You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू, आईसह तिन्ही लेकरांचा जीव गेला; आतापर्यंत कुणाला अटक?
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, धाराशिव
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नळदुर्ग किल्ल्यावरील घटनेतील मृत कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या उपचार घेत असलेल्या मुलीचाही मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असलेल्या अश्विनी पौळ यांच्या मृत्यूनं धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
3 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह तुळजापुरातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याच्या बुरुजावरून खाली पडल्या.
या घटनेत अश्विनी पौळ यांच्यासह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरी मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर धाराशिवच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मुलीचीही प्राणज्योत मालवली.
या प्रकरणात अश्विनी पौळ यांचे पती मनोहर पौळ आणि सासरे अंकुश पौळ यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता, दोन्ही आरोपीना न्यायालयानं 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
दरम्यान, अश्विनी पौळ यांच्या माहेरच्या कुटुंबीयांना सासरच्या लोकांवर आरोप केलेत. त्याबद्दल त्यांच्या सासरच्या लोकांकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता, अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.
तसंच, आरोपींच्या बाजूने वकीलही उभे राहिले नसल्याचं समोर आले आहे.
(आत्महत्या ही गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील एखादी व्यक्ती तणावातून जात असेल तर भारत सरकारच्या 'जीवन आस्था' हेल्पलाइन 18002333330 वर संपर्क साधू शकता. मित्र, नातेवाईक किंवा विश्वासू व्यक्तींशीही संवाद साधणं महत्त्वाचं आहे.)
नेमकी घटना काय घडली?
अश्विनी मनोहर पौळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होत्या. त्या मूळच्या लातूरच्या निलंग्यातील आंबुलगा (पौळ) गावच्या होत्या. त्यांचं वय 30 वर्षे होतं.
गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी तीन मुलांसह धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावर त्या गेल्या होत्या. त्यावेळी मुलांसह खाली पडल्या होत्या.
घटनेत अश्विनी, त्यांची दोन मुलं अजिंक्य (वय वर्षे 5) आणि क्रांती (वय वर्षे अडीच) यांचा अश्विनी यांच्यासोबत जागीच मृत्यू झाला, तर तिसरी मुलगी वीरा (वय वर्षे अडीच) ही गंभीर जखमी झाली होती. धाराशिवच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. पण तिचाही अखेर मृत्यू झाला.
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील एक नावाजलेल्या कुस्तीपटू होत्या. कुस्ती क्षेत्रातील त्यांच्या कारकीर्दीमुळे त्यांना 'महाराष्ट्राची वाघीण' म्हणून ओळखले जात असे.
2007 साली केरळच्या तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अश्विनी पौळ यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तसेच 2008 आणि 2009 मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली होती.
आपल्या कारकिर्दीत अश्विनी यांनी एकूण 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके मिळवली होती.
ज्या नळदुर्ग किल्ल्यावर ही घटना घडली, तिथे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी या घटनेबद्दल सांगितलं की, "एक महिला तीन मुलांबरोबर किल्ल्यावर आली होती. तिच्या बॅगेत केक असल्याचे आम्ही पाहिले.
किल्ल्याच्या परिसरात केक कापता येणार नाही, असे आम्ही तिला सांगितले. त्यानंतर त्या तिथून परत गेल्या. काही वेळाने त्या पुन्हा किल्ल्यात आल्या. आम्ही लहान मुलांना नेऊ नका असं सांगितलं. पण तरीही त्या गेल्या. त्यानंतर किल्ला पाहत असताना त्या बुरुजावर चढल्या आणि त्यानंतर ही घटना घडली."
आतापर्यंत दोघांना अटक
या घटनेनंतर अश्विनी पौळ यांचे वडील तानाजी शिवाजी मोहिते यांनी 4 सप्टेंबर 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार, अश्विनीचा पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पंढरीनाथ पौळ, सासू कालिंदा अंकुश पौळ आणि पतीची आत्या विमलबाई यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम 80, 85, 108, 3(5) या कलमांअन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
"सासरच्या मंडळींकडून अश्विनीला सातत्यानं शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचललं," असं अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांनी तक्रारीत म्हटलं.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मनोहर पौळ आणि अंकुश पौळ यांना अटक केलीय.
कौटुंबिक वाद, हुंड्याची मागणी, मानसिक छळ किंवा अन्य काही कारण या घटनेमागे आहे का, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)