राजा शिवाजी : वादग्रस्त मुद्दे टाळून व्यावसायिक चतुराईने बनवलेला, तरीही प्रचंड मर्यादा असलेला सिनेमा

फोटो स्रोत, JioStudios
- Author, अक्षय शेलार
- Role, चित्रपट अभ्यासक
- वाचन वेळ: 9 मिनिटे
साधारणतः दहा-बारा वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटाला इतिहासज्वराची (व त्यानंतर लगेचच युद्धज्वराची) लागण झाली. असा संसर्ग (ट्रेंड म्हणू हवं तर) मराठी चित्रपटसृष्टीत पसरायला वेळ लागत नाही.
त्यामुळे मराठीतही 'तथाकथित' इतिहासपट बनू लागले. या इतिहासपटांना एका व्यक्तीचं, व अर्थातच ती व्यक्ती ज्या काळात जगली व तिने जो काळ गाजवला त्या काळाचं प्रचंड आकर्षण होतं. तसं ते आकर्षण अजूनही आहे. ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
चित्रपट अकॅडमिक पद्धतीने इतिहास उभा करत नसतात, तर त्यातून इतिहासाचे पुनर्कथन केले जाऊन इतिहासाची भावनिक पुनर्रचना करण्यात येते. आता, शिवाजी महाराजांवरील चित्रपट ही बाब इतकी कुतूहलजनक का बनते, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
त्याआधी आणि आणि त्यानंतरही अनेक राजे झालेच की, परंतु शिवाजी महाराजच का? तर, याचे एक कारण असे की, शिवाजी महाराज कधीही 'केवळ इतिहासाच्या पानांवरील एक व्यक्तिरेखा' म्हणून आपल्यासमोर येत नाही. उलट सांस्कृतिक-प्रतीकात्मक व्यक्तिमत्व म्हणून ठाशीवपणे उभे राहतात.
हे प्रतीक कशाचं आहे, तर तत्कालीन इतिहासात इतर राजांचे मुघल साम्राज्याविरुद्ध बंड करण्याचे प्रयत्न असफल ठरत असताना गरीब, शेतकरी वर्गाला हाताशी घेऊन स्वराज्याची निर्मिती करण्याच्या धाडसी कारवायांचं ते प्रतीक आहे.
शिवाय, उभं केलेलं राज्य कशा आदर्श रीतीने चालवायचं याविषयीच्या कामकाजाची आणि दस्तवेजांची जोड या शौर्याला आहे. त्यामुळे यात एक संतुलितपणा पाहायला मिळतो. बुद्धिमत्ता आणि शौर्य, न्याय आणि नीतीमत्ता असे महत्त्वाचे की-वर्ड्स आपल्याला पदोपदी पाहायला मिळतात.
आणि सिनेमाच्या केसमध्ये असे की-वर्ड्स आणि त्यांना लागून येणाऱ्या अचंबा वाटायला लावणाऱ्या घटना फार महत्त्वाच्या ठरतात. कारण, चरित्रपट आणि इतिहासपट तयार करताना घटनांकडे इतिहासाचे संक्षिप्त (कंडेन्स्ड्) प्रतीकात्मक रूप म्हणून पाहावे लागते.
शिवकालीन इतिहासात शाहिस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग, अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, गनिमी कावा, इत्यादी अनेक घटना विविध माध्यमांमधून वारंवार मांडलेल्या असल्यानं सार्वजनिक स्मृतीमध्ये ठसठशीत झाल्या आहेत. त्यामुळे त्या तात्काळ उजागर करता येतात. आपण एकूणच इतिहासाकडे विखंडित घटनांच्या स्वरुपात पाहत असतो.
शिवकालीन इतिहासाला तर हे अधिकच लागू होते. कारण, चमत्कृतीपूर्ण म्हणावेत असे अनेक पराक्रम शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात घडलेले असल्यानं आणि ते (विशेषतः महाराष्ट्रात) सर्वपरिचित असल्यानं अनेक पात्रांची आणि घटनांमागील संदर्भचौकटीची मुळापासून वेगळी पायाभरणी करावी लागत नाही.
याखेरीज आणखी एक मुद्दा असा की, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भावनिक आवाहन करणे फार सोपे झालेले आहे. त्यामुळे चित्रपटासारख्या खर्चिक माध्यमाच्या दृष्टीने सिनेमात वापरायचे म्हणून शिवाजी महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व बनते. कारण, भावनिक गुंतवणुकीच्या बळावर ब्राऊनी पॉइंट्स मिळवून आर्थिक गुंतवणुकीवर परतावा मिळवणे तुलनेने सोपे असते.
थोडक्यात, सार्वजनिक स्मृतीमध्ये ठळकपणे अस्तित्त्वात असलेला एक जननायक सर्वांना हवाहवासा वाटतो व त्याचा वापर करावासा वाटतो. या अर्थी रामाच्या व्यक्तिरेखेचाही दाखला देता येऊ शकतो. कारण, तिथेही रामासोबत जोडला जाणारा आदर्शपणा, देवत्व यांमुळे एक नायक, त्याचे काही सहकारी आणि एक अथवा अनेक खलनायक लोकांना आधीच माहित असतात व त्यामुळेच ते सिनेमात आणणं सोपं होतं. कॅरेक्टर आर्क्स शून्यातून उभ्या कराव्या लागत नाहीत.

फोटो स्रोत, Instagram/Riteish Deshmukh
अनेक स्कॉलर असे म्हणतात की, इतिहासपट एकंदरीत कितीही काल्पनिक असले तरी ते भूतकाळ समजून घेण्यासाठीची महत्त्वाची आणि वैध साधनं बनतात. पोस्ट-लिटरेट जगात वाचन शक्य असूनही सिनेमा पाहून 'इतिहास' जाणून घेणं अधिकाधिक सोपं आणि सोयीस्कर झालेलं असल्यानं असं घडतं. हाच मुद्दा आपल्याला 'राजा शिवाजी' या रितेश देशमुख दिग्दर्शित ताज्या चित्रपटापर्यंत आणून सोडतो.
'राजा शिवाजी' चित्रपट पूर्वार्धात बाल शिवाजी आणि पौगंडावस्थेतील शिवाजी यांभोवती फिरतो. असे करताना त्याआधीच्या पिढीतील, तसेच तत्कालीन राजकारण पाहायला मिळते. मराठ्यांना मुघलांनी व खुद्द इतर मराठ्यांनी दिलेला दगा, छुपे वार आणि कारवाया अशा गोष्टी त्यात येतात.
शिवकालीन इतिहासाची मूलभूत माहिती तुम्हाला असायला हवी, या अर्थी हा सिनेमा प्रेक्षकांना किंचित गृहीत धरतो. त्यामुळे त्यात राजकीय इतिहास आणि घटनांचे खूप जास्त सुलभीकरण केलेले नाही. अनेकदा चित्रपटाची लांबी कमी ठेवण्याच्या दृष्टीने आणि तो रंजक, रोचक व्हावा या हेतूने सूचक व प्रतीकात्मक मांडणी करावी लागते अशावेळी तसे सुलभीकरण नक्कीच करावे लागलेले आहे.
यातून एका महत्त्वाकांक्षी चित्रपटविश्वाची पायाभरणी घडते. आपल्याला ज्ञात-अज्ञात घटनांच्या माध्यमातून, वास्तविक घटनांना काल्पनिक प्रसंगांची जोड देऊन शिवकाळाची सुरुवात दाखवली जाते.
समकालीन सरधोपट सौंदर्यशास्त्र आणि वेगळी वाट
समकालीन चित्रपटांच्या दृष्टीने हिंसा ही जगभरातील चित्रपटांसोबतच भारतीय चित्रपटांच्या सौंदर्यशास्त्राचा अविभाज्य भाग बनली आहे. शिवकालीन चित्रपट (याला शिवपट म्हणण्याचा मोह आवरतोय) त्याला अपवाद ठरत नाहीत. हिंसा हा एखाद्या काळातील जगण्याचा, विशेषतः पराक्रमी लोकांच्या जगण्याचा भाग असताना हिंसा टाळावी, असे म्हणून चालत नसते. परंतु, हिंसेची बटबटीत व आक्रस्ताळी मांडणी नसावी, ही अपेक्षा नक्कीच ठेवता येते. समकालीन लोकप्रिय चित्रपटांकडे पाहिल्यास हिंसेचे सरधोपट सौंदर्यशास्त्र आपल्या लक्षात येऊ शकते. मात्र, गडबड अशी आहे की, आपले इतिहासपटही याच सौंदर्यशास्त्रानुसार बनवले जातात. वास्तविक पाहता त्या काळातील हिंसेचे दृश्य रूप अधिक वेगळे असायला हरकत नसते.
मराठ्यांच्या शौर्याच्या, मुघलांच्या क्रौर्याच्या घटनाही मूलतः हिंसक स्वरूपाच्या असल्याने त्या तशाच स्वरुपात इथे येतात. जसे की, अफजल खानाने हत्तीचा वापर करून एका मराठा कुटुंबाची केलेली हत्या किंवा शिवाजी महाराजांनी जावळीचे मोरे आणि त्यांना शरण गेलेला मात्र, बहुतांशी वेळा ती हिंसा त्या-त्या प्रसंगांमध्ये अपरिहार्य वाटते, तसेच ती दिसताना अगदीच बटबटीत दिसत नाही, हे लेखक-दिग्दर्शक यांचे यश होय (याला अपवाद असलेल्या काही प्रसंगांचा उल्लेख लेखात पुढे येईलच).
सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये (आणि एकूणच सार्वजनिक स्मृतींमध्ये) शिवाजी महाराज एक 'नॅशनलिस्ट आयकॉन' म्हणून उभे राहतात. मात्र, अशा पराक्रमी आणि बुद्धिमान पात्रांच्या बाबतीत नेहमी घडणारी बाब अशी की, या प्रतिमाशास्त्रात व्यक्तिरेखेचे सद्गुण आणि आदर्शवादी भूमिका वगळता इतर काहीही दाखवणे जवळपास अशक्य होते.
देशमुखांचा चित्रपट त्यास अपवाद आहे. रितेश देशमुख यांनी स्वतः साकारलेला शिवाजी समकालीन आक्रस्ताळ्या सिनेमांचा प्रभाव पूर्णतः टाळू शकत नसला तरी त्यात श्रेष्ठ राजाची वल्नरेबिलीटी आणि संवेदनशीलता जरूर दिसते. कारण, आयुष्यात इतके उतारचढाव पाहिलेल्या माणसाचे आयुष्य एकाच एका साच्यातील असू शकत नाही, याची निर्मात्यांना जाण आहे.
उदाहरणार्थ, व्यक्तिरेखा म्हणून व एक माणूस म्हणून पाहत असताना शिवाजी या व्यक्तीच्या मनात भीती, हतबलता अशा भावना कधीच दाटून आल्या नसतील का? अनेकांनी दिलेला दगा पाहून रागाव्यतिरिक्त आणखी काहीही वाटलं नसेल का? आपले वडील आणि मोठा भाऊ हे दोघेही आपल्यापासून इतकी वर्षे दूर आहेत हे पाहून त्यांना कधीच हतबल किंवा उदास वाटलं नसेल का? असे प्रश्न मला पडत असत. या सिनेमात यातली काही अंगं जरूर दिसतात. आपली बायको सईबाई मृत्यूच्या दारात आहे हे पाहून कंठ दाटून येणारे प्रेमळ, करुण शिवाजी दिसतात. मोठ्या भावाच्या, संभाजीच्या मृत्यूच्या बातमीने किंचित कोसळून पडलेला लहान भाऊ दिसतो. आईचा जिवलग मुलगा, बायकोचा जोडीदार, रयतेचा राजा दिसतो. हे सारे प्रचंड सुंदर गुण आहेत. आणि तेच तर या पात्राला मानवी बनवतात!

फोटो स्रोत, Instagram/Riteish Deshmukh
त्यामुळे दिग्दर्शक देशमुख आणि लेखक अजित वाडीकर, संदीप पाटील यांनी सरधोपट वाट सोडून मोठ्या चतुराईने निर्माण केलेलं हे अंग फारच रोचक आहे. कारण, यामुळे राजा शिवाजी हे केवळ देव्हाऱ्यात ठेवायचे आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये मिरवायचं प्रतीक नसून एक जिवंत माणूस होता, हे मनावर ठसतं.
सार्वजनिक प्रतिमा आणि प्रतीकं विरुद्ध व्यक्तिमत्त्व या दृष्टीने एकूणच समजाचा गोंधळ उडालेला असताना हा निर्णय चित्रपटातही किंचित तळ्यात-मळ्यात स्वरूपाचा वाटतो. शिवाजी महाराजांचा न्याय्य संताप आणि लढा दाखवताना स्लो-मोशन शॉट्स, क्लोज-अप्स दाखवून, समकालीन चित्रपटांत दिसते तशी दृश्यभाषा वापरून त्यांचे नायकत्व अधोरेखित करण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे हे समीकरण एकाचवेळी रोचक आणि मर्यादा अधोरेखित करणारं ठरतं. दिग्दर्शकच स्वतःच शिवाजी महाराजांची भूमिका रेखाटत असल्याने असं घडत असावं हे मान्य असलं तरी समकालीन दृश्य सौंदर्यशास्त्राचा प्रभाव नाकारता येऊ शकत नाही.
'राजा शिवाजी' पुष्कळ चतुराईनं बनवलेला चित्रपट आहे. त्यात व्यावसायिक मराठी-हिंदी चित्रपटांना साजेसं सुलभीकरण आहे, पण अनेक वेळी ते टाळलेलं देखील आहे. शिवाय, शिवकालीन इतिहासाबाबत गेल्या काही वर्षांत वादग्रस्त बनलेले मुद्दे वगळले आहेत. उदा. दादोजी कोंडदेव किंवा (किमान या भागात तरी) समर्थ रामदास अशी पात्रे पाहायला मिळत नाहीत. रामदास स्वामी भालजी पेंढारकरांच्या 'छत्रपती शिवाजी' (1952) या एरवी उत्तम सिनेमातही दिसले होते, हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं.
परंतु, असे इतर गुरु टाळले तरी खुद्द जिजाऊंचं मूल्य सिनेमात जरा कमी झाल्याचं दिसतं. सती जाणं नाकारून राज्यकारभार करणाऱ्या जिजाबाई प्रचंड विवेकी, बुद्धिमान, मुत्सद्दी व्यक्ती असणार हे नक्की. शिवाजी राजांना पुष्कळ विद्या आणि भाषा अवगत होत्या. त्यासाठी स्वतंत्र शिक्षक होते. असं असलं तरी जिजाबाईंइतकी खमकी स्त्री आई असताना शिवाजी महाराजांना मनोबल आणि अंगभूत चातुर्याच्या बाबतीत तिऱ्हाईत 'मेंटॉर्स'ची उणीव भासली नसावी. 'राजा शिवाजी'मध्ये मात्र त्यांना अगदीच दुय्यम किंवा अगदी तिय्यम म्हणावी अशी भूमिका मिळते. त्यामुळे पात्र म्हणून व शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील योगदान म्हणून त्यांचं महत्त्व पुरेसं अधोरेखित होत नाही.

फोटो स्रोत, Instagram/Mumbaifilmcompany
याउलट, यापूर्वीच्या चित्रपटांमध्ये जवळपास न दिसलेले, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचं पात्र तपशिलात समोर येतं. या चित्रपटकर्त्यांनी हे पात्र इतक्या रोचक पद्धतीने वापरण्याच्या, संपूर्ण चित्रपटाचा, तसेच शिवाजी महाराज आणि जिजाबाईंच्या कृतींचा आणि साहजिकरीत्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं भावनिक अँकर पॉइंट म्हणून वापरण्यामागील प्रेरणांचा मुळातून विचार करायला हवा. कारण, आजवरच्या चित्रपटांचा आणि लोकप्रिय कथनांचा विचार करता भोसले कुटुंबापैकी जिजाबाई आणि शहाजीराजे भोसले या दोघांचा व त्यांच्या मूल्यांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता, असे चित्र पाहायला मिळालं आहे. इतर चित्रपटकर्त्यांचा अभ्यास कमी पडला की कल्पनाशक्ती, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, या चालीवर भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली, यासारख्या सरसकट सोप्या मार्गांवर अवलंबून न राहता इतर तपशील समोर आणून इतिहासाचे पुनर्कथन करणे कधीही इष्टच, नव्हे का?
या अशा इमोशनल अँकर पॉइंट्समधून सिनेमाच्या कथनातील भावनिक पाया अधिक भक्कम केला जातो. 'अंगावर काटा आला' हा एक वाक्प्रचार आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. त्यात अभिप्रेत काय असतं, तर एक प्रेक्षक म्हणून एखादी व्यक्ती जणू त्या ठिकाणी, त्या ऐतिहासिक, भावनिक क्षणी त्या तिथे उपस्थित होती अशी भावना प्रेक्षकाच्या मनात उजागर होणं. नेमक्या याच गोष्टीला अॅलिसन लँड्सबर्ग या अभ्यासिकेने 'प्रॉस्थेटिक मेमरी' अशी संज्ञा दिली आहे.
लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' (2025) पाहून लोकांना ते ज्या काळात अस्तित्त्वातदेखील नव्हते त्याविषयी हतबल, अस्वस्थ वाटून मनात प्रचंड राग निर्माण होणं, रडू कोसळणं यांसारख्या घटनांकडे 'प्रॉस्थेटिक मेमरी'च्या दृष्टीनं भारतीय व विशेषतः महाराष्ट्रीयन संदर्भचौकटीतील उदाहरण म्हणून पाहता येतं. हे महत्त्वाचं का ठरतं, तर सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भावनांनी प्रेरित असतो. आणि 'राजा शिवाजी'मध्ये केलेला त्याचा वापर नेहमीच्या उथळपणाच्या पलीकडे जातो.
माध्यमाच्या मर्यादा
शिवाजी महाराज कसे फार उत्तम रणनीतीकार होते, गनिमी कावा, गडकिल्ले जिंकण्याच्या आणि त्यांची डागडुजी करण्याच्या पद्धती, अष्टप्रधान मंडळ, राज्याभिषेकापर्यंत पोचेपर्यंतची एकूणच प्रक्रिया आणि महत्त्वाकांक्षा, उत्तम न्यायनिवाडा, इत्यादी बाबी आपल्यातील बऱ्याच लोकांना माहित असाव्यात. भले हा चित्रपट केवळ अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगापर्यंतचाच असला तरी कार्यपद्धतीच्या दृष्टीनं सारं काही वरवरच्या स्वरुपात दिसतं.
इथे चित्रपटकर्त्यांच्या बाजूने असा बचाव करता येईल की, उपरोक्त काही गोष्टी मुळात माध्यमाच्या मर्यादा आहेत. कारण, शिवकालीन इतिहास आणि शिवाजी राजाचा पराक्रम ही संपूर्ण गाथाच मुळी एखाद्या भव्य मालिकेच्या स्वरुपात मांडावी अशी आहे. चित्रपटमालिका बनवली तरी त्यात लांबी आणि सर्वांना किंवा अनेकांना खुश करण्याच्या दृष्टीने सुलभीकरण करण्याची गरज अंगभूत असते. त्यामुळे काही ठिकाणी अशी तडजोड करावी लागते. तरी, या मर्यादांवर मात करता येणं शक्य आहे हे आपण राजामौलीच्या 'बाहुबली'सारख्या (2015-17) किंवा मणी रत्नमच्या 'पोण्णियीन् सेल्वन्: भाग 1 व 2' (2022-23) यांसारख्या चित्रपटांतून पाहिलं आहे.
'राजा शिवाजी' चित्रपटाचं छायाचित्रण संतोष सिवन या मणी रत्नमच्या हक्काच्या आणि निर्विवादरीत्या उत्कृष्ट छायाचित्रकाराने केलेलं आहे. आणि असं असूनही या चित्रपटात काहीएक प्रसंग वगळता सबंध चित्रपट म्हणून सदर चित्रपटात भव्यता जाणवत नाही. काही लढाया चांगल्या दाखवल्या आहेत. परंतु, अनेकदा गोष्टी लुटुपुटूच्या व कृत्रिम वाटतात. केवळ शिवाजी महाराजांवरील चित्रपट असल्यानं आणि अजय-अतुल यांचं चांगलं संगीत (पार्श्वसंगीत जॉन स्टुअर्ट एडूरी) आहे म्हणून आपला आपण तो भव्य-दिव्य असल्याची खोटी समजूत करून घ्यायची का? साहजिकच ही बाब दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख यांच्या मर्यादा दाखवून देणारी आहे.
आपल्याकडील तथाकथित ऐतिहासिक सिनेमांविषयीचा आणखी एक मोठा आक्षेपार्ह मुद्दा असा की, त्यात चक्क इतिहासाचाच अभाव असतो! तपशीलच नसतात. ना भाषिक, ना सामाजिक-सांस्कृतिक तपशील, ना दृश्य तपशील. चित्रपटांचे सेट आठवड्याभरापूर्वी उभारून पूर्ण झाल्यासारखं स्पष्ट दिसतं. भक्कम दगडी असणं अपेक्षित असलेल्या गोष्टीही इतक्या तकलादू दिसतात की विचारू नये! चकचकीत दागिने आणि कपडे कुठल्यातरी पेटीतून नुकतेच काढल्याचं जाणवतं. अभिनेते कुठल्या प्रांतातला ग्रामीण लहेजा आणतात, ते त्यांचं त्यांना ठाऊक! 'राजा शिवाजी'मध्येही या साऱ्या उणिवा दिसतात. पुन्हा एकदा, ही बाब दिग्दर्शनाशी आणि एकूणच व्हिजनशी निगडीत आहे.

फोटो स्रोत, Instagram/Riteish Deshmukh
डिजिटल तंत्रज्ञानामुळे सगळे काही चकचकीत व सुस्पष्ट दिसत असताना दृश्य घटक अधिक खुपतात. कपडेपट ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर आहे का, हा वेगळाच मुद्दा. परंतु, त्यातली रेष अन् रेष स्पष्ट दिसत असताना अनेक प्रसंगांमध्ये कपडे इतके नवेकोरे वाटतात की थक्क व्हायला होते. अगदी गोरगरीब जनता आणि मावळ्यांचे कपडेदेखील इतके चकचकीत नि नवे असत? निर्मितीच्या दृष्टीने चित्रपटाची स्केल इतकी मोठी असूनही या गोष्टी लख्खपणे जाणवतात हा भाग भव्यदिव्य कलाकृती निर्माण करताना त्यात डोकावणाऱ्या दृश्य कृत्रिमतेचं द्योतक आहे.
रांझ्याच्या पाटलाचे हात छाटण्याचा प्रसंग त्यातले वाईट व्हीएफएक्स आणि प्रॉस्थेटिक्स (किंवा खरंतर त्यांचा अभाव) यांमुळे एखाद्या बी-ग्रेड सिनेमाप्रमाणे (इथे बी-ग्रेड या शब्दाचा अर्थ म्हणजे कमी बजेट असलेले, त्या दृष्टीने लुटुपुटू प्रॉप्स वापरून सरधोपटपणे तयार केलेले यथातथा दर्जाचे चित्रपट होय) 'श्लॉक' (निम्न, निकृष्ट दर्जाचा) स्वरूपातील भासतो. हीच बाब हत्तींच्या प्रसंगांनाही लागू पडते. इतरही काही प्रसंगांचा दाखला देता येईल, पण ती अनावश्यक पुनरावृत्ती ठरेल.
यापैकी काही मुद्दे चित्रपट या माध्यमाला टेलिव्हिजन मालिकांसारखे स्वरूप मिळण्यातून उद्भवतात. 'राजा शिवाजी'मध्ये ते कमी प्रमाणात घडत असले तरी घडते खरे. बहुतांशी अभिनेत्यांचे विशिष्ट नाटकी बेअरिंग, फ्लॅट लायटिंग आणि छायाचित्रण, निकृष्ट व कामचलाऊ वाटणारे व्हीएफएक्स, लढाया लुटुपुटूच्या भासतील असे प्रॉप्स हे सारे मालिकांमध्ये सर्रास दिसणारे प्रकार आहेत.
सिनेमातील काही घटक उत्तम असूनही भव्यता आणि सिनेमाच्या तंत्राच्या दृष्टीने, दृक्-श्राव्य भाषेच्या दृष्टीने 'राजा शिवाजी' प्रचंड मर्यादा असलेला आहे. मात्र, आधी उल्लेख केल्याप्रमाणे मराठी-हिंदीतील इतर इतिहासपटांची, विशेषतः शिवकालीन चित्रपटांची दयनीय अवस्था पाहता हा चित्रपट तुलनेने सुखद आहे, हेही आवर्जून सांगावे लागेल.
वासरांतली लंगडी गाय शहाणी म्हणण्याचे दिवस सरावेत, हा भाग वेगळा!
(या लेखात लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























