठवडे अत्यंत कठीण काळातून जावं लागलं."
या घटनेनंतर त्यांना या विषयात रस निर्माण झाला. पर्यायी औषधं आणि मद्यपानाच्या व्यसनामुळे होणाऱ्या परिणामांचा त्यांनी अभ्यास सुरू केला.
त्या वेळी त्यांच्या राज्यात ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली होती.
ते म्हणतात की, त्यांनी पर्यायी वैद्यकशास्त्राचा विज्ञान आणि इतिहासाचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं.
त्यांना केवळ डॉक्टर म्हणून राहायचं नव्हतं, तर त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात शास्त्रीय आणि शिस्तबद्ध अभ्यासपद्धती आणायची होती.
त्यांनी सोशल मीडियावर आपल्या केस स्टडी शेअर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फार कमी लोकांनी त्याकडे लक्ष दिले. नंतर त्यावर विरोध सुरू झाला.
लाखो लोकांचा पारंपरिक वैद्यकशास्त्रावर दृढ विश्वास आहे. अनेकांना वाटतं की, त्यावर आधुनिक वैद्यकीय नियम लावणं म्हणजे संस्कृती नष्ट करण्यासारखं आहे.
टीकाकारांचं म्हणणं आहे की, फिलिप्स केवळ या विश्वास किंवा समजुतीवरच प्रश्न उपस्थित करत नाहीत, तर त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा अपमानही करतात.
पण ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, माघार घेत नाहीत. ते म्हणतात, "मी उपचार करणाऱ्या व्यक्तींना भोंदू किंवा बोगस डॉक्टर म्हणत नाही. पण या पद्धतीची तत्त्वं वैज्ञानिक विचार किंवा तार्किक कसोटीवर टिकत नाहीत, एवढंच मी सांगतो."
"आधुनिक वैद्यकशास्त्रात चुका झाल्या, तर त्या सुधारल्या जातात. परंतु, पर्यायी वैद्यकशास्त्रात अशी तयारी किंवा परिपक्वता दिसत नाही. त्या स्वतःच्या मर्यादा किंवा चुका मान्य करण्यास तयार नसतात."
यानंतर त्यांनी पारंपरिक भारतीय औषधांमुळे यकृतावर होणाऱ्या दुष्परिणामांवर अनेक संशोधनपर लेख प्रकाशित केले आहेत. हे सर्व लेख तज्ज्ञांकडून तपासणी झालेल्या (पीअर-रिव्ह्यू) वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
म्हणजे अशा वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये संशोधन प्रसिद्ध होण्यापूर्वी त्या विषयातील तज्ज्ञ त्याची तपासणी आणि समीक्षा करतात.
जेव्हा आयुष मंत्रालयाने त्यांच्या एका अभ्यासावर प्रश्न उपस्थित केला, तेव्हा त्यांनी वैज्ञानिक पुरावे आणि तथ्यांच्या आधारे त्याला उत्तर दिले.
त्यांनी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून भारतात विकल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडर आणि जेनेरिक औषधांच्या गुणवत्तेची तपासणीही करून घेतली.
'माझ्या प्रत्येक रुग्णाचा मृत्यू माझ्या स्मरणात राहिला...'
नुकतंच डॉ. फिलिप्स यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित एक पुस्तकही लिहिलं. पण या प्रवासात त्यांना आर्थिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठी किंमत मोजावी लागली.
ते म्हणतात की, त्यांचं रोजचं काम कोणालाही नैराश्यात टाकू शकतं. त्यांचे अनेक रुग्ण यकृताच्या गंभीर आजारांशी झुंज देत असतात.
भारतात मद्यपानामुळे होणारे यकृताचे आजार वेगाने वाढत आहेत, विशेषतः तरुणांमध्ये. सर्वांनाच यकृत प्रत्यारोपणाची सुविधा मिळत नाही. काही लोक खूप गरीब असतात.
काही रुग्ण खूपच गंभीर अवस्थेत असतात. काही जण मद्यपान सोडू शकत नाहीत. अशा बहुतांश रुग्णांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत त्यांचं काम म्हणजे शक्य तितक्या वेदना कमी करून मृत्यूला सुसह्य बनवणं.
ते म्हणतात, "रुग्ण शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी आणि समाधानी राहील याची काळजी घ्यावी लागते. कुटुंबाला हे समजावून सांगावं लागतं की, रुग्णाचा अंत जवळ आहे. त्यांचा मृत्यू सन्मानपूर्वक व्हावा यासाठी प्रयत्न करावे लागतात."
हे सांगताना ते काही क्षण थांबतात.
ते म्हणतात की, डॉक्टरांना नेहमी अशी प्रतिमा राखावी लागते जणू ते देवासारखे आहेत. ते एखाद्या ढालीसारखे असतात, जी सगळा भार सहन करते पण स्वतः मात्र शांत आणि स्थिर राहते.
"मी तुम्हाला सांगतो, सगळं काही अगदी व्यवस्थित असतं असं नाही."
त्यांनी इतक्या मृत्यू प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी केली आहे की, त्यांची संख्याही त्यांना आता आठवत नाही. आणि प्रत्येक मृत्यूचं दुःख त्यांच्या मनात कायम राहतं.
एकदा ते एका गंभीर रुग्णाबाबत कनिष्ठ डॉक्टरांशी फोनवर बोलत असताना कार अपघातातून ते थोडक्यात बचावले. या घटनेनंतर त्यांनी आपली दिनचर्याच बदलून टाकली.
आता ते दररोज केवळ 25 रुग्ण तपासतात. ही संख्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांपेक्षा आणि त्यांच्या वडिलांपेक्षाही खूप कमी आहे. त्यांचे वडील आजही दिवसाला 100 पेक्षा जास्त रुग्ण तपासतात.
4 वर्षांपूर्वी त्यांनी मद्यपानही सोडलं आहे. ते म्हणतात, "मी स्वतः दारू पित असताना रुग्णांना ते सोडायला कसं सांगू शकलो असतो?"
त्यांना ऑनलाइन गेम्स खेळायला आवडतं. ते आपल्या कुटुंबासाठी आणि छंदांसाठीही आवर्जून वेळ काढतात.
ते म्हणतात, "लोकांना वाटतं मी नेहमीच सोशल मीडियावर असतो, पण तसं नाही. मी केवळ मर्यादित वेळेसाठीच ऑनलाइन असतो आणि तेही एका विशिष्ट उद्देशानेच."
संशोधनासोबत न्यायालयीन लढाईचाही खर्च
त्यांची पत्नी टीना कोलकात्यातील दिवसांपासून त्यांच्यासोबत आहेत. रुग्णांसोबत असलेलं त्यांचं नातं त्या अगदी सोप्या शब्दांत सांगतात.
त्या म्हणतात, "ते खूप संयमी आहेत."
त्या पुढे म्हणतात, "त्यांना मला काही सांगायचं किंवा शिकवायचं असेल, तर ते घाई करत नाहीत. वेळ घेतात आणि खूप चांगल्याप्रकारे समजावून सांगतात."
त्या क्षणभर थांबतात आणि म्हणतात, "सोशल मीडियावर ते जसे दिसतात, प्रत्यक्षात ते तसे अजिबात नाहीत."
त्यांचे वडील डॉ. ऑगस्टीन म्हणतात की, सुरुवातीला मुलाच्या सोशल मीडिया प्रोफाइलबाबत त्यांना आक्षेप होता.
ते म्हणतात, "मला त्याची काळजी वाटते. पण तो जे काम करतो, त्याचं महत्त्वही मला समजतं."
तरीही यासाठी वैयक्तिक पातळीवर त्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. गेल्या 6 वर्षांत त्यांच्याविरोधात अनेक कायदेशीर खटले दाखल करण्यात आले आहे.
ही प्रकरणे पर्यायी उपचारपद्धती म्हणजेच वैद्यकशास्त्राशी संबंधित तज्ज्ञ आणि काही कॉर्पोरेट समूहांनी दाखल केली आहेत.
या प्रकरणांमध्ये काही वकिलांनी त्यांची बाजू विनामूल्य मांडली, त्यांनी कोणतेही शूल्क घेतलेलं नाही.
तरीही स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागले आहेत.
त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याला संयुक्त संशोधन लेखाच्या प्रकरणात चौकशीसाठी अडवण्यात आलं. त्यानंतर ते भारत सोडून गेले.
आता काही संशोधक त्यांच्यासोबत संशोधन लेख प्रकाशित करण्यासाठी आपलं नाव जोडण्यास तयार नाहीत.
तरीही ते थांबायला तयार नाहीत.
ते म्हणतात, "कायदेशीर लढाईवर खर्च करण्यापूर्वीही मी या औषधांच्या तपासणीसाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करत होतो. सामान्य लोकांसमोर सत्य येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण असं सत्य त्यांना कधीच समजलं नसतं."
"माझ्यासाठी हे काम माझ्या सुरक्षिततेपेक्षा आणि आरामापेक्षाही कितीतरी महत्त्वाचं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)